– नीता दिनेश प्रभू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘This Shall too pass…’ म्हणजेच ‘हेही दिवस जातील..’ असं डॉ. अल्बर्ट एलिस यांचं पुष्टीकरण असलेलं विधान माझ्या मनावर कायमचं कोरून ठेवलं आहे मी. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ असतो जेव्हा मनात निराशा दाटलेली असते, अनेक आघाडय़ांवर संघर्ष सुरू असतो. एक अडचण संपली, की दुसरी उभी राहते. सर्वत्र अविश्वास दाटलेला असतो आणि असं वाटतं, की संपलं सगळं. मग वाटतं, का आपण जगतोय उगाच पुढे अंधार दिसत असताना आणि काय माहीत या अंधारातून पुढे ठेचकाळत पडलो तर? पुढे अगदीच खोल दरी असेल किंवा रस्ताच संपला आणि आपल्याला मागे फिरायची वाट सापडली नाही तर काय करायचं? पण अशा संदिग्ध, धूसर वाटेवरून अंदाजानेच पुढे चालत असताना एक विश्वास मनात सतत तेवत ठेवत जायचा, की अचानक कुठल्या तरी वळणावर बोगदा असलेली वाट संपेल आणि लख्ख उजाडलेला हमरस्ता नक्की लागेल जिथून आपल्या आयुष्याची गाडी मस्त फुल स्पीडनं धावेल आणि मजेत पुढचा प्रवास होईल.

जेव्हा माझं मन खट्टू होतं किंवा निराशा दाटून येते तेव्हा पुस्तकंच माझ्या मदतीला धावून येतात. तेच आपले मित्र, सखा, मार्गदर्शक ठरतात अनेकदा. वाचताना मी पेन्सिलनं खुणा करून ठेवलेल्या असतात, अनेकदा असं होतं, मनात खळबळ माजली, की बरोबर एखादं पुस्तक उघडलं जातं आणि नेमकी खूण केलेली एखादी ओळ हुश्श करणारा दिलासा देऊन जाते. इतरांच्या गोष्टी वाचून, त्यांच्या व्यथा समजून घेऊनदेखील आपल्या दु:खाची धार बोथट होते हे रॉबिन्सन क्रुसोनं शिकवलं. आयुष्य हा एक प्रवाह आहे, तो कधीच थांबत नाही. त्या प्रवाहासोबत आपण मस्त डुलत आपली नाव वल्हवत  पुढे न्यायची, जिथे खळखळता प्रवाह असेल, पाण्याला जास्त जोर असेल तिथे झोकून द्यायचं, आपोआप वाहत मग अशा वेळी वल्ही फिरवत दमायचं नाही. कधी प्रवाह संथ असेल तर जरा प्रयत्नांची वल्ही कौशल्याने फिरवून वल्हवत आयुष्याला थोडं वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करायचा. तर कधी सारखं पुढे वाहत जायचा कंटाळा आला तर होडी किनाऱ्याला लावून चार घटका निवांत पहुडायचं आणि मग पुन्हा निश्चिन्त  होऊन पुढल्या प्रवासाला निघायचं. हे असंच आयुष्य जगत गेलं तर मजा येते.

मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तसं जगत गेले. आणखी एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते, ती म्हणजे शेअरिंग,  share is care  असं म्हणतात तसं आपल्याजवळचं जे जे काही चांगलं आहे ते इतरांसोबत वाटायचं, त्यांना आनंद देऊन आपणदेखील आनंदी राहायचं. आपल्याला झेपेल तशी मदत इतरांना केल्यानं आपल्यालाच बरं वाटतं. आयुष्य क्षणभंगुर असेल, थोडं असेल, जास्त असेल कसंही असेल, तरीही खूप छान आहे आणि माझं अस्तित्व आहे म्हणूनच माझ्या जगण्याला अर्थ आहे. ‘पेला अर्धा भरला आहे,’ असं म्हणायचं ठरवा आणि गाणं म्हणत म्हणत मस्त जगा. dneeta_prabhu@yahoo.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyacha artha author nita dinesh prabhu glass days life conflict difficulty ysh
First published on: 15-01-2022 at 00:02 IST