– श्रीपाद कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते’ असं अर्थपूर्ण वाक्य वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ कादंबरीत आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधला अवकाश भरून व्यापणारा काळ हपापल्यासारखा सुखाचा शोध घेण्यात घालवणं हाच का आयुष्याचा अर्थ?..

बरं, सुखाचा शोध घेता घेता कित्येक दु:खांना सामोरं जावं लागतं, तेव्हा आशेच्या झुल्यावर झुलण्याचं व्यसन लागतं. द्यूतातलं आजचं दान हरलो, उद्याचं दान आपल्या बाजूनं खचितच पडू शकेल हा आशावादच आयुष्य पुढे ढकलायला मदत करतो. पण नक्की सुख कशात आहे, ते शेवटपर्यंत कळत नाही. सुख संपत्ती जमवण्यात नाही, तर मिळालेल्या संपत्तीचा वापर ‘स्व’पलीकडे जाऊन इतरेजनांसाठी, विधायक कल्याणकारी कार्यासाठी करण्यात जास्त आहे, याचा साक्षात्कार तारुण्याच्या मस्तीत नाही, तर पैलतीराकडे नेत्र लागल्यावर होतो. मग तोपर्यंतच्या आयुष्याला अर्थ काय?

खरं तर निसर्गनियमसुद्धा असं सांगतो, की अधाशासारखं चमचमीत अन्न ग्रहण करण्यातल्या आनंदापेक्षा शरीरातील टाकाऊ पदार्थ वेळच्या वेळी नियमितपणे बाहेर टाकता येणं, यातला आनंद जास्त खरा. नाही तर शरीराला क्लेश ठरलेले आहेत.

लहानपणी कुणा सहृदय नातलगानं मला सांगितलं होतं, की ‘याला शिक्षण पाहिजे तेवढं मिळेल, पण उत्पन्न पोटापुरतंच..’ त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना पाहून नोकरी-व्यवसायात अल्पसंतुष्ट राहाण्याचा आणि घर-संसारात गरजा कमी ठेवण्याचा संकल्प केला. (त्या काकांना स्वत:च्या अवेळी मरणाचं भविष्य कसं माहीत नसावं हा विचार मात्र मला बरेच दिवस डाचत राहिला होता.) पण जेव्हा आपल्याबरोबर सहजीवनाचे भागीदार आयुष्यात येतात, तेव्हा त्यांच्या वाढत्या गरजा नजरेआड करता येत नाहीत आणि फरफट झाली तरी राहाणीमानाचा दर्जा राखण्याची कसरत करण्यात आयुष्याचा ‘अर्थ’पूर्ण अर्थ लावावा लागतो, हे लक्षात आलं.

बघा, म्हणजे पुन्हा स्वत:च्या बौद्धिक, वैचारिक, अर्थार्जनाच्या मर्यादांऐवजी परिस्थितीलाच दोष देण्याच्या मानसिकतेनं डोकं वर काढलंच. मग सकारात्मकतेच्या कमाईऐवजी नकारात्मक खर्चाचंच पारडं जड होऊन बसतं. अशा वेळी आपल्या बाजूनं खंबीरपणे उभ्या राहाणाऱ्या जोडीदाराची, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढं पाठबळ देणाऱ्या भाऊबंदांची आणि सकारात्मक रतीब घालणाऱ्या, मौजमजेचे, विरंगुळय़ाचे क्षण साजरे करण्यात सोबती होणाऱ्या मित्रमंडळींची दौलत आपल्यापाशी असेल तर आयुष्य सार्थकी लागायला हरकत नाही. या बाबतीत माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण आदर्श वाटतं. काळानं अवेळी हिरावून नेलेल्या पतीच्या पश्चात मुलीला वाढवून, डॉक्टर करून, स्वत: नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही आमच्या शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर, त्यावरील संवाद, कार्यक्रम या सर्वात आघाडीवर ती असते. अशा जगन्मित्र व्यक्तींना आयुष्याचा अर्थ कळला आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘मॅनस् सर्च फॉर मीनिंग’ या प्रभावशाली पुस्तकांच्या यादीत स्थान मिळवलेल्या पुस्तकात लेखक डॉ. व्हिक्टर फ्रँकल हे व्हिएन्नातले न्यूरोलॉजिस्ट व मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात ते अगदी खरं आहे- ‘काळ किंवा इतर मानवी/अमानवी शक्ती तुमच्यापासून सर्व काही हिरावून घेऊ शकतात. मात्र तुम्ही परिस्थितीकडे कसे आणि कोणत्या दृष्टिकोनातून बघता याचे स्वातंत्र्य कोणी कधीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत.’ आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत डॉ. फ्रँकल सांगतात, की ‘अटळ दु:खाला सामोरे जाण्याच्या वृत्तीतूनसुद्धा जीवनाला अर्थ प्राप्त होतो. प्रत्येकाच्या नशिबी काही तरी भोग असतात. तेव्हा दु:खाला न कवटाळता किंवा नशिबाला दोष न देता त्याचेच रूपांतर एखाद्या विधायक गोष्टीमध्ये केले, तर दु:खातही अर्थ शोधता येतो.’ हे किती सार्थ आहे याची प्रचीती माझ्या मैत्रिणीच्या वागण्यातून येते असं वाटून, आपण कुरवाळत बसतो ती आपली दैनंदिन दु:खं किती क्षुद्र आहेत याचा साक्षात्कार होतो.

करोनाकाळात ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ हा विचार मनात न आलेला मनुष्य विरळाच. जेव्हा करोनाग्रस्त होऊन शरीराचा त्याग केलेल्या माझ्या वडिलांचं ‘अस्पृश्य’ झालेलं कडेकोट बंदोबस्तातलं कलेवर पाहिलं, तेव्हा हा विचारच मनात साचून राहिला. ज्यांनी आयुष्याचा एक महत्त्वाचा- ‘त्याग’ हा अर्थ दाखवत आम्हाला मोठं केलं, त्यांच्या ९२ वर्षांच्या पुण्याईचा काही अंशही अंतिम क्षणी समर्पित करता आला नाही, याची खंत डाचत राहाणार. ते जगले सर्वसामान्य प्रापंचिक पुरुषासारखेच, पण ते त्या पिढीतले होते, ज्या पिढीतल्या लोकांना शिक्षण, नोकरी, वेतन या सर्वच बाबतींत आपल्या आई-वडील व अनेक भावाबहिणींसाठी आपल्या तारुण्यसुलभ आणि गृहस्थाश्रमात कौटुंबिक हौशीमौजींचा त्याग करावा लागला. नंतर आपल्या मुलांच्या शिक्षण व भवितव्यासाठी फिरतीच्या नोकरीनिमित्तानं कुटुंबापासून बराच काळ लांब राहावं लागलं. या त्यांच्या त्यागामुळे आम्ही सुखवस्तू मुलं शेवटपर्यंत त्यांना जपू शकलो हे भाग्य; पण निसर्गानं त्यागाची परिसीमा गाठायला लावली हा दैवदुर्विलास! त्यांच्या जाण्याच्या आदल्या रात्रीच सोसायटीतले त्यांचे एक स्नेही वयोवृद्ध आजोबा करोनानंच निवर्तल्याची वार्ता कळली होती. करोनाकाळात अनेकांना जो अनुभव आला, तो रामदास स्वामींच्या ‘मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ या श्लोकाचा. आयुष्याचा अर्थ समजे-समजेपर्यंत निसर्गाचं हे धक्कातंत्र काम करून जातं. त्यामुळे आलेला क्षण लगेच जाणार आहे, हाच एक सनातन अर्थ लक्षात घेऊन वाटय़ाला आलेले क्षण परमार्थ आणि परोपकारांनी साजरे करणं हेच आपल्या हातात आहे. डॉ. फ्रँकल यांनी पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, ‘जेव्हा स्व आणि स्वार्थापलीकडे बघितलं जातं, तेव्हाच विधायक कार्याची निर्मिती होते. त्यातून आपल्यापेक्षाही इतर सगळय़ांना मिळणारं समाधान शाश्वत असतं आणि ते आपल्यामुळे मिळालं हा आनंद अवर्णनीय असतो.’ म्हणूनच जंगल, पर्यावरण संरक्षणासाठी, वृद्धाश्रमातल्या आणि आजारी वडीलधाऱ्यांचा एकाकीपणा घालवण्यासाठी, समाजातल्या दुर्लक्षित लोकांच्या सबलीकरणासाठी, दिव्यांग मुलामाणसांसाठी जे अनेक लोक कुठलाही बडेजाव आणि गवगवा न करता काम करत असतात, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करताना, त्यात खारीचा वाटा उचलताना जो जीवनाचा अर्थ गवसतो, तो आकाशाला गवसणी घालण्याच्या सामर्थ्यांइतकाच प्रबळ असतो, असं मला वाटतं.

shripadkster@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyacha arth author sripad kulkarni moment comes will pass eternal early life ysh
First published on: 30-07-2022 at 00:05 IST