आपली कितीही चूक असली, तरी लोक नव्याण्णव टक्के वेळा कबूल करत नाहीत. गुन्हेगारी जगात हे नेहमीचं आहे त्यामुळे टीका निर्थक असते, याचं कारण मग तो माणूस स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करणं सुरु करतो. टीका ही धोकादायक असते, कारण त्यामुळे माणूस जखमी होतो, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो आणि रागावतो. म्हणून मध गोळा करायचा असेल तर पोळ्यावर लाथ न मारता युक्तीने तो काढायला हवा..

जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल, तर मधमाश्यांच्या पोळ्यावर कधीच लाथ मारू नका..

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई

७ मे, १९३१! हा दिवस न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील  खळबळजनक दिवस ठरला. नाटय़ सुरू झाले होते,  ‘टू गन’ क्राउले हा एक खुनी.. तो दारू पीत नव्हता, सिगरेट ओढत नव्हता; पण पोलीस त्याच्या मागे शिकारी कुत्र्याप्रमाणे लागले होते. तो वेस्ट एण्ड एव्हेन्यूच्या किनाऱ्यावरील त्याच्या मैत्रिणीच्या घरात लपून बसला होता. सुमारे दीडशे पोलीस गुपचूप त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन पोहोचले. त्यांनी छपराला भोके पाडून त्यामधून अश्रुधूर आत सोडून क्राउलेला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतींवरून  बंदुका त्याच्यावर रोखल्या होत्या. त्यांनी गोळीबार सुरू केला. क्राउलेपण प्रतिउत्तर करत होता. अखेर क्राउले पोलिसांच्या झटापटीत पकडला गेला. पोलीस कमिशनर ई. पी. मुलरूने यांनी जाहीर केले, ‘‘अविचारी, दुष्कृत्य करणारा ‘टू गन’ हा आत्तापर्यंत पोलिसांकडून मारल्या गेलेल्या गुन्हेगारांपैकी सर्वात जास्त खतरनाक होता. तो अतिशय उलटय़ा काळजाचा होता.’’

पण ‘टू गन’ क्राउलेला स्वत:बद्दल काय वाटत होते? ज्या वेळी पोलीस त्याच्यावर हल्ला चढवत होते तेव्हा तो पत्र लिहित होता. ‘संबंधित जन हो! माझ्या या कोटाखाली एक थकले-भागलेले, पण दयाळू हृदय आहे. असे हृदय, ज्याने आत्तापर्यंत कोणालाही इजा पोहोचवली नाही.’ त्याने या पत्रात असं का म्हटलं होतं?

घडली ती घटना अशी, एके दिवशी क्राउले त्याच्या मैत्रिणीबरोबर गळ्यात गळा घालून मौजमजा करत होता. नेमकं  त्याच वेळी एक पोलीस त्याच्या गाडीजवळ आला व त्याने क्राउलेकडे लायसेन्स मागितले. त्यावर एक शब्दही न बोलता क्राउलेने  बंदूक काढली आणि त्या पोलिसावर गोळ्यांचा वर्षांव केला. तो पोलीस ऑफिसर जेव्हा खाली कोसळला तेव्हा क्राउले गाडीतून खाली उतरला, त्याने त्या पोलीस ऑफिसरचे पिस्तूल बाहेर काढले व त्या पिस्तुलानेच त्याच्या शरीराच्या खालच्या भागावर गोळ्या झाडल्या आणि असा हा पाषाणहृदयी मारेकरी म्हणत होता, ‘माझ्या या कोटाखाली एक थकले-भागलेले पण दयाळू हृदय आहे, ज्याने आत्तापर्यंत कोणालाच कधीच इजा पोहोचवलेली नाही.’ क्राउलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मृत्युदंडाच्या खोलीत जेव्हा त्याला आणले गेले तेव्हा तो म्हणाला, ‘मी लोकांना ठार मारले म्हणून ही शिक्षा मला देण्यात आली का? नाही, मी स्वत:च्या प्राणांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला म्हणून मला ही शिक्षा देण्यात आली.’

तात्पर्य काय, तर ‘टू गन’ क्राउले अशाही परिस्थितीत स्वत: ला दोष द्यायला तयार नव्हता. गुन्हेगारी जगात असे घडणे नेहमीपेक्षा वेगळे आहे का? तुम्हाला जर असे वाटत असेल, तर पुढची गोष्ट ऐका.

‘मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगली वर्षे लोकांना आनंद देण्यासाठी घालवली. त्यांच्या भल्यासाठी झटलो, पण तरीही मला शिव्याशापच मिळाले. मला खुनी म्हणूनच संबोधले गेले.’ हे म्हटले आहे अल् केपोनने. अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुंड, समाजकंटक, अतिशय दुष्ट टोळीनायक असणाऱ्या अल्ने शिकागोवर हल्ला केला होता; पण तरीही केपोन स्वत:ला दूषणे देत नाही. तो स्वत:ला समाजोपयोगी कार्यकर्ता समजतो. त्याने समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचले, पण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला गेला व त्याच्या कष्टाचे चीज झाले नाही, असे त्याला वाटते. तीच गोष्ट डच स्कुल्ट्झच्या बाबतीत घडली! तोसुद्धा गुन्हेगार जगतातील अत्यंत कुप्रसिद्ध गुंड होता. न्यूयॉर्कमध्ये एका वृत्तपत्राला मुलाखत देताना त्याने असे सांगितले की, तो समाजाचा मित्र आहे अशी त्याची श्रद्धा आहे.

न्यूयॉर्क येथील कुप्रसिद्ध सिंगसिंग तुरुंगाचे एक अधिकारी लुईस लॉवेस यांच्याशी माझी एकदा मुलाखत झाली आणि याच विषयावर आम्ही खूप छान गप्पा मारल्या. ते म्हणाले, ‘‘सिंगसिंगमध्ये असलेल्या काही गुन्हेगारांना हे जाणवते की, ते वाईट आहेत. ती तुमच्या-आमच्यासारखीच माणसे असल्याने  काही गोष्टी युक्तिवादाने पटवून देतात. तिजोरी का फोडली किंवा बंदुकीचा चाप त्यांनी एवढय़ा घाईने का ओढला, हे ते समजावून देऊ शकतात. पण काही गुन्हेगार मात्र आपल्या विघातक कृत्याबद्दल खोटारडी कारणे सांगून त्यांचे कसे चुकले नाही हे पटवून देतात आणि त्यांना असे कैद करून ठेवणे किती चुकीचे आहे हेही समजवण्याचा प्रयत्न करतात.’’

जर अल केपोन, क्राउले, डच स्कुल्ट्झ आणि तुरुंगात असलेले इतर असंख्य स्त्री-पुरुष स्वत:ला दोषी मानत नसतील, तर तुम्हा-आम्हाला, रोजच्या रोज भेटणाऱ्या लोकांबद्दल काय बोलावे?

जॉन वॅनामेकर, त्याच्याच नावाच्या स्टोअर्सचा संस्थापक. त्याने एकदा कबूल केले, ‘‘मी तीस वर्षांपूर्वीच हे शिकलो की, दुसऱ्यावर रागावणे मूर्खपणाचे असते. माझ्या स्वत:च्या मर्यादा जाणून घेतानासुद्धा माझा संताप होत असे आणि देव बुद्धिमत्तेची देणगी देताना अन्याय करतो याचा मला राग येत असे.’’ वॅनामेकर हा धडा खूप लवकर शिकला; पण व्यक्तिश: माझा अनुभव पहिला, तर आपली कितीही चूक असली, तरी लोक नव्याण्णव टक्के वेळा कबूल करत नाहीत, हे मी वर्षांनुवर्षे पाहत आलो आहे.

त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं निर्थक असतं, कारण त्यामुळे तो माणूस स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करायला सुरुवात करतो. टीका ही धोकादायक असते, कारण त्यामुळे माणूस जखमी होतो, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो आणि रागवतो. बी. एफ. स्किनर हा जगप्रसिद्ध मनोशास्त्रज्ञ होता. त्याने त्याच्या प्रयोगावरून हे सिद्ध केले आहे की, प्राण्यांना जर त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल बक्षीस दिले गेले, तर ते अधिक लवकर व परिणामकारकरित्या शिकतात आणि त्यांना जर त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल शिक्षा केली गेली, तर ते काहीच शिकत नाहीत. नंतर त्यांनी मानवांवरील प्रयोगांनीसुद्धा हेच सिद्ध केले. टीका केल्याने कायमस्वरूपी परिणाम साधत नाही, उलट संतापच वाढतो.

दुसरा एक मोठा मानसशास्त्रज्ञ टॅन्स सेले म्हणतो, ‘‘कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल.’’ नोकरांवर किंवा कुटुंबातील सदस्यांवर किंवा मित्रांवर टीका केल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होते, त्यांच्या स्वभावात फरक पडतो का?

ओक्लाहोमाचा जॉर्ज बी. जॉनस्टन हा एका इंजिनीअिरग कंपनीमध्ये सुरक्षा-व्यवस्थापक होता. त्याच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी ही होती की, कामगारांनी काम करताना डोक्यावर सुरक्षा-टोप्या घातल्या आहेत की नाही ते पाहाणे. पण  कामगार त्या घालत नसत. मग तो त्यांना कडक शब्दात, रागावून, ‘हा नियम पाळलाच पाहिजे.’ वगैरे सांगत असे. कामगारांच्या हिताचे असूनसुद्धा कामगारांना ते आवडत नसे आणि जेव्हा जॉनस्टन जवळपास नसे तेव्हा तर कामगार त्या टोप्या भिरकावूनच देत असत. मग जॉनस्टनने युक्तीने वागायचे ठरवले. पुढच्या वेळेस जेव्हा कामगार त्याला टोपी न घातलेले आढळले तेव्हा त्याने त्यांना विचारले की, या टोप्यांनी त्यांना काही त्रास होतो का? त्या नीट बसत नाही का? मग त्याने त्यांना अगदी विश्वासाने सांगितले की, ‘त्या टोप्या त्यांना इजा होऊ नये यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्यांनी त्या घालायला हव्यात.’ याचा परिणाम काय झाला? तर कामगारांना मुळीच राग आला नाही उलट कामगारांनी त्या नियमाचे आनंदाने पालन केले.

तुम्ही इतिहासात जर डोकावून पाहिले, तर इतिहासाच्या पानोपानी तुम्हाला टीकांमधली व्यर्थता जाणवेल. म्हणूनच टीका न करता त्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं तर लोक स्वत:मध्ये नक्की बदल करू शकतील.

(मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ‘मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा’ या डेल कार्नेजी लिखित आणि अ‍ॅड. शुभदा विद्वांस अनुवादित पुस्तकातील संपादित भाग.)

डेल कार्नेजी

chaturang@expressindia.com