जनजागृती हा मोठा उपाय

करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊनही अनेकांना करोनाची,ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं लोकांमध्ये काहीशी गोंधळाची, अस्वस्थतेची भावना आहे.

डॉ. किशोर अतनूरकर

करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊनही अनेकांना करोनाची,ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं लोकांमध्ये काहीशी गोंधळाची, अस्वस्थतेची भावना आहे. गर्भवतीनं लस घ्यावी का, स्तन्यदा मातेनं ती घ्यावी का, असे प्रश्न आजही, तिसऱ्या मानल्या जाणाऱ्या लाटेतही विचारले जात असतील तर अपयश कुणाचं ?

जगभर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. सरकारी पातळीवर स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध योजना आखल्या जातात, वेगळं बजेट मंजूर केलं जातं, वेगळी यंत्रणा राबविली जाते. असं का बरं असावं? हिवताप, कावीळ, मधुमेह वगैरेसारखे आजार, अगदी करोनादेखील पुरुष आणि स्त्री दोघांनाही होऊ शकतो. पण तरीही स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांचा वेगळा विचार करावा लागतो, कारण निसर्गानं स्त्रियांना दिलेली प्रजननाची मुख्य जबाबदारी आणि त्या आनुषंगिक असलेली शरीरव्यवस्था. याशिवाय भारतीय समाजानं स्त्रियांना ढोबळ मानानं ‘घर सांभाळण्याची’ जबाबदारी दिली आहे, पुरुषांना नाही. 

सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना करोना झाला असेल किंवा होऊ नये म्हणून वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागेल. करोनामुळे संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून त्रस्त आहे. हे संकट कधी संपेल, विस्कळीत झालेलं जनजीवन कधी पूर्वपदावर येईल याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. करोनाची दुसरी लाट भयानक होती. अनेकजण मृत्युमुखी पडले, प्रत्येक क्षेत्रात नकारात्मक प्रभाव जाणवला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ‘बसला’, आर्थिक घडी विस्कटली. टाळेबंदीमुळे रोजगारावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना घरी बसावं लागलं. स्त्रियांवर घरकामाचा बोजा वाढला, त्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढल्या. कमी पैशांत घर चालवताना स्त्रियांची चिडचिड वाढली. या सर्व परिस्थितीतून कसेबसे सावरत असताना, रुग्णसंख्या कमी होऊ लागली. प्रशासनाने घातलेले निर्बंध शिथिल होत गेले. बाजार फुलला. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांच्या सभा वगैरेच्या निमित्ताने पुन्हा लोक मोठय़ा संख्येने एकत्रित यायला सुरुवात झाली. लोक विनामुखपट्टी फिरू लागले, सोशल डिस्टिन्सगचा फज्जा उडाला. माणूस ‘बेफिकीर’ व्हायला वेळ लागत नाही. विषाणूंनी संधी साधली. आपलं स्वरूप बदललं. डेल्टा, ओमायक्रॉन वगैरेसारखी नावं धारण करून आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. विषाणूनं आपलं स्वरूप बदललं. अगोदर ‘कोविड -१९’, नंतर ‘डेल्टा’ आणि आता ‘ओमायक्रॉन’च्या रूपाने विषाणूजन्य आजाराची रुग्णसंख्या वाढीस लागत आहे. तिसरी लाट जोर धरू पाहत आहे.

हा सगळय़ांसाठीच चिंतेचा विषय आहे. अशा विषाणूजन्य आजारासाठी खरं पाहिलं तर खात्रीलायक असं औषध नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जी उपचार योजना केली गेली त्याबाबतीत तज्ज्ञांचं एकमत नव्हतं. आजही अमुक एक औषध दिलं की करोना नक्की बरा होईल असं नाही. करोनापासून बचाव करण्याचा सध्याचा उपाय म्हणजे लसीकरण. लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतरही त्या व्यक्तीला जर करोना होत असेल तर मग लसीकरण कशासाठी करायचं? असा प्रश्न विचारला जातो आहे. वास्तविक पाहता करोना प्रतिबंधक लसच नाही तर कोणतीही लस ही शंभर टक्के सुरक्षा देत नसते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बी.सी.जी. लस. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस बाळ जन्माला आल्यानंतर एक महिन्याच्या आत टी.बी. किंवा क्षयरोग होऊ नये म्हणून दिली जाते. याचा अर्थ त्या व्यक्तीला क्षयरोग होणारच नाही, असा होत नाही. आजही लोकांना क्षयरोग होतो, पण पूर्वीच्या तुलनेत तो  इतका प्राणघातक राहिला नाही. लसीकरणामुळे रोगग्रस्त असण्याची स्थिती (morbidity) कमी होत असते. या नियमानुसार करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरदेखील करोना विषाणूजन्य आजार होऊ शकतो, पण त्याची लक्षणे सौम्य असतील, उपचार सामान्य असतील, दीर्घकालीन गुंतागुंत होण्याची, जिवावर बेतण्याची शक्यता कमी असेल. म्हणून सर्वाचं लसीकरण होणं अत्यावश्यक आहे.

गर्भवती स्त्रिया आणि स्तन्यदा माता, त्यांचे नातेवाईक यांच्या मनात लसीकरणाबद्दल शंका आहेत. लसीकरणाच्या कार्यक्रमाने सध्या आपल्या देशात जोर धरला आहे. गर्भवतींनीदेखील लस घेतली तरी चालते, किंबहुना ती घेतलीच पाहिजे, असं अनेक पद्धतीनं सांगितलं जातंय, पण याबाबतीत अजून जनजागरण झालं पाहिजे, अशी अवस्था आहे. लस घेतल्यानं पोटात वाढत असलेल्या बाळाच्या जिवाला धोका तर होणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर ‘होणार नाही, काळजी करू नका, लस घ्या’ या पद्धतीनं पुन:पुन्हा सांगावं लागतं तेव्हा कुठे ते तयार होताना दिसतात. ज्या व्यक्तींची काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, इम्युनिटी कमी असते, त्यांना कोणत्याही आजाराची लागण लवकर होत असते. करोना विषाणूजन्य संसर्ग याला अपवाद नाही. गर्भधारणेमुळे स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची अवस्था निर्माण होते म्हणजेच करोनाच्या लाटेमध्ये विषाणू संसर्ग होण्याची शक्यता गर्भवतींमध्ये जास्त असते. म्हणून गर्भवतींचे लसीकरण प्राथमिकतेनं झालं पाहिजे; त्याचा सविस्तर संदेश लोकांपर्यंत पोचला पाहिजे.   

स्त्रियांच्या बाबतीत, गर्भवती असो वा नसो

(विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया)आणखी एक अडचण म्हणजे अशा स्त्रिया डॉक्टरांकडे किंवा लसीकरण केंद्रापर्यंत एकटय़ा जाऊ शकत नाहीत. त्यांना सोबत हवी असते. ही अडचण लक्षात घेऊन घरातील पुरुषांनी पुढाकार घेऊन त्यांनी त्यांचं लसीकरण करून घेतलं पाहिजे.

गर्भवतीस करोनाची लागण झाल्यास एखाद्या स्त्रीचं नववा महिना लागण्याच्या आतच प्रसूती  होऊ शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. करोना झाल्यामुळे त्या स्त्रीचं बाळंतपण ‘नॉर्मल’ होणार नाही, किंबहुना नॉर्मलची वाट न पाहता सिझेरियन सेक्शन करावं लागेल, हा समज चुकीचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे, ग्रामीण भागातील बऱ्याच गर्भवतींनी आणि शहरातील काही स्त्रियांनी, नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा रात्री-बेरात्री सुरू झाल्या आणि त्या वेळेस हॉस्पिटलमध्ये जाण्यास वाहन उपलब्ध न झाल्यास अनास्था उद्भवेल, या भीतीने नैसर्गिक कळा सुरू होण्यापूर्वीच आम्हाला सिझेरियन सेक्शन करून द्या, अशी मागणी केली. लोकांची ही भीती टाळण्यासाठी आणि बाळंतपण सुखरूप होण्यासाठी स्वतंत्र ‘कोविड मॅटर्निटी होम’ ची व्यवस्था केली पाहिजे अशी सूचना प्रशासनास करावीशी वाटते. स्तन्यदा मातेनं करोना लस घ्यायला हरकत नाही. लस घेतल्यानंतर मातेला ताप आला तरी बाळाला दूध पाजायला हरकत नाही, हे करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेच्या वेळेपासूनच सांगितलं जात आहे. अनेक वेळा सांगूनही पुन:पुन्हा तेच प्रश्न आजही विचारले जात आहेत. त्यातला आणखी एक म्हणजे, मासिक पाळी चालू असल्यास लस घेता येईल का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असंच आहे. कहर म्हणजे एकीनं तर ‘मला माहिती नव्हतं की मी गर्भवती आहे; आता मला लक्षात आलं, पण मी चार दिवसांपूर्वी लस घेतली आहे, मी गर्भपात करून घेण्याची गरज आहे का?’ अशी शंका उपस्थित केली. याचा अर्थ अजूनही जनजागृतीची खूप आवश्यकता आहे.

याचं दुसरं कारण बहुधा करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्यानंतरसुद्धा एखाद्या व्यक्तीला पुन्हा करोनाची लागण होऊ शकत असल्यामुळे आपल्याला गोंधळलेल्या, भीतीदायक आणि अनिश्चिततेच्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. अर्धवट ज्ञान आणि गप्पा मारताना ते दाखवण्याची हौस या दोन गोष्टींमुळे गैरसमज झपाटय़ाने पसरतात. एकदा निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ‘हे सगळं कधी संपणार?’ या प्रश्नाचं नक्की उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. कदाचित अजून दोनएक वर्ष. तोपर्यंत स्वत:ला करोनाचा संसर्ग होऊ नये आणि आपल्यापासून इतरांना तो होऊ न देण्याची दक्षता घेताना,  ‘दो गज की दूरी, मास्क जरुरी और बार बार हात धोने की आदत’ ही त्रिसूत्री आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.

(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

atnurkarkishore@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Awareness big solution corona health life ysh