मेधा देव
एका बस प्रवासात वारीहून परतीच्या वाटेला निघालेल्या आजी भेटल्या. वारीविषयी ऐकून होते, पण त्या आजींनी वारीविषयी जे सांगितलं ते आयुष्यभर लक्षात राहील असंच होतं. त्या प्रवासात आजींनी मला फक्त पंढरीच्या वारीचं महत्त्व समजावलं नाही तर त्यांच्या आयुष्याची ह्रद्य कहाणी ऐकल्यावर वाटलं, आपलं आयुष्य हीसुद्धा एक वारीच असते आणि प्रत्येकाला ती करावीच लागते.
आषाढ सरून गेला असावा. ऐके दिवशी मी बसने निघाले होते. प्रवासात एका ठिकाणी एक आजी चढल्या आणि माझ्या शेजारी येऊन बसल्या. बहुधा वारीवरून आल्या असाव्यात. सत्तरीकडे झुकलेल्या, निळ्या रंगाचं काठाचं साधंच नऊवारी लुगडं, डोक्यावरून पदर, कपाळावर काहीतरी गोंदलेलं, थोडेसं खोल गेलेले डोळे पण डोळ्यात वेगळंच तेज, गळ्यात तुळशीची माळ, दोन्ही हातात दोन दोन सोन्याच्या बांगड्या. खूप जुन्या असाव्यात. गावाकडल्या सगळ्या कामानं जरा थकलेल्या. चेहर्यावर वयाच्या थोड्या सुरकुत्या. गावाला बहुधा एकट्याच असाव्यात असं वाटलं. तरी चेहरा शांत होता…
त्यांच्या मांडीवर एक पिशवी होती छोट्या गाठोड्यासारखी. मी विचारलं, ‘‘आजी वर ठेऊ का ही पिशवी? ’’ तसं ‘‘व्हय’’ म्हणाल्या. मी पिशवी ठेवली आणि पुन्हा जागी बसले. बस चालू झाली आणि कंडक्टरने तिकिटं द्यायला सुरुवात केली. त्या आजी बहुधा त्याच्या ओळखीच्या असाव्यात. त्यानं विचारलं, ‘‘काय आजी, झालं का दर्शन पांडुरंगाचं?’’
‘‘व्हय बाबा डोकं टेकून आले बग त्येच्या पायावर.’’ तसं कंडक्टर म्हणाला, ‘‘कशाला कौतुक आजी तुला त्या पांडुरंगाचं इतकं? इतकं सोसायला लावलं तुला त्यानं. इतकं कष्ट उपसलेस, तरी त्याच्या भक्तीत काही कमी केलं नाहीस. त्याचं सारं मनापासून केलंस, पण त्या पांडुरंगानं काय दिलं गं तुला? होतं ते पण ओरबाडलं. पण तू अजून त्याची भक्ती करणं सोडत नाहीस बघ.’’
आजी डोक्यावरचा पदर नीट करत नुसती हसली. कंडक्टर पुढे गेला. सारे प्रवासी स्थिरावले. आजी जपाची माळ घेऊन जप करायला लागल्या. मध्येच डोळे मिटत होत्या. मीसुद्धा माझा मोबाईल काढला. ‘व्हॉट्सअप’ उघडलं. भरपूर मेसेज होते. वाचू या आता शांत, ठरवलं खरं! पण डोक्यात मघाचे कंडक्टरचे शब्द येत होते. म्हणजे आजी फार सुखी नसाव्यात? सहज त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांचा चेहरा शांत. किती समाधान होतं त्या चेहर्यावर. मीच अस्वस्थ. तेवढ्यात आजींनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहर्यावरच्या अनेक प्रश्न शंका त्यांनी सहज टिपल्या. हसत म्हणाल्या, ‘‘मघा बोलनं जालं ते डोक्यात हाय वाटतं तुज्या?’’. मी नुसतीच ओशाळती हसले. तसं म्हणाल्या, ‘‘अगं त्यो आमच्या गावचा हाय. त्याच्या आजापासनची वळख. त्याला लई परेम समद्या गावाचं.’’
‘‘ पण आजी तो असं का म्हणाला तुम्हाला? तुम्ही तर किती शांत वाटता!’’ माझं कुतूहल मला गप्प बसू देई ना.
‘‘ आणि तुम्ही या वयात एकट्याच वारीला जाता? काळजी, भीती वाटत नाही तुम्हाला?’’
‘‘अगं पोरी कसली भीती नी काळजी गं? समदी काळजी त्या पांडुरंगाला हाय बग. त्येला समद्या जगाची काळजी हाय, त्यो आपली करणार न्हाय व्हय? समदं त्येच्या इच्छेनेच व्हतं बग. जल्माला बी कुटं घालायचं त्योच ठरवितो. अगं सारं त्योच करनार.’’
‘‘ पण मग तुमची त्याच्यावर इतकी श्रद्धा तरी त्यांनी तुम्हाला दु:खच दिलं ना?’’ मी आता गप्प बसणार नव्हते. म्हटलं, ‘‘तो कंडक्टर म्हणत होता त्यानंच तुमचं सगळं ओरबाडलं.’’ ‘‘आता काय सांगू पोरी, त्येची चूक कशी म्हनावी? अगं चार-पाच वर्सांपूर्वी ती महासाथ नाय का आली, त्यात माजं धनी नी चांगला तरणा ताठा पोरगा दोगं गेली, दु:खाचा डोंगर कोसलला बग. काय बी सुधरत नव्हतं, समदं येड्यागत जालं होतं. वाटलं आता मला बी उचलावं त्यांनं, पर माजी सून पोटुशी व्हती. तिच्यासाठी समदी ताकद गोळा केली बग. पर त्ये बी सुख नव्हतं मिळायचं. नात जाली तसा लई आनंद जाला. पन तिला घेऊन सून मंबईला माहेरी गेली ती आजपोतर संबंध नाय. वाईट वाटलं, मला लई राग आला त्या देवाचा. समदे नदीत टाकून द्यायला उटले नी देवार्यापाशी गेले. समदे देव उचलाया हात घातला तशी काय जालं म्हाईत नाय पन डोल्याला इतकं पानी लागलं की खळ येई ना. लई रडले त्येच्यासमुर. तशीच बसून राईले त्येंच्याकडे एक ठाव बगत. कधी सांज होऊन अंधारलं कळलंच न्हाय. तशी त्यांच्या समोर दिवा लावला. त्या परकाशानी त्यो देव्हारा लई परकाशला. पाह्यलं तर ईठ्ठलाच्या चेहर्यात धन्यांचा चेहरा दिसला नी वाटलं मी एकटी न्हाय ते हायेत. तवापासून दर वर्साला वारीला जाते नी पांडुरंगाच्या इथं धन्याच्या पायावर बी डोकं टेकते. लई सुखात ठेवलीन त्येंनी मला. काय बी कमी न्हाय. पन धनी गेलं नी समदी दु:ख पाठीवर भुतापरी बसली. त्येंच्या भावानं सारी जमीन-जुमला सारं हडप केलं. ह्यो घर तेवडं वाचलं. पोरगं कमवत होतं. पन त्यो बी गेला नी सारंच फिरलं बग. मंग कुटं शेतात काम मिळायचं ते करायची. गाठीशी थोडा पैका व्हता. पण त्यानं कुटं भागणार व्हतं. सुनेच्या गर्भारपनात खर्च झाला डाक्टरकडे. पन सूनबी नंतर निगूनच गेली. आता एकटी र्हाते.’’ त्या अगदी शांतपणे सांगत होत्या.
ते ऐकल्यावर म्हटलं, ‘‘तरी त्या पांडुरंगावर इतकी भक्ती?’’ एका क्षणाला वाटलं, देवांना नदीत बुडवायला निघालेली आणि आता इतकी शांत? मी हळूच पुटपुटले,
‘‘केवढी वेडी श्रद्धा ही!’’ पण त्यांनी ऐकलं असावं बहुधा. माझ्याकडे पाहात नुसत्या हसल्या. कुठे दु:खाचा लवलेश नाही. मग मी विचारलंच, ‘‘आजी खरंच विसरलात ते सारं?’’ तसं म्हणाल्या, ‘‘ न्हाय गं, दु:ख, तरास कुटं इसरता येतं का! पन आता न्हाय वळून बघत त्येच्याकडे. त्यावेळेला ईठ्ठला बरुबर धन्याचा चेहरा पाह्यला नी मनाला ठरवून वारीला गेले.
त्या पांडुरंगाचं दर्सन झालं का लई समाधान गावतं आनि वारीत लई माणसं भ्येटतात बग. माज्यासारखंच सारं दु:खं, चिंता, सारं बाजूला ठेवून चालतात. तवा कळतं, ह्यो समदा दु:ख हाय म्हनून देव हाय. अगं सेवटाला आपलं नशीब सटवाईनीच कपालावर लिवलाय त्येला पांडुरंग बी काय करनार? आपनच भोगायचं. कुनाला बी चुकत न्हाय ते.’’ माझ्या मनातल्या प्रश्नाचं आजी उत्तर देत होत्या.
मला त्यांनी विचारलं, ‘‘पोरी तू वारी केली का कदी?’’
म्हटलं, ‘‘नाही हो. मला कुठे वेळ मिळतो? रोज सकाळी पहाटे उठलं की घरच्या कामाचा रगाडा चालू होतो तो रात्रीपर्यंत आणि खरं सांगू आजी मला एवढं नाही वाटत वारीचं वगैरे. नाही म्हणजे देवाचं काही करत नाही असं नाही. मी रोज देवांची पूजाही करते, हं पण ते जपजाप्य, नामस्मरण वगैरे नाही होत. अशी उन्हातान्हात पूर्ण वारी पायी करायची एवढी झेप नाही, विश्वास खूप आहे आजी, पण तुमच्यासारखी श्रद्धा, तळमळ नाही हो मनात आणि खरं सांगू ते नुसतंच आपलं चार पावलं चालून मी वारी केली म्हणायचं ते मनाला अजिबात पटत नाही. म्हणून नाही करत.’’
तसं हसत म्हणाल्या, ‘‘अगं वारी करत न्हाई म्हणतेस, नी ही आयुष्याची वारी करतेस ती? ही आयुष्याची वारी कुनाला चुकलीय सांग. जल्माला येऊन दुडुदुडु चालाया लागलं की वारी चालू जाली का न्हाय? अगं पंढरीच्या वारीला बाईच्या डोईवर तुळशीचा भार असतो. पन आयुष्याच्या वारीत तरी दुसरं काय? बाईच्याच डोईवर असतो की समदा भार! घरचा, दारचा, आला गेला आनि आता तर पोरंबालं त्यांचे संसार कोन सुटलाय का या खटल्यातून? पुना आपला भार सोतानीच पेलायचा. म्होप ऊन पाऊस काय बी असो. आयुष्याची वारी चुकनार हाय का? बरं तुमाला करायची का न्हाय असं बी न्हाईच. चालायचं तर हायेच फकस्त प्रत्येकाची वाट निराली. पंढरीच्या वारीपरमाणंच आपन पन तुळशी रोपा परीसच हा बी भार डोईवर आनंदानं पेलत आयुष्याची वारी चालायची बग. सेवटाला काय गं दोन्ही वारी त्या पांडुरंगाच्याच पायाशी. फकस्त आयुष्याच्या वारीला परतवारी मात्र न्हाय.’’ आजी वारी समजावत होत्या. माझ्या डोळ्यासमोर माझं अख्खं आयुष्य आलं.
म्हटलं, ‘‘आजी किती छान बोलता हो तुम्ही.’’ आजी हळूच हसल्या, माझ्या चेहर्यावर हातांनी हळूच थोपटलं नी जागेवरून उठून दाराशी गेल्या. त्यांची पिशवी वरच राहिली होती. मी पटकन द्यायला उठले तर नुसत्याच हसून उतरल्याही. मी क्षणभर पाहातच राहिले. नंतर विचार केला नी ती पिशवी उघडली. त्यात एक साडी होती, त्यात रखुमाई अन् पांडुरंगाची सुबक मूर्ती गुंडाळलेली होती आणि एक पोथी होती त्यावर लिहिलं होतं, ‘राम कृष्ण हरी…’ आजींनी ते जाणीवपूर्वक मला दिलं होतं का?… आजींच्या शब्दांतला वारीचा
खरा अर्थ आता मला उलगडू लागला होता.
‘‘आयुष्याची वारी कुनाला चुकलीय सांग. जल्माला येऊन दुडुदुडु चालाया लागलं की वारी चालू जाली का न्हाय? अगं पंढरीच्या वारीला बाईच्या डोईवर तुळशीचा भार असतो. पन आयुष्याच्या वारीत तरी दुसरं काय? बाईच्याच डोईवर असतो की समदा भार! घरचा, दारचा, आला गेला आनि आता तर पोरंबालं, त्यांचे संसार कोन सुटलाय का या खटल्यातून? पुना आपला भार सोतानीच पेलायचा. म्होप ऊन पाऊस काय बी असो. आयुष्याची वारी चुकनार हाय का? बरं तुमाला करायची का न्हाय असं बी न्हाईच. चालायचं तर हायेच फकस्त प्रत्येकाची वाट निराली. पंढरीच्या वारीपरमाणंच आपन पन तुळशी रोपा परीसच हा बी भार डोईवर आनंदानं पेलत आयुष्याची वारी चालायची बग. फकस्त आयुष्याच्या वारीला परतवारी मात्र न्हाय.’’
u devmedha1 @gmail. com
