आयुष्य समाधानानं जगायचं असेल तर जे आपल्याला मिळत आहे त्याविषयी कृतज्ञ असणं खूप गरजेचं असतं. आपल्या आयुष्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक व्यक्तीचा कृतज्ञतेनं उल्लेख केल्यानं आपलं मन आकाशाएवढं विशाल आणि समुद्राएवढं खोल होतं. आणि असं हे उदार, नम्र मन रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांना, रितेपणाला, निराशेला दूर करतं. अगदी लहान असल्यापासूनच आपल्यावर आभार मानायचे संस्कार केले जातात. उत्तम शिकवण दिल्याबद्दल गुरुजनांचे, काळजी घेतल्याबद्दल, वेळोवेळी आधार दिल्याबद्दल कुटुंबाचे आणि आपल्याला कोणी काही भेट दिली तर त्याबद्दल त्या व्यक्तीचे आभार मानायला आपल्याला शिकवलेलं असतं. काही संस्कृतींमध्ये जेवणाअगोदर प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. हेदेखील एक प्रकारे व्यक्त केलेले आभारच! काही कुटुंबातील मुलांना सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांचे, पोलिसांचे आणि आपल्या गरजेच्या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या लोकांचेही आभार मानायला शिकवलं जातं. आपल्या व्यावसायिक जीवनातही आपल्या सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे आणि ग्राहकांचे आभार आपण मानतच असतो. एखाद्या समारंभाला गेल्यावर आपण तिथल्या यजमानांचे त्यांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल आभार मानतो. जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो, त्या दिवशीची आपली सर्व भाषणे म्हणजे आभार प्रदर्शनच तर असतं! आणखी वाचा-‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय! पण या आभार मानण्यामागे कृतज्ञता असते का? खरं तर हल्लीच्या काळात आभार मानणं ही केवळ औपचारिक गोष्ट म्हणून शिल्लक राहिलेली आहे. कोणी काही चांगलं केलं तर त्याला दिला जाणारा एक ठोकळेबाज प्रतिसाद. आपलं संपूर्ण आयुष्य अशा प्रकारचा प्रतिसाद देण्यात खर्ची पडतं. आपल्याला अशी सतत ऊठसूट आभार मानायची इतकी सवय लागली आहे की, आता हे आपल्या अंगवळणीच पडलेलं आहे. आपण अगदी कृत्रिमपणे ‘थँक्यू’ म्हणतो, पण तसं म्हणताना त्याचा खरा अर्थ बहुतेक वेळा आपण लक्षात घेत नाही. किंबहुना तो आपल्या बोलण्यात-वागण्यात येत नाही. अशा औपचारिक आभारांच्या जगात वावरताना खरी कृतज्ञता (ग्रॅटिट्युड) व्यक्त करण्यात मात्र आपण मागेच राहतो. नुसत्या वरवरच्या आभारापेक्षा कृतज्ञतेला अधिक गहिरेपणा आहे. अधिक सखोल अर्थ आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्या आयुष्यात काही वेगळं, भव्यदिव्य घडत नसतानाही आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल मनापासून आनंदी, समाधानी असणं. आभार मानणं हे आपल्यासाठी कोणी तरी काही तरी करण्यावर अवलंबून असतं, पण कृतज्ञतेचं तसं नसतं. ती एक रोजच्या जीवनात आचरणात आणण्याची वर्तनपद्धती आहे. केवळ वरवर ‘थँक्यू’ म्हणण्यापुरती ती मर्यादित नसून आपल्या जीवनात जे जे काही चांगलं आहे, ते ओळखणं आणि जपणं याच्याशी या कृतज्ञतेचा संबंध आहे. आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या आणि जीवनात आनंद आणणाऱ्या व्यक्ती आणि गोष्टींची दखल घेत त्यांची मनापासून जपणूक करणं म्हणजे कृतज्ञता! रोजच्या सामान्य जगण्याचा विचार करता आपण श्वास घेत असलेल्या हवेविषयी, रोज उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्याही (त्यामुळे आपल्याला रोज रात्री शांत झोपही लागते.) सूर्याविषयी, आपली तहान भागवणाऱ्या पावसाविषयी, निसर्गाविषयीही अशी कृतज्ञता असायला हवी. बऱ्याचदा स्वत:ची अधिकाधिक प्रगती करण्याच्या नादात आपल्याकडे आधीपासून असणाऱ्या गोष्टींचे महत्त्व ओळखायला आपण चुकतो. आपल्यासमोर असणाऱ्या अडचणींवरच सगळं लक्ष केंद्रित होतं आणि त्यामुळे आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टींकडे लक्षच जात नाही. आणखी वाचा-ईतिश्री : थोडीसी बेवफाई? अभय हा जीवनात सातत्याने यश मिळणारा तरुण. अप्राप्य ध्येयं ठरवून ती गाठण्यासाठी अथक मेहनत करणारा. अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर एका नामांकित मार्केटिंग एजन्सीमध्ये त्याला हवी तशी नोकरी मिळाली. निदान कागदावर तरी त्याचं आयुष्य अगदी आदर्श असंच होतं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी, एक प्रशस्त घर आणि प्रेमळ कुटुंब, पण तरीसुद्धा त्याला नेहमीच रितेपणा जाणवायचा आणि तो हताश व्हायचा. हे त्यानं कधीच कोणाला सांगितलं नाही, पण तो नेहमीच असमाधानी असायचा. त्याचा एक प्रकल्प एका धर्मादाय कार्यक्रमाशी संबंधित होता. त्या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनासाठी त्याने अथक परिश्रम घेतले. तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि त्यातून त्याच्या एजन्सीला अपेक्षित फायदा होण्यासाठी त्याने स्वत:ला त्यात पूर्णपणे बुडवून घेतलं होतं. त्याच्या एजन्सीच्या यशोगाथेत ही आणखी एक महत्वाची भर होती आणि त्याच्या बायोडेटामध्ये आणखी एक मानाचा तुरा! कार्यक्रमाच्या दिवशी अभय आपल्या सहकाऱ्यांसोबत तयारीत गुंतलेला असतानाच त्याची भेट झाली तेथे आलेल्या वयस्क शिक्षक साहिल गोठोस्कर यांच्याशी. तब्बल चाळीस वर्षं उत्तम नोकरी करून नम्रतेने आयुष्य जगलेले हे सर. अभयला त्यांच्या डोळ्यांमधून समाधान ओसंडून वाहताना दिसलं आणि या आनंदाचं, समाधानाचं रहस्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेनं त्यानं त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. साहिल सरांनी त्यांची सर्व जीवनकहाणी सांगितली. आयुष्यात खाल्लेल्या खस्ता, दीर्घ आजाराने पत्नीचा झालेला वियोग आणि असं असूनही त्यांचं मनापासून कृतज्ञ असणं. दररोज अगदी लहानसहान गोष्टींसाठीदेखील कृतज्ञता व्यक्त करणं हे त्यांच्या अंगवळणीच पडलं होतं. मग ते छान पोटभर झालेलं जेवण असो, एखाद्याचं छान हसून बोलणं असो, एखाद्यानं केलेली मदत असो, की एखादा छान लख्ख सूर्यप्रकाशाने उजळलेला दिवस असो! त्यांनी एक वही केली होती आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसांत घडलेल्या अशा तीन गोष्टी ते त्या वहीत लिहीत असत, ज्यांच्यासाठी त्यांना मनापासून कृतज्ञ वाटलं होतं. साहिल सरांच्या या वृत्तीमुळे केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नव्हे तर सभोवतालच्या परिस्थितीतही अनेक बदल घडून आले. त्यांची समाजातली प्रतिमाही उंचावली. कितीही आव्हानात्मक परिस्थिती आली, तरी त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ते नेहमीच उपलब्ध असत आणि नेहमीच मदतीसाठी तत्पर असत. त्यांच्या अखंड सकारात्मक वृत्तीमुळे शाळेला आणि शिक्षकांनाही त्यांचा खूपच आधार वाटायचा. कधीही काही अडचण आली, तरी साहिल सरांच्या सकारात्मकतेमुळे आणि सर्वांचं भलं व्हावं या त्यांच्या प्रामाणिक इच्छेमुळे सर्व जण योग्य सल्ला आणि धीर मिळावा यासाठी त्यांच्याकडेच धाव घेत असत. आणखी वाचा-एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व! शेजारीपाजारी सर्वत्र अत्यंत उदार मनाचा मनुष्य,अशी साहिल सरांची प्रसिद्धी होती. एका स्थानिक फूड बँकेत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं. काही सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात ते कायम सहभागी असत तसेच आपल्या गरजू शेजाऱ्यांसाठी त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असायचा. त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सवयीमुळे त्यांच्या मनात खोलवर इतरांप्रति सहानुभूती निर्माण झाली आणि यामुळे इतरांच्या जीवनातला संघर्ष जवळून जाणून घेता आला. त्यामुळे लोकांना शक्य होईल तेव्हा आणि शक्य तितकी मदत करत राहण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. साहिल सरांच्या या जीवनगाथेचा अभयवर चांगलाच प्रभाव पडला. त्या क्षणी त्याला उमगलं की, त्याच्या मनातल्या सततच्या असमाधानाची जागा कृतज्ञतेच्या भावनेने घ्यायला हवी. हळूहळू सुरुवात करत त्यानं स्वत: एक कृतज्ञतेची वही लिहायचं ठरवलं. सुरुवातीला त्याला हे सर्व कृत्रिम वाटलं. कृतज्ञता वाटेल अशा गोष्टी त्याला शोधाव्या लागल्या. रोजच्या आयुष्यातल्या आणि नोकरीतल्या ताणतणावाकडेच त्याचं वारंवार लक्ष जात होतं, पण सातत्याने हळूहळू करत गेलेल्या प्रयत्नांमुळे त्याच्यात बदल घडू लागले. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतलं सौंदर्य त्याला उमगू लागलं. त्याच्या मुलांच्या खळाळणाऱ्या हास्यातलं सौंदर्य, त्याच्या पत्नीच्या आधारातलं सौंदर्य, त्याच्या सहकाऱ्यांशी असलेल्या मैत्रीतलं सौंदर्य! कालांतराने अभयचा आयुष्याविषयी असलेला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तो अधिक वर्तमानात जगू लागला, स्वत: घडवलेल्या आयुष्याचं स्वत: मनापासून आणि भरभरून कौतुक करू लागला. जवळच्या लोकांबद्दल तो अधिक कृतज्ञता व्यक्त करू लागल्याने त्याचे नातेसंबंधही अधिक मजबूत आणि दृढ झाले. त्याच्या हे लक्षात आलं की, जीवनातल्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं त्याला अतिशय कृतार्थ आणि समाधानी वाटत होतं. ज्या रितेपणाने त्याला ग्रासून टाकायला सुरुवात केली होती त्याची जागा आता खऱ्या, आतून उमलून येणाऱ्या आनंदानं आणि समाधानानं घेतली होती. कृतज्ञतेच्या भावनेमुळे अभयच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट झाला. खरा आनंद बाह्य जगातल्या यशामुळे मिळत नाही तर तो अगदी आतून यायला हवा, हे त्याला उमगलं. कृतज्ञतेने जगण्याचा निश्चय केल्याने एका समृद्ध आणि सजग जीवनाचा तो अनुभव घेऊ लागला. ज्या सदिच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी असणारच हे आतापर्यंत गृहीत धरलं होतं, त्यांचं आयुष्यातलं स्थान आणि महत्त्व ओळखून त्यांच्याप्रति जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची आता त्याला रोज नव्याने संधी मिळू लागली. आणखी वाचा-स्वभाव – विभाव : ते असे का वागतात? दररोजच्या जीवनात कृतज्ञतेचा समावेश करणं वरवर फार सोपं वाटत असेलही, पण त्याचे परिणाम दूरगामी आहेत. कृतज्ञतेच्या भावनेमुळे आपल्या जीवनऊर्जेत वाढ होते. आपला आत्मसन्मान उंचावतो आणि अधिक आरोग्यपूर्ण व आनंदादायी स्थिती निर्माण करण्यासाठी मेंदूला चालना मिळते हे शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित झालं आहे. यामुळे आपल्या स्वभावातली आक्रमकता कमी होऊन इतरांसाठी सहानुभूती वाढू लागते. त्याचबरोबर आव्हानात्मक प्रसंगातून लवचीकतेनं आणि खुबीनं, युक्तीनं मार्ग काढता येतो. जगात तणावग्रस्त जगण्याची कितीही कारणं असू देत, पण कृतज्ञ राहिल्यानं आपल्या व्यवहारिक आणि व्यक्तिगत आयुष्यात नक्कीच कायापालट घडतो. कृतज्ञता म्हणजे केवळ नम्रतेचा आविर्भाव नव्हे, तर ही एक अशी सवय आहे, की ज्यामुळे जगणं तर सुखावह होतंच, पण त्याचबरोबर आपलं स्वत:शी आणि इतरांशी असलेलं नातंही अधिक गहिरं होतं. सरांच्या या कथेतून अभयला मोठा धडा मिळाला. कृतज्ञता ही केवळ भावना नाहीये, तर अशी एक प्रभावी कृती आहे की ज्यामुळे आपला जगाशी असलेला व्यवहार बदलतो! कृतज्ञता म्हणजे केवळ चांगल्या गोष्टीची दखल घेणं नव्हे. जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या समृद्धीची, संपन्नतेची आपण नोंद घेणं आवश्यक आहे आणि त्या अनुभवांबद्दल आनंदी, समाधानी राहण्याची वृत्ती म्हणजे कृतज्ञता. साहिल गोठोस्कर यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, ‘जीवनाची परिपूर्णता अनुभवायची असेल तर कृतज्ञता ही त्याची गुरुकिल्ली आहे. तेव्हा या कृतज्ञतेचा फक्त चांगल्या गोष्टीला देण्याचा प्रतिसाद म्हणून अंगीकार न करता प्रत्येक क्षणात आपल्यासह आपल्या सभोवतालाचा कायापालट करण्याचं सामर्थ्य असलेला आणि सजग आयुष्य जगण्याचा एक मार्ग म्हणून आपण कृतज्ञतेचा स्वीकार करू या.’ sanket@sanketpai.com