scorecardresearch

आयुष्याचा अर्थ: खल भेदण्याची आस दे!

आयुष्य, त्यातही मनुष्ययोनीमधलं आयुष्य ही खरं तर परमेश्वरानं आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

आयुष्याचा अर्थ: खल भेदण्याची आस दे!
आयुष्याचा अर्थ: खल भेदण्याची आस दे!

डॉ. सुरेखा पाटील

‘तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना, विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे’

‘आयुष्य’- तीनच अक्षरांचा अगदी छोटासा शब्द; पण आपल्या पुढच्या अनेक पिढय़ांकडून आपलं नाव ‘सुप्रसिद्ध’ की ‘कुप्रसिद्ध’ या बिरुदावलीसह घेतलं जाईल, हे ठरवण्यासाठी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण जगलेला तो संपूर्ण गोषवारा आहे.

 आयुष्य, त्यातही मनुष्ययोनीमधलं आयुष्य ही खरं तर परमेश्वरानं आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. ही देणगी आपल्याला आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी असतेच, पण आपल्याबरोबर आणि आजूबाजूला जे आहेत, उदा. आपले कुटुंबीय, नातलग, मित्रमैत्रिणी आणि समाजातले इतर घटक, त्यांचंही जीवन आपल्या सहकार्यानं सुखकर करण्याची आवश्यकता असते. तरी जीवन जगताना देवानं हा मानवी देह व आयुष्य का दिलेलं आहे याचा संपूर्णपणे विसर पडतो. आपल्याला आपली दु:खं, यातना हे भोग असल्याप्रमाणे वाटू लागतात. आपली दु:खं डोंगर आणि इतरांची दु:खं मोहरीच्या दाण्याप्रमाणे भासू लागतात. आपण आपलीच कीव करू लागतो. ‘माझं कुणीही नाही, माझी कुणी काळजी घेत नाही, माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही’ या खुळय़ा कल्पनांच्या जगात आपण वावरायला लागतो आणि संपूर्णपणे भरकटले जातो. त्याचा परिणाम म्हणजे थोडक्यात, आपण आपलं आयुष्य वाया घालवायला सुरुवात करतो. जोपर्यंत इतरांच्या जीवनात आपण डोकावून पाहात नाही, त्यांची, त्यांच्या दु:खाची सत्यता पडताळून पाहात नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत हे असं होणं साहजिकच आहे. जेव्हा आपल्याला इतरांच्या दु:खाची कल्पना येते, ती आपल्या अंत:करणापर्यंत पोहोचते, त्या वेळी आपल्या आयुष्याला खरी कलाटणी किंवा तरुणाईच्या भाषेत ‘किक’ मिळते. प्रत्येकाच्या आयुष्याला अशी किक वेगवेगळय़ा वयात, वेगवेगळय़ा परिस्थितीत, वेगवेगळय़ा अनुभवानं कमी-जास्त प्रमाणात मिळते. कुणी त्याला गांभीर्यानं घेऊन खरोखर आपलंच नव्हे, तर आपल्या सभोवती असणाऱ्यांचं आयुष्यदेखील सुखकर करतात. काहींना ‘किक’ मिळूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात. 

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्यानंतर पाच भावंडांमध्ये सर्वात धाकटी असणारी मी, ‘बी.कॉम.’ करून नोकरी करू लागले. लहानपणापासून मदर तेरेसा, महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा होती. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये एकसुरी आयुष्य जगण्यात आपण काही तरी मनाविरुद्ध करत आहोत याची सतत खंत मला वाटत होती. अशातच माझी एक मैत्रीण भेटली आणि तिनं मला बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) असणाऱ्या मुलांच्या क्षेत्राविषयी माहिती दिली. हा माझ्या आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’ होता. ज्या समाजामध्ये आपण राहातो तिथे आपल्याला बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांच्या जगाविषयी माहितीही असू नये, याची माझी मलाच खंत वाटत होती. अधिक माहिती घेण्यासाठी मी मैत्रिणीच्या संस्थेमध्ये गेले, बौद्धिक अक्षम मुलांना व प्रौढ व्यक्तींना पाहून काळीज हेलावून गेलं. या मुलांच्या पालकांचा विचार आला, कारण त्या वेळी मलाही तीन वर्षांचा मुलगा होता. जर माझ्या मुलाला असं दिव्यांगत्व आलं असतं, तर एक पालक म्हणून माझं जीवन कसं असतं, या विचारांनी मला पूर्णपणे भंडावून सोडलं.

   जवळजवळ आठवडाभर झोप येत नव्हती. डोळय़ांसमोर केवळ आणि केवळ ही मुलं, त्यांचे पालक हेच विचारचक्र सुरू होतं. अनेक प्रश्नांनी मला भंडावून सोडलं. मला ही ‘किक’ लागली आणि आपल्याला हवं असणारं कार्य सापडलं. मग मी १९९७ मध्ये या क्षेत्रात उतरले आणि ‘बी.एड.’ (मतिमंदत्व), ‘एम.एड.’ (मतिमंदत्व), विद्यावाचस्पती (पीएच.डी.) (कला) विशेषज्ञ मतिमंदत्व, मुंबई विद्यापीठ, असं शिक्षण पूर्ण केलं. २००४ मध्ये तालुका पेण, जिल्हा रायगड इथे ‘सुहित जीवन ट्रस्ट’ ही संस्था सुरू केली. १० विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या संस्थेमध्ये सध्या १६० हून अधिक विद्यार्थी विशेष शिक्षण आणि विशेष सेवांचा लाभ घेत आहेत. संस्थेत पेण, अलिबाग, उरण आणि खालापूर या ४ तालुक्यांमधल्या ५२ गावांमधून बौद्धिक अक्षम विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. संस्थेचं ‘पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र’, ‘सुमंगल बौद्धिक अक्षम मुलांची शाळा’, ‘एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र’ व ‘लाइट हाऊस विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र’ असे चार विभाग आहेत. आजघडीला या विशेष मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना त्यांच्या गरजेनुरूप शिक्षण देणं, व्यावसायिक प्रशिक्षण देणं, त्यांच्यामधले योग्य कलागुण ओळखून त्यांना वाव देणं, पालकांना समुपदेशन, मार्गदर्शन, तणावमुक्तता आणि सकारात्मक प्रेरणा मिळवून देणं आवश्यक आहे. या शिक्षकांना सातत्यानं प्रेरणा देऊन त्यांनी या विशेष विद्यार्थ्यांना शिकवताना लागणारी सहनशीलता आणि सकारात्मकता यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. समाजात दिव्यांगत्वाविषयी जनजागृतीही करायला हवी. असे अनेक उपक्रम गेली १८ वर्ष संस्था सातत्यानं पार पाडत आहे. या एका ‘किक’मुळे माझं आयुष्यच बदलून गेलं, दृष्टिकोन बदलला.

आयुष्य कोरं पान असतं. त्या पानावर काय लिहायचं हे आपणच ठरवायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडताना वादळ येतं आणि ते येणारच, परंतु वादळांना घाबरून शांत बसून आपण जर आपल्या आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल घडवला नाही, तर इतरांचं सोडाच, पण आपणही आपल्यावर समाधानी असणार नाही. आपण आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य आनंदानं फुलवू शकलो, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आपण आपलं आयुष्य भरभरून, आनंदानं जगलो याची पावती आहे, असं मला वाटतं. 

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातलं गुरू ठाकूर यांचं सुरुवातीला उद्धृत केलेलं हे प्रार्थनागीत समर्पक आहे-

‘धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे’

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 00:08 IST

संबंधित बातम्या