एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक रचनेवरून,रंगावरून तिची टिंगल करणं, टोमणे मारणं, चिडवणं थोडक्यात ‘बॉडीशेमिंग’ करणं आपल्या समाजात नवीन नाही, परंतु काहींसाठी ती जीवघेणी ठरते. काही जण न्यूनगंडामुळे आत्मविश्वासच घालवून बसतात. चिंता, भय, निराशा त्यांना इतकी वेढते की, समाजापासूनच नाही तर स्वत:च्या डोळ्याला डोळा भिडवायला ते घाबरतात. एखाद्याचं आयुष्य थांबावं इतकं महत्त्व या चिडवण्याला, टिंगलीला आपण का द्यावं? काय वाटतं तुम्हाला?
चौथीत असताना मला चष्मा लागला, परंतु मला तो तीव्रतेने खटकला जेव्हा कुणीतरी माझ्यामागून जोरात ओरडलं, ‘‘ए चष्मिष.’’ त्या शब्दात खरं तर राग येण्यासारखं काहीच नव्हतं, पण तो ज्या प्रकारे उच्चारला गेला होता त्यावरून लक्षात आलं ते चिडवणं होतं. त्यानंतर मी दिसले रे दिसले की, ‘ढापणी’, ‘चार डोळे’, ‘बॅटरी’ असं चिडवणं नेहमीचं झालं. पाठी वळून पाहिलं की, ती व्यक्ती गायब झालेली असे. पण त्यामुळे हळूहळू मला हा माझ्या शरीरातला नव्हे, तर माझाच दोष वाटायला लागला.
आपल्यात काही तरी कमतरता आहे, याची जाणीव त्या लहान वयात प्रत्येक विशेषणाबरोबर मनात घट्ट रुतत गेली आणि हळूहळू स्वत:बद्दलच्या न्यूनगंडात बदलत गेली. अर्थात हे नंतर जाणवलं. परंतु लहानपणी ते माझ्यासाठी सत्यच होतं. हे कुणाला सांगावं आणि कुणी आपली समजूत घालावी, असं वातावरण ४०-५० वर्षांपूर्वी नसल्याने प्रत्येक चिडवणं माझ्यातल्या न्यूनतेची जाणीव करून देणारं असल्याने मी खचत गेले होते, एवढं आठवतंय.
त्यावेळी मी लहान असल्यामुळे असेन, पण ही एवढी छोटी गोष्ट जर मी इतकी मनाला लावून घेत असेन तर अनेकांना त्यांच्या शारीरिक दोषांवर(?) बोलणं, चिडवणं, हिणवणं, टिंगल करणं, अवहेलना, उपहास करणं किती त्रास देत असेल आणि शरीराचं हे तथाकथित व्यंगत्व त्यांच्या मनाला किती पंगू करत असेल ना? ते किती खोलवर असतं ते लक्षात येतं त्यातून घडलेल्या आत्महत्यांमुळे किंवा ते व्यंग सुधारण्यासाठी टोकाच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया करायला मागेपुढे न पाहाणार्या अनेकांमुळे. जगभरात अशा शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने मृत्युमुखी पडणार्यांची संख्याही मोठी आहे. तरीही लोक त्याकडे वळत असतील तर हे टोमणे मारणं एखाद्याला किती खोलवर हादरवून टाकत असेल हे लक्षात येतं. चिडवणारे हे लोक इतके क्रूर का वागतात, बोलतात? एखाद्याला त्याच्या शरीरावरून टिंगल करण्याने कुणाला कसला आनंद मिळतो? की त्यांच्या लक्षातच येत नाही आपल्यामुळे कुणी दुखावला जातोय ते?
मी लहान असताना निदान ‘ट्रोलिंग’ प्रकरण नव्हतं, जे काही असायचं ते प्रत्यक्ष. पण जेव्हापासून समाजमाध्यमं आली तेव्हापासून दुसर्यांना बोलणं हा माझा अधिकार असल्यासारखंच लोकं कितीही दुखावणारं, टोचणारं, अनेकदा तर अत्यंत खालची पातळी गाठून बोलणार्यांची संख्या वाढली आहे, विशेषत: स्त्रियांना. अर्थात बहुतांशी खोट्या नावाच्या आणि बनावट चेहर्याच्या आडूनच.
मला आठवतंय, २०१५ मध्ये ‘व्होग इंडिया’साठी दीपिकाने एक लघुपट केला होता, ‘माय बॉडी, माय माईंड, माय चॉईस’ साधारण ९९ जणींनी तिच्या होकारात आपला होकार मिसळला होता. अर्थात तो लघुपट स्त्रीच्या सगळ्याच अधिकारांवर बोलणारा होता. पण दीपिकाला अनेकदा तिच्या शरीरावरच्या ‘कमेंट्स’ना, त्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलेलं आहे, कधी मासिकाच्या मुखपृष्ठावरील तिच्या फोटोवरून आणि नंतर तर तिच्या गरोदरपणातील शरीरयष्टीमुळे. कधी ‘टू थीन’ तर कधी ‘टू स्किनी’ अशी अनेक ‘लेबलं’ आणि विशेषणं, पण तिने त्याला कधी आक्रस्ताळीपणाने उत्तर दिलं नाही. जे दिलं ते शांतपणे, अडीच मिनिटांच्या लघुपटातून, ‘माय बॉडी, माय चॉइस.’ इतकंच कशाला… प्रत्येक चित्रपट कलावंताला, बहुतांशी अभिनेत्रींना कमी-जास्त वेळा यातून जावंच लागतं.
सुष्मिता सेन, विद्या बालनसारख्या व्यक्ती मात्र त्याला पुरून उरतात कारण त्यांच्याकडे इतकी वर्षं चित्रपट व्यवसायात राहून शहाणपण आलेलं असतं. आणि ते ठामपणे बोलून दाखवण्याचा आत्मविश्वास आलेला असतो, अर्थात तरीही, एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितलं, ‘‘मधल्या काळात मी खूप आजारी होते. कुणाला मी सांगितलं नव्हतं आणि अचानक कुठल्याशा कार्यक्रमासाठी मला रंगमंचावर यावं लागलं. माझी त्यावेळी असणारी अवस्था लक्षात न घेता अनेकांनी प्रचंड टीका केली. ‘काय झालंय हिचं?’, ‘काय करून ठेवलंय हिनं स्वत:चं?’ कितीही ठरवलं मनावर घ्यायचं नाही, तरी वाईट तर वाटलंच, खूपच.’’ असं जेव्हा ती सांगते तेव्हा लोकांचा समोरच्या व्यक्तीचा विचार न करता बोलण्याचा स्वभाव एखाद्याच्या किती जिव्हारी लागू शकतो, हे जाणवतं.
‘‘मी नुकताच बाळाला जन्म दिलाय, माझं वजन वाढलंय, थोडी तरी सहानभूती दाखवा,’’ असं सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणार्या पत्रलेखा राजकुमारने ट्रोलर्सना सुनावलं होतंच. असंच उदाहरण स्वरा भास्करचं. बाळंतपण मानवलेल्या स्वरावर ‘तू किती जाडी झालीस’ अशी टीका करताना, ‘मुस्लीम माणसाशी लग्न केलंस म्हणून तुझी अशी अवस्था झाली,’ असे तारे तोडणारे कमी नव्हते. विद्या बालन तर सांगते, ‘‘जाड असणं आणि बारीक असणं या शरीराच्या दोन अवस्था आहेत.
त्यात वाईट काय? पण जेव्हा माणसं ‘जजमेंटल’ होऊन व्यक्तिगत टीका करतात तेव्हा त्यांचा सूर वेगळा असतो. त्याचं दुखं होतं.’’ अर्थात तिच्यासह अनेकजणी असल्या गोष्टी लवकर कानाआड करतात. पण प्रत्येकालाच तसं उदात्त होता येत नाही, मग माणसं कोषात जातात. इतकी की चिंता (एन्झायटी) आणि मग नैराश्य (डिप्रेशन) पर्यंत पोहोचतात. एखादीला नटण्यामुरडण्याची खूप हौस असते. तिने साडी कशी नेसलीय, कपडे कोणते घातलेत, ती फॅशनच फार करते, मेकअपच किती करते इथपासून सुरू झालेले टोमणे जेव्हा तिच्या चारित्र्यावरच घाला घालण्या इतपत वाढतात तेव्हा मात्र एक हसती-खेळती व्यक्ती पार आयुष्यातून उठू शकते.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरून, तिच्या चालण्या-बोलण्यावरून टिंगलटवाळी करणं, टोमणे मारणं यालाच इंग्रजीमध्ये ‘बॉडीशेमिंग’ म्हटलं जातं आणि जगभरात याचे पडसाद ऐकायला मिळतात. सर्वात वाईट म्हणजे याचं खूप सामान्यीकरण झालं आहे. एखाद्या व्यक्तीची जाडी, रंग, त्यांचं तोतरं बोलणं, पायानं अधु असणं यावरून सर्रास चिडवलं जातं. पौगंडावस्थेतील मुलींना-मुलग्यांना तर ढब्बू, खादाड, भुक्कड , ढेरपोटी, खाऊची पेटी, नकटी, दाताडी-बिजागर्या, तोतरा, बोबडा, अडखळ्या, कासव, वाचाळ वगैरे वगैरे. काहींना त्यांच्या शरीरावरून तर काहींना त्यांच्या स्वभावावरूनही टीकेचा सामना करावा लागतो, त्यातल्या त्यात सौम्य – रडूबाई, ढ, भित्री, भांडखोर, हळूबाई, कजाग, मुर्ख, आळशी, पृथ्वीवर भार, मंद. या लेखात जरी आपण फक्त ‘बॉडीशेमिंग’ बद्दल बोलत असलो तरी अशी विशेषणं माणसाचं कमजोर करतातच.
पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्यातला हाच काळ अतिनाजूक असतो, ज्यावेळी त्यांना स्वत:च्या शरीराबद्दल कुतूहल वाटायला लागलेलं असतं. शरीर त्यांना काही सांगत असतं अशा वेळी जर सतत त्यांच्या शरीरावर टीका करीत राहिलं तर त्याचा दीर्घकाळ नकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर होतो. आत्मविश्वास हरवू शकतो. पण लक्षात कोण घेतो?
अनेकदा तर आपले जवळचे नातेवाईकच, आत्या, काकू, मावशी पटकन, ‘किती गं जाड झालीस? अशाने नवरा कसा मिळायचा?’ असं सहज एखाद्या मुलीला बोलून जातात आणि त्यांना कुणी थांबवलं तर, ‘तिच्याच भल्यासाठी बोलतेय ना मी?’ असं त्याचं समर्थनही करतात. इतकं हे दुसर्याला दुखावणं समाज म्हणून आपल्या नसानसात भरलं आहे. एका आरोग्यविषयक सर्वेक्षणानुसार ९० टक्के लोकांच्या मते असं बोलण्यात काहीही वावगं नाही. कारण प्रत्येकाने लहानपणापासूनच असं कोणाला तरी कोणाबद्दल तरी बोलताना पाहिलेलं असतं. हेच सामाजिक सार्वत्रीकरण.
परंतु यांचा दुष्परिणाम हा की मुलीसुद्धा आपल्या शरीराच्या आकाराला फारच गांभीर्याने घ्यायला लागल्या. ‘तू जाडी झाली आहेस,’ या वाक्याचा न्यूनगंड तर सगळ्याच वयोगटात दिसतो. शरीरावर टोकाचे प्रयोग केले जातात. ‘काय करू इतका व्यायाम करते, इतकं डाएट करते पण बारीकच होत नाहीए’, माझ्या मैत्रिणी बघ र साइजचे कपडे घालतात’, ‘नशीबवान आहेस, किती बारीक आहेस तू?’, ‘मी महागडी न्यूट्रिशनिस्ट, डाएटिशियन लावलीय, त्याशिवाय काही मी बारीक होणार नाही,’ ‘दिवाळीत ना २-४ किलो सहज वाढतं माझं वजन.’ ‘आंबा इतका आवडतो ना पण मी खाऊच नाही शकत, पटकन वाढतं वजन’, अशी वाक्यं सहज ऐकायला मिळतात, इतका आता जाड असण्याचा ‘टॅब्यू’ झाला आहे. याचं एक कारण समाजाचा दबाव.
अर्थात त्याविरोधात अनेक आंदोलने झाली. कपड्यांचे साइज डबल, ट्रिपल एक्स, ओव्हरसाइज… झाले. ‘माझं शरीर, माझा निर्णय’ स्लोगनही लोकप्रिय झालं. पण तरीही ना बोलणार्यांचा आवाज बंद झाला ना ऐकून घेणार्यांची मानसिकता.
अलीकडे समाजमाध्यमांमुळे, विशेषत: ‘सेल्फी’ कल्चरमुळे. बारीक असण्याचं, गोरं असण्याचं, सुंदर दिसण्याचं फारच उदात्तीकरण (ग्लोरिफिकेश) केलं जातं, त्यामुळे ज्या मुली तशा नसतात त्यांच्या स्वत्वाला, स्व-प्रतिमेला, स्व-प्रतिष्ठेला धक्का बसतो. आपण चांगले दिसत नाही, हे मनावर बिंबत जातं. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने तर ती १५ दिवसांसाठी बाहेर गेलेली असताना (अन्यथा ती हे करू देणार नाही हे माहीत असल्याने) इंटरनेटवरचं वाचून जेवणच बंद केलं. त्याचा इतका वाईट परिणाम झाला की, जेव्हा मैत्रीण घरी आली तेव्हा लेकीचा सापळा झालेला पाहून तिने धसकाच घेतला. मुली इतक्या टोकाला का जातात? याची जी नेहमीची कारणं आहेत त्यात, सामाजिक दबाव (‘पिअर प्रेशर), फियर ऑफ मिसिंग आउट’(फोमो), सौंदर्याविषयीच्या समाजमानसातल्या रूढ कल्पना, चित्रपट अभिनेत्रीच्या शरीरयष्टीचं आकर्षण (पूर्वी ‘झिरो फिगर’ ची क्रेझ होती, आता ‘टोन बॉडी’ असावी लागते), आणि अलीकडे त्यात समावेश झालाय तो बॉयफ्रेंडच्या आवडीचा.
ही सगळी कारणं बघितली तर लक्षात येतं की, ती कारणे समाजातून आलेली आहेत. समाजातल्या बदलत्या संकल्पनांनी या तरुणींच्या मनावर राज्य केलं आहे. ब्रिटनच्या एलिस वेबने आपल्या नितंबांचा आकार बदलण्यासाठी केलेली विना शस्त्रक्रिया प्रक्रिया अयशस्वी झाल्याने तिची स्वप्नं तर संपलीच आणि आयुष्यही. नाक, गाल, हनुवटी, स्तन, पोट या सगळ्यांचा आकार बदलू घेण्याचा ‘ॲस्थेटिक सर्जरी’चा व्यापार कित्येक कोटी डॉलर्सचा आहे. त्यावर तर वेगळा लेख लिहावा लागेल.
हे सगळं होत असतं कारण कुणी तरी कुणाला तरी सतत ‘जज’ करतं. आणि आपल्या मताची पिंक टाकत त्याचा आनंद घेतं. अन्यथा कुणाला तरी असा जीवघेणा टोमणा मारण्यात, समोरच्याला खजील करण्यात, दु:खी करण्यात कोणता आनंद मिळत असेल? प्रसिद्ध मानस अभ्यासक अंजली जोशी यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘‘ त्यामागे सत्तेची प्रेरणा असते. एखाद्याच्या मनात सत्ता आणि ताबा (पॉवर आणि कंट्रोल) याचं इतकं वर्चस्व असतं की, त्यांना वाटतं, एखादी व्यक्ती दु:खी झाली, रडली म्हणजेच मी तिला झुकवलं, तिच्यावर मला अधिकार गाजवता येतोय.
मी कुणालाही माझ्या समोर वाकवू शकतो, ही त्यांच्यातली भावना इतकी प्रबळ असते की, त्यापुढे त्यांच्यातली सहअनुभूती – एम्पथीसुद्धा नाहीशी होते. वयाने, पदाने मोठी असलेली व्यक्ती अनेकदा असे शब्द वापरत असते.’’ त्यांनी एक उदाहरण देताना सांगितलं, ‘‘मुलीच कशाला माझ्याकडे एक मुलगा समुपदेशनला येणार होता. तो प्रत्यक्ष तर आला नाहीच पण ऑनलाइन बोलतानाही त्याने आपला व्हिडीओ बंद ठेवला होता कारण त्याला त्याच्या काळेपणाचा न्यूनगंड होता. त्याला न्यूनगंड आला याचं कारण त्याच्या रंगावरून त्याला नक्कीच कुणी तरी जीवघेणं बोललेलं असणार, सातत्याने बोललं असणार, साहजिकच ते त्याच्या मनाला कुरतडत राहिलं असणार.’’
मला तर असं वाटतं, की हे काळेपणाचं ओझं समाजानेच दिलेलं असतं. इंग्रजांनी ज्या अनेक गोष्टी मागे सोडल्या त्यात इंग्रजी बोलता येणं आणि गोरं दिसणं हे वर्चस्वाचं लक्षण मानलं गेलं. ते नसलं की तुम्ही खुजे मानले जाता. याबद्दल अंजली म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे याबाबतीत ‘अनकॉन्शस बायसेस’ जास्त बघायला मिळतात. म्हणजे एखाद्याला जाडा, टकल्या सहज बोललं जातं, मुख्य म्हणजे ती त्या व्यक्तीची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि त्यात आपण हस्तक्षेप करतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्याचा त्या व्यक्तीवर परिणाम होतोच.
अनेकदा आत्मविश्वास ढासळतो, न्यूनगंड येतो कारण ती व्यक्तीसुद्धा नकळत स्वत:ला तसं स्वीकारायला लागते. काहींच्या बाबतीत तर त्याच्याही पुढचं घडतं, विशेषत: स्त्रियांमध्ये जास्त, ज्याला ‘इम्पोस्टर सिन्ड्रॉम’ म्हटलं जातं. म्हणजे न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी ती व्यक्ती जाणीवपूर्वक अनेक गोष्टी करते, यशस्वीही होते, परंतु ते यश खुल्या मनाने स्वीकारण्यापेक्षा, ‘छे, नशिबाने हे झालंय, माझी ती लायकी नाही’ अशी स्वत:चीच कडक शब्दांत निर्भर्त्सना करते. त्या न्यूनगंडातून बाहेर यायला तिला खूप काळ लागतो.’’
अर्थात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे लक्षात ठेवलं पाहिजे. ‘बॉडीशेमिंग’ मधून बाहेर आपणच पडायला हवं ‘स्वत:ला जसे आहोत तसंच्या तसं स्वीकारणं’ हाच त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय आहे. कोण काय बोलताहेत? यापेक्षा मी कोण आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे? याचा विचारच तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतो.
माझ्या चष्म्यावरून मला चिडवणारे आज कुठे आहेत माहीत नाही, परंतु या चष्म्यामुळे, स्पष्ट दिसायला लागल्या- मुळेच मी उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहू शकले. मी माझ्यातल्या न्यूनगंडालाच माझं शस्त्र बनवलं आणि म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास करू शकले… हेच स्वत:ला स्वीकारणं.
तुम्हाला आलाय अनुभव जीवघेण्या टोमण्यांचा?
‘कुणी यावे टपली मारून जावे’, इतक्या सहजपणे एखाद्या व्यक्तीची तिच्या शारीरिक गुणदोषांवरून टिंगलटवाळी केली जाते. थोडक्यात, तिचं ‘बॉडीशेमिंग’ केलं जातं. जोपर्यंत ते सौम्य शब्दांतलं असतं तोपर्यंत ठीक परंतु जेव्हा ते सततच्या टोमण्यात बदलतं, कुणाचं तरी मानसिक खच्चीकरण करतं तेव्हा मात्र त्याचे गंभीर परिणाम होतात. माणूस आत्मविश्वास हरवून बसतो, लोकांमध्ये वावरण्याला घाबरतो. अनेकांचं तर आयुष्यच थांबून जातं. तो न्यूनगंडाच्या कोशाात तरी अडकतो किंवा आत्महत्या तरी करतो. इतकं हे चिडवणं जीवघेणं ठरू शकतं. तुम्हाला आहे का असा अनुभव? टिंगलटवाळीचा, टोमणे मारण्याचा? ‘बॉडीशेमिंग’ चा? काय मन:स्थिती होती तुमची आणि काय केलं त्यातून बाहेर पडण्यासाठी? २०० शब्दांत आम्हाला पाठवा chaturang.loksatta@gmail.com या इमेल वर. सब्जेक्टमध्ये ‘माझं शरीर, माझा निर्णय’ अवश्य लिहा. दीर्घ प्रतिसादांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाणार नाही, तेव्हा मोजकंच लिहा. स्पष्ट लिहा. arati.kadam@expressindia.com
