scorecardresearch

आनंददायी वार्धक्य

आमच्या सेवानिवृत्तीच्या काळात एकदा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी गप्पा मारण्याचा आम्हाला योग आला.

नोकरीसाठी मला ठाण्याहून कांदिवलीला जावे लागे. या रोजच्या प्रवासाचा कंटाळा आला होता. मला पीएच.डी. ही करायची होती. ही चांगली संधी मानून पत्नीचा सल्ला घेऊन मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मुंबई विद्यापीठात जाऊन मराठी विभाग प्रमुख डॉ. गीता मांजरेकरांना भेटलो. मला मार्गदर्शन करण्यास त्या तयार झाल्या. आम्ही चर्चा करून ‘मराठीतील समस्याप्रधान नाटकांचा चिकित्सक अभ्यास’ (१९६० -२०००) हा विषय ठरवला. दरम्यान बी.लिब. पदवीही घेतली. ठाण्याहून दादरच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात रोज अभ्यासाला जाऊ लागलो. असे दहा वर्षे केल्यानंतर प्रबंधाचे काम पुरे झाले. मला पीएच.डी. मिळाली. तेव्हा माझे वय ६९ होते.

दरम्यान, माझ्या सेवानिवृत्तीनंतर सात वर्षांनी माझी पत्नी अलका हीसुद्धा मंत्रालयातून निवृत्त झाली. वाचन आणि पुस्तके जमा करणे याची आम्हा दोघांनाही आवड. तिला अध्यात्माची तसेच पर्यटनाची आवड आहे. आध्यात्मिक पर्यटन म्हटलं तर दुधात साखर. मीही तिच्याबरोबर प्रवासाला जाऊ लागलो. तुम्ही एक पाऊल पुढे टाका. देव तुम्हाला कोणाकोणाच्या रूपाने मदत करीत असतो याचा अनुभव मला अनेक वेळा आला आहे. अशा आध्यात्मिक पर्यटनाच्या शोधात असतानाच ठाण्यात आम्हाला अशी तीन मंडळं सापडली. विष्णूनगर येथील सांप्रदायिक मंडळातर्फे एखाद्या ठिकाणी भागवत कथा करतात. आम्ही त्यांच्याबरोबर गेली पाच वर्ष अशा पर्यटनाला जातो. जवळजवळ २०० ज्येष्ठ नागरिकांचा समूह घेऊन ते जातात. वारी आधी १५ दिवस मूळ वारीसारखीच आळंदी ते पंढरपूर अशी आमची वारी असते. वारीत चार बस, म्हणजे २०० वारकरी असतात. याशिवाय गेली तीन वर्षे मी कळवा ज्येष्ठ नागरिक संघाचा सचिव म्हणून काम पाहतो आहे. या मंडळाचे १२०० पेक्षा जास्त सभासद आहेत. आम्ही डोळे तपासणी, रक्त तपासणी अशी शिबिरे घेतो. तसेच कोजागरी, ज्येष्ठ नागरिक दिन, वार्षिक एकदिवसीय सहल, मकर संक्रांत इत्यादी कार्यक्रम करतो. दरमहा त्या त्या महिन्यातील सभासदांचे एकत्रित वाढदिवस आम्ही साजरे करतो. ठाण्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचा एक महासंघ आहे. त्यांच्यातर्फे ‘मानकरी’ हा अंक दरवर्षी निघत असतो. मी त्याच्या संपादक मंडळात गेली दोन वर्षे आहे.

आमच्या सेवानिवृत्तीच्या काळात एकदा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी गप्पा मारण्याचा आम्हाला योग आला. त्याचे असे झाले, त्याचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांनी मला तो सहा महिन्यांचा असताना डोंबिवलीला त्याचे फोटो काढायला बोलावले होते. मी ते फोटो काढून ४० वर्षे संभाळून ठेवले होते. तो जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच दिवशी तो फोटो ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केला. तसेच ‘लोकप्रभा’ने पाच-सहा फोटो सकट माझी मुलाखत छापली. सचिनला हे कळल्यावर त्यांनी आम्हाला भेटायला बोलावले. आम्ही भेटलो. त्याचे फोटो त्याला दिले आणि दुसऱ्या कॉपीवर त्याची स्वाक्षरी घेतली.

आता माझे वय ७१ आहे. वार्धक्यात आपला उदरनिर्वाह चालविण्याइतके पैसे, उत्तम तब्येत आणि चांगल्या प्रकारे वेळ गेल्यास दिवस चांगले जातात. सध्या अध्यात्म, वाचन, लिखाण, सहली, व्यायाम, छायाचित्रणकला, फेसबुकचा वापर यामुळे तसेच पत्नीने दिलेल्या सहकार्यामुळे दिवस फार छान जात आहेत. शेवटी सेवानिवृत्त जीवनातही आयुष्य भरभरून आणि आनंदाने जगणे हेही महत्त्वाचे आहे.

– डॉ. सुधाकर फडके, कळवा

आनंदाचे डोही आनंद तरंग!

ठरवल्याप्रमाणे नोकरीची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर २००१ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. सरकारी कामकाज उत्तम रीतीने पार पाडून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात पूर्ण समाधानाने घरी परतले. निवृत्तीनंतर.. डोक्यात अनंत विचार, कल्पना, योजना घुटमळत होत्या. नोकरीच्या काळात वाचन काहीच झाले नव्हते. मला माझ्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. त्या सुव्यवस्थितपणे पार पाडल्या असून दोनही मुलींचे विवाह झाले. दरम्यानच्या काळात मुलींच्या विवाहाच्या रुखवतावेळी भरतकाम, विणकामाची हौसही पूर्ण केली.

२०१४ उजाडले. या वर्षीपासून मी माझे आयुष्य जाणीवपूर्वक जगू लागले. भजन गटात सहभागी झाले. रजनी जोशी मॅडम सुंदर-सुंदर भजने शिकवतात. भजनात मन रममाण होते. छोटय़ा छोटय़ा सहली होतात. ‘पुणे गीता धर्म मंडळ’ याची परीक्षा दिली. नाशिक येथे अनघा चिपळूणकर वर्ग घेतात. त्या वर्गाला जाऊ लागले आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता एकनाथ महाराजांच्या साहित्याचा अभ्यास आणि परीक्षा तसेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास असे टप्प्याटप्प्याने चालू आहे. या आनंदसागरात मी रममाण होते. दूरचित्रवाणी पाहणे पण एकदम कमी झाले. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळीही सरस्वतीची, गं्रथांची पूजा करायला आवडते. कारण परमेश्वराने मला भरभरून दिलेले आहे आणि त्यात मी अत्यंत समाधानी आहे. या वेगळ्या आयुष्यात आपल्या संतांच्या साहित्याची ओळख आणि अभ्यास हा मुख्य हेतू आहे. आणि तो हळूहळू पूर्ण होत आहे.

शेवटपर्यंत मला त्यातच रममाण होण्यास आवडेल! दासबोधाचा पत्राद्वारे अभ्यासपण सुरू आहे. संतसाहित्य अनमोल, अगाध आणि ज्ञानाने परिपूर्ण असे रत्नांचे भांडार आहे. त्याची एकदा गोडी लागली की त्यातून बाहेर पडू शकत नाही. ‘देता किती घेशील दो कराने’ ही उक्ती या ठिकाणी सार्थ आहे. आज माझे वय ६२ वर्षे आहे. सध्या आनंदाचे डोही आनंद तरंग! हीच अवस्था आणि आनंदाची व्याख्या नाही करता येत. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो हे खरे!

माधुरी प्रकाश मुजुमदार, नाशिक

हवेसे वाटणारे जीवन

माझं वय सध्या ७१ आहे. म्हणजे सेवानिवृत्त होऊन जवळजवळ १३ वर्षे झाली, पण जीवनाबद्दल निराशा कधीच मनात आली नाही. आणि मला खात्री आहे की शेवटच्या श्वासापर्यंत जीवन नकोसे वाटणार नाही.

शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या पायऱ्या चढत चढत शेवटी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. विविध प्रकारचे अनुभव आले. मी दररोज नियमित पायी फिरत एक-दीड किलोमीटरवरील विठ्ठल मंदिरात जातो, तेथे ज्ञानेश्वरी, भागवत, महाभारत ऐकायचे. तेथेच नऊ ते साडेनऊ तुकाराम गाथेतील अभंगाचे सार्थ विवरण चालू असते ते ऐकून साडेदहापर्यंत घरी यायचे. साडेअकरा वाजेपर्यंत जेवण करून थोडीशी वामकुक्षी करायची आणि नंतर वर्तमानपत्रे चाळायची किंवा इतर कामे करायची. सायंकाळी पाच ते साडेसहा हरीपाठ असतो. तेथे मंदिरात पाच-सहा लोकांसमवेत तो आनंद घ्यायचा. अगदी व्यवस्थित वेळेचे नियोजन होते आणि कोठेही मनाला इतरत्र भटकण्याची वेळ येत नाही.

अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नावीन्यपूर्ण ‘ज्येष्ठ नागरिक मंच’ स्थापन झालेला आहे. त्याचा मी गेल्या नऊ वर्षांपासून आजीव सभासद आहे. या मंचामार्फत दरमहा दोन दर्जेदार कार्यक्रम, दरमहा संबंधित ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस-सत्कार, वर्षांतून एकदा वर्षांसहल, ऋ षीपंचमीला ऋ षीतुल्य व्यक्तींचा सत्कार, वैशिष्टय़पूर्ण ज्ञान-विज्ञान पुरस्कार, जानेवारी महिन्यात एक दिवस भरगच्च कार्यक्रमासह स्नेहसंमेलन, १ ऑक्टोबरला वृद्ध दिनानिमित्त वृद्धाश्रमाला सक्रिय भेट आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.  जगण्याला हुरूप येतो. काहीतरी नवीन मिळाल्याचे समाधान मिळते.

शेवटी मला एवढेच म्हणावयाचे आहे की वृद्धांनी आपले लक्ष भौतिक जगातून दूर करून अन्यत्र वळविले पाहिजे. ज्यात समाजसेवा आहे किंवा सुसंस्कार आहेत अशा गोष्टी नवीन पिढीपर्यंत पोहचविल्या पाहिजेत.

– पांडुरंग काळे, अहमदनगर

स्वत:साठी जगायची सुरुवात

२००४ मध्ये मी निवृत्त झाले. तोपर्यंत मुलाचे शिक्षण, नोकरी, लग्न सर्व पार पडले. मग आम्ही दोघेच घरात होतो. ४० वर्षांचा संसार झाला. एक खांबी तंबूसारखा सावरला. सासर-माहेरच्या लोकांचे केले, नवऱ्याचे करता येईल तेवढे सर्व केले, मुलाला त्याच्या पायावर उभे केले, सर्व कर्तव्ये पार पाडली. पण मनात कुठेतरी हुरहूर होती. मग लक्षात आले आपण सर्व केले पण स्वत:साठी काय केले? स्वत:साठी जगायचे राहूनच गेले. मग मी ठरवून स्वत:साठी जगायला सुरुवात केली.

नाटकाची खूप आवड होती. नोकरीत असताना नाटक-स्पर्धेत भाग घेतला होता. बरीच बक्षिसे पण मिळविली होती. मग धडाधड नाटके बघायला सुरुवात केली. पतीची फारशी साथ नव्हती, मग कोणी मैत्रीण आली तर नाहीतर एकटीच जायचे. कथा-कादंबरी वाचनाचाही धडाका सुरू केला. मग रात्रीच्या जागरणाला बंधन ठेवलंच नाही. मिस्टरांना वाचनाचा मात्र बराच छंद होता. त्यामुळे घरात विकत घेतलेल्या पुस्तकांचे संग्रहालयच आहे. स्वयंपाकातपण बदल केला. कधी सूप, इडली सांबार, मासालेभात, पराठे, थालीपीठ असाच मेनू केला. हे सर्व करताना मनाला एक प्रकारचा आनंद व्हायचा. कुठेतरी स्वतंत्रतेचा आभास व्हायचा. आता तर वेळेला पण बंधन ठेवले नाही. आंघोळ, जेवण, झोपणे सगळ्याच वेळा बदलल्या. मनात आले की, रिक्षा करून बाजारात जात होते. बिनधास्त शॉपिंग करीत होते. मग एखादा छोटासा दागिना, साडी, असे काहीही असायचे, वेळेला आणि पैशाचे कोणतेच कारण या बंधनात ठेवले नाही. यांना सहलींना जायला फार आवडते. त्यांनीही त्यांना हवे तसे जगावे, असे ठरवले आणि मीही मला हवं तसं जगणार असं ठरवलं. मनाला उभारी, उत्साह आला, आपण ५- ७ वर्षांनी लहानच झालोय असे वाटायला लागले. मला लहान मुले फार आवडतात. कॉलनीतल्या छोटय़ा मुलांना आणून दिवस -दिवस सांभाळले. आतापर्यंत या गोष्टी शक्य नव्हत्या. वेळ, काटकसर, पैसा सर्वाचाच विचार करावा लागत होता. आता ते सर्व मनाला स्पर्शतच नव्हते.

मनात वेगवेगळे विचार यायचे. मग ते कागदावर उतरवायला सुरुवात केली. निरनिराळ्या विषयांवर लेख लिहिले. निरनिराळ्या वर्तमानपत्रांत काही ना काही उपक्रम येतच असतात. त्यात भाग घेतला. एक लेख पाठविला तो छापून आला मग दुसरा, तिसरा नंतर नादच लागला. वृत्तपत्रामध्ये माझा लेख छापून आला की परमानंद व्हायचा. ती अनुभूती वेगळीच होती. तो आनंद वेगळाच होता. छापून आलेला लेख पाहिला की, या वयात सुद्धा चक्क उडय़ा मारायची. मग कथा लिहिल्या, त्यापण या वर्षी दोन दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. मन प्रफुल्लित होत होते. लिखाण करायला लागून तीन-चार वर्षेच झाली. हा आनंदसुद्धा फार मोठा होता. मला काय लेखिका वगैरे व्हायचे नाही. कारण आज मी ७१ वर्षांची आहे. आता त्यासाठी अवधीच नाही, तेवढी प्रतिभाही हवी. मला यातून मात्र एक वेगळा आनंद भावला.  मुलगा-सून खूप प्रोत्साहन देत होते. ओळखीचे, मैत्रिणींचे फोन यायचे, खूप छान वाटायचे. या सर्वामुळे खूप आनंदी, उत्साही वाटायची. सगळे म्हणायच्या तुम्ही इतक्या वयाच्या वाटतच नाही हो! गेली ४-५ वर्ष तर मी जास्तच समाधानी, आनंदी, उत्साही झाले आहे. उशिरा का होईना मला हा आनंद गवसला. हे नसे थोडके! आता शेवटपर्यंत मी अशीच आनंदाने जगणार हे नक्की.

– सरिता देशपांडे, सातारा

मराठीतील सर्व भरभरून जगताना ( Bharbharun-jagtana ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Career after retirement life after retirement career plans after retirement

ताज्या बातम्या