scorecardresearch

Premium

वाचायलाच हवीत : मोठी तिची सावली..

मनाच्या अत्यंत अस्वस्थ अवस्थेतही पुस्तकावर राग काढणं चुकीचं आहे, हा त्यांचा विवेक आणि शहाणपण जागं होतं.

वाचायलाच हवीत : मोठी तिची सावली..

|| वंदना बोकील- कुलकर्णी

‘डेक्कन क्वीनच्या इंजिनाला जोडलेला खटारा’ इतकी कमालीची तफावत असणारं रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई हे जोडपं. त्यांच्या सहजीवनाचं ‘स्मृतिचित्रे’ हे पुस्तक त्याच्या कितीतरी पलीकडे जाऊन जीवनातील विसंगतीत सुसंगती शोधणारं आयुष्याचं तत्त्वज्ञान होऊन जातं. नितळ, प्रामाणिक मनाच्या लक्ष्मीबाईंनी यात जे ‘घडलं तसं मांडलं’ असलं तरी मिश्कील लेखणीतून उतरलेले त्यातील अनुभव आज 

union minister nitin gadkari comment on casteism in harsh words
“जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार,” नितीन गडकरी यांचे टीकास्त्र; म्हणाले…
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
traders making meal and breakfast arrangement maratha activists in apmc premises
चटणी भाकर प्रेमाची ….मराठा समाजाच्या भवितव्यची
pannalal surana article pays tribute to ex bihar chief minister karpoori thakur
सामाजिक न्यायाच्या वाटेवरचा जननायक

८५ वर्ष उलटून गेली तरीही अनेक गोष्टीचं अनुकरण करायला भाग पाडणारे आहेत, म्हणून  हे पुस्तक वाचायलाच हवं.

काही पुस्तकं तुम्हाला काठावरून मौज नाही पाहू देत. पाऊलभर पाण्यात पाय भिजवण्याचं चिमूटभर सुख ती नाही देत. ती एकदा वाचली की आपल्यात राहायलाच येतात आणि आपण त्यांच्याबरोबर वाढत जातो. लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ हे असं आपल्यात वस्तीला येणारं आणि आपल्याला वाढवणारं पुस्तक आहे. ते प्रसिद्ध झाल्याला आता ८५ वर्ष उलटून गेली आहेत. सकाळची गोष्ट संध्याकाळी विस्मरणात ढकलणाऱ्या आजच्या विलक्षण वेगवान जगण्यातून खरं तर तीही ‘विस्मृती’चित्रे झाली असती. पण तसं नाही झालेलं. का नाही झालं? तर त्याचं उत्तर त्या पुस्तकाच्या लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

   खरं म्हणजे या आत्मचरित्रावर उदंड लिहिलं गेलंय. वाङ्मयीनदृष्टय़ा तर ती मोलाची आहेतच, पण एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाची पहिली तीस वर्ष सामाजिक, सांस्कृतिक संदर्भासह खूप ठसठशीतपणे त्यातून उमटली आहेत! गंगाधर गाडगीळांनी ‘साहित्याचे मानदंड’मध्ये त्याची ही साहित्यिक महत्ता सांगताना ‘उत्कृष्ट पाश्चात्त्य साहित्याशी तुलना करता येईल असे आधुनिक मराठी पुस्तक’ म्हणून त्याचा  गौरव केला आहे.

   १९३४ ते १९३६ या काळात चार भागांत ते प्रथम प्रकाशित झालं. रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी ‘माझं चरित्र लिहायचं असेल तर जसं घडलं तसं लिहा,’ असं बजावून सांगितलं होतं. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या त्यांच्या पत्नीनं लिहिलेलं हे पुस्तक. रेव्हरंड टिळकांचं यथातथ्य चरित्र तर ते आहेच, पण त्याचबरोबर टिळकांच्या करुणावृत्तीच्या, दयाळू स्वभावाच्या आणि रसिक कवित्वाच्या सहवासाबरोबरच त्यांच्या विक्षिप्तपणाचे चटके सोसूनही त्यांच्या सहवासात फुलत गेलेल्या आणि स्वत:चा विकास घडवत गेलेल्या प्रसन्न, खेळकर आणि स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीचं लोभस दर्शनही ते घडवतं. लक्ष्मीबाईंच्या शब्दांत ‘डेक्कन क्वीनच्या इंजिनाला जोडलेला खटारा’ इतकी कमालीची तफावत दोघांत असूनही त्यांच्या अनोख्या प्रेममय सहजीवनाचं हृद्य चित्र त्यातून उमटलं आहे. पतीला परमेश्वर मानणाऱ्या ‘प.भ.प.’ (पतीभक्तपरायण) पत्नीचं ते आत्मचरित्र नाही. भल्याभल्यांना साधत नाही ती कलात्मक अलिप्तता लक्ष्मीबाईंना सहजधर्मानं साधली आहे. प्रांजलपणा हा त्यांचा स्वभावविशेष आहे. त्यामुळेच आजही ‘स्मृतिचित्रे’ ताजी वाटतात. आजही त्यातले अनेक प्रसंग हसवतात आणि अंतर्मुखही करतात.

 लक्ष्मीबाईंची (पूर्वाश्रमीच्या मनकर्णिका गोखले) मोठी बहीण भिकुताई त्यांच्यापेक्षा पंधरा-सोळा वर्षांनी मोठी. तिला नाशकात पेंडशांच्या घरी दिली होती. तिचे पती नानासाहेब पेंडसे यांनी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या भावंडांचं सर्व काही वडीलकीच्या मायेनं आणि आस्थेनं केलं. त्यांनीच लक्ष्मीबाईंचा विवाह टिळकांशी व्हावा यासाठी खटपट केली. १७-१८ वर्षांच्या टिळकांचं ८-९ वर्षांच्या मनू गोखलेशी लग्न लागलं. ही गोष्ट १८८०ची. मीठ-साखरेसारख्या वस्तूही धुऊन घेणाऱ्या कर्मठ नाना गोखल्यांची ही मनू पुढच्या आयुष्यात संत नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून माणूसधर्माचं पालन करणारी कशी झाली, याचा हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. रूढ अर्थानं अशिक्षित अशी ही बाई. पण विवेक, उपजत शहाणपण, आजूबाजूच्या जनव्यवहाराची उत्तम जाण तिच्या ठायी होती. तीच या लेखनाला अनमोल करते, अ-जर करते. आपल्या वडिलांच्या विक्षिप्त स्वभावाचे काही रंग रे. टिळकांच्या स्वभावातही आलेच होते. ‘त्यांनी न सांगता-सवरता वारंवार कुठे कुठे जावे. पोरसवदा लक्ष्मीबाईंनी रडत बसावे. घरातल्या मोठय़ा माणसांनी काळजीत पडावे आणि तरुणांनी त्यांचा शोध घेत फिरावे,’ हा टिळक दाम्पत्याच्या संसाराचा स्थायिभावच होता. टिळकांचा कोणत्याही माणसावर सहज विश्वास बसत असे. लक्ष्मीबाई म्हणतात, ‘टिळकांच्या या सद्गुणाला त्यांच्याच सहवासामुळे माझ्या संशयी वृत्तीचा ब्रेक उत्पन्न झाला. त्यांचा एखाद्या माणसावर विश्वास बसला की माझा हटकून त्याच्यावर अविश्वास ठेवलेला! यावरून आमचे नेहमी खटके उडायचे’.. ‘टिळकांना भय असे कोणाचेच वाटत नसे.. जर काही भय त्यांच्या हृदयात असेल, तर ते देवाचे व त्याच्या खालोखाल माझे!’ ‘पैसा असला म्हणजे तो जाईल कसा, याच्या काळजीत टिळक असत. तो राहील कसा, या काळजीत मी असायची. पैसा घालवणे सोपे असल्यामुळे या लढाईत नेहमी त्यांचाच विजय होत असे.’ अशा या तऱ्हेवाईक स्वभावाच्या, पण संत वृत्तीच्या माणसाचा संसार निभावताना खटके, भांडणं यांचे प्रसंग वारंवार येत असत. त्या त्या वेळी लक्ष्मीबाई  टिळकांच्या मागे सावलीसारख्या गेल्या हे खरं असलं तरी मेल्या मनानं नाही गेल्या. वेळप्रसंगी त्यांच्याशी भांडून स्वत:चं म्हणणं त्यांनी टिळकांना ऐकवलं. त्या काळातली ही बाई ज्या निर्मळपणे पतीपत्नींमधल्या भांडणांविषयी लिहिते, त्याचा आज अचंबा वाटतो. टिळकांनी आपलं मरण लवकर ओढवून घेतलं असं वाटल्यामुळे लक्ष्मीबाई म्हणतात, ‘आता स्वर्गात त्यांची गाठ पडली म्हणजे मी आधी त्यांच्याशी सपाटून भांडेन..’ 

  टिळकांच्या स्वभावाचे, वृत्तीचे, अव्यवहारीपणाचे अनेक भलेबुरे पैलू त्या ज्या सहजतेनं दाखवून देतात, ते वाचलं की एकीकडे त्यांच्या जीवनसंघर्षांची कल्पना येऊन जीव गलबलून जावा आणि त्याच वेळी तल्लख विनोदबुद्धी, मूळचा आनंदी आणि खेळकर स्वभाव यांमुळे असे प्रसंग त्या ज्या खुमासदारपणे कथन करतात, त्याची जाणीव होऊन बाईंविषयी कौतुक दाटून यावं, असं या पुस्तकाच्या वाचनात पानोपानी घडतं. ‘उपदेशाचे डोस नव्हे- चांगला टमरेलभर उपदेश टिळकांनी पाजला’ असं त्या लिहून जातात. ‘टिळकांच्या स्वभावात हा एक विशेष होता, की दृष्टीसमोर असेल ते त्यांना जीव की प्राण असे. एकदा का एखादी व्यक्ती किंवा काम दृष्टीआड झालं, की त्यांना पुष्कळदा त्यांची आठवणही राहात नसे. त्यांची ‘पाखरा येशील का परतून’ ही कविता एखाद्यानं त्यांनाच उद्देशून म्हटली असती तरी त्यात वावगे झाले नसते.’ असं लिहू शकणाऱ्या या बाईचा मोठेपणा दर वाचनात नव्यानं जाणवतो. आपल्या सहचराच्या स्वभावाची केवढी ही समज!  टिळकांना फार हौस, की आपल्या बायकोनं कोणीतरी मोठं व्हावं. लेखिका, कवयित्री, वक्ता बनावं. त्यामुळे ते नेहमी त्या दिशेनं प्रयत्न करत. एकदा अहमदनगरच्या ऐक्य सभेत त्यांनी लक्ष्मीबाईंचं भाषण ठरवलं. दहा मिनिटांचं भाषण त्यांना लिहून दिलं, ते पाठ करून घेतलं, रानात जाऊन मोठय़ानं म्हणून घेतलं. प्रत्यक्ष भाषणाच्या वेळी दहा मिनिटांतली नऊ मिनिटं त्या माईकसमोर नुसत्या गप्प उभ्या होत्या. आता त्या काही बोलत नाहीत, हे पाहून डॉ. ह्यूम व्यासपीठाकडे येताना दिसल्यावर लक्ष्मीबाईंनी घडाघडा पाठ केलेलं भाषण म्हटलं. पण घरी गेल्यावर मात्र त्या टिळकांवर रागावल्या. ‘इत:पर मी कोठे बोलावे असे तुम्हाला वाटत असेल, तर मी पाठ करून बोलणार नाही. मला माझ्या मनाला वाटेल तसे बोलेन. दुसऱ्याच्या लिहिण्याने माझ्या मनाचा गोंधळ होतो.’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पुढे त्यांनी अनेक सभांमधून भाषणं केली, पण कधी पाठ करून नव्हे. कोणताही आव न आणता लक्ष्मीबाई स्वत:चे शब्द आणि दुसऱ्यानं लिहून दिलेले शब्द यात फरक करतात. स्वत:चं काही म्हणणं असणं आणि ते बोलण्याची गरज असणं, धैर्य असणं, हेही त्या सहजपणे यातून सांगतात. पतीचा मोठेपणा त्यांना नीटच ठाऊक होता. म्हणून तर ते ‘डेक्कन क्वीनचं इंजिन’ असल्याचा उल्लेख त्या करतात. पण तरीही आपले विचार, आपलं म्हणणं आपण आपल्या पद्धतीनं मांडायला हवं, ही त्यांची समज मोलाची आहे आणि त्यांच्या स्व-तंत्र बाण्याची निदर्शक आहे. टिळकांचा ओढा ख्रिस्ती धर्माकडे आहे, ते ख्रिस्ती मंडळींत ऊठबस करतात, हे लक्षात येताच त्यांच्या नातलग आणि मित्रमंडळींत चलबिचल, भीती, राग असा संमिश्र भावनांचा कल्लोळ निर्माण झाला होता. घरात टेबलवर असलेली बायबलची प्रत पाहून कोणीसं म्हणालं, की जाळून टाका ते बंबात घालून. लक्ष्मीबाई म्हणतात, ‘हे शेवटचं बायबल आहे का? हे एक जाळले तर जगातील सारी ती पुस्तके जळून जातील का? तर मग मी ते जाळीत नाही.’ मनाच्या अत्यंत अस्वस्थ अवस्थेतही पुस्तकावर राग काढणं चुकीचं आहे, हा त्यांचा विवेक आणि शहाणपण जागं होतं.  टिळकांनी धर्मातर केलं, तो काळ लक्षात घेतला तर मृत्यूपेक्षाही भयंकर गोष्ट होती ती. लक्ष्मीबाई तेव्हा भिकूताईंच्या म्हणजे नानासाहेब पेंडशांच्या घरी होत्या. तिथे नातेवाईक आणि इष्टमित्र सारखे खेपा घालत, लक्ष्मीबाईंकडे, मुलगा दत्तूकडे पाहत डोळे पुसत. टिळक वारले की काय, या विचारानं लक्ष्मीबाईंचा धीर खचून गेला. जेव्हा त्यांना टिळक ख्रिस्ती झाले असून सुखरूप आहेत असं समजलं, तेव्हा लक्ष्मीबाई म्हणतात, ‘होऊ द्या ख्रिस्ती झाले तर. कुठेही असले आणि सुखरूप असले म्हणजे झाले. ते गेले तर काय, माझ्या कपाळाचे कातडे थोडेच काढून नेले आहे त्यांनी?’ स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचं हे भान फार महत्त्वाचं आहे. लक्ष्मीबाईंच्या धैर्याची आणि चिवटपणाची कसोटीच होती तेव्हा. धर्मत्याग केलेल्या माणसाची बायको म्हणून आप्तेष्टांत, समाजात मानहानी झाली, उपेक्षा झाली. त्यांना सुवासिनी समजावं, की विधवा, की परित्यक्ता, याच्या चर्चा होऊ लागल्या. लक्ष्मीबाई काही काळ अगदी भ्रमिष्ट झाल्या. पण त्यातून उत्कट जीवनेच्छेनं त्या तरून गेल्या. ‘मी मोठय़ा चिवट शरीराची आहे. कितीही संकटं येवोत, मध्येच म्हणून प्राण सोडायचा नाही.’ असं त्या लिहितात. खरोखरच आल्या परिस्थितीला तोंड द्यायला त्या सज्ज झाल्या आणि विचारांती स्वत:च निर्णय घेऊन त्या टिळकांबरोबर नगरला गेल्या. वेगळं बिऱ्हाड करुन तिथे राहिल्या.

लहानमोठय़ा अडचणींनी गांगरून जाणारे, ऊठसूट नैराश्यात जाणारे आणि आत्महत्येस प्रवृत्त होणारे आजूबाजूचे तरुण सुशिक्षित पाहिले, की वाटतं.. घ्या. हे वाचा. पतीशिवाय स्त्रीला अन्य गंतव्य नसे, अशा काळातली एक बाई केवढी चिवटपणे जीवनाची लढाई लढते! मुख्य म्हणजे हे सगळं लिहिताना त्याकडे बघणारी बाईंची दृष्टी नितळ, साधी आणि अभिनिवेशरहित आहे. जे जसं घडलं ते प्रसंगच त्या उभे करत जातात.  टिळकांच्या धर्मातरानंतर चार-साडेचार वर्षांनी लक्ष्मीबाईंनीही ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतला- तो इतका गांभीर्यानं, इतका समजून-उमजून, की टिळकांचं ‘ख्रिस्तायन’च्या लेखनाचं अपुरं राहिलेलं काम त्यांनी नंतर पूर्ण केलं. स्वत: ख्रिस्ती झाल्यावर लक्ष्मीबाईंची वाट पाहणारे टिळकही मोठे ठरतात. या वाट पाहण्याच्या मधल्या काळात लक्ष्मीबाईंशी त्यांचा सतत पत्रव्यवहार होता, संवाद होता. लक्ष्मीबाईंचं मन आणि मत वळवण्यासाठी टिळकांनी त्यांना जो अवकाश दिला, ती गोष्ट आजही अनन्य आहे हे जाणवतं. ‘माझी भार्या’ या कवितेत टिळक माता, कांता, कन्या यांबरोबरच मैत्रीच्या नात्याचाही उल्लेख करतात. हे टिळकांचं त्या काळाच्या पार्श्व भूमीवरचं कमालीचं वेगळेपण आहे. बाह्यरूपापेक्षा पत्नीचं असामान्य अंतरंग त्यांना महत्त्वाचं वाटलंय. त्यातून त्यांच्या विकसित प्रेमभावनेचं दर्शन तर घडतंच, पण त्यांच्या स्त्रीविषयक उदार दृष्टिकोनाचाही परिचय होतो. रचनेचं वळण जुनं असलं तरी स्त्रीच्या आंतरिक गुणांकडे लक्ष वेधणं हा या कवितेचा आशय आत्यंतिक आधुनिक आहे!  इतरांच्या दु:खाबद्दल टिळकांना कमालीचा कळवळा होता. अनेकदा जेवता जेवता ते मध्येच थांबत. हजारो लोकांची उपासमार होतेय या विचारानं त्यांची अन्नावरची वासनाच उडत असे. लक्ष्मीबाईंनी हे समजून घेतलं आणि मग पतीच्या समाजसेवेच्या ऊर्मीशी त्यादेखील एकरूप झाल्या. केवळ पतीचा मार्ग अनुसरायचा पत्नीधर्म म्हणून नव्हे!  

 प्रसववेदनांनी तळमळत असतानाही कनिष्ठ वर्गातील सुईण नको, म्हणून हट्ट करणाऱ्या लक्ष्मीबाई पुढे किती बदलल्या, कशा बदलल्या, याचा आलेख या पुस्तकातून उमटला आहे. आधी विचार बदलतात, मग आचार. लक्ष्मीबाई लिहितात, ‘धैर्यावाचून विचार लंगडे आहेत.’ हे धैर्य त्यांनी कसं कमावलं आणि अबाधित राखलं, ते अचंबित करणारं आहे. नवऱ्याच्या कर्तृत्वरेषेच्या कडेकडेनं, पण त्याच्याशी सुसंगत आपलं कार्यक्षेत्र उभारण्यात आणि कसोशीनं ते चालवण्यात लक्ष्मीबाईंच्या व्यापक माणुसकीचा जो प्रभावी प्रत्यय येतो, तो फार महत्त्वाचा आहे. विशेषत: सध्या केवळ स्वत: आणि स्वत:चं कुटुंब यांच्यापलीकडे आपली दृष्टी फारशी पोहोचतच नाही. करणारे काम करतात, त्यांच्याविषयी समाजमाध्यमांवर काही वाचलं की आपण फक्त ‘लाइक्स’ देतो. वसतिगृह बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा अनाथ व्हावं लागणाऱ्या एक-दोन नव्हे, २२ मुलांना लक्ष्मीबाई गाडग्या-मडक्यांच्या संसारात जर सहजपणे घरी आश्रय देऊ शकतात, तर भरल्या पोटी आपण मध्यमवर्गातली, सुरक्षित कोशातली माणसं आपला हात खिशात का घालत नाही, असं प्रश्नोपनिषद मनात सुरू होतं.  म्हणून ‘स्मृतिचित्रे’ वाचण्याचा कलात्मक आनंद तर घेऊच, पण हेही समजून घेऊ, की १८७३ मध्ये जन्मलेली एक स्त्री कर्मठपणाच्या कोषातून बाहेर पडून मानवी करुणेच्या स्पर्शानं इतकी मोठी झाली, की तिच्या संत पतीनं म्हटलं, ‘तू तर माझ्याही पुढे गेलीस !’

vandanabk63@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author vandana bokil kulkrani article vachyalach havit deccan queen reverend narayan waman tilak and lakshmibai are a couple akp

First published on: 19-02-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

×