scorecardresearch

Premium

गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘आपणच आपल्यावर मात करायची ’’

तरुण मंडळी मातृभाषेतून शिकण्याविषयी काय म्हणतात, हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

ब्लॉगर आणि लघुचित्रपट निर्माते  मौक्तिक कुलकर्णी.
ब्लॉगर आणि लघुचित्रपट निर्माते  मौक्तिक कुलकर्णी.

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘आपल्याकडे परीक्षेसाठीची ‘सेमिनार्स’ रट्टे मारून पार करता येत असल्यामुळे मी ती कशीतरी निभावून नेली. पण अमेरिकेला आल्यावर ‘टर्म पेपर’ सादरीकरणाच्या वेळी पहिला हादरा बसला. मी भांबावलो. इंग्लिशमधून मला माझे विचार सुस्पष्टपणे मांडता यायला हवेत, हे प्रकर्षांनं जाणवलं. मग इंग्रजी संभाषण करण्यावर भर दिला. आपल्या मनात जी भीती असते, की मला प्रश्न नीट विचारता येतील का?, तिच्यावर मात करायला आपणच आपल्याला प्रवृत्त करायला लागतं. अमेरिकेतल्या शैक्षणिक पद्धतीनंही मला हे सगळं करायला भाग पाडलं. त्यामुळे संभाषणावर प्रभुत्व आलं.’’ सांगताहेत जळगावमध्ये मराठी माध्यमातून शिकलेले आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले, ब्लॉगर आणि लघुचित्रपट निर्माते  मौक्तिक कुलकर्णी.

गेले सात महिने आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या आणि स्वत:चं एक स्थान निर्माण केलेल्या व्यक्तींच्या मुलाखती वाचल्या. मातृभाषेतून शिकल्यामुळे शिक्षणातल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्यांना मोलाची मदत झाली आणि मराठीतून शिकल्यामुळे त्यांनी काही गमावलं तर नाहीच, उलट खूप काही मिळवलं, हा त्यांच्यातला समान धागा होता.

पण हे झालं आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित झालेल्यांविषयी. परंतु तरुण मंडळी मातृभाषेतून शिकण्याविषयी काय म्हणतात, हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  मराठी माध्यमातून शिकलेल्या तरुणांना आपल्या भवितव्याविषयी काही साशंकता वाटते का?, इंग्रजी माध्यम आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांचं (बोर्ड्स) पेव फुटलेलं असताना ज्यांच्या पालकांनी त्यांना मराठी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला, तो त्यांना रुचलाय का?, मराठीतून शिकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो का?, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधला.

मौक्तिक कुलकर्णी हा जळगावमध्ये वाढलेला युवक. त्यांचा जन्म अमेरिकेत झाला खरा, पण ते तीन-साडेतीन वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जळगावला परत आलं. तिथे बालवाडीपासून दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. प्राथमिक शिक्षण त्यांनी ‘आदर्श प्राथमिक शाळे’त आणि नंतर ‘लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालया’त पूर्णपणे मराठीतून केलं. पुढे त्यांनी पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं, तसंच अमेरिकेत दोन पदव्युत्तर पदव्याही मिळवल्या. त्यानंतर मात्र सर्वसाधारण मार्ग न चोखाळता सुरुवातीला नोकरी, नंतर जगप्रवास, पुस्तक लेखन (तेही इंग्रजीत), लघुचित्रपट निर्मिती अशा अनेकविध गोष्टी त्यांनी केल्या. त्यांच्या अनुभवांविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा..

प्रश्न : मौक्तिक, प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यावर अकरावी-बारावीचं शिक्षण तुम्ही कुठून पूर्ण केलंत, आणि तिथे माध्यमाचा बदल कितपत जाणवला?

मौक्तिक : दहावीनंतर मी पुण्यात मॉडर्न महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे माझा पहिल्यांदा इंग्रजीशी जवळून संबंध आला. पहिले एक-दोन महिने शास्त्रातल्या संज्ञा आणि वेगवेगळी शास्त्रीय नावं, गणितातल्या संज्ञा वगैरे आत्मसात करायला लागले. पण ते आव्हान न झेपण्यासारखं आहे असं मला कधी वाटलं नाही. आमच्या घरी इंग्रजी वर्तमानपत्र येत असे आणि मी ते वाचत असे. त्यामुळेही मला मदत झाली असावी. महाविद्यालयातलं शिकवणं हे इंग्रजीत असलं, तरी बाकी मित्रांशी बोलणं वगैरे सगळं मराठीतूनच होत असे. माझ्या इंग्रजीची कुणी खिल्ली उडवत नसे, पण माझ्या जळगावच्या मराठीतील विशिष्ट शब्दांची, उच्चारांची मात्र त्यांना गंमत वाटे. त्यामुळे मी माझा मराठी बोलण्याचा बाज बदलला. इंग्रजीतून उत्तरपत्रिका लिहिताना विशेष काही अडचण आल्याचं आठवत नाही. चाचणी परीक्षांना आता फार महत्त्व नसतं. त्यामुळे मी काही परीक्षांमुळे फार दबून गेलो नाही.

प्रश्न : पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यानंतरचा अनुभव कसा होता?

मौक्तिक : तिथे खरंतर पहिल्यांदा आजूबाजूचं सामाजिक वातावरणही बदललं. अकरावी-बारावीत माझ्या बरोबरीचे बहुतेक सगळे मराठी बोलणारेच होते, त्यामुळे काही फरक जाणवला नव्हता. अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यावर मी वसतिगृहात राहात होतो. तिथे संपूर्ण भारतातून आलेली मुलं होती. बहुतेकांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. महाविद्यालयातल्या स्नेहसंमेलनाचं नियोजन वगैरे करणारी मुलंही त्यातलीच असत. तेव्हा पहिल्यांदा मला वाटलं, की आपलंही इंग्रजीवर अधिक प्रभुत्व असतं- विशेषत: इंग्रजी संभाषणावर, तर बरं झालं असतं. त्यामुळे मी कधी या समारंभांमध्ये किंवा नियोजन समित्यांमध्ये भाग घेतला नाही. मराठी शाळांत मुलांमध्ये सभाधीटपणा येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्याची कमतरता मला जाणवली. अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्ही मराठी माध्यमातली मुलं एकत्र असायचो. इंग्रजी माध्यमातल्या मुलांवर अगदी ‘अरे, काय हे स्वत:ला फार भारी समजतात,’ वगैरे टिप्पण्याही करायचो. आमच्या मनात असलेली असुरक्षितता म्हणा, किंवा न्यूनगंड म्हणा- त्यामुळे आमचा असा दृष्टिकोन झाला होता. असं असलं तरी उत्तरपत्रिका लिहिताना काही समस्या येत नव्हती.

प्रश्न : शैक्षणिक दृष्टीनं काही फरक पडला का? म्हणजे इंग्रजी माध्यमातली मुलं पुढे जात आहेत आणि आपण मागे राहात आहोत असं कधी वाटलं का?

मौक्तिक : कदाचित थोडा फरक पडलाही असेल, पण विशेष नाही. तुम्ही जर    आत्मविश्वासानं बोलत असाल, प्राध्यापकांशी संवाद ठेवून असाल तर परीक्षांमध्ये थोडं डावं-उजवं होतही असेल. पण माझं काही नुकसान झालं असं मला नाही वाटत. शिवाय लेखी परीक्षांमध्ये काही प्रश्न नव्हता. अमेरिकेला जायला ‘जीआरई’ (‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झ्ॉमिनेशन’) वगैरे परीक्षा दिल्या. त्यातही चांगले गुण मिळाले. त्यामुळे माझ्या करिअरसाठी आणि नवीन संधी मिळण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणामुळे काही अडचणी आल्या असं मुळीच झालं नाही.

प्रश्न : अभियांत्रिकीला असताना तोंडी परीक्षा, ‘सेमिनार्स’ वगैरे देताना कितपत त्रास झाला?

मौक्तिक : सेमिनार्स ही रट्टे मारून पार करता येत असल्यामुळे मी ती कशीतरी निभावून नेली. पण अमेरिकेला आल्यावर मात्र जेव्हा मला ‘टर्म पेपर’साठी सादरीकरण करायला लागलं तेव्हा पहिला हादरा बसला. त्यात प्राध्यापकांनी पहिल्या दोन-तीन मिनिटांतच मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मला नीट उत्तरं देता येईनात. त्यामुळे मी भांबावलो आणि माझी गाडी रुळावरून घसरली. तेव्हा माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. इंग्लिशमधून मला माझे विचार सुस्पष्टपणे आणि संक्षिप्तपणेही मांडता यायला हवेत, हे मला प्रकर्षांनं जाणवलं.

प्रश्न : मग त्यासाठी काय प्रयत्न केलेस?

मौक्तिक : इंग्रजी संभाषण करण्यावर भर दिला. मुद्दाम सगळ्यांशी वेगवेगळ्या अवांतर  विषयांवर इंग्रजीतून बोलायला लागलो. हेतू हा, की कधीही, कुणीही आणि काहीही विचारलं तरी न गडबडता उत्तर देता यायला हवं. त्याबरोबरीनं वर्गात नुसती श्रवणभक्ती न करता प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपल्या मनात जी भीती असते, की मला प्रश्न नीट विचारता येईल का?, तिच्यावर मात करायला मुद्दाम प्रयत्न करण्याची गरज असते. त्यासाठी आपणच आपल्याला प्रवृत्त करायला लागतं. अमेरिकेतल्या शैक्षणिक पद्धतीनंही मला हे सगळं करायला भाग पाडलं. त्यामुळे संभाषणावर प्रभुत्व आलं.

प्रश्न : तुम्ही जगभर फिरला आहात, त्यावर इंग्रजीतून पुस्तकही लिहिलं आहे, ज्याचं मराठी भाषांतरदेखील आता उपलब्ध आहे. तुमचा ‘ब्लॉग’ इंग्रजीत आहे, आणि हे लेखन तांत्रिक नसून वेगवेगळ्या विषयांवर आहे. त्यासाठी इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व मिळवायला लागलं असणार. हा खूप मोठा बदल आहे. तो कसा काय झाला?

मौक्तिक : मला लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड आहे. मी भरपूर वाचतो. पुस्तक लिहिण्यापूर्वीची काही र्वष मी अमेरिकेत घालवली होती. त्यामुळे इंग्रजी सुधारलं होतं. पण लहानपणी मी जे वाचन केलं, ते सगळं मराठीत होतं. माझ्या आजूबाजूचं वातावरण आणि मी जे काही वाचायचो त्यात साम्य होतं, त्यामुळे त्या लेखनाशी सहज संवाद जुळत गेला, त्याचा संदर्भ मला सहज लावता आला. लेखन म्हणजे तरी काय असतं? तुम्ही आजूबाजूला जे बघता त्याचा तुम्ही काय अर्थ लावता, हे तुमच्या लिखाणात उतरतं. तुम्ही जर लहानपणीच एकदम दुसऱ्या भाषेतलं  लेखन वाचायला सुरुवात केली, तर तुम्हाला ते संदर्भ लावणं जड जाणार. कारण त्या भाषेतले संदर्भ हे ती भाषा बोलली जाते त्या देशातले असणार, आणि ते तुमच्या ओळखीचे असतीलच असं नाही. संदर्भ लागले नाहीत तर त्यात रस कसा वाटणार? आणि मग वाचनाची गोडी कशी लागणार? इंग्रजी माध्यमातल्या मुलांना लहानपणी कदाचित या समस्येला तोंड द्यावं लागत असेल. माझ्या पुस्तकाविषयी म्हणाल, तर माझं पहिलं पुस्तक हे माझ्या दक्षिण अमेरिकेच्या सफरीवर आहे. तिथे तर मला ना इंग्लिशचा उपयोग होत होता, ना मराठीचा, कारण तिथे सगळे स्पॅनिश बोलतात. फार तर पाच-दहा टक्के लोक इंग्रजी समजू आणि बोलू शकत असतील, तेसुद्धा उत्तम नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची अंत:प्रेरणा, निरीक्षणशक्ती यांवर अवलंबून असता. त्यावरून तुम्ही तुमच्या अनुभवांचे अर्थ लावता. भाषेचा अभाव असूनही ते मला जमून गेलं, कारण लहानपणीच्या वाचनामुळे मला सवय होती.

प्रश्न : तुम्ही आत्तापर्यंत पन्नासहून अधिक देशांचा प्रवास के ला आहे. त्या देशांमध्ये तिथल्या भाषांची काय परिस्थिती आहे? त्याबद्दल तुमची काही खास निरीक्षणं आहेत का?

मौक्तिक : एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे ज्या देशांची अर्थव्यवस्था बळकट आहे, त्यांना इंग्रजीचं फारसं महत्त्व वाटत नाही. विकसनशील देशातले लोक इंग्रजी शिकायला जास्त उत्सुक असतात. सध्या इंग्रजी, जर्मन, जपानी या प्रबळ भाषा आहेत. युरोपियन देश, जपान, जर्मनी या देशांनी आपापल्या देशवासीयांना उत्कर्ष साधायच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी त्यांना इंग्रजीच्या कुबडय़ा घ्याव्या लागल्या नाहीत. स्कॅन्डिनेव्हियन देशांतल्या लोकांना त्यांची भाषा येते, आणि इंग्रजीही. या देशांमध्ये आर्थिक स्थैर्य आहे. ते त्यांच्या युवा पिढीला उत्तम दर्जाचं शिक्षण देतात, स्वतंत्र विचार करायला उत्तेजन देतात. त्यामुळे तिथे वारंवार नवनवीन शोध लावले जातात, आणि त्या अनुषंगानं येणारे उद्योगधंदे उदयाला येतात. समाजाला नवीन संधी उपलब्ध होतात. थोडक्यात म्हणजे राजकीय, आर्थिक स्थैर्य, उत्तम शिक्षण आणि उद्योजकता व सर्जनशीलतेला वाव देणारी शासकीय यंत्रणा हे एकत्र आलं, तर समाजातल्या सर्व थरांना उत्कर्ष साधण्यासाठी पोषक वातावरण मिळतं. आपल्याकडे आपण नक्की कोण आहोत यावर, आणि आपल्याला कुठे जायचं आहे यावरही आपलं एकमत नाही. शिक्षणात घोकंपट्टीला महत्त्व आहे. त्यामुळे त्यानंतरही नवीन उद्योग सुरू करण्यापेक्षा नोकरी करण्याकडे जास्त कल असतो. असं असल्यामुळे इंग्रजी येण्याला फार महत्त्व दिलं जातं. आपल्याकडेही जर तसं वातावरण निर्माण करता आलं, तर आपल्यालाही कदाचित इंग्रजी येणं ही यशाची गुरुकिल्ली आहे असं वाटणार नाही.

प्रश्न : तरुण पिढीला मराठीतून शिकून काही तोटा झाल्यासारखा वाटत नाही, हे ऐकून बरं वाटतं..

मौक्तिक : तोटा तर नाहीच, उलट फायदाच झाला. स्पॅनिशमध्ये मराठीसारखा आदरार्थी बहुवचन हा प्रकार असतो, क्रियापदाची रूपंही स्त्रीलिंगी, पुल्लिंगी अशीच असतात. इंग्रजीत या संकल्पना नाहीत. पण मला मराठी येत असल्यानं स्पॅनिश भाषा शिकणं सोपं गेलं. अलीकडे तर संशोधनांमधूनही हेच निष्कर्ष येत आहेत, की वयाच्या १५ ते २० वर्षांपर्यंत वेगवेगळ्या भाषा आत्मसात करायची क्षमता उत्तम असते. त्याचा उपयोग करून आपण बहुभाषक व्हायला पाहिजे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blogger and short film maker mauktik kulkarni garja marathicha jayjaykar dd70

First published on: 08-08-2020 at 03:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×