प्रज्ञा तळेगावकर
कांथा भरतकाम हे बांगलादेश आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांमध्ये- विशेषत: पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि ओडिशाच्या प्राचीन कलांपैकी एक आहे. कांथा भरतकामाद्वारे पश्चिम बंगालमधल्या ग्रामीण स्त्रियांचं सक्षमीकरण करतानाच ही कला अधिक विकसित करून तिचा प्रसार भारतासह जगभरात करणाऱ्या प्रीतीकोना गोस्वामी यांना त्यासाठी या वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
जवळपास ५० वर्षांपासून कांथा भरतकामाची कला जोपासणाऱ्या प्रीतीकोना अगदीच योगायोगानं या कलेकडे वळल्या. सत्तरच्या दशकात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या वेळी त्या नुकत्याच मॅट्रिक झाल्या होत्या. घरातली कमावती व्यक्ती गेल्यानं कुटुंब आर्थिक गर्तेत सापडलं होतं. पाच बहिणी आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लावावा यासाठी त्या कामाच्या शोधात होत्या. त्याच वेळी एका मैत्रिणीकडे गेल्या असताना मैत्रीण साडीवर कांथा भरतकाम करत होती. प्रीतीकोना बारकाईनं पाहात होत्या. थोडय़ा वेळानं मैत्रीण भरतकाम तसंच ठेवून घरकाम करण्यासाठी आत गेली. तेव्हा त्या साडीवर भरतकाम करण्याचा मोह प्रीतीकोना यांना झाला. त्यांनी थोडंसं भरतकाम करून साडी पूर्ववत ठेवून दिली. मैत्रीण परत आल्यावर तिला साडीवर तिनं केलं होतं त्यापुढे भरतकाम केल्याचं लक्षात आलं. त्या मैत्रिणीनं त्यांच्या भरतकामाचं कौतुक तर केलंच, शिवाय त्यांनी तिच्यापेक्षाही उत्तम भरतकाम केल्याचं सांगितलं. आपल्याप्रमाणे कपडय़ांवर कांथा भरतकाम करून पैसे कमवण्याचा मार्गही दाखवला. त्यासाठी तिनं त्यांना कोलकात्यातल्या ‘पितांबरी’ या दुकानाची माहिती सांगितली. तिथे भरतकामाचं ‘आऊटसोर्सिग’ केलं जात असे. त्या दुकानातली साडी भरतकामासाठी नेण्यापूर्वी ५० रुपये अनामत जमा करावी लागत होती. प्रीतीकोना यांनी त्यासाठी पैसे उधार घेण्याचं ठरवलं. मात्र त्या काळात- म्हणजेच १९७३ मध्ये त्या केवळ ३० रुपये जमा करू शकल्या. तीही रक्कम त्यांच्यासाठी मोठी होती. पण कामाप्रति असणारी निष्ठा पाहून दुकानाच्या मालकीणबाईंनी एका लहान कापडावर भरतकाम करण्यास सांगून त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांनी केलेल्या भरतकामावर खूश होऊन प्रीतीकोना यांना पहिली ऑर्डर दिली. इथूनच त्यांच्या कांथा भरतकामाला आणि कमाईला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ कपडा घरी नेऊन त्यावर ‘पीस-रेट’ प्रमाणे त्यांनी भरतकाम केलं. दरम्यान त्यांचं लग्न होऊन त्यांना दोन मुलीही झाल्या. पतीची कमाई फारशी नसल्यामुळे भरतकामाच्या कमाईवरच त्यांचं घर चालत होतं.
१९९० मध्ये प्रीतीकोना यांच्या या कामाला महत्त्वपूर्ण वळण मिळालं. त्यांचं भरतकामातलं कौशल्य पाहून पश्चिम बंगालच्या ‘क्राफ्टस् काउन्सिल’च्या अध्यक्ष रूबी पाल चौधरी यांनी त्यांना दक्षिण कोलकात्यातल्या २४ परगणातल्या स्त्रियांना कांथा भरतकामाचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित केलं. तिथून त्यांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेला प्रारंभ झाला आणि कामाला कलाटणी मिळाली.
प्रीतीकोना २००० मध्ये कोलकात्याच्या दक्षिणेकडील सोनारपूरच्या ग्रामीण कामराबादमध्ये स्थलांतरित झाल्या. तिथे त्यांनी घरोघरी जाऊन स्त्रियांना कांथा भरतकाम शिकण्याची विनंती केली. त्यासाठी आपल्या दोन मुलींसह कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या केंद्रात स्त्रियांना ‘नक्षी कांथा’ हे पारंपरिक कांथा भरतकाम शिकवलं जाई. हे काम खूप आव्हानात्मक असलं तरी त्यामुळे प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.
प्रीतीकोना यांना रूबी पाल चौधरी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे कांथा भरतकामातल्या अनेक ऐतिहासिक कलाकृतींचं यशस्वी पुनरुज्जीवन केलं आणि प्रतिकृती तयार केल्या. २००१ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रीतीकोना यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा त्यांच्या कलेचा गौरव आणि त्यांनी भरतकामाद्वारे केलेल्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा सन्मान होता. या पुरस्कारानंतर त्यांना देशभरात ओळख तर मिळालीच, पण त्यांच्या कार्याची व्याप्तीही वाढली. त्यानंतर प्रीतीकोना यांनी कांथा भरतकामाच्या प्रचार-प्रसारासाठी देशभरात दौरे केले. अनेक मोठमोठय़ा प्रदर्शनांमध्ये त्या सहभागी झाल्या. २००६ मध्ये त्या पश्चिम बंगालच्या ‘क्राफ्ट्स काउन्सिल’अंतर्गत एका जपानी प्रकल्पाशी जोडल्या गेल्या. त्याचं काम आजही सोनारपूर इथे सुरू आहे.
आज कामराबाद केंद्रात अनेक कुशल कारागीर स्त्रिया आहेत. त्यांनी वर्षांनुवर्ष अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभागी होऊन, आवश्यकतेनुसार कौशल्यांत सुधारणा केली आहे. त्यांच्या कलाकुसरीतल्या कौशल्यामुळे आज त्यांची कला परदेशात पोहोचली आहे. त्याला परदेशात खूप मागणी आहे.
त्याच्या या कलेनं त्यांना आर्थिकदृष्टय़ा केवळ सक्षमच केलं नाही, तर त्यांना ओळखही मिळवून दिली आणि प्रीतीकोना यांनीही स्त्रियांना केवळ प्रशिक्षण दिलं नाही, तर कलेवर प्रेम करायला शिकवलं. त्यातूनच त्यांच्या कल्पनेला भरारी मिळत असल्याचं त्यांच्या सहकारी अभिमानानं सांगतात.
प्रीतीकोना यांच्या या कार्याचा गौरव या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं केला जात आहे. हा पुरस्कार आपल्या एकटीचा नसून तो आपल्याबरोबरीनं काम करणाऱ्या शेकडो जणांचा असल्याचं त्या सांगतात.
प्रीतीकोना आता सत्तरीला पोहोचल्या आहेत. पण कलेसाठी आणि प्रशिक्षणासाठी आजही त्या तरुणांच्या बरोबरीनं उत्साही आहेत. ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्या अनेक वर्षांच्या कष्टांची आणि संघर्षांची ओळख आहे. मला माहीत आहे की मी माझं कार्य अधिक प्रभावीपणे, जागतिक स्तरावर पुढे नेलं पाहिजे,’ हे त्यांचे शब्द त्यांच्यातल्या अखंड कार्यमग्न राहू इच्छिणाऱ्या कलाकाराचीच झलक दाखवतात.
pradnya.talegaonkar@expressindia.com