ऊर्मिला सहस्रबुद्धे वाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी कशासाठी जगतोय? अशा जगण्याला काय अर्थ? हे प्रश्न कोणालाही.. तो गरीब, श्रीमंत, यशस्वी, अयशस्वी कोणीही असो, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर पडू शकतात. मलाही असाच नकारात्मकतेकडे झुकणारा प्रश्न एके काळी पडला होता. याचं साधं सोपं उत्तर मला मिळालं, ‘जिवंत असण्याच्या जाणिवेसाठी जगायचं.’

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे प्राण्यांना आपण ‘जिवंत असण्याच्या जाणिवेची’ जाणीव नसते. स्वत:ला मरू द्यायचं नाही हे प्राण्यांना कळत असतं, पण जगायचं कशासाठी? हा प्रश्न त्यांना पडत नाही. प्राणी आत्महत्या करत नाहीत. केली तरी तो निसर्गचक्राचा भाग असतो. पतंग दिव्यावर झेपावतो ही एक नैसर्गिक क्रिया; पण माणसाला मात्र त्यात शमा-परवाना दिसतात. प्रियकर-प्रेयसी दिसतात. का दिले गेले हे विचार माणसाला?

‘झाकोळल्या मनाने उजळू नकोस वाती

मरतील कैक स्वप्ने झेपावुनी दिव्यावर’

असा शेर मी लिहिला होता. नकारात्मकता जेव्हा मनात घर करते तेव्हा माणूस स्वत:ची स्वप्नं अशी मारून टाकतो. कधीकधी स्वत:लाही संपवतो. इतक्या टोकाच्या नकारात्मकतेकडे जाऊनही जो स्वत:ला पुन्हा प्रकाशाच्या वाटेवर खेचून आणतो त्यालाच आयुष्याचा खरा अर्थ समजला असं म्हणता येईल का?

अशाच काहीशा अनुभवातून काही वर्षांपूर्वी मी गेले. ‘सोसला एकटीने उन्हाळा, कोरडा वाटला पावसाळा’ अशी माझी स्थिती झाली होती. अतीव एकटेपणाची भावना, पश्चात्ताप, विश्वासघात, फसवणूक, अपयश, भविष्याची चिंता, दुर्धर आजार, अपंगत्व,आप्तांचा  मृत्यू  अशा जीवन संपवायला उद्युक्त करणाऱ्या घटनांपैकी काही घटना माझ्याही आयुष्यात घडल्या. मग कुठे तरी आशेचा इवला किरण दिसला. जणू अनेक ग्रहणे परतवणाऱ्या सूर्यानंच कवडशाच्या रूपात तो माझ्यासाठी पाठवला होता. मनात आलं,

‘कवडसा इवला उन्हाचा पण किती कर्तृत्व मोठे

छिद्र इवलेसे पुरे अस्तित्व त्याचे जाणवाया’

ज्या अर्थी माझा जन्म झाला त्या अर्थी त्याचं काही तरी प्रयोजन नक्कीच असलं पाहिजे. या पृथ्वीवर अब्जावधी माणसे राहतात. प्रत्येक जण आईन्स्टाईन, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, बिल गेट्स होत नाहीत; पण ते होण्याची शक्यता जन्मलेल्या प्रत्येक माणसात असते. मग माझ्या आयुष्याचं काय उद्दिष्ट? माझ्याच वाटय़ाला अपयश, दु:ख का? उत्तर शोधण्यासाठी खूप वाचन केलं. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, गीता, बुद्ध, ओशो ज्यांचं ज्याचं जे जे साहित्य मिळेल ते वाचलं. हळूहळू थोडा प्रकाश पडू लागला आणि मी लिहिती झाले.

‘अस्तित्वाचे प्रयोजन अजूनही मी शोधत आहे

अंधाराच्या वाटेवरून प्रकाशाकडे चालत आहे.’

हा प्रकाश शोधताना एक दिवस अचानक ‘युरेका’ झाले. भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत. जे अस्तित्वात आहे ते आत्ता, इथे, या क्षणी आहे. भूतकाळ फक्त स्मरणात आहे आणि भविष्य कल्पनेत आहे. आहे तो वर्तमान आहे आणि तेच आयुष्य आहे, हे लक्षात आले.

जन्म आणि मृत्यू यामधला काळ म्हणजे माणसाचं आयुष्य ही आयुष्याची प्रचलित व्याख्या मला मान्य नाही. आनंदानं जेवढे क्षण व्यतीत करतो तेवढंच आयुष्य. भूतकाळात रमलेले आणि भविष्याच्या चिंतेत बुडलेले क्षण हे मी आयुष्यात धरतच नाही. ‘मी या क्षणी जिवंत आहे’ हा विचार माणसाला किती आनंद देऊ शकतो हे एखादा मरणाच्या दाढेतून वाचलेला माणूसच सांगू शकेल. करोनाकाळानं याची प्रचीती कित्येकांना दिली. मग त्याच आनंदासाठी मरणाच्या दारापर्यंत जायची गरजच काय? तो आनंद मला आत्ता, या क्षणी का नाही होऊ शकत?  प्रत्येक क्षण आनंदानं जगायचा आणि आपल्या असण्याचा उत्सव साजरा करायचा. वर्तमान हेच आयुष्य आहे आणि ते आनंदानं जगायचं हे फक्त आपल्या हातात आहे. त्याचा कंट्रोल कोणाच्याही हातात द्यायची गरज नाही. दु:खाच्या, अपयशाच्या, तुटलेल्या नात्यांच्या, अगदी मृत्यूच्या भयाच्याही.

त्यासाठी गरज आहे फक्त एका अनुभवाच्या जाणिवेची. ‘या क्षणी मी आहे.’ या अनुभवाची जाणीव चिरकाल टिकणारी असेल. कदाचित शरीराच्या मृत्यूनंतरही..

creativeleaf@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyacha arth author urmila sahasrabuddhe vani purpose existence life live question ysh
First published on: 15-01-2022 at 00:02 IST