|| सुलभा आरोसकर
अंध, दृष्टिहीन, चक्षुहीन, दिव्यांग, काहीही म्हटलं तरी वास्तव राहतं ते आयुष्यात आलेल्या तिमिराचं. आज जगभरातील कोट्यवधी लोक या परिस्थितीचा सामना करीत आयुष्य पुढे नेत आहेत. काहींचं काम स्वत:पुरतं मर्यादित आहे, तर काही इतरांना प्रतिकू लतेतून अनुकू लतेचा धडा देत आहेत. अशीच ही काही आपल्या कर्तृत्वानं उंच झालेली माणसं – इतिहासाच्या अभ्यास, संशोधनात वेगवेगळे प्रयोग करत विद्यार्थ्यांमध्ये त्याची गोडी लावणाऱ्या, तेरा भाषा अवगत असणाऱ्या प्राध्यापक डॉ. अभिधा धुमटकर, खेळाडू आणि मार्गदर्शक असं दुहेरी नाव कमावणाऱ्या नेहा पावसकर, वकिलीच्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवलेल्या कांचन पमनानी, अपघातानं अंधत्व आल्यानंतरसुद्धा ठाम उभे राहात इतर दिव्यांगांना पायावर उभं करणारे हेमंत पाटील आणि स्वत:अंध नसताना ब्रेल लिपीत साहित्यनिर्मिती करणारे स्वागत थोरात, ही मंडळी दृष्टिहीनांसाठी काठीसारखा कणखर आधार झाली. काल झालेल्या ‘पांढरी काठी दिना’च्या (१५ ऑक्टोबर) निमित्तानं के वळ दृष्टिहीनांनाच नव्हे, तर समाजालाच प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कथा. 

दिठींच्या दिशा खोल तेजाळताना…

तमाच्या तळाशी दिवे लागले रे, दिवे लागले!

 शंकर रामाणी यांच्या शब्दांतून उतरलेलं आणि पद्माजा फेणाणी-जोगळेकर यांनी गायलेलं गाणं ऐकलं आणि मन कातर झालं. ज्या अभागी जीवांच्या चक्षूंचं तेज नियतीनं हिरावून घेतलं आहे, अशा व्यक्तींच्या मनाची ओथंबलेली जिद्द, ऊर्मी त्यांना प्रकाशवाट दाखवते, हेच या गीतातून सांगितलंय का? असं वाटत राहिलं आणि आठवली, काही तेजोमय आयुष्यं ज्यांनी स्वत:ला तिमिरातून बाहेर काढत इतरांनाही प्रकाशवाट दाखवली.

इतिहास एक प्रक्रिया आहे. त्याचा आवाका खूप मोठा. घर, गाव, शहर, देश, परदेश, पृथ्वी, आकाश येथील कोणत्याही क्षेत्रात भूतकाळाचा धांडोळा व भविष्याचा वेध इतिहासाशिवाय मानव घेऊच शकणार नाही, हे माहीत असलेल्या

प्रा. डॉ. अभिधा धुमटकर हा वारसा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असोशीनं पुढे नेत आहेत. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात त्या इतिहासाच्या विभाग प्रमुख आहेत. इतिहासाच्या अनुषंगानं अनेक वाटा विद्यार्थ्यांमध्ये झिरपाव्यात, मुराव्यात म्हणून त्या प्रयत्नशील आहेत.

  डॉ. अभिधा या जन्मापासून दृष्टिहीन. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता, जिज्ञासा, जबरदस्त आत्मविश्वास, ज्ञानार्जनाची आस, त्याच्या जोडीला मृदू, आनंदी असा त्यांचा स्वभाव. आईवडिलांनी सामान्य मुलांच्या शाळेत घालून, सर्जनशीलतेचं बीज पेरतच त्यांची जडणघडण केली. इतिहासाची आवड तेवती ठेवायला सुवर्णयोग जुळून आले. त्यांचे हितचिंतक

प्रा. सिक्वेरा यांनी एखाद्या घटनेतला कार्यकारणभाव, ती घटना का घडली?, त्याचा परिणाम, जगातील इतिहासाचा, घडामोडींचा एकमेकांवर काय प्रभाव पडतो?, याचा शोध घ्यायला त्यांना उद्युक्त केलं. राजा-प्रजा-समाज हे बिंब-प्रतिबिंब आहे, ही दृष्टी दिली.

प्रा. जगन्नाथ नाईक, दत्तो वामन पोतदार, यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण शिकवलं. या सर्वांमुळेच त्यांचा इतिहासाचा ‘कॅनव्हास’ वाढत गेला. आखाती युद्ध, सद्दाम हुसेन, सोव्हिएत युनियन, युरोपियन इतिहास, १७८९ ची फ्रें च राज्यक्रांती व आपल्याकडील अँग्लो-फ्रें च दुही, हे सर्व त्या इतकं मंत्रमुग्ध होऊन शिकवतात, की तो काळ, देश विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिलाच पाहिजे.

डॉ. अभिधांनी ‘एम.ए.’, ‘बी.एड.’, ‘नेट’, ‘सेट’, ‘पोस्ट डॉक’ या पदव्या मिळवल्या आहेत. ‘ब्रिटिश राज्यात महाराष्ट्रात झालेला विज्ञान प्रसार’ या विषयात ‘एम.फिल.’, ‘पीएच.डी.’ केलंय. विभाग प्रमुख पद भूषवताना श्रीलंका आणि ग्लासगो येथे जागतिक परिषदेत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. अभिधा भारतातील अशी पहिली अंध स्त्री व महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती आहेत, ज्यांना ‘चार्लस् वॉलेस इंडिया ट्रस्ट’तर्फे संशोधन फेलोशिपसाठी लंडनला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी भाषांचा तौलनिक अभ्यास सुरू केला. संस्कृत, सिंधी, बंगाली, उर्दू, जर्मन, फ्रेंचसहित जवळपास तेरा-चौदा भाषा त्यांना अवगत आहेत. मध्ययुगीन साम्राज्याच्या अभ्यासासाठी ब्राह्मी, मोडी, खरोष्टी, शारदा, ओल्ड नागरी, या लिपींच्या प्रेमात पडावंच लागेल. १२६०-१९६० पर्यंत अनेक व्यवहार आवर्जून मोडीत के ले जात, असं म्हणता येईल. हे जाणून साठ्ये कॉलेजमध्ये १६० तासांचा मोडी लिपीचा अभ्यासक्रम त्यांनी तयार के ला. त्यात कॅलिग्राफीचाही समावेश आहे. त्यांनी इतिहासाशी निगडित आर्कियॉलॉजी, स्थापत्यशास्त्र, नाणेशास्त्र, म्युझिकॉलॉजी , पुरातत्त्वशास्त्र, दप्तरखाना, अशा अनेक शाखांचा अभ्यास के ला आणि मुलांनाही ते ज्ञान त्या देत आहेत. कारण करिअर म्हणूनही या शाखांमध्ये अनेक संधी आहेत.  मार्गदर्शक म्हणून किं वा प्रबंध लिहिणे, मुलाखती देणे-घेणे यातही त्या विद्यार्थ्यांना पारंगत करत आहेत.  त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. मानवाची उत्क्रांती रंगवून सांगताना त्या अश्मयुगापासूनचा प्रवास चितारतात. इतिहासात दडलेलं विज्ञान, राजकारण, समाजकारण, नागरिकशास्त्र, कृषिशास्त्र, तंत्रयुग, असा सुंदर गोफ विणतात. अगदी पाककृती कशी चविष्ट होत गेली, हेही सोदाहरण पटवून देतात.

त्यांचं स्वत:चं ज्ञान गुणाकार वेगानं वाढतंच आहे, पण मुलांची कल्पकता, सर्जनशीलताही त्या वाढवत आहेत. त्यांची गाडी भन्नाट वेगानं, देशाचं, जगाचं भवितव्य उज्ज्वल करणाऱ्या तरुणांना घेऊन पुढे जात आहे. इतकं  ज्ञान मिळवण्यासाठी आणि ते दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांमध्ये वाटण्यासाठी दृष्टी नसणं हे त्यांनी आड येऊ दिलं नाही.

 कु सुमाग्रजांची ‘किनारा तुला पामराला ’या ओळींची आठवण यावी इतकं  त्यांचं कार्य मोलाचं आहे.

खेळातून अंधत्वावर मात

 कु सुमाग्रजांच्या याच ओळीचा प्रत्यय देणारं आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नेहा पावसकर. खेळ म्हणजे मानवी जीवांचा आनंदमयी स्त्रोतच. काही जणांमध्ये एखाद्या खेळाचं नैपुण्य जाणवतं, त्याला ते खतपाणी घालतात, प्रतिकूल परिस्थितीतही अनेक विक्रम  करतात. त्यातलीच समाजभान जागृत असलेली एखादी व्यक्ती आपला भवतालही आनंदमय करते. अशीच एक जिद्दी, आनंदी, खळाळून हसणारी, दृष्टिहीन खेळाडू म्हणजे नेहा पावसकर. पूर्वाश्रमीची चंद्रप्रभा नाईक. बुद्धीबळ, अ‍ॅथलेटिक्स, ज्युडो, जलतरण, गिर्यारोहण, गोल बॉल (Goalball) अशा विविध खेळांत विभागीय ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

त्यांचं  वास्तव्य मुंबईत. आईवडील, पाच भावंडं. पैशांची आवक तुटपुंजी, मात्र मायेची ऊब खूप. बालपणी लाडाकोडात वाढत असताना त्यांची दृष्टी खूप अधू आहे हे लक्षात आलं. अगदी जवळून वाचता येणारी दृष्टी नववी-दहावीपर्यंत अंधूक प्रकाश आणि नंतर गडद अंधारापर्यंत येऊन ठेपली. तिमिरातून बाहेर येण्यासाठी नेहा यांनी ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) संस्थेत धाव घेतली. तेथील अंध व्यक्तींमध्ये त्यांना सूर गवसला. यथावकाश कलाशाखेची पदवी घेऊन तात्पुरती नोकरीही  पत्करली. हे सर्व करताना त्या खेळांची आवड जोपासत होत्या. १९९१ मध्ये त्यांची विक्रीकर विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नियुक्ती झाली. या नोकरीबरोबरच त्यांनी खेळाचं प्रशिक्षणही पूर्ण केलं. १९९२ मध्ये ५४ गिर्यारोहकांबरोबर कुलूमनालीजवळील ‘क्षितीधर’ या १७,२२० फूट उंचीवरील ट्रेकला जाण्याची संधी त्यांना मिळाली. त्यात या तीन अंध स्त्रिया होत्या. निसर्गाची रौद्ररूपं अंगावर झेलत त्यांनी शिखरावर तिरंगा फडकवला. ‘लिम्का बुक’मध्ये त्याची नोंद झाली आहे. त्यानंतर डोळस नलिन पावसकर यांच्याशी त्यांचा  विवाहही झाला. त्यांना पतीची साथ सर्वार्थानं मिळू  लागली. १९९८ मध्ये बुद्धिबळात राष्ट्रीय विजेतेपद, २००४ मध्ये लंडन-स्टेफर्ड येथे अंधांच्या बुद्धिबळात पाचवं स्थान, २००५ मध्ये राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक, अशी घोडदौड चालू असतानाच नियतीनं दणका दिला. पती नलिन यांना जीवघेणा अपघात होऊन २६  ठिकाणी फ्रॅ क्चर झालं. ३ वर्षं ते अंथरुणाला खिळून होते. नेहा यांनी त्यांना भक्कम साथ दिली. सासूबाईंच्या आजारपणात, आईला कर्करोग झाल्यावरही त्या त्यांचा आधारवड झाल्या. अष्टभुजा दुर्गेसारखं त्या सर्व सांभाळत होत्या.

कठीण परिस्थितीतही त्यांचे छंद त्यांना ऊर्जा देत होते. लोणावळा ड्यूक्स नोज येथे ३,५०० फूट उंचीवर रॅपलिंग. जीवधन किल्ला ते खडापारसी- नाणेघाटातील व्हॅली क्रॉसिंग. १३,५०० फू ट उंचीवर चाललेल्या डोंगरी प्रशिक्षणाचे नेतृत्व. हिमालयातील १६,८०० फुटांवरील मोहिमेत कन्साल-सारपास-नागारू या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग. अशा लहानमोठ्या अगणित उपक्रमांत त्या स्वत:ला आनंदी ठेवत असतात.

यथावकाश उभयतांनी ठरवलं, की आपल्यातील कलागुणांनी दिव्यांगांच्या खेळातील नैपुण्याला प्रोत्साहन देऊया. या हेतूनं २००३ मध्ये ‘आएशा’ (एआयएएसएचए) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आजतागायत १० हजारच्या वर खेळाडूंना त्यांनी घडवलं. अंध क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, गोल बॉल, बुद्धिबळ, अनेक खेळांचं त्या नेतृत्व करत असतात. या संस्थेतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकं मिळवली आहेत. २०१७ मध्ये थायलंड-बँकॉक येथे अंधांसाठी झालेल्या ‘एशिया पॅसिफिक आंतरराष्ट्रीय गोल बॉल’ या स्पर्धेत त्यांनी नेतृत्व करून स्त्रियांची टीम नेली. भारतातून त्या वेळेपर्यंत एकाही टीमनं सहभाग घेतला नव्हता. विशेष म्हणजे हा गोलबॉलही त्यांच्याकडे नव्हता. थायलंडला गेल्यावर त्या फक्त तीन दिवस सराव करू शकल्या. बक्षीस म्हणून बॉल मिळाल्यावर मुंबईत प्रशिक्षण सुरू केलं. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्या एकमेव दृष्टीहीन खेळाडू होत्या. त्यात त्यांनी कांस्य पदक मिळवलं. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल सरकारनंही घेतली. २००४ चा ‘झोनाटा आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार’, २००५ चा ‘शिवछत्रपती राष्ट्रीय पुरस्कार’, २०१० मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

    हे पुरस्कार उमेद देतात, असं त्या म्हणतात. आपल्या ‘आएशा’ संस्थेतर्फे लाखो दिव्यांगांना मार्गदर्शन मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांची ही सत्शील प्रार्थना सत्यात उतरेल यात शंका वाटत नाही.        

कायद्यातल्या उच्चतम पायऱ्यांवर

 दिव्यांगांना मदत हा उद्देश समोर ठेवून कांचन पमनानी यांनीसुद्धा अनेक सोयीसवलतींचा लाभ त्यांना मिळावा यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्यातल्या अंधत्वावर मात के ली आहे. स्वत:मधील कमतरता धुडकावून मीही सर्वसामान्य माणसासारखं माझं जीवन फुलवू शकते, दुसऱ्याचं आयुष्य  मार्गी लावू शकते, हा विश्वास मनात अंकुरला, की त्याचं निर्धारात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. सॉलिसिटर कांचन पमनानींना रुबाबदार पेहरावात पाहिल्यावर याची खात्रीच पटते. त्यांचं अत्यंत मृदू, मैत्रीपूर्ण आश्वासक बोलणं ऐकल्यावर आपण त्यांच्या प्रेमातच पडतो! अधू दृष्टी ते दृष्टिहीनता या क्लेशकारक प्रवासातही ‘बी.कॉम.’, ‘एल.एल.बी.’, ‘एलएल.एम.’, सॉलिसिटर, अशा एकापेक्षा एक उच्च पायऱ्या त्या चढल्या. गेली कित्येक वर्षं मुंबई उच्च न्यायालयात आपल्या ज्ञानाचा उपयोग करत अडलेल्यांचा मार्ग खुला करत आहेत.

 विधात्याने पंचज्ञानेंद्रियांतील एक दान कमी दिलं, तरी सरस्वती, लक्ष्मीचा वरदहस्त त्यांना लाभलाय. लहानपणापासूनच निकोप, सकारात्मक ऊर्जा त्यांना घरातूनच मिळाली. शाळेपासूनच त्या हुशार आणि चुणचुणीत. वक्तृत्व, नेतृत्व नेहमीच उत्तम. शाळेच्या ‘सोशल वर्क’ विभागाच्या त्या अध्यक्ष होत्या.  शिक्षक, घर, आजूबाजूचे लोक अशा सर्वांचीच साथ मिळाल्यानं त्यांचं जीवन तेजोमय होत गेलं. सतत वेगवेगळं ज्ञान घेत त्यांनी स्वत:ला समृद्ध केलं. आज त्या वकिलीच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर आहेत. कंपनी कायदे, जमिनी कायदे, वारसा हक्क कायदे यात त्यांचा हातखंडा आहे. आपलं ज्ञानदान चोख व्हावं, म्हणून बौद्धिक स्वामित्व संपदा कायद्यातील पदविका घेण्याबरोबरच आणि इंग्लडमधील कायदे सोसायटीची ‘क्वालिफाइड लॉयर ट्रान्सफर’ परीक्षा त्यांनी दिली. कायदेपंडित म्हणजे अनेक किचकट कायदे, उपकायदे, खाचखळगे, वाटा-पळवाटा या सगळ्यांचा अभ्यास हवा. पुराव्यांची छाननी करणे, योग्य न्याय देणे, हा कोर्टकचेरीचा गाभाच. ‘तुम्हाला हे सर्व कसं जमतं?’ असं विचारताच त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

  दिव्यांग व्यक्तींचं समुपदेशन करणं, त्यांच्या समस्या सोडवणं, गरजूंना मदत करणं, अशी कामं त्या व्यवसाय सांभाळून करतात. साधे प्रश्न चर्चेद्वारे त्या सोडवतात. पूर्वी बँकिंग क्षेत्रात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका अंधांना देत नसत, ही बाब त्यांनी ‘रीझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ च्या डेप्युटी गव्हर्नरला पटवून देत या सुविधा उपलब्ध करून दिल्या. शेअर बाजारातही त्यांच्यामुळे दृष्टिहीन व्यक्ती उलाढाल करू शकतात. त्याचबरोबर पूर्वी पूर्ण परीक्षेत एकच लेखनिक हवा, ही अट होती. मात्र ही अट अन्यायकारक असल्याचं त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं. सरकारी संकेतस्थळं अंधांना उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांना करिअरच्या संधी धुंडाळताना, विविध गोष्टींची पूर्तता करताना त्रास होतो, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर त्या काम करत आहेत. मनात आलं, कांचन पमनानी नावाचं जहाज आपल्याबरोबर इतरांनाही दर्यापार नेतंय. त्यांचा हा प्रवास असाच अनेकांना लाभदायक ठरेल हे नक्की.

कामाचा अखंड झरा

असंच एक जहाज म्हणजे हेमंत पाटील. अत्यंत टापटीप राहणी, टवटवीत स्मितहास्य, समृद्ध ज्येष्ठत्व… बिचकणं  नाही, की बावरणं नाही. कोणालाही आवडेल असंच हेमंत पाटील यांचं व्यक्तिमत्त्व. ‘बी. फार्म.’ झाल्यावर अमेरिकेत संशोधन क्षेत्रात कार्यरत असताना रसायनाचा भडका उडून त्यांची दृष्टी गेली. विदीर्ण मनानं ते मायदेशात- आपल्या पिळोदे गावी परतले.

तिमिरातून तेजाकडे  जाणारा त्यांचा  पुढचा प्रवास मात्र आपल्याला थक्क करतो. स्वत:च्या पाऊलवाटा शोधण्यासाठी ते डोंबिवलीत आले. संपूर्ण मुंबई, आजूबाजूची शहरं यांची अंत:चक्षूंनी ओळख करून घेतली. फूटपाथवरच्या व्यवसायांची अंतर्बाह्य माहिती मिळवली. दरम्यान पत्नी अलका त्यांच्या जीवनात आल्या. त्यांच्या साथीनं सकाळी ६ ते रात्री १.३० पर्यंत फूटपाथवर व्यवसाय करून पुंजी साठवली. डोंबिवलीत १९८६ मध्ये स्वत:चा ‘झेप’  बंगला बांधला. जरा स्थिरता आल्यावर ‘बी.ए.’, ‘एम.ए.’ केलं आणि ‘नॅब’मध्ये नवीन अध्याय सुरू केला. अनेक दृष्टिहीनांचं, दिव्यांगांचं जीवन फुलवायचा त्यांनी विडा उचलला. दात्यांच्या मदतीनं हजारो बांधवांना स्वयंरोजगार दिले, देत आहेत. नव्यानं अंधत्व आलेल्यांकडे धाव घेऊन त्यांना ते समुपदेशन, मार्गदर्शन करतात. सरकारद्वारा मिळणारी आर्थिक, वैद्यकीय मदत मिळवून देतात. बहुविकलांग व्यक्तींना चाकाची  खुर्ची, बीन बॅग देऊन आश्वस्त करतात. आनंदाला पारख्या झालेल्या अशा मुलांच्या मातांसाठी त्यांनी ‘मातृमहोत्सव’ सुरु केला. दिव्यांग मुलांच्या शिक्षकांचा सन्मानही ते करतात. प्रत्येकाला जीवनानंद देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते करतात.

प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या हेमंत यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच सन्मान झाला आहे. ‘नॅब’चं माध्यम, पत्नीची खंबीर साथ आणि संवेदनशील मन यांनी त्यांचा दानयज्ञ, सेवाभाव फुलला. ‘नॅब’च्या उपसंचालक पदावरून २०१३ मध्ये ते निवृत्त झाले, तरी हे कार्य अव्याहत सुरूच आहे.

ब्रेल लिपीतील दिवाळी अंक

 स्वत: अंध नसूनही अंधांविषयी आत्मीयता असणारे स्वागत थोरात हे एक आगळं व्यक्तिमत्त्व.  ‘सिम्पथी’ आणि ‘एम्पथी’- अगदी जवळचे शब्द. मात्र ‘सिम्पथी’ जेव्हा ‘एम्पथी’मध्ये परिवर्तित होते, तेव्हा उत्तम कार्यकृतीचं बीज रुजवते. ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ अशी उपाधी ज्यांना बहाल केली आहे, त्या स्वागत थोरात यांचं अंधांना उभारी देण्याचं कार्य असंच फोफावलंय. स्वत: डोळस, पत्रकार असलेले स्वागत एका प्रसंगानं हेलावून गेले आणि आपला मोहरा त्यांनी ब्रेल लिपीकडे वळवला. आजतागायत दृष्टिहीनांच्या जीवनात ते चैतन्याची मशाल पेटवत आहेत.

‘काळोखातील चांदणे’ या माहितीपटाचं लेखन त्यांनी १९९३ मध्ये केलं आणि दृष्टीहिनांच्या भावविश्वाशी ते जोडले गेले. त्यांचं जगणं समजून घेण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून घरात वावरू लागले, खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्यांविषयी डोळस झाले. ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ या एकांकिकेचं लेखन, दिग्दर्शन करून पुण्याच्या महापौर करंडक स्पर्धेत ८८ अंध मुलांना रंगमंचावर आणलं. या प्रयत्नास सांघिक पहिलं बक्षीस आणि दिग्दर्शनाचंही पहिलं बक्षीस मिळालं. जागतिक रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं अंधांनी रंगभूमी भूषवली. हे यश ‘गिनीज बुक’ आणि ‘लिम्का बुक’मध्ये नोंदवलं गेलं. त्यानंतर त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक ४४ अंध मुलांसह पहिलं व्यावसायिक नाटक म्हणून के लं, ‘स्वयंवर’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटकं करून त्यांचं जीवन फुलवलं.

   या सर्व मुलांनी आपल्या या गुरूंना, ‘आमच्या अवांतर वाचनासाठी ब्रेल लिपीतून मासिक काढा,’ अशी आग्रही विनंती केली. त्यातून १९९८ मध्ये ‘स्पर्शगंध’ हा ब्रेल लिपीतील पहिला दिवाळी अंक स्वागत यांनी काढला. कवयित्री संजीवनी मराठे यांच्या ‘उठा मुलांनो उठा’ या कवितेचं ब्रेल लिपीचा आधार घेऊन दृष्टिहीन मुलांनी गायन के लं आणि टाळ्यांच्या कडकडाटानं आसमंत दुमदुमला. २००८ पासून त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ हे पाक्षिक मराठीत आणि २०१२ पासून हिंदीत सुरू केलं. हे भारतातील पहिलं नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक आहे. तसंच शेकडो मराठी पुस्तकांचं ब्रेलमध्ये लिप्यंतर केलं. २२ महाविद्यालयांच्या ग्रंथालयांत ब्रेल विभाग त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झालाय. २०१३ पासून ‘ब्रेल टेबल कॅलेंडर’ भारतभर अनेक अंध व्यक्तींच्या टेबलावर विराजमान झालं आहे. या मुलांना समाजात मानाचं स्थान मिळावं, यासाठी ते वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात. ‘स्पर्शांकित कविता’ या व्यासपीठावरून अनेक ब्रेल कथा, कविता, ललित साहित्य यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम रंगत असतो. दृष्टिहीनांचं समाजजीवन सहजसुलभ व्हावं म्हणून मोबिलिटी कार्यक्रम सुरू करून हजारो अंध व्यक्तींनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं. सहृदयी असलेल्या स्वागत यांनी या कार्यात स्वत:ला पूर्ण झोकून दिलंय. त्याची सर्वांत मोठी पोचपावती म्हणजे ब्रेललिपीतील पत्रांचा त्यांच्यावर होणारा वर्षाव. ‘हेच माझे समाधानाचे क्षण आहेत,’ असं ते सांगतात.

  गेली २५ वर्षं त्यांचा हा सेवायज्ञ सुरूआहे. त्याबरोबरीनं वन्यजीव छायाचित्रणाचा छंद त्यांनी जोपासला आहे. त्यांचं बालपण चंद्रपूरच्या आदिवासी भागात गेलं. ते सातवीत असताना वडिलांनी त्यांना जर्मन बनावटीचा ‘बुल्सआय’ कॅमेरा हाती दिला. प्राण्यांचं वर्तनशास्त्र, वनस्पतींचं जीवनचक्र, हे त्यांचे आवडते विषय. ५२ राष्ट्रीय उद्यानं, ३२० अभयारण्यांना भेटी  देऊन त्यांनी छायाचित्रण आणि व्हिडीओ चित्रण केलं आहे. त्या माध्यमातून शाळांतील मुलांमध्ये ते निसर्गाची आवड निर्माण करतात. त्यांच्याकडून दृष्टिहीनांचं जीवन असंच उजळत राहो हीच सदिच्छा!

  या सर्वांचा जीवनलेख डोळसांना मौल्यवान विचारांची  शिदोरी देतो. मला वाटतं, संजय चौधरी यांच्या पुढील बोलांचं बाळकडू या

सर्वांना बालपणीच मिळालं आहे. त्यातूनच

त्यांचं आयुष्य घडलंय आणि ते इतरांचंही

 घडवत आहेत-

आपल्या आतून जे उगवून येतात

तेच दागिने ल्यावे, नि सजावे

दुसऱ्या झाडाची फुलं माळून

    एखादं झाड सजल्याचं,

एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही…

sulabha.aroskar@gmail.com