scorecardresearch

रक्त संक्रमणाचा नवा चेहरा

प्रत्येक रुग्णाला रक्तातील नेमक्या कुठल्या घटकाची गरज आहे ते ओळखून रक्ताचा तेवढाच घटक संक्रमित करण्याच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कॉम्पोनन्ट थेरपीविषयी…

ch12प्रत्येक रुग्णाला रक्तातील नेमक्या कुठल्या घटकाची गरज आहे ते ओळखून रक्ताचा तेवढाच घटक संक्रमित करण्याच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कॉम्पोनन्ट थेरपीविषयी…

रक्ताच्या ऊर्जाशक्तीबद्दल माणसाला पहिल्यापासून कुतूहलमिश्रित आकर्षण वाटत आलेलं आहे. उसळणारं रक्त, रक्ताचं नातं, रक्तरंजित क्रांती इत्यादी शब्दप्रयोग हेच सुचवतात. रक्त संक्रमणाच्या अयशस्वी प्रयोगांचे उल्लेख अगदी पौराणिक-ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असले तरी ही प्रक्रिया शास्त्रीयदृष्टय़ा वयात आली विसाव्या शतकात, जेव्हा कार्ल लैंडस्टीनरनी प्रथम ए, बी,ओ आणि नंतर आरएच रक्तगटांचा शोध लावला आणि एका माणसाचं रक्त दुसऱ्याला देऊन त्याचे प्राण वाचवण्याच्या स्वप्नाला मूर्त रूप मिळालं.
त्यानंतर रक्त संक्रमणाच्या क्षेत्रात खूपच बदल होत गेलेत. रक्तदानाची सुरक्षित पद्धत, रक्ताच्या विविध तपासण्यांची व्यवस्था, दूषित रक्त नष्ट करणे, रक्त गोठून न देता पूर्णत: र्निजतुक प्लास्टिक पिशव्यांमध्ये शीतकपाटात साठवून ठेवण्याची सोय, गरजू रुग्णाला पाहिजे तेव्हा रक्त मिळण्याचं ठिकाण ऊर्फ रक्तपेढी इत्यादी. आता रक्त संक्रमणाच्या एकंदर प्रक्रियेला एका स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. रक्तपेढीचं व्यवस्थापन हा पूर्वी सर्वसाधारण पॅथोलॉजिस्टच्या कामाचा एक भाग असे. आता त्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेला स्वतंत्र अधिकारी असणं गरजेचं झालं आहे. आणि या शास्त्राची व्याप्तीसुद्धा वाढत गेली आहे.
रक्तदाता आणि रक्त स्वीकारणारा या दोघांचे ए-बी-ओ आणि आर एच हे रक्तगट तर जुळले पाहिजेतच पण याव्यतिरिक्त इतरही अनेक रक्त घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सर्व काळजी घेऊन केलेल्या संक्रमणातही अनेक अडचणी येतात, किरकोळ खाज, पुरळ अशा त्रासापासून थंडी भरून येणे, ताप, दम लागणे, श्वासाला अडथळा, फुप्फुसात पाणी भरणे असे गंभीर स्वरूपाचे त्राससुद्धा होऊ शकतात. विशेषत: ज्या रुग्णांना एकाच वेळी खूप रक्त द्यावं लागतं. उदा. गंभीर अपघात, मोठय़ा शस्त्रक्रिया, प्रसूती पश्चात रक्तस्राव अशा घटना, किंवा ज्यांना वारंवार रक्त घ्यावं लागतं असे थॅलेसेमिया, सिकलसेल अ‍ॅनिमिया, हिमोफिलियासारखे आजार असणाऱ्या रुग्णांना रक्त संक्रमणाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
हा त्रास कमी करता येईल का? प्रत्येक रुग्णाला नेमकी गरज कशाची आहे ते ओळखून रक्ताचा तेवढाच घटक संक्रमित केला तर त्याचं शरीर दिलेल्या घटकाचा स्वीकार अधिक चांगल्या पद्धतीने करेल. या संकल्पनेतून जन्म झाला कॉम्पोनन्ट थेरपीचा, याबद्दलचीही माहिती.
रक्तपेढीत जमा झाल्यानंतर रक्ताचं पृथकरण करतात ५०० मिलीलिटर रक्तातून सुमारे २०० मिलीलिटर पेशी आणि ३०० मिलीलिटर पातळ द्रव (प्लाझ्मा) मिळतो. पेशींमधला मुख्य भाग असतो तांबडय़ा पेशींचा, ज्यांची गरज जास्तीतजास्त रुग्णांना असते. हा घट्टसर द्रव म्हणजे पॅक्ड रेड सेल्स (पीआरसी). २०० मिलीलिटरच्या एका युनिटमुळे हिमोग्लोबिन एक ग्रॅमने वाढतं. पीआरसीचा वापर बऱ्याच वर्षांपासून चालत आला आहे, पण या द्रवामध्ये पांढऱ्या पेशी, प्लेटलेट व इतर पदार्थ असून त्यांच्यामुळेही रुग्णाला त्रास होऊ शकतो म्हणून आता तांबडय़ा पेशी सलाइनमध्ये धुऊन घेण्याची पद्धत निघाली आहे. ज्या रुग्णांची प्रतिकारकशक्ती कमी झालेली आहे, उदा. कर्करोग, स्टेम सेल प्रत्यारोपण केलेले रुग्ण किंवा गर्भावस्थेतच ज्यांचं संपूर्ण रक्त बदलावं लागतं असे भ्रूण अशांना तांबडय़ा पेशी देताना आधी त्या पेशींवर गॅमा किरणांचा मारा केलेला असतो. अतिसूक्ष्म अशा काही विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून या रक्ताला विशेष प्रकारचा फिल्टर वापरतात.
तांबडय़ा पेशींना काही पर्याय मिळेल का? आता गायी – बैलांच्या हिमोग्लोबिनचे खास प्रक्रिया केलेले रेणू यासाठी अभ्यासले जात आहेत. कृत्रिम तांबडय़ा पेशी, परफ्लूरो- कार्बन वापरलेले रेणू हेसुद्धा या शर्यतीत आहेत. डेंगी तापाच्या उद्रेकामुळे प्लेटलेट पेशी आता सर्वसामान्यांना माहीत झाल्या आहेत. इतरही अनेक व्याधी अशा आहेत की प्लेटलेट्सची संख्या त्यामध्ये कमी होते आणि ठिकठिकाणी रक्तस्राव सुरू होण्याचा धोका असतो. ५०० मिलीलिटर रक्तातून सुमारे ५०-७० मिलीलिटर प्लेटलेट्स मिळू शकतात. गरजू व्यक्तीला ४-६ रक्ताच्या युनिट्समधून मिळालेल्या प्लेटलेट्स एकत्र करून देतात. त्याहून चांगली पद्धत म्हणजे एफेरेसिस. यामध्ये दात्याचं रक्त एका नळीतून काढून विशिष्ट यंत्रातून अभिसारित केलं जातं. रक्तातून प्लेटलेट्स काढून बाकी रक्त दुसऱ्या नळीतून दात्याला परत करतात. या प्रकारात अर्थात जास्त प्लेटलेट्स मिळतात. बहुधा प्लेटलेट्स सामान्य तापमानालाच साठवून ठेवतात, परंतु अतिशीत तापमानाला गोठवलेल्या प्लेटलेट्स १० वर्षांपर्यंत चांगल्या राहू शकतात. लायोफिलायझेशन या प्रक्रियेत प्लेटलेट्स कोरडय़ा पावडरीच्या रूपात, र्निजतुक स्थितीत साठवल्या जातात.
तांबडय़ा पेशींप्रमाणेच आता प्लेटलेट्सना पर्याय असे इतर काही पदार्थ उपयोगात येत आहेत. कालावधी संपलेल्या प्लेटलेट्सचे कणसुद्धा मूळ पेशींप्रमाणेच काम करतात. ज्यांना वारंवार प्लेटलेट्सची गरज पडते अशांसाठी असे कण वरदान ठरू शकतील.
रक्तातील द्रवपदार्थ हीसुद्धा खूप उपयोगाची गोष्ट आहे (प्लाझ्मा). रक्तस्रावाने खचत चाललेल्या रुग्णाला जीवदान देऊ शकतील असे रक्त गोठवणारे पदार्थ त्यात असतात. ५०० मिलीलिटर रक्तातून २५०-३०० मिलीलिटर प्लाझ्मा मिळतो. रक्त गोळा केल्यावर ८ तासांच्या आत प्लाझ्मा वेगळा करून गोठवला तर त्याला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा ( एफ एफ पी ) म्हणतात. उणे १८ तापमानाला हा पदार्थ वर्षभर चांगला राहू शकतो. गोठवलेला प्लाझ्मा ४ अंश तापमानाला आणल्यास एक जेलीसारखा पदार्थ मिळतो, याला म्हणतात क्रायो प्रेसिपिटेट. यामध्ये रक्तस्राव थांबवणारे सर्व घटक संपृक्त अवस्थेत असतात. हिमोफिलिया, डेंगीसारख्या अनेक व्याधी, शस्त्रक्रिया चालू असलेले रुग्ण यांचा रक्तस्राव थांबवण्यासाठी क्रायोचा चांगला उपयोग होतो.
फायब्रिन ग्लू असाच एक घटक. फेव्हिकोलचा ‘मजबूत जोडम्’ जसा हरहुन्नरी तसाच फायब्रिन ग्लू हा पदार्थ आहे. यामध्ये प्लाझ्मातील फायब्रिनोजेन आणि थ्रोम्बिन हे दोन घटक आहेत, हा ग्लू लावला की दहा सेकंदात वाहत असलेल्या रक्ताची गुठळी बनते. मोठय़ा शस्त्रक्रियांमध्ये या ग्लूचं महत्त्व किती असतं हे सांगायला नको.
प्लाझ्मामधून वेगळे काढता येणारे आणखी दोन महत्त्वाचे पदार्थ म्हणजे प्रथिन अलब्यूमिन आणि इम्यूनो ग्लोब्युलिन. अलब्यूमिनवर उष्णतेची प्रक्रिया करून त्याच्यातील अनेक प्रकारच्या जंतूंचा आणि विषाणूंचा नाश करून मग ते वापरलं जातं. रक्तातील प्रथिने अगदी कमी झाली असतील (उदा. यकृताचे विकार) तर अलब्यूमिन देऊन खूप चांगला परिणाम साधता येतो.
इम्यूनो ग्लोब्युलिनची इंजेक्शन शिरेतून देतात. गंभीर स्वरूपाच्या आजारात, जसं की संधिवात, कर्करोग, प्लेटलेट्सची कमतरता, गर्भवतीचं विषाणूंपासून रक्षण करण्यासाठी वगैरे. अलब्यूमिन आणि ग्लोब्युलिन दोन्हींना खर्च पुष्कळ येतो, परंतु रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
अगदी क्वचित वापरलं जाणारं इंजेक्शन म्हणजे वेगळ्या काढलेल्या पांढऱ्या पेशीचं. कर्करोगावर उपचार करीत असताना कधी कधी रुग्णाच्या पांढऱ्या पेशी एकदम कमी होऊन त्याला ताप येऊ लागतो. प्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे चटकन तीव्र जंतुसंसर्ग होऊन जिवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी पांढऱ्या पेशी वाढवणं म्हणजे रुग्णाला जीवदान.
कॉम्पोनन्ट थेरपीमुळे काय साधलं? जरूर त्या ठिकाणी जरूर तेच रक्त घटक वापरल्यामुळे रुग्णाचा फायदा तर होतोच, पण नको त्या घातक प्रतिक्रिया टाळता येतात. विकसित देशांमध्ये आज संपूर्ण रक्त बहुधा कोणालाच देत नाहीत, तर वर वर्णन केल्याप्रमाणे योग्य त्या कॉम्पोनंटचाच वापर करतात. आपल्याकडेही आता हीच पद्धत रूढ होते आहे. अशी सुविधा विकसित करण्यासाठी अत्यावश्यक आहे रक्तशास्त्राचा सखोल अभ्यास, रक्त घटक वेगळे काढण्याचं आणि साठवण्याचं अचूक तंत्र, आणि त्यांचं योग्य तिथेच उपयोजन करण्याची क्षमता.
डॉ. लीली जोशी
संदर्भ : डॉ. आर. सी. आर्य , एनसीबीआय

मराठीतील सर्व उद्याचे आज ( Udyacheaaj ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blood component therapy

ताज्या बातम्या