योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे

वृद्धत्व येण्यापूर्वीच मी त्याचा विचार खूप आधीपासून केला होता. आयुष्यात तीन ‘प’ सांभाळायचे. पहिला ‘प’ पैसा. पुरेसे पैसे गाठीशी ठेवायचे. जेणेकरून वृद्धावस्थेत मिंधेपणा येऊ नये. दुसरा ‘प’ प्रकृतीचा! आपली माणसं आपला प्रतिपाळ प्रेमाने करतीलच, पण त्यांना त्रास द्यायला संकोच वाटतो. म्हणून शक्यतो प्रकृती सांभाळायची. ती कशी? तर आहार विहार आणि विश्रांती यांचं संतुलन हवं. पोटातील अर्धा भाग घन आहार, पाव भाग पाणी आणि पाव भाग मोकळा ठेवा.  तिसरा ‘प’ प्रतिष्ठेचा! स्वत:ची प्रतिष्ठा, आत्मसन्मान सांभाळायचा.

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
What Kangana Ranut Said?
कंगना रणौतचं प्रचाराच्या भाषणात वक्तव्य “आता भाजपा हेच माझं अस्तित्व, हीच माझी ओळख कारण..”
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

आयुष्य वाहतं राहण्यासाठी आयुष्याचा प्रवाह स्वच्छ, वाहता हवा. निरंतर साधना आणि योग प्रसाराचे कार्य यामुळे आज ८८व्या वर्षीसुद्धा मी न थकता वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करतो आहे.

वयाच्या अकराव्या वर्षी मी गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीत उतरलो. राष्ट्र सेवा दलाचं कार्य करू लागलो. स्वत: सूतकताई केलेले खादीचे कपडे परिधान करू लागलो. पण ज्या क्षणी त्या खादीला भंपकपणाचा वास येऊ लागला त्या क्षणी ती सोडली. मात्र चळवळीच्या प्रभावातून ध्येय निश्चित झालं. आयुष्यभर निरलसपणे कार्य करायचं ते राष्ट्र, समाज आणि संस्कृती यासाठीच! त्यादृष्टीने सांस्कृतिक संपन्नता असेल अशाच शहरांत स्थायिक व्हायचं या विचारांतून ठाण्यात स्थायिक झालो. २६ जानेवारी १९६५ रोजी ‘घंटाळी मित्र मंडळ’ ची स्थापना केली. मूठभर मंडळींना हाताशी घेऊन त्याच वर्षी घंटाळी देवीचं मंदिर, परिसर, पटांगण यांच्या सफाईचं काम केलं.

कधी कधी जीवनात एखाद्याचा स्पर्श, डोक्यावरील हात, नेत्रकटाक्ष, वर्तणूक, दर्शन, प्रवचन यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते. अशी कलाटणी ५ जानेवारी १९७१ला माझ्या आयुष्याला मिळाली. त्या दिवशी अनपेक्षितपणे काशिनाथ बाळकृष्ण सहस्रबुद्धे माझ्या घरी आले. ते योगविद्येचे प्रचारक. त्यांनी ठाण्यात योगविद्येचं शिबीर घ्यावं, असा प्रस्ताव मांडला. फुकट दिलं की फुकट जातं. म्हणून दहा दिवसांच्या शिबिराची नाममात्र पाच रुपये फी घेतली आणि ‘घंटाळी मित्र मंडळ’तर्फे योगविद्येचं पहिलं शिबीर घेतलं. त्या वेळी मला कळून चुकलं की योगविद्येत लोकांना ऊर्जा देण्याची, मरगळ घालवण्याची विलक्षण क्षमता आहे. मग मात्र दहा-बारा वर्ष वेडय़ासारखी योगसाधनेवरची पुस्तकं वाचली. मठ फिरलो. साधकांना भेटलो. तेव्हा कळलं, योगाभ्यासासाठी आधी स्वत:ला ओळखता यायला हवं. एकांतात साधना करायला हवी. तीन वर्ष मी मुंबादेवीच्या डोंगरावर एकांतात साधना केली. लेखन, वाचन, मनन केलं. त्यातून आत्मबोध, आत्मज्ञान मिळालं.

मी हाडाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी योगविद्या वापरायची हा माझा निश्चय आहे. कारण चांगली पिढी घडवण्यासाठी, लोकांचे आरोग्य टिकवण्यासाठी, माणसांमधली ऊर्जा जागवण्यासाठी योगविद्या हा बिनखर्चाचा आणि प्रभावी उपाय आहे. त्यादृष्टीने मी आजवर २८ प्रकल्प राबवले. त्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प सांगायचे तर, ९वी ते १५वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेला ‘मेधासंस्कार’ वर्ग. हा शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा होता. २४० शिबिरांमधून हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्याशिवाय डॉक्टर्स, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, स्थूलत्व, मधुमेह, थायरॉईड, रक्तदाबाचे रुग्ण – गर्भवती, मतिमंद यांबरोबर आदिवासी, विद्यार्थी अशा समाजातील सर्व घटकांसाठी योगविद्येची शिबिरं घेतली. प्राणायम शिबीर, आनंद ध्यान शिबीर, त्राटक शिबीर, आनंद साधना शिबीर यांमधून आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सामान्यजनांना गवसला.

योगविद्येच्या प्रसारातून थोर तपस्वी बाबा आमटे यांच्याशी स्नेह जुळला. आनंदवनात मूक, बधिर, अंध, अपंग यांच्यासाठी अनेक शिबिरं घेतली. त्यांचा लाभ हजारो योगसाधकांनी घेतला. पण यातील सर्वोच्च समाधानाचा क्षण होता जेव्हा आम्ही तुरुंगातील कैद्यांसाठी योगविद्येचे शिबीर घेतले तेव्हा. योगविद्येने कैद्यांच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल घडल्याचे तुरुंगाधिकाऱ्यांनी मान्य केले. जगभरातून या अभिनव प्रकल्पाची दखल घेतली गेली. त्या कैद्यांमधील तेरा जण आज योग प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. अर्थात योगविद्येच्या प्रसाराचं कार्य हा जगन्नाथाचा रथ आहे. साडेचार हजार प्रशिक्षक मी तयार केलेत. त्यांतील दोनशे योग प्रशिक्षक ‘घंटाळी मित्र मंडळा’त नि:शुल्क सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहेत. पैसा आणि प्रसिद्धी मती भ्रष्ट करायला कारणीभूत होते. माझ्यासह सर्व कार्यकर्ते त्यापासून दूर आहेत. माझे जागोजागी अनेक सत्कार होतात. सत्काराहून आल्यावर पैशांचं पाकीट मी संस्थेत जमा करतो आणि श्रीफळ माझ्या कार्यकर्त्यांना भेट देतो.

‘घंटाळी मित्र मंडळ’चे कार्य हा माझा प्राण आहे. पण तरीही अत्यंत निरलसपणे मी पदांचा त्याग केला आहे. प्रकल्प उभारायचा, कार्यकर्त्यांची टीम तयार करायची आणि विश्वासाने त्यांच्या हाती प्रकल्प सुपूर्द करायचा. संस्थेत एकाधिकार त्यांच्या हाती प्रकल्प सुपूर्द करायचा. संस्थेत एकाधिकार नाही, घराणेशाही आली की समजावे त्या संस्थेला भवितव्य नाही. माझ्या कार्यकर्त्यांना हे पक्कं ठाऊक आहे की इथे पद, प्रसिद्धी, पैसा मिळणार नाही. इथे मिळेल ते सात्विक समाधान आणि आत्मिक आनंद! म्हणूनच गेली पन्नास वर्ष सर्व जण एकदिलाने कार्य करत आहेत. मंडळाचं स्वास्थ्य, संवर्धन अबाधित राहावं यासाठी ‘मी’ पुसट झाल्याशिवाय ‘ते’ ठळक होणार नाहीत याची पूर्ण काळजी मी घेतो. तरच माझ्या पश्चातही संस्था जोमाने कार्य करत राहील.

अर्थातच त्यासाठी स्वत: कार्यकर्त्यांसमोर आदर्श वस्तुपाठ घालून द्यायला हवा. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला खूप प्रेरणादायी ठरलं. ‘योगाभ्यास ही केवळ वैचारिक चळवळ न राहता ती समाजाभिमुख व्हावी’ हा त्यांचा विचार मनात ठेवून मी केलेल्या ३८ प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला/ दुसरा क्रमांक लाभला आहे. योगाभ्यासावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील ‘आनंदयोग’ आणि ‘प्राणायाम दर्शन’ या माझ्या पुस्तकांना उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. मला आजवर योगरत्न, योग मित्र, व्यास रत्न, विवेकानंद अ‍ॅवॉर्ड, कुवलायानंद अ‍ॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार लाभलेत. पण मला सर्वात जास्त आनंद मिळाला तो १९९८ मध्ये जवळजवळ दहा महिने ख्यातनाम लेखक पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या घरी जाऊन यौगिक मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता आला. एकदा पु. लं. उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘मेधासंस्कार वर्गात आणि इतरत्रही तुम्ही सांगता दैववादी बनू नका, प्रयत्नवादी बना ते मला फार आवडतं. दैववादी मनुष्य पार पांगळा होतो. म्हणूनच कर्म कोणतंही असो, त्यासाठी प्रयत्न करणे, त्यात रमणे अतिशय महत्त्वाचे आहे.’’

बस्स, माझी वयाच्या ८८व्या वर्षीसुद्धा नेमकी हीच धारणा आहे. ‘बिहार स्कूल ऑफ योगा’चे परमहंस स्वामी निरंजानंद सरस्वती यांनी मला ‘सत्यकर्मानंद’ ही उपाधी दिली. कारण मी कर्मातून आनंद घेतो. काम हीच माझी ऊर्जा आहे. वृद्धत्व ही एक अपरिहार्य घटना आहे. वयपरत्वे येणाऱ्या मर्यादांचा मी स्वीकार केला आहे. ‘जरा मरण नाशनम्’ या वाक्याचा अर्थ योगातून मी असा लावलाय की जरावस्था तुम्ही आनंदाने स्वीकारा. ‘मृत्यु भय नाशनम्’ कधी ना कधी मृत्यू येणारच. त्याचं भय न बाळगता त्याचं आनंदानं स्वागत करा.

वृद्धत्व येण्यापूर्वीच मी त्याचा विचार खूप आधीपासून केला होता. आयुष्यात तीन ‘प’ सांभाळायचे. पहिला ‘प’ पैसा. पुरेसे पैसे गाठीशी ठेवायचे. जेणेकरून वृद्धावस्थेत मिंधेपणा येऊ नये. दुसरा ‘प’ प्रकृतीचा! आपली माणसं आपला प्रतिपाळ प्रेमाने करतीलच, पण त्यांना त्रास द्यायला संकोच वाटतो. म्हणून शक्यतो प्रकृती सांभाळायची. ती कशी? तर आहार विहार आणि विश्रांती यांच संतुलन हवं. आपण पाहुण्यांना म्हणतो, सावकाश जेवा. याचा अर्थ स+अवकाश जेवा. म्हणजे पोटात अवकाश अर्थात पोकळी ठेवा. पोटातील अर्धा भाग घन आहार, पाव भाग पाणी आणि पाव भाग मोकळा ठेवा. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी विहार आवश्यक. तिसरा ‘प’ प्रतिष्ठेचा! स्वत:ची प्रतिष्ठा, आत्मसन्मान सांभाळायचा.

परिवर्तन कालसापेक्ष आहे. दोन पिढय़ांमध्ये वैचारिक अंतर असणारच. तेव्हा नव्या पिढीचे विचार, त्यांच्या समस्या समजून घ्याव्या. पूर्वायुष्य उगाळू नये. मागितल्याशिवाय सल्ले देऊ नये. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण काळ येतोच. अशा वेळी प्रसंग पाहून दोन पावलं मागे यायचं.

म. पां. भावेंची एक कविता मला फार आवडते, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा.. गोडी अपूर्णतेची..’ या अपूर्णतेला आनंद शोधायचा हे माझं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे.

माझी एक सवय आहे. रोज रात्री झोपताना मी स्वत:ला तपासतो. आपण दिवसभरात कोणाशी गैर वागलो, कोणाला दुखावलं का? ‘मी’ शब्द आपल्या बोलण्यात किती वेळा आला? आपल्या वागण्यात दोष दिसले तर ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. मी इतरांचं वर्तनही तपासतो. प्रेरकशक्ती म्हणून त्यांच्याकडून कोणतं काम करून घेता येईल ते पाहतो. मी सर्वाना आवर्जून सांगतो, योगविद्या हे खणखणीत नाणं आहे. तुम्हाला योग साधनेने उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य लाभेल, मात्र पुस्तक वाचून, टी.व्ही.वर योगासन बघून करू नका. योग्य गुरूंकडून दीक्षा घ्या.

योगसाधनेने माझ्या आयुष्यात जादू केली आहे. माझ्या रोजच्या जीवनात उगवणारा प्रत्येक सूर्य रोज नवी आशा पल्लवीत करतो. त्याच्या किरणांतून कार्याची ऊर्जा मिळते. त्याच्या प्रकाशात पुढच्या वाटचालीची दिशा मिळते. माझ्या जीवनांत साधनेला अतिव महत्त्व आहे. साधना उचित, नियमित, प्राामणिक आणि अपेक्षारहित असावी.

पहाटेची साधना संपली की मला माझ्यातील शक्ती स्रोतांची जाणीव होते. अपार मन:शांती लाभते.

शब्दांकन : माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

chaturang@expressindia.com