पल्लवी शेलार

‘सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत’ तसं प्रत्येकानं आपापल्या परीनं आयुष्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कार, विचारसरणी, वय, पूर्वग्रह, अशा अनेक स्तरांतून झिरपत आलेला हा प्रत्येकाचा आत्मानुभव आहे. पण तरीही आपल्याला गवसलेला आयुष्याचा अर्थ हा अंतिम मुक्काम समजू नये, कारण तो एक प्रवास आहे, जो आपण जिवंत असेपर्यंत चालूच राहणार आहे.       

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…

 कळत्या वयात जेव्हा घर, शाळा, अभ्यास, खेळ, या पलीकडच्या जगाची ओळख होऊ लागली, तेव्हा काही प्रश्नांनी छळायला सुरुवात केली होती. हे विश्व कोणी निर्माण केलं? विश्वातल्या पहिल्या जीवात चैतन्य कुठून आलं? या विश्वाला सीमा आहे का? विश्वाच्या अगम्य पसाऱ्यात माणसाच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? अशी प्रश्नांची साखळी तयार झाली. आजूबाजूला वावरणारे प्राणीमात्र नैसर्गिक प्रेरणेनं मार्गक्रमण करत असताना दिसत होते. मग माणसानं जगण्याचं प्रयोजन शोधण्याची उस्तवार का करावी? कधी वैज्ञानिक, तर कधी आध्यात्मिक साहित्यातून, थोरामोठय़ांनी दिलेल्या शिकवणीतून, अवांतर वाचनातून या प्रश्नांची अर्धीमुर्धी उत्तरं मिळत गेली. एवढं मात्र लक्षात आलं, की गाठीशी असलेली अल्प बुद्धी घेऊन या साऱ्या प्रश्नांची उत्तरं धुंडाळत बसण्यापेक्षा जगण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.

  लौकिक अर्थानं ज्याला यश म्हणतात, ते म्हणजे गाडय़ा, बँकेतला पैसा, जमीनजुमला, संसार, अपत्य हे तर सर्वानाच मिळवायचं असतं. पण आपापल्या परीनं हे सर्व मिळाल्यावरही ‘देअर इज मोअर टू लाइफ’ असं वाटत राहातं. भौतिक प्राप्तीपेक्षा काहीतरी कृतकृत्य करणारं, धन्य वाटायला लावणारं करावं असं वाटतं. आदरणीय पु. ल. देशपांडे म्हणतात, तसं जीवन आणि मृत्यू या दोन टोकांत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक लक्षात आली, की दुसऱ्यांची हसवणूक करण्याशिवाय काय करायचं? पुलंना सापडला तसा जगण्याचा हेतू काहींना भटकी कुत्री आणि मांजरांना खाणं देताना, बेडकांची कुठलीशी नवी प्रजाती शोधताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांना ‘अ, आ, इ’चे धडे देताना  सापडतोही. पण आयुष्य नेहमीच असं साधं, सुसंगत, स्वयंस्पष्ट नसतं. स्वत:चं व्यक्तित्व, क्षमता याकडे लक्ष न देता दुसऱ्यांनी ठरवलेल्या यशाच्या चाकोरीमधून चालायची आपली प्रवृत्ती असते. सतत कशाच्या तरी मागे धावणाऱ्या झुंडीमध्ये आपण सामील होतो. इतरांच्या नजरेतून आयुष्याकडे पाहात, इतरांच्या कल्पनेतलं जिणं जगतोय, हे लक्षात येईपर्यंत बरीच वर्ष हातातून निघून गेलेली असतात. गरज असताना योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक कोणी सोबत नसतात. मग जी वाट निवडली जाते, त्या वाटेवरचं सारं काही पत्करावं लागतं. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं सर्वाच्याच आवाक्यात नसतं.  

 कधी आपण एखाद्या व्यक्तीचा इतका ध्यास घेतो, की त्या व्यक्तीलाच आयुष्याचा हेतू समजून बसतो. त्या ध्यासातून मिळणारी उत्तेजना, प्रत्येक क्षणाला जिवंत असल्याची भावना याचं जणू व्यसन जडतं. मात्र ती उत्तेजना संपुष्टात आल्यावर निर्माण होणारी पोकळी हतबल करणारी असते. अशा वेळी मनाला उभारी देणारं ठोस असं तत्त्वज्ञान हाताशी हवं. स्वत:च्या तत्त्वांना मुरड घालत, अपमान सहन करत, चांगल्या-वाईट प्रसंगांतून पार होत चालत असताना ठेच लागली, तर स्वत:च्या हिमतीवर पुन्हा उभं राहता आलं पाहिजे. जगण्याच्या झगडय़ात स्वत:चं अस्तित्व टिकवत असताना आपलं व्यक्तिमत्त्वही उत्क्रांत होत असतं. त्या व्यक्तित्वात दडलेले झळाळणारे पैलू आणि गडद सांदीकोपरे नव्यानं माहिती होतात. त्यांनाही अंगीकारलं पाहिजे. जगण्यामध्ये साचलेपणा आला, तर नशिबाला किंवा भूतकाळातल्या निर्णयांना दोष देण्यापेक्षा परिस्थितीला सकारात्मक वळण कसं देता येईल, यावर आपलं बळ खर्च करायला हवं.

आयुष्य उत्कटपणे, अगदी समरसून जगावं. प्रसंगी घाम, अश्रू, रक्त, यांची किंमत चुकवूनही! एक दीर्घ श्वास घ्यावा, पाय घटट रोवावेत आणि नियतीनं आपल्या कोर्टात टाकलेल्या चेंडूला टोला द्यायला हसत हसत सरसावावं.

psshelar.5@gmail.com