डॉ. राजन भोसले
शारीरिकदृष्टय़ा किरण पूर्णपणे मुलगा असला तरी मनानं, अंत:करणानं व त्याच्या स्वत:च्या आंतरिक अनुभूतीनं त्याला आपण ‘मुलगी’ आहोत असं जाणवत होतं. त्या बंधनातून मुक्त झाल्याने त्याला नवं आयुष्य मिळालं. जगात दर दोनशे व्यक्तींमध्ये एक व्यक्ती, म्हणजेच जनसंख्येच्या ०.५ टक्के व्यक्ती जन्मजात ‘ट्रान्ससेक्शुअल’ अर्थात ‘पारलैंगिक’ असतात. मात्र त्याचा समलैंगिक वा होमोसेक्शुअल असण्याशी काहीही संबंध नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे; अन्यथा ही चूक महागात पडू शकते.
आज १७ वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेले डिसोझा पती-पत्नी माझे खूप जुने स्नेही. आमच्या दोघांच्याही लग्नाआधीपासूनची आमची मत्री. मी अमेरिकेची फेरी करणं आणि डिसोझाला न भेटणं हे शक्यच नाही. उलट मला स्वत:च्या घरी राहण्याचा आग्रह करण्यात डिसोझा अग्रणी.
सुमारे सात वर्षांनी मी डिसोझांना भेटलो. त्यांच्या घरी केलेल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्याशी मनमुराद गप्पा झाल्या. पहिल्या दिवशीच संध्याकाळी ते मला त्यांच्या मुलीचा भारतीय शास्त्रीय नृत्याचा वर्ग दाखवायला घेऊन गेले. त्यांची मुलगी किरण अमेरिकेत नृत्याचे वर्ग चालवते हे मला माहीत होतं. तिचे नृत्य करतानाचे व तिच्या नृत्य शाळेच्या विविध उपक्रमांचे अनेक फोटो मी सोशल मीडियावर पाहिले होते. फोटो पाहण्यात व प्रत्यक्ष नृत्य बघण्यात मात्र खूप फरक असतो. प्रत्यक्ष पाहून डोळ्याचं पारणं फिटावं इतका तो सुंदर व अविस्मरणीय अनुभव होता.
किरणच्या या वर्गामध्ये सुमारे २५ मुली होत्या. त्यातल्या पाच-सहा भारतीय परिवारांमधून आलेल्या पण बाकी सर्व अमेरिकी मुली. तन्मयतेने व शिस्तबद्धपणे त्यांचा नृत्यांचा सामूहिक सराव सुरू होता. त्यांचं भरभरून कौतुक वाटावं असाच तो विलक्षण क्षण होता. डिसोझांची किरण कमालीच्या सुंदर व सहजतेने नृत्याचे धडे त्या मुलींना शिकवताना बघून माझं मन भरून आलं आणि २० वर्षांपूर्वीचा तो घटनाक्रम माझ्या डोळ्यांसमोर येऊन गेला.
डिसोझा तेव्हा मुंबईत रहात होते. लग्नानंतर किरणचा जन्म होऊन आठ वर्षे झाली होती. किरण हा त्यांचा पहिलाच व एकुलता एक मुलगा.. पण त्याचं बोलणं, चालणं, वागणं हे बरंच मुलींसारखं होतं.. आणि हे जन्मापासून जरी असलं तरी वयपरत्वे आता ते सर्वाच्याच हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं. किरणच्या आवडीनिवडी, सवयी, हालचाली सर्वच ‘स्त्रण’ (फेमिनाइन) म्हणजे मुलींसारख्या. त्याला चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर मुलींची नृत्यं बघून त्याचं उत्स्फूर्तपणे अनुकरण करण्याचा मोठा व्यासंग. मुलींचे खेळ, मुलींचे छंद व मुलींसारख्या पेहेरावाची त्याला उपजत आवड. आई नसताना तिच्या मेकअपच्या साधनांमध्ये तो रमत असे. किरण मुलगा असूनही त्याचे सर्व वर्तनव्यापार मुलींप्रमाणे आहेत हे दिवसेंदिवस स्पष्ट होत चाललं होतं. या गोष्टींची चिंता वाटल्यानेच डिसोझा दाम्पत्य मला येऊन भेटले होते व त्यांनी त्यांची विवंचना मला बोलून दाखविली होती.
किरणबरोबर खेळीमेळीच्या घरगुती वातावरणात झालेल्या माझ्या काही भेटी, काही सूक्ष्म निरीक्षणं व काही मनमोकळ्या गप्पा यातून एक गोष्ट मला अगदी स्पष्ट होत गेली. किरण एक हुशार, उत्साही व बोलका मुलगा. वडिलांचा गोरा रंग व आईसारखा रेखीव चेहरा घेऊन जन्मलेला. एका अत्यंत सुरक्षित व आनंदी घरात मोठा होत असलेला. प्रेमळ व सुशिक्षित आई-वडिलांचा सहवास व देखरेख यांत विकसित होत असलेला असा एक निरोगी मुलगा. त्याच्यात दिवसेंदिवस प्रकर्षांने दिसून येत चाललेला हा ‘वेगळेपणा’ नक्कीच कुणाच्याही ध्यानात येण्याइतपत सुस्पष्ट होता. किरण जन्मत:च असा असावा याबाबत माझ्या मनातही आता काहीच संशय राहिला नव्हता.
शारीरिकदृष्टय़ा किरण पूर्णपणे मुलगा असला तरी मनाने, अंत:करणाने व त्याच्या स्वत:च्या आंतरिक अनुभूतीने त्याला आपण मुलगी आहोत असं जाणवत होतं. या प्रकारच्या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्ससेक्शुअल’ किंवा ‘ट्रान्सजेंडर’ असणं म्हणजेच ‘पारलैंगिक’ असणं असं म्हटलं जातं. अशा व्यक्ती जन्मापासूनच ‘आपण शारीरिकदृष्टय़ा पूर्णपणे जरी मुलगा किंवा मुलगी असलो तरी आपण खरं तर आतून आपल्या भावविश्वात विरुद्धिलगी आहोत’ अशा दृढ धारणेचे असतात. त्यांनी हे कुठून पाहून किंवा ऐकून शिकलेलं किंवा निवडलेलं नसतं. हा त्यांचा स्वत:बद्दलचा अस्सल असा आंतरिक अनुभव असतो.
जगात दर २०० व्यक्तींमध्ये एक व्यक्ती, म्हणजेच जनसंख्येच्या ०.५ टक्के व्यक्ती जन्मजात ‘ट्रान्ससेक्शुअल’ अर्थात पारलैंगिक असतात. आपला देश याला अपवाद नाही. पण या विषयाच्या जागरूकतेबाबत आपण अजून खूप मागे आहोत. पदवीधर डॉक्टर्ससुद्धा याबाबत मोठय़ा प्रमाणात अनभिज्ञ असतात.
‘ट्रान्ससेक्शुअल’ म्हणजेच ‘पारलैंगिक’ असण्याचा समलैंगिक होमोसेक्शुअल असण्याशी काहीही संबंध नाही हे वाचकांनी नीट ध्यानात घ्यावं. या दोन भिन्न गोष्टी आहेत. समलैंगिक असणं हा एक अगदी वेगळा प्रकार आहे. व्यक्ती ‘ट्रान्ससेक्शुअल’ असणं म्हणजेच ‘समलैंगिक’ असणं असं अजिबात समजू नये. ही चूक खूप महाभाग करतात म्हणूनच हे स्पष्टीकरण इथं दिलं आहे. ‘ट्रान्ससेक्शुअल’ म्हणजे तृतीयपंथीय नव्हेत. हा गैरसमजही अनेकांचा असतो. तृतीयपंथी (हेर्माफ्रोडिटिजम) हा एक वेगळा प्रकार आहे. त्यांना द्विलिंगी किंवा हिजडा असंही संबोधलं जातं. तृतीयपंथी लोकांच्या शरीरात पुरुष व स्त्री या दोघांचे अवशेष असतात. त्यांचं शरीर पूर्णपणे पुरुषाचं किंवा स्त्रीचं नसतं.
डिसोझांचा मुलगा किरण मात्र स्पष्टपणे जन्मापासूनच ‘ट्रान्ससेक्शुअल’ या प्रकारात बसणारा होता. त्यात त्याचा, त्याच्या पालकांचा किंवा चहुबाजूच्या वातावरणाचा काहीही संबंध किंवा दोष नव्हता. शारीरिकदृष्टय़ा व गुणसूत्रांनुसार क्रोमोझोमली किरण पूर्णपणे मुलगाच होता, तरी त्याला आतून, मनाने व अंत:करणाने, आपण मुलगी आहोत याची निर्वविाद आणि सुस्पष्ट खात्री होती व तीही अवघ्या आठ वर्षांचा असताना.
अशा केसेसमध्ये पालकांची भूमिका खूप ‘निर्णायक’ असते. त्यांना मुलांमधल्या या वेगळेपणाची योग्य माहिती असणं, संवेदनशीलतेने ते जाणून घेणं, या वेगळेपणाचा प्रांजळ स्वीकार करणं व अशा मुलांच्या संगोपनाबद्दलचं सुयोग्य व समयोचित मार्गदर्शन असणं हे फार-फार महत्त्वाचं असतं. पालकांना स्वत:लाच माहिती नसेल किंवा त्यांच्या मनात चुकीचे भ्रम किंवा अवास्तव आग्रह असतील तर या प्रकारच्या केसेसमध्ये ते खूप घातक अशा घोडचुका करू शकतात. त्या चुकांच्या खोल परिणामांमधून बाहेर पडणं त्या निरागस मुलांना व स्वत: पालकांनाही मग पुढे ते अशक्य किंवा अतिशय अवघड होऊन बसतं. डिसोझांच्या बाबतीत सुदैवाने अशा चुका अजून झाल्या नव्हत्या. किरण अजून फक्त आठ वर्षांचा होता.
अशा व्यक्तींमध्ये ‘आपण मुलगी असूनही आपल्याला मुलाचं शरीर का दिलं?’ हे द्वंद्व व संघर्ष वाढत्या वयात हळूहळू सुरू होतो; तो सुरू होण्याआधीच पालकांनी याबाबत सावध होणं ही पालकांच्या भूमिकेमधली पहिली व खूप महत्त्वाची पायरी. इथेच बहुतांशी पालक चुकतात किंवा गाफील राहतात. हा संभाव्य संघर्ष अनेकदा अगदी अपरिहार्य असतो, पण त्याची तीव्रता व त्याचे परिणाम मर्यादित ठेवण्याचं काम जागरूक पालक नक्कीच करू शकतात. या संघर्षांत या व्यक्तीने कशी लढत दिली यावर त्या व्यक्तीच्या उर्वरित आयुष्याचा आलेख (लाइफ स्क्रिप्ट) रचला जाणार असतो. व्यक्तीने स्वत:च्याच उर्वरित जीवनाचा आलेख रचण्याच्या क्रियेचं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेलं वैज्ञानिक असं विस्तृत स्पष्टीकरण डॉक्टर अमन लिखित ‘इसेन्शियल टीए’ या पुस्तकात पाहायला मिळतं.
मुलांमध्ये असा संघर्ष सुरू होण्यास खऱ्या अर्थाने व सातत्याने कारणीभूत होतात ते म्हणजे चहुबाजूंनी मिळत जाणारे अत्यंत प्रतिकूल असे संकेत व प्रतिक्रिया. अशा मुलाची अभद्र चेष्टामस्करी केली जाते, त्याला हिणवलं जातं, एकटं पाडलं जातं, त्याला तू ‘विचित्र’ आहेस असं दर्शवलं जातं, त्याला अगदी वेडं ठरवण्यापर्यंत काही लोक जाताच. असं करण्यात अनेकदा बरोबरीची मुलं-मुली, शेजारीपाजारी, आप्त-नातेवाईक व कधीकधी अगदी शिक्षकही सहभागी होतात व त्यातून त्या निष्पाप बालकाच्या आत्मप्रतिष्ठेचे चक्क हिडिस असे धिंडवडे काढले जातात. चारीबाजूंनी सातत्याने होणारे असे आघात व अपमानांचा भडिमार सहन करणं त्याच्या सहनशीलतेच्या व आवाक्याच्या बाहेर होत जातं. अशी मुलं मग कालपरत्वे नराश्य व आत्मक्लेशाने ग्रासली जाऊन त्यांची दारुण शोकांतिका तयार होते.
डिसोझा मात्र योग्य वेळी सावरले व सावध झाले. या विषयाची योग्य माहिती, संवेदनशील जाण, पूर्ण स्वीकार व योग्य मार्गदर्शन वेळीच अवगत झाल्याने त्यांनी या सर्व चुका कटाक्षाने टाळल्या. या विषयाची व्याप्ती, गांभीर्य व लागणारी सावध तत्परता त्यांना नेमकी गवसली होती. किरणच्या निरागसतेला जराही तडा पडू न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईत राहिलो तर घराबाहेच्या जगात किरणला समजून घेतलं जाणार नाही. त्याला इतरांच्या नको त्या निर्बंध व निर्लज्ज प्रतिक्रियांना सामोर जावं लागेल, त्यांच्या असंवेदनशील वर्तणुकीला सारखं तोंड द्यावं लागेल हे डिसोझाला दिसत होत. ज्या गोष्टींवर आपला ताबा नाही अशा गोष्टी कधी मर्यादा सोडून घात करतील याचा भरोसा नाही, या संभाव्य परिस्थितीचा अंदाज डिसोझाला आला होता. या विचारांनी काही काळ डिसोझा स्वत:सुद्धा व्यथित झाला होता. ‘माझ्या किरणसाठी मी काहीही करायला तयार आहे; मला मार्ग दाखवा’ या त्याच्या विकल पण नम्र याचनेला साजेसा असा समंजस व प्रौढ प्रतिसाद, खंबीर आधार व समयोचित मार्गदर्शन त्याला समुपदेशातून मिळत गेलं.
या प्रकारच्या केसेसमध्ये पुढे जाऊन योग्य वयात ‘जेंडर रिअसाइन्मेंट शस्त्रक्रिया’ म्हणजेच ‘सेक्स चेंज सर्जरी’ करून त्या व्यक्तीला त्याच्या आंतरिक जाणिवांना साजेल असे शारीरिक बदल व शरीराची रचना करून दिली जाते. यासाठी क्रमाक्रमाने काही नाजूक शस्त्रक्रिया (प्लास्टिक सर्जरी) केल्या जातात. पुरुषाचे स्त्रीच्या शरीरामध्ये रूपांतरण असो की स्त्रीचे पुरुषाच्या शरीरामध्ये.. दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया आता केल्या जाऊ शकतात. शस्त्रक्रिया करण्याआधी बराच काळ विरुद्धिलगी संप्रेरकं (हार्मोन्स) दिली जातात; जेणेकरून शरीराचा बांधा, ठेवण, बाज व त्वचा या होणाऱ्या रूपांतरणास सुलभ व साजेशी होत जाईल. पुरुषी संप्रेरकांना आटोक्यात ठेवणारी औषधे (अँटी अॅंड्रोजन थेरपी) सुद्धा योग्य वेळी व योग्य प्रमाणात देणं गरजेचं असतं जेणेकरून शरीरात होणारे पुरुषी बदल रोखले जातील. हे सर्व होत असतानाच बरोबरीने त्या व्यक्तीच्या मनाची तयारी करण्याच्या उद्देशाने सातत्याने बहुस्तरीय समुपदेशन (मल्टीमॉडेल सायकोथेरपी) करणं हेसुद्धा अत्यंत गरजेचं व बंधनकारकच असतं.
किरणच्या बाबतीत केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर त्याला शस्त्रक्रिया करण्याचं योग्य वय होईपर्यंत त्याची मानसिकता जोपासणं, बाह्य़ जगाकडून होणाऱ्या संभाव्य आघातांपासून त्याचं संरक्षण करणं या जबाबदाऱ्यासुद्धा पालकांवर होत्या. काही वर्ष पायरी-पायरीने (स्टेप बाय स्टेप) चालणाऱ्या या प्रक्रियेच्या आयोजनासाठी बरीच तयारी व बराच खर्च करावा लागणार होता. एक पालक म्हणून हे सर्व करताना त्यांनी स्वत:च खचून जाऊ नये यासाठी डिसोझा दांपत्यालासुद्धा समुपदेशनाची सातत्याने गरज होती.
समुपदेशन (कॉन्सेलिंग अॅन्ड सायकोथेरपी) हा जबाबदार विषय आहे. दुर्दैवाने आपल्या देशात मनोविकारतज्ज्ञांना (सायकॅट्रिस्ट) समुपदेशनाचं काहीही प्रशिक्षण वैद्यकीय महाविद्यालयात दिलं जात नाही. एम.डी.सारखी उच्च पदवी प्राप्त करूनही मनोविकारतज्ज्ञ या बाबतीत कमालीचे अनभिज्ञ असतात. समुपदेशन तंत्राचं वैयक्तिकरीत्या वेगळ प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. पण त्या बाबतची तयारी व तत्परता फारसे मनोविकारतज्ज्ञ अजूनही दाखवत नाहीत ही एक चिंतेची बाब आहे.
किरणसाठी गरजेच्या प्रदीर्घ अशा तमाम प्रक्रियेतून नेटाने व क्रमाक्रमाने वाट काढत काढत, आज १७ वर्षांनी, डिसोझांच्या मुलीच्या रूपातलं किरणचं खूप मोहक रूप मला पाहायला मिळालं व माझं मन कृतकृत्य झालं.
ज्या प्रकारे डिसोझा दांपत्याने एक पालक म्हणून हे आव्हान स्वीकारलं व हा विषय हाताळला.. असं आदर्श उदाहरण लाखात एक पाहायला मिळतं. आपल्या देशात या विषयाबाबत अजूनही हवीतशी जागरूकता आलेली नाही.. ती यावी व जे डिसोझाने केलं, साधलं त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी. तोच उद्देश समोर ठेवत या नाजूक पण आवश्यक अशा विषयावर मी हे विचार मांडले. हे विचार वैज्ञानिकतेचे सगळे निकष लावून जबाबदारीपूर्वक मांडले आहेत. या विषयाला समोर आणत त्याची तत्त्वनिष्ठ अशी प्रौढ चर्चा घडवून आणणं हे मी एक जबाबदार व प्रगतशील लैंगिक विज्ञानतज्ज्ञ व समुपदेशक म्हणून माझं कर्तव्य मानतो. या लिखाणातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही हे सुजाण पालक व वाचकांनी ध्यानात घ्यावं.
(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)
rajanbhonsle@gmail.com
chaturang@expressindia.com