‘‘अगं, या काळ्या माकडाच्या तोंडाला काही तरी मेकअप लावा गं…’’ ,‘‘आमची मुलगी मुकी, बहिरी, आंधळी, अपंग आहे का की कोणालाही देऊन टाकावी?’’, ‘‘तुझ्यासाठी सर्कशीतला जोकरच शोधावा लागेल,’’ असे अनेक टोमणेवजा बोल झेलत अनेक जणांनी आपल्या आयुष्याशी आज समझोता केला असला तरी काहींनी मात्र त्यामुळे गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून आयुष्य नव्याने बांधलं आहे, अर्थात काहींच्या मनातला सल मात्र तरीही घट्ट रुतून आहे. हे सगळे दुखावणारे, वेदना देणारे अनुभव आहेत, ‘माझं शरीर, माझा निर्णय’ या २९ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘बॉडीशेमिंग’ याबाबतच्या लेखात केलेल्या आवाहनानुसार आलेल्या पत्रांमधील. जागेअभावी फक्त संपादित पत्रेच प्रसिद्ध करीत आहोत.
यातील चांगली गोष्ट म्हणजे स्त्री वाचकांबरोबरच पुरुष वाचकांनीही त्यांचे अनुभव पाठवले आहेत. अनेकदा आपल्याकडूनही कळत नकळत काही बोललं जाऊ शकतं जे इतरांचं मानसिक खच्चीकरण करू शकतं. तेव्हा प्रत्येकानेच इतरांवर काही ‘टिप्पणी’ करताना स्वत:चं बोलणं आधी ऐकलं पाहिजे. अन्यथा एखादी व्यक्ती कायमची न्यूनगंडात जाऊ शकते. ‘तिच्या-त्याच्या भल्यासाठीच बोलतेय ना,’ हा उसना मोठेपणा आणून बोलणं तर अनेकांनी सोडूनच द्यायला हवं. मला तर खात्री वाटतेय की ही सगळी पत्रे वाचल्यानंतर अनेक जण टोमणे मारणं सोडतील, इतके यातील काही अनुभव जीवघेणे आहेत.
खरं तर कुणाच्या व्यंगावर किंवा स्वभावावर बोलणारे आपण कोण, हा प्रश्न त्या त्या व्यक्तींनी स्वतःला विचारायला हवा. तरच या जगातून वेदनादायी शब्दांतून निर्माण होणारं दुःख कायमचं नाहीसं होईल. – आरती कदम
माझं वय ६५ वर्षं आहे. लहानपणी ‘दिसणं’ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असे. माझी बहीण दिसायला देखणी होती. एकदा शेजारच्या काकी आईला म्हणाल्या, ‘‘हिला, (बहिणीला) वाटेवरचा चोरसुद्धा हसत हसत पळवून नेईल. पण तुमच्या धाकटीचं कठीण आहे. चपला झिजवायला लागणार तुम्हाला.’’ आई पटकन म्हणाली, ‘‘अहो, अजून लहान आहे ती. आत्ताच काही बोलणं ठीक नाही. तिच्यासारखे गुण आहेत का कुणाकडे ?’’
त्या बोलून निघून गेल्या पण त्यांचं बोलणं लागलंच. खचून गेले. आपण अत्यंत कुरूप आहोत अशी खात्रीच पटली. न्यूनगंड इतका बळावला की महाविद्यालयात जाणं कमी होत गेलं. पण शिक्षण पूर्ण होता होता शासकीय नोकरी मिळाली. यथावकाश प्रेमविवाह झाला. (बघा, म्हणजे प्रेमात पडण्याइतकी मी नक्कीच छान होते.) पण, शेजारच्या काकींचा तो अभिप्राय आजही पाठलाग करतो. लग्न समारंभात किंवा खूप प्रमाणात साजश्रृंगार केलेल्यांची उपस्थिती असेल, तेथे जाण्याचं टाळते. अगदी गेलेच, तरी त्या ठिकाणाहून बाहेर पडेपर्यंत उगाचच बावळटपणाची एक साय चेहर्यावर पसरलेली असते. दोन्ही मुलांच्या लग्नातही मी कसलाच मेकअप केला नाही. आडात नाही तर पोहर्यात कसं येणार? ही भावना. खरं तर मेहनतीमुळे महत्त्वाच्या खात्यातून उच्च पदावरून मी निवृत्त झाले. सगळं आयुष्य छान चाललंय असं वाटत असताना कधी तरी अश्वत्थामासारखी ती भळभळती जखम डोकं वर काढते. म्हणूनच असं वाटतं, त्या शेजारच्या काकींसारखं कुणीच कुणाचंच ‘बॉडीशेमिंग’ करू नये, कोणी त्यामुळे माझ्यासारखं न्यूनगंडात जाऊ शकतं. – अ. ब. क.
माझा रंग सावळा होता. लहानपणी फारसं काही वाटायचं नाही. पण लग्नाचं वय झालं आणि जाणवलं, स्त्रीच्या सौंदर्याचं मोजमाप अजूनही रंगाच्या छटांनीच होतं. नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी, परदेशवार्या आणि गलेलठ्ठ पगार होता. स्थळं यायला लागली. पण एका वधू-वर सूचक मंडळातील बाई थेट म्हणाल्या, ‘‘रंग सावळा आहे, पगाराचा आकडा थोडा कमी लिही.’’ मी मात्र ठाम होते. फोटो आणि पगार पाहून पसंत करणारा मुलगा मला नको होता. एका गोर्यापान मुलाचं स्थळ आलं होतं, परंतु त्यांच्या घरातील अस्वच्छ स्वयंपाकघर पाहून मला धक्काच बसला. त्याची बहीण मात्र मला म्हणाली, ‘‘तू ब्युटी पार्लरमध्ये जात नाहीस का?’’ मनात आलं म्हणावं, ‘आधी घर साफ कर आणि मग स्वत:ला.’ माझे पप्पा मात्र म्हणायचे, ‘‘आपलं नाणं खणखणीत आहे. तुझं शिक्षण, तुझे आचार-विचार हेच तुझं खरं सौंदर्य आहे.’’ आणि त्यांचं म्हणणं खरं ठरलं. शैलेशला भेटले. त्याच्या डोक्यावर केस कमी होते, रंग सावळा होता; पण आमचे विचार छान जुळले आणि लग्न झालं. आजही वाटतं- मी गोरीपान असते तर कदाचित माझं लग्न लवकर झालं असतं; चांगलं शिक्षण, नोकरी आणि शैलेशसारख्या गुणी जोडीदाराला कदाचित मुकले असते. म्हणून आजही माझा सावळा रंग कधीही माझ्यात कमीपणाची भावना निर्माण करत नाही, उलट हाच रंग माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे, याची जाणीव करून देतो. – ज्योती शैलेश सावंत
माझ्या आत्येबहिणीचं दुसर्या दिवशी लग्न होतं, त्या दिवशी संध्याकाळी नवरीसह सगळ्या माझ्या गोर्या बहिणी ‘फेसपॅक’ लावून बसल्या होत्या. ‘‘अगं, या काळ्या माकडाच्या तोंडाला काहीतरी लावा गं…’’ माझी थोरली आत्या मला उद्देशून म्हणाली. माझं वय त्या वेळी साडेचौदा वर्षं. पण हे वाक्य ऐकल्यावर मी थिजूनच गेले, कारण आतापर्यंत माझ्या रंगावरून मला घरात कोणीच काहीही बोललं नव्हतं. आईनं ओळखलं, माझं काहीतरी बिनसलंय. मी घडला अनुभव सांगितला. आईनं मला समजावलं, ‘‘रंगात काहीच नसतं आणि रंगावरून कोणी बोललं तरी चिडायचं नाही. तुझ्याकडे उंची आहे, जी त्यांच्यात नाही. तू त्याचा फायदा करून घे. पुन्हा कोणी काही बोललं तर तुझ्याकडेसुद्धा हुकुमी नाणं आहे.’’ माझी कळी एकदम खुलली. त्यानंतर जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक रंगावरून बोलायचे, मी लगेच म्हणायचे, ‘‘पण मी उंच आहे.’’ आईचं हे वाक्य मी पुढे अनेकदा वापरलं आणि मी स्वत: ते वाक्य माझ्या संपर्कात आलेल्या मुलांनासुद्धा पटवून दिलं, प्रत्येकाकडे काहीना काही चांगले गुण असतातच जे आपण ध्यानात घ्यायला हवेत. ‘बियॉन्ड द फेस’ हे मी नेहमीच म्हणते. – मीनल हेमंत टिकेकर
माझं वय वर्ष ४४. स्पष्टच सांगायचं तर मी रूपानं दिसायला तसा बरा असलो तरी देहयष्टीनं मात्र (समाजाच्या दृष्टीनं) खूपच बारीक, ‘हडकुळा’ आहे. लहानपणापासून बारीक शरीरयष्टी लाभल्यामुळे आसपासची लोकं, नातेवाईक, समवयीन मित्र, शेजारी आदींकडून होणारी टिंगलटवाळी, टोमणे अर्थात ‘बॉडीशेमिंग’ ओघानं आलंच. जसं जसं वय वाढत गेलं, पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण केलं तसं हडकुळ्या शरीराला मिळणारी ‘मरतुकडा’, ‘एड्सचा रोगी’, ‘किडका’, ‘सुकडा बोंबील’ अशी कुत्सित विशेषणंही वाढत गेली जी आजही रक्तपिपासू जळवांप्रमाणे शरीर आणि मनाला चिकटून आहेत. आजवर माझ्या कामाच्या ठिकाणीही माझ्या शरीराचा असाच अपमान झालेला आहे. मनाला भयंकर यातना होतात. यामुळे कैकवेळा मानसिक खच्चीकरण होऊन मी न्यूनगंडाने ग्रस्तही झालो आहे. शरीरानं मी जरी बारीक असलो तरी कामात मात्र अत्यंत चुणचुणीत व काटक आहे, प्रामाणिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आजवर कसलाही मोठा वा गंभीर आजार मला झालेला नाही. परंतु, अशा कुत्सित विशेषणांपुढे या गोष्टी कायमच झाकोळून गेल्या. कुणाकडे समारंभाला गेलो तर चारचौघांत, प्रवासात कोणी ओळखीचे भेटले किंवा कामानिमित्त कुणा अगदी परक्या माणसालाही भेटलो तरी बोलण्याची सुरुवात नेहमी ‘‘किती बारीक आहेस रे तू! व्यायाम करतोस की नाही, जेवतोस की नाही…’’ अशा वाक्यांनीच होत असते. अशा वेळी भयंकर वाईट वाटतं. पण अशा लोकांना सांगणार कोण? अलीकडे हे प्रमाण कमी झालं असलं तरी ते पूर्णत: बंद मात्र झालेलं नाही. माझ्या शरीर आणि मनाच्या सन्मानासाठी आता मी स्वत:ला अशा लोकांपासून, समाजापासून बर्यापैकी अलिप्त ठेवलंय. मी आणि माझं काम, जोडीला माझ्याकडे असलेला नव्या जुन्या मूळ हिंदी व मराठी गीतांचा खजिना. कधी एकटं वाटलं तर माझ्याकडची अनमोल गीतांची ‘संगीत थेरपी’ सुरू करतो. या उपायामुळे माझ्या मनाला आता बर्यापैकी शांती लाभली आहे. टोमणेबहाद्दर लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा आत्मविश्वास आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं शरीर कसंही असलं तरी मला त्याचा सार्थ अभिमान आहे. – विक्रांत एस. मोरे डोंबिवली
सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा माझी उंची थोडी जास्त आहे. सौंदर्याच्या सध्याच्या संकल्पनेत, ‘मॉडेलिंग’च्या विश्वात तर ते फारच महत्त्वाचं असतं. अर्थात त्या दुनियेशी माझा संबंध कधीच नव्हता पण माझी उंची आणि बांध्याबद्दल मी विविध प्रतिक्रिया आणि नजरांना आजही सामोरं जात आहे. स्वप्रतिमा उजळवणारे उद्गार, थोडा मत्सर, थोडी असूया या सर्वांची त्यात सरमिसळ असते. आता मी वयाची पन्नास वर्षं पार केली आहेत. उंची, रंग ,केस या गोष्टी अनुवंशाने मिळणार्या आहेत, पण आपल्या परंपरेनं स्त्रीसाठी व पुरुषांसाठी सौंदर्याचे मापदंड पक्के केले आहेत. माझ्या बाबतीत या सर्वाला वेगळे वळण मिळाले ते लग्नाच्या वेळी! माझा प्रेमविवाह होता. माझा नवरा माझ्यापेक्षा उंच असणे या पारंपरिक कल्पनेला आमच्या लग्नानं छेद दिला. माझ्यापेक्षा एक-दोन इंचाने त्याची उंची कमी होती. आमच्या परस्परावरील प्रेमात या ‘उंचीच्या इंचाचा’ तसूभरही परिणाम होणार नव्हता. कोणाच्याही व्यक्तिमत्त्वातील बाह्य घटकांनी आम्ही दोघेही फारसे प्रभावित होणारे नाही. असं असलं तरी समाजातील परंपरापूजक ज्येष्ठ, श्रेष्ठ धुरीण, नातेवाईक आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहतात. आज याचं काही वाटत नाही. एक काळ मात्र असा होता की, माझ्या ज्या उंचीचा मला अभिमान असायला हवा ती उंची मला नकोशी वाटे. अगदी जवळच्या नातेवाईकांच्यासुद्धा विचित्र प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या होत्या. आम्ही दोघांनीही याकडे दुर्लक्ष केलं. लग्न आणि प्रेम यातील व्यक्तिगत अवकाश आणि आपापल्या संकल्पनांचे अस्तित्व मान्य करायला हवं हे कोणाच्याही गावीच नसतं. आमचे परस्परांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलूंवर अतिशय प्रेम आहे. यातील सर्व बाजू आम्ही मनापासून स्वीकारलेल्या आहेत. सामाजिक संकल्पनेत असणारे बाह्य घटक आम्ही स्वत:वर लादून घेतले नाहीत. परस्परांना साथ देऊन आनंदी जगणं आम्ही महत्त्वाचं मानलं. असं असलं तरी तेव्हापासून आजपर्यंत ‘बॉडीशेमिंग’ ही संकल्पना व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक घटकांवर झाकोळ आणते हे निश्चित! अर्थात आजचे आमचे परिपक्व सहजीवन या सर्वांना पुरून उरले आहे. – पूर्वा म्हाळगी, पुणे</strong>
मानवी संस्कृतीत ‘सौंदर्याचे निकष’ पुरुषप्रधान व्यवस्थेने ठरवल्यामुळे जवळजवळ सर्वच स्त्रिया ‘बॉडीशेमिंग’च्या बळी ठरल्यात. लहानपणापासून मी सडपातळ असल्याने शेजारीपाजारी, महाविद्यालयातील अनेक जणांच्या शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. ‘हँगर’, ‘काडीपेटी’, ‘काडी’, ‘अगरबत्ती’, ‘हडकुळी’, ‘काडी पैलवान’ शब्दांचे बाण मी झेलले. पण या ट्रोलर्सना डावलून मी जशी होते तसे मला पसंत करणारेसुद्धा होते. त्यामुळे कदाचित ते ट्रोलिंग सुसह्य झाले असावे. ‘हिचं लग्न कसं होणार…?’ ही चिंता असणार्या ट्रॉलर्सना लग्न झाल्यावर ‘हिला मूल कसं होणार’ ही विवंचना होती. कुठेही गेलं की प्रत्येक बाईचा तोच प्रश्न, ‘खातेस की नाही काही? पोरं कशी होतील?’ हे सगळं पचवून आई झाले तरीही लोकांची काळजी काही संपेना. हळूहळू दु:ख होणं कमी झालं. पण खरं सांगते, एवढी काळजी असून कोणीही मला कधी खायला आणून दिलं नाही की, बाळंतपणाला भेटायला आले नाहीत. आज तेच बारीक राहण्याच्या माझ्याकडून टिप्स घेत आहेत. – संध्या सामंत सावंत
आम्ही दोघी जुळ्या बहिणी. मी शोभा आणि ती मीना. मीना गोरी, मोहक पण मी सावळी आणि दिसायला साधारणच. आमचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. शाळेत लक्षात आलं की मुली आम्हाला बघून कुजबुजताहेत, एवढ्यात एक मुलगी ओरडलीच ‘‘अगं, शोभा, तुझी बहीण एवढी गोड आणि तू अशी काय दिसतेस?’’ माझे डबडबलेले डोळे बघून मीना रडायलाच लागली. आई-बाबांकडे मन मोकळं केलं. ते म्हणाले, ‘‘खरं सौंदर्य रंगात, रूपात नसतंच मुळी. ते असतं स्वभावात, गुणांत.’’ या उपदेशानं दोघींचं आयुष्यच बदलून टाकलं. नंतर ‘हिरा आणि कोळसा’ असे टोमणे चालूच होते. पण त्यानंतर आम्ही कधी पर्वाच केली नाही कुणाची. आज मीना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध आहे तर मी शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर आहे. दोघांची क्षेत्र वेगळी आहेत आणि यशही, पण आमची मानसिक जवळीक मात्र तेवढीच राहिली आहे. – शोभना कसबेकर
सासरे म्हणाले, ‘‘तू ॲव्हरेज दिसतेस.’’ वरिष्ठ सहकारी म्हणाले, ‘‘तू वयस्कर दिसतेस.’’ परिणाम? हळूहळू मनात एक भावना रुजत गेली. ‘‘ माझ्यात काही तरी कमी आहे…’’ सतत स्वत:ला कमी समजण्याची सवय लागली. नकळत घाबरटपणाही वाढला. मात्र एक दिवस ठरवलं, स्वत:वर काम करायचं, तंदुरुस्त शरीराबरोबर विचारही मजबूत होतातच. आणि एक महत्त्वाची गोष्ट समजली कुणाचंही मत म्हणजे अंतिम सत्य नसतं. एक शिकले, सगळ्यात आधी स्वत:चा आदर स्वत: केला पाहिजे. कारण जग तुम्हाला कसं पाहतं, हे नेहमी तुमच्या हातात नसतं. पण तुम्ही स्वत:ला कसं पाहता,? हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. – डॉ. श्रुती कोनाळे
मी रुपाली. माझी उंची कमी आहे. यावरून मला अनेक नावं ठेवली होती. बुटकी, छोटी, टिल्लू, ठुसकी, डुबू, कांडी आणि खूप. वयात आल्यावर तर शेजारचे काका, ‘‘तुझ्यासाठी सर्कशीतला जोकरच शोधावा लागेल,’’ असं सतत हिणवायचे. वाईट वाटायचं. पण कॉलेजच्या पहिल्याच वर्षी माझ्यासाठी चार स्थळं आली. आणि योग्य व्यक्तीशी लग्न झालंही. मला लग्नाआधी स्वयंपाकदेखील येत नव्हता. माझ्या पतीने शिक्षणासाठी प्रोत्साहन देत स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले. गरोदर असताना ते पार पडलं आणि शिक्षण सुरू असतानाच माझी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय कार्यालयात लेखालिपिक म्हणून निवड झाली. या गोष्टीला चौदा वर्षं झालीत. आपल्यात जे व्यंग आहे त्याला आपण जबाबदार नाही. त्यामुळे त्यावरील टोमण्यामुळे आपण हताश होता कामा नये, एवढं नक्की. – रुपाली, नागपूर</strong>
माझी उंची पाच फूट, चण बारीक आणि वजनही यथातथाच. त्यामुळे लहानपणापासूनच मी किरकोळ दिसायचे. शाळा-कॉलेज आटोपून नोकरी करताना आणि अगदी लग्नाच्या वयापर्यंत नातेवाईक आणि परिचित बिनदिक्कतपणे, ‘‘किती बुटकी आहे ही! लहानशी दिसते, वाटतच नाही लग्नाची आहे,’’ असे टोमणे ऐकतच मी मोठी होत गेले. उंची तर आपल्या हातात नसते; पण आहार-विहारावर नियंत्रण ठेवून मी वजन अगदी काटेकोर राखलं आहे. कार्यमग्न राहून मनही आनंदी ठेवलं. आज वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर माझ्या त्याच शरीरयष्टीचं अनेक जण कौतुक करतात. तरी कोवळ्या वयात, हळव्या मनावर कोरली गेलेली ती शब्दांची बोच विसरता येणं शक्यच नाही. – रेणुका मुजुमदार
प्रमोदला जन्मत: डोळ्यांचा कोणताही दोष नव्हता. पण एका अपघातात त्याने उजवा डोळा कायमचा गमावला. घरची परिस्थिती बेताची असल्याने महागडा चष्मा घेणं शक्य नव्हतं. फुगेवाल्याकडून घेतलेल्या स्वस्त चष्म्यानं त्यानं डोळ्यांची खोबण झाकली आणि तेच त्याचं आयुष्यभराचं डोळ्यांसाठीचं कवच झालं. पण समाजाला कुणाची जखम दिसत नाही, त्यांना फक्त चेष्टा दिसते. शाळेत तो ‘काणा’, ‘चकणा’, ‘तिरक्या’ आणि अखेर ‘फुटक्या’ झाला. सुरुवातीला प्रत्येक हाक त्याच्या काळजाला भोसकत होती. नंतर त्यानंच ठरवलं. नाव काहीही असो, ओळख माझ्या कर्तृत्वाने होईल! त्यानं आयटीआयमधून तीन वर्षांचा ‘वायरमन-इले्ट्रिरशियन’ कोर्स पूर्ण केला. प्रमोदच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याने त्याला एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कायमची नोकरी मिळाली. एके दिवशी कंपनीच्या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पात मोठा तांत्रिक बिघाड झाला. स्फोट होऊन शेकडो कामगारांचा जीव जाऊ शकत होता. सर्वांचं लक्ष यंत्रणेकडे असताना प्रमोदनं आपल्या एकाच डोळ्यानं अतिशय सूक्ष्म चमकणार्या वायरमधील दोष टिपला.
‘‘सगळे जण ताबडतोब मागे व्हा!’’ ओरडतच प्रमोद धावला. त्याने मुख्य विद्युतप्रवाह बंद केला आणि काही सेकंदांचा फरक, मोठा स्फोट टळला. कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान आणि शेकडो जीव वाचले. या शौर्यासाठी सरकारने त्याला ‘भूषण गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारताना त्याला चष्मा काढण्याची विनंती झाली. प्रमोदनं हळूच चष्मा काढला. उजव्या डोळ्याची फक्त खोबण दिसली; पण डावा डोळा विलक्षण तीक्ष्ण, स्थिर आणि आत्मविश्वासाने चमकत होता. टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्याला जगाने ‘काणा’, ‘तिरक्या’, ‘फुटक्या’ म्हणून हिणवलं होतं, पण त्याच्यासाठी आज एकच नाव दुमदुमत होतं, ‘शार्प आय मॅन!’ – रवींद्र बुधकर, मुंबई
बहुधा, १९७५-८० चा काळ असावा. मी, जन्मताच डावखुरा! त्यामुळे सतत अपमानित व्हायचो. कुणाच्या घरी पूजेला प्रसाद घेताना सरावाप्रमाणे डावा हात पुढे केला की, पुजारी तावातावाने रागवत सगळ्यांसमोर अपमान करायचे. काही वेळा खरेदी केल्यानंतर डाव्या हाताने पैसे दिल्यास दुकानदार डोळे लाल करत पुन्हा माझ्या दुकानात येऊ नकोस असा दम भरायचे. आई, समुपदेशकाची भूमिका वठवून मला जवळ घेत हिताच्या चार गोष्टी समजून सांगायची. काही गोष्टींचा शोध घेतला असता माझ्यासारखे डावखुरे व्यक्ती असंख्य आहेत हे लक्षात आलं. आणि मग आयुष्यात नकळत्या वयात संयमाचा समतोल राखत अपमान सकारात्मक घेत काही वेळा डोळेझाक करीत पुढील वाटचालीला सामोरे गेलो. आज डावखुरेपणाचा सार्थ अभिमान आहे. – डॉ. राहुल भोसले, पुणे
मला ‘काळू’ हे टोपणनाव मिळालं ते माझ्या रंगामुळे. पण त्याचा न्यूनगंड जायला मदत झाली ती पुस्तकांमुळे. याबाबतीत आपले पूर्वज मात्र उदारमतवादी होते. वेद व्यास यांचे जन्मनाव कृष्णद्वैपायन, (ते त्यांना त्यांच्या रंगामुळे मिळाले.)महाभारताची नायिका द्रौपदी हीसुद्धा शामवर्णी होती. विष्णु अवतार कृष्ण आणि आपला विठोबा काळाच मानला जातोे. पण तरीही आपल्या मनावर ही वर्णाबद्दलची ‘लेबल्स’ अगदी घट्ट आहेत. मला नेहमी वाटतं, भारतामध्ये रंगभेद मानणार्यांची संख्या जास्त आहेच, पण त्यातल्या बहुतेकांना आपण चुकीचे आहोत याची जाणीवही होत नसेल. – प्राची
माझ्या काळ्या रंगावरून माझी थट्टा केली जायची. माझं नाव प्रेमा, त्यात त्या वेळी एक नाटक चालू होतं, ‘प्रेमा तुझा रंग कसा…’’ त्यावरून चिडवताना तर सगळ्यांची सुप्त प्रतिभा जागृत व्हायची. शाळेच्या गोर्या मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य मिळे. पात्र असूनही काळी असल्याने मला डावललं जाई. कपडे घेताना ‘‘तू हा रंग घेऊ नको, तो घे’’ असं सुचवलं जायचं. मी कधीच त्वचा गोर्या करणार्या क्रीमच्या भानगडीत पडले नाही. पण त्याची जाहिरात बघताना मनात यायचं, की आपला नैसर्गिक रंग नाकारून या महागड्या फसव्या क्रीमच्या मागे का लागायचं? परंतु तेच सर्वमान्य होतं. नंतर पुस्तक मित्र झाला, आत्मविश्वास मिळाला आणि यशही मिळालं. – आरती पांडे, मुंबई
माझ्या कर्णबधिर मुलीच्या जडणघडणीत आम्हाला आलेले अनेक अनुभव. तिच्यातील दोष लक्षात आल्यावर आम्ही आवश्यक गोष्टी करायला सुरुवात केली होती. पण एक महाशय म्हणाले, ‘‘तिला ऐकू येत नाही आणि हे आईबाबा बसले आहेत निवांत,’’ या पहिल्याच प्रतिक्रियेने मी शांत राहायला शिकले. कारण असेच अनुभव येणार याची कल्पना आली. एक जण घरी आले होते, त्याच वेळी दुसरी अशीच शारीरिक व्यंग असलेली मुलगी घरी आली होती. तिला पाहून म्हणाले, ‘‘या अशा मुलांची पण लग्नं होतात का?’’ मुलीचं लग्न हा खरं तर तिच्यासाठी हळुवार विषय. पण एकाने वक्तव्य केलं, आमची मुलगी मुकी, बहिरी, आंधळी, अपंग आहे का की कोणालाही देऊन टाकावी?’’ खूप वाईट वाटलं. लेकीचं लग्न ठरलं त्या वेळी एक जण म्हणाले, ‘‘अरे अशा मुलींचे लग्न होते आणि चांगल्या मुली बिनलग्नाच्या आहेत.’’ समाज हा सगळ्या घटकांनी बनला आहे, तर तीही या समाजाचाच घटक आहे, इतकेही भान या व्यक्तीला चार लोकांत बोलताना नव्हते. हे टोमणे तिच्यापुरतं राहिलं नाहीत, तर तिला झालेल्या गोड मुलीसंदर्भातसुद्धा विचारताना यांना काहीच वाटलं नाही. ती सहा महिन्यांची होती आणि एकाने विचारले, ‘‘काय, ही तरी बोलते की नाही?’’ त्या गोड मुलीकडे न बघता तिच्या कानाशी टाळ्या वाजविणं, शीळ वाजविणं, आवाजासाठी चमचा खाली टाकणं याही गोष्टी झाल्या. पण ती मात्र अतिशय हुशार, होतकरू, सतत बडबड करणारी आहे. अर्थात सगळे अनुभव वाईट आले असे नाही तर चांगलेही आले ज्याचा उपयोग तिला शिक्षणात, नोकरी करताना, समाजात वावरताना आला. मी सगळ्यांचे आभार मानते. कारण अजून बरीच वाटचाल बाकी आहे. – प्रज्ञा गिजरे, पुणे
‘‘किती बारीक झालीस!’’, ‘‘तुझं वजन वाढलंय वाटतं!’’, ‘‘तुझ्याकडे पाहिलं की आजारी असल्यासारखं वाटतं.’’ हे शब्द बोलणार्यासाठी कदाचित सहज असतील; पण ते ऐकणार्या व्यक्तीच्या मनावर किती खोल ओरखडे उमटतात, हे फार कमी जणांना समजतं. माझ्याही आयुष्यात असे टोमणे आले आहेत. सुरुवातीला मी ते हसून टाळायचे. पण हळूहळू त्या शब्दांचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर होऊ लागला. आरशात स्वत:कडे पाहताना मला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी दिसण्याऐवजी उणिवाच दिसू लागल्या. लोकांसमोर वावरताना ‘‘माझ्याबद्दल कोणी काही बोलणार तर नाही ना?’’ ही भीती वाटू लागली. नंतर मात्र मला जाणवलं. माझं शरीर हे कुणाच्या मतापेक्षा खूप मोठं आहे आणि माझी किंमत माझ्या दिसण्यावर ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीची शरीरयष्टी वेगळी असते आणि ती स्वीकारण्याचा अधिकारही प्रत्येकाला आहे. आज कोणी माझ्या शरीरावर टिप्पणी केली, तर मी स्वत:ला एकच सांगते, ‘‘त्यांचे शब्द त्यांची मानसिकता दाखवतात; माझी किंमत नाही.’’ टोमणे मारण्या- आधी प्रत्येकाने विचार करावा, कारण सहज उच्चारलेल्या काही शब्दांनी एखाद्याचा आत्मविश्वास मोडू शकतो आणि कदाचित त्याला पुन्हा स्वत:वर प्रेम करायला खूप वेळ लागू शकतो. – प्रतीक्षा लबडे
माझी उंची कमी आणि रंग सावळा असण्यावरून मला अनेकदा टोमण्यांचा सामना करावा लागला आहे. एक प्रसंग स्पष्ट आठवतो. नातेवाईकांच्या एका कार्यक्रमात माझ्या एका दूरच्या काकूंनी चारचौघांसमोर मला सहज म्हटले, ‘‘हिचा रंगही असा आहे आणि उंचीही कमी, मग चांगल्या कपड्यांमध्ये तू कशी शोभून दिसणार?’’त्यांचं सर्वांसमोर हे बोलणं मला खूप अपमानास्पद वाटलं. आजूबाजूचे लोक हसल्याने माझ्यात प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला. लोकांमध्ये वावरताना भीती वाटू लागली आणि आरशात स्वत:कडे बघताना माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला. पण त्या अपमानास्पद प्रसंगानंतर मी ठरवले की, लोकांच्या टोमण्यांना मी माझे आयुष्य ठरवू देणार नाही. मी या नकारात्मकतेने माझे खच्चीकरण करू न देता, माझ्या मनाची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. आणि ते यशस्वी ठरले. – तृप्ती देव, भिलाई छत्तीसगड
माझ्या ओळखीतील एका मित्राच्या आयुष्यात असाच एक काळ आला होता. लहानपणापासूनच अमितचे वजन थोडे जास्त होते. शाळा-महाविद्यालयात त्याला मित्र ‘जाड्या’, ‘फुटबॉल’ अशा नावांनी चिडवायचे. सुरुवातीला तो सर्व काही हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न करायचा, पण हळूहळू नातेवाईक आणि अगदी जवळचे लोकही त्याला भेटल्यावर आरोग्याची काळजी व्यक्त करण्याच्या बहाण्याने ‘अरे जरा वजन कमी कर, लग्नात कसा दिसशील?’ असे टोमणे मारू लागले. त्याची मन:स्थिती हळूहळू ढासळत गेली. तो आरशात पाहणे टाळू लागला. त्याला कपडे खरेदी करायला जाण्याचीही भीती वाटायची. ‘माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होऊ शकत नाही,’ या विचाराने तो इतका त्रस्त झाला की त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. या मानसिक दलदलीतून बाहेर पडण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले मात्र त्यावेळी त्याला जाणवलं की ही परिस्थिती त्याच्या जिवावर उठत आहे, तेव्हा यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वत:चा स्वीकार केला आणि टोमणे मारणार्यांना स्पष्ट शब्दांत ‘मला ही मस्करी आवडत नाही. थांबवा,’ असे सांगायला सुरुवात केली. समुपदेशनातून नकारात्मक विचारांवर मात करण्यास आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास त्याला मदत झाली. -अंजली लोखंडे
‘कुणीही यावे आणि टपली मारून जावे’ हा अनुभव लग्नानंतर काही महिन्यांतच मला आला. ‘तुला कंबरच नाहीये,’ इति सासुबाई. खूप राग आला, दुखावले गेले. ओठांवर शब्द आले आणि ‘तुम्ही काय सिंहकटीच्या का?’ आमचे ठरवून झालेले लग्न आहे ना. पुढून मागून नीट बघून करायची होती सून.’ असं विचारायचं होतं पण शब्द आतच विरले. आड आले ते लहानपणापासून झालेले संस्कार- मोठ्यांना उलट बोलू नये. पण माहेरच्यांना नावे ठेवण्यापर्यंत मजल गेली. ‘तुझी आई किती उग्र दिसते.’ कहर म्हणजे माहेरच्यांचा उल्लेख ‘जड माणसे’ असा होऊ लागला. माझ्या नवर्याने मध्यस्थी करणे अपेक्षित होते, पण तो बोलला तर घरच्यांशी संबंध बिघडतील ही त्याला भीती. मग मीच सर्व सूत्रे हाती घेतली. माझा अपमान करणार्यांना मी पूर्णपणे ओळखून होते. त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवले. अपमानाने मी निराश झाले नाही. माझे माझ्यावरचे निरातिशय प्रेम आणि स्वत:च्या क्षमतेवरचा विश्वास ही माझी बलस्थाने होती. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणतात. इथे घरातच निंदक असल्याने माझा फायदाच झाला. माझं व्यक्तिमत्त्व घडवणार्या त्या माणसांची मी सदैव ऋणी आहे. – ललिता केळकर
माझ्या चेहर्यावर पुटकुळ्या यायच्या. चेहरा हे अंतर्मनाचं प्रतिबिंब असल्याचं ऐकल्यापासून तर या मनाचं आता काय बरं करावं, असे ग्रस्त करणारे प्रश्न भिरभिरू लागले आणि कधी एकटे-दुकटे आणि कधी संमेलन असल्यासारखे एकत्र उगवणार्या या पुळ्यांनी माझ्या सहनशीलतेत वाढ झाली, त्यामुळे आपण बरे आणि आपले पिंपल्स बरे, अशी मी स्वत:ची समजूत काढली. पण ती त्या काळी अनेकांना मान्य नव्हती. मी काहीच का करत नाही आहे असं वाटून या ‘‘एरवी बर्यापैकी दिसणार्या मुलीचा चेहरा इतका चंद्रासारखा नसता तर…’’ अशी हळहळ व्यक्त व्हायची. एक नामवंत विवाह मंडळ चालवणार्या बाईंनी अशा चेहर्यामुळे माझं नाव नोंदवून घ्यायलाच नकार दिलेला आठवतो… ‘‘शिक्षण, उंची, शरीरयष्टी, नोकरी वगैरे ठीक आहे, चष्मासुद्धा नाही, पण तुम्ही पिंपल्स गेले की या, नाही तर चांगलं स्थळ मिळणं कठीण आहे,’’ असं सांगून माझ्या चेहर्यावरील घडामोडींना माझ्या व्यक्तिमत्त्वात त्या बाईंनी मानाचं स्थान दिलं होतं. कालांतराने पुटकुळ्या सरत गेल्या. आणि ज्या तेलकट त्वचेमुळे पुळ्या आणि त्यांच्याइतक्याच निरनिराळ्या भेदक प्रतिक्रियांना मी सामोरी गेले ती खरं तर वरदान आहे, असं ऐकण्यात आलं… नैसर्गिक तेलामुळे त्वचेची कांती टिकून राहते असंही एक ऐकलं. – सुचिता कुलकर्णी
सात वर्षांपूर्वी मी आई झाले. आई होण्यापूर्वी मी अगदी सडपातळ, बारीक होते. पण आई झाल्यानंतर माझं वजन वाढलं. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. कुठे तरी मनापासून अभिमानच वाटला. कारण त्या शरीरबदलामागे माझं बाळ होतं. माझ्यासाठी आई होणं ही आयुष्यातली खूप मोठी, सुंदर आणि आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे माझ्यात झालेले हे बदल मी एका ‘गॉड गिफ्ट‘सारखे स्वीकारले. पण नंतर लोकांनी बोलायला सुरुवात केली, ‘वजन वाढलंय.’, ‘पोट सुटलंय.’, ‘मागच्या वेळी बारीक होतीस, आता किती वाढलीस!’ आणि गंमत म्हणजे, एखादी व्यक्ती आज भेटली आणि दोन दिवसांनी पुन्हा भेटली तरी तिचा विषय तोच ‘‘तुझी तब्येत वाढलीय!’’ वाईट वाटतं, कधी वाटतं खूप व्यायाम करावा, योगा करावा, डाएट करावं आणि पुन्हा बारीक व्हावं. पण स्वत:लाच विचारते, ‘मी माझं आयुष्य दुसर्यांच्या नजरेप्रमाणे जगायचं का?’ तर नाही! माझं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आहे, सतत कोणाच्या तरी टोमण्यांच्या धाकात जगण्यासाठी नाही. मी आता ठरवलंय… माझं पोट किती सुटलंय, माझं वजन किती आहे, मी आधीपेक्षा किती बदलले आहे यापेक्षा मला माझं आयुष्य किती आनंदाने जगता येतंय, याला मी जास्त महत्त्व देणार. स्वत:ला स्वीकारा. पौष्टिक खा, कारण शरीर बदलतं. त्या शरीराने दिलेल्या आयुष्याच्या सुंदर आठवणी जास्त महत्त्वाच्या असतात. – सुजाता देसले
समाजमनात सौंदर्याचे परिमाण म्हणजे गोरा रंग. गोरे होण्यासाठीची जाहिरात बघितली की गोरा रंग छान, काळा रंग वाईट! हा विचार समाजात खोलवर रुजलेला आहे आणि प्रसारमाध्यमे त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या नकळत्या वयात या काळ्या-सावळ्या रंगाने मला खूप न्यूनगंड दिला. जवळचे नातेवाईक, ओळखीचे, गणगोत येता-जाता मला म्हणायचे, ‘तुझी आई गोरी, भावंडं गोरी, तू अशी कशी!’ त्यात मी आजीकडे राहायचे. आई-बाबांपासून लांब, त्यांचे पुढचे वाक्य म्हणजे ‘तुला कोंड्यावरून विकत घेतली म्हणून तू इथे आहेस.’ खूप वाईट वाटायचं. पुढे डॉक्टर झाले आणि एका त्वचारोगतज्ज्ञाशी लग्न झाले. हळूहळू कॉस्मेटोलॉजी म्हणजेच सौंदर्यशास्त्र या क्षेत्रात काम करायला लागले. माझ्याकडे उपचारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांना फक्त गोरे व्हायचे असायचे. त्यांना समजावून सांगताना माझ्या नाकीनऊ यायचे. पण त्यांचा आग्रह असायचा. याच विचारांमुळे गोरं व्हायच्या क्रीम्स्, गोळ्या, इंजेक्शन्स यांची चलती झाली. काय करणार? जमानाच तसा आलाय, बाह्य रूपावर भाळणारा… – सुनीता पाटील
वयाच्या तेराव्या वर्षी शाळेच्या फळ्यावर लिहिलेलं वाचता यावं म्हणून मला दूरचा चष्मा लागला. ही गोष्ट जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची. घरचे आणि बाहेरच्यांकडूनही माझ्या चष्म्याच्या बाबतीत काहीसा नाराजीचा सूर कानावर पडू लागला. त्यामुळे ‘चष्मा लागला हे काही फार चांगलं झालं नाही’, हे माझ्या बालमनावर हळूहळू ठसत गेलं. वयात आल्यानंतर माझी उंची जास्त असल्यामुळे मुली छाती लपवण्यासाठी वाकून चालतात, तसं मीही नकळत वाकून चालायला लागले होते. एकदा पाहुण्यांनी वडिलांना विचारलं, ‘‘ तुमची मुलगी कुबडी आहे का?’’ त्या शब्दांनी माझ्या मनावर आणखी एक ओरखडा काढला. खरं तर माझा रंग गोरा, नाकी-डोळी नीटस होते. पण माझ्या दिसण्यातल्या तथाकथित दोषांनी माझ्या मनात इतकं घर केलं होतं की, माझा स्वत:च्या दिसण्याबाबातचा आत्मविश्वास हरवला. त्यात लग्नाच्या बाजारात ‘मुलीचं दिसणं’ हा एक मुख्य मुद्दा असतो. एका चांगल्या स्थळाकडून मला पसंती आली पण माझा त्यावर अजिबातच विश्वास नव्हता, त्यामुळे त्याला नकार देऊन नंतर आलेल्या एका सर्वसाधारण स्थळाला मी होकार दिला. पुढे एका काकूंनी मला म्हटलं, ‘‘तू एवढी शिकलेली, दिसायलाही चांगली. तुला याहून चांगलं स्थळ मिळालं असतं!’’ तेव्हा मला जाणवलं, ‘अरे, आपण आपल्याला समजत होतो तेवढे काही वाईट नव्हतो.’ त्या अनुभवातून एकच शिकले, कुणाला त्याच्या दिसण्यावरून कमी लेखू नये. कारण शब्दांनी मनावर उमटलेला ओरखडा अनेक वर्षं टिकतो आणि एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. – संगीता पुजारी
बॉडीशेमिंगमध्ये उंची, रंग, शारीरिक दोष सगळ्यांवरून चिडविले जाते. केरळ राज्यात ‘बॉडीशेमिंग’विषयक माहिती शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाणार, असा सरकारने निर्णय घेतला असल्याचे कळते. सगळ्यांनी तो घ्यायला हवा. मला आलेला अनुभव असा की, माझी उंची थोडी कमी, दिसायलाही ठीकठाक, पण वजन जरा जास्तच. सर्वांना वाटायचं लग्न कसं जमेल? पण लग्न झालं. अर्थात स्वत:वरचा विश्वास आणि घरच्यांची साथ यामुळे मी बिथरले नाही. आज जेव्हा माझा नवरा लाडाने ‘ढबरी’ म्हणतो किंवा मुलगी ‘गोलू मोलू’ मम्मा म्हणते त्याचं मला काहीच वाटत नाही. याचं कारण ‘माझं शरीर हा माझा निर्णय आहे,’ असं मी सतत मानते. टोमण्यांकडे दुर्लक्ष केलं नसतं तर खचून बसले असते. स्वत:वर प्रेम करायला शिकल्याने सर्व गोष्टी सोप्या सोप्या झाल्या. – ज्योती राऊत, छत्रपती संभाजीनगर
लग्न असो नाहीतर सांत्वनाची जागा असो. पाऊस, हवा, पाणी, राजकारण, आंदोलनं हे गप्पांचे जुजबी विषय संपले की, सगळ्यांचं कटाक्षानं लक्ष जायचं ते माझ्या वजनाकडे. लहान-मोठे सगळेच यथेच्छ तोंडसुख घेत. मात्र मी एक दिवस ठरवलं, हे बदलायला हवं. माझा हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता, तर तो स्वत:चाच शोध घेण्याचा होता. जुन्या सवयी बदलणं तसं सोपं नव्हतं. आवडत्या पदार्थांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करणं, फारसा न आवडणारा आणि न केलेला व्यायाम नियमित करणं, यासाठी रोजची एक लढाई लढावी लागत होती. कधी शरीर थकलं. मन व्यथित झालं. मलाच विचारू लागलं, हे सगळं का करायचंय? अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं खरं, पण मी त्या प्रश्नांना हुशारीने मुळासकट उपटून टाकलं. जेव्हा शंका वाटायची त्या प्रत्येक वेळी मनाने मेंदूला एकच संदेश पाठवला, ‘आता थांबायचं नाही.’ या सर्व प्रवासात शरीरापेक्षा मनाची ताकद, दृढनिश्चय आणि संयम यालाच मी अधिक महत्त्व देईन.
हळूहळू विचारांबरोबर शरीरही बदलू लागलं. आज माझ्या बदललेल्या रूपापेक्षा माझ्यात निर्माण झालेली इच्छाशक्ती, आत्मविश्वास मला जास्त मौल्यवान वाटतो. माझं बदललेलं रूप आरशात दिसतं, पण त्याहून सुंदर बदल आत घडलाय- स्वत:ला जिंकण्याचा. – डॉ. आश्लेषा मुंगी
मला माझ्या पांढर्या केसांवरून टोमणे सोसावे लागले आहेत. फार लवकर, अगदी मी शिक्षक होतो तेव्हापासून पांढरे केस मला सोबत करत आले आहेत. रंग गोरा, उंची सहा फूट, मी वापरत असलेले पांढरे कपडे, माझी मान जराशी लांब या सगळ्या कारणांनी मला विद्यार्थी एका पक्ष्याच्या नावाने संबोधत. माझ्या ते कानावर पडत असे, पण मी ते कधीच मनावर घेतलं नाही. केस रंगवले नाहीत, कधी केसांना कलप केला नाही, विग वापरला नाही, की टोपी घातली नाही. ‘पदरी पडलं, पवित्र झालं…’ या न्यायाने पांढरे केस जोपासले. तीच माझी ओळख बनवली. तात्पर्य काय, कुणीही आपलं ‘स्वत्व’ सोडू नये. लोकनिंदा मनावर घेऊन दु:खी होऊ नये. – सदानंद करंदीकर, बारामती</strong>
मी चाळिशीच्या उंबरठ्यावर असताना एकदा माझ्या मित्राच्या पंचावन्न वर्षांच्या काकांशी बोलत होतो. अचानक एक व्यक्ती आली आणि त्यांना म्हणाली, ‘‘खरं तर हाच तुझा काका वाटतो आहे. मग तुला हा कसं काय काका म्हणतो ?’’ आणि त्या क्षणापासून मी अकाली वार्धक्याची शिकार झालेलो आहे, याची सर्वात पहिली प्रचीती मला आली.
८०व्या वर्षी नवी चाळिशी समजून सुरुवात करावी लागेल, असं वाचत असताना, मी मात्र पडलेलं टक्कल , चेहर्यावरची काहीशी सुरकुतलेली त्वचा यामुळे चक्क चाळिसाव्या वर्षीच ऐंशी वर्षांचा दिसत होतो. कोणी म्हणायचं, ‘‘काय झुर्रा दिसायलास?’’ तर कोणी ‘आजोबा आले’ म्हणत हसायचं. काही मंडळी समजूतदारपणे पण तेच बोलायची. अशा प्रसंगांना सामोरं जाताना, चेहर्यावर आपल्यालाच, न आवडणारं बेशरम हसणं आणायचं आणि स्वत:चा धिक्कार करत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करत राहायचं, एवढंच हाती असतं आणि अकाली वार्धक्य येऊ शकण्याच्या वैयक्तिक कारणांच्या दरीत खोल खोल डुबकी मारत राहायचं. साहजिकच लोकांत मिसळण्याची इच्छा कमी होत जायची. लोकांचं काय ते बोलून निघून जातात. कदाचित आपण कोणाचं मन दुखावलं, हे त्यांच्या लक्षातसुद्धा नसेल. पण मी मात्र त्यांचं बोलणं जणू काही ‘अमूल्य धन’ असल्यासारखं सोबत बाळगून ठेवत असे. गौतम बुद्धाच्या गोष्टीची आठवण व्हायची. एकदा एका माणसाने त्यांना खूप शिव्या दिल्या. पण ते शांतपणे पुढे जात राहिले. त्यांच्या शिष्याने विचारलं, ‘‘तो एवढं बोलत होता. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही…’’ ते हसले. म्हणाले, ‘‘एखाद्याने आपल्याला दिलेली गोष्ट आपण स्वीकारली नाही तर ती कोणापाशी उरते?’’ या मागचं सूत्र कळल्यावर मात्र ‘‘मी म्हातारा व्हायची गोळी खाल्ली आहे…’’ असं हसत सांगून वेळ मारून न्यायला लागलो आहे. – नागेश वा. किवळेकर
माझ्यापेक्षा एक वर्षानं मोठा असलेल्या भावाचा माझ्यात न्यूनगंड निर्माण करण्यात मोलाचा वाटा आहे. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ही म्हण माझ्या बाबतीत सार्थ ठरली. माझे समोरचे दात थोडे पुढे होते. त्याला वैगुण्य मानून भाऊ त्याचं भांडवल करत असे. ‘दंताडी’, ‘दातफुडकी’, ‘तडफडी’ अशी सतत चारचौघांत हेटाळणी करत असे. मी भावनिक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत असे. हळूहळू याचा परिणाम माझ्या मनावर होत गेला. हसण्याच्या, खेळण्याच्या वयात मी गंभीर होत गेले. हसणं तर विसरूनच गेले. कारण ‘हसतील तर दात दिसतील’ हे वाक्य. हा न्यूनगंड जवळजवळ २८ वर्षं होता. लग्नातल्या फोटोतही मी हसताना दिसत नाही. दाताला तार लावून घेण्याचा विचार पैशांमुळे शक्य झाला नाही. अखेर वयाच्या ४०व्या वर्षी तो योग जुळून आला. शिक्षिका म्हणून निवृत्त झाले. तेव्हा छान उपचार घेतले. एकूण अशी ही ‘दंतकथा…’ – अनामिका
‘गोरी कातडी म्हणजे सुंदर…’ अशा मानसिकतेच्या समाजात मी ‘सावळी’ म्हणजे ‘काळीच.’ नातेवाईक माझी तुलना सख्ख्या, चुलत बहिणीशी करायचे तेव्हा त्यांच्या नजरेत ‘हिचं लग्न कसं होणार?’ असे भाव. जणू लग्न हेच आयुष्याचं ध्येय. नात्यातल्या एक बाई सतत ‘‘माझ्या मुलीला आत्तापासून लोक मागणी घालत आहेत, आमची लेक सुंदर आहे ना…’’असं बोलायच्या. माझं अजाण वय. मला वाटायचं, ‘‘मी कोणालाच आवडू शकत नाही का?’’ त्याचमुळे मी शालेय जीवनापासून आजतागायत व्यासपीठावर येऊन काही सादर करायचं म्हटलं की, आधी घशाला कोरड पडते. नवरा कधीही वावगं बोलला नसला तरी ‘नवर्यापेक्षा दिसायला डावी’ , बाळंतपणानंतर वजन वाढल्यावर तर इतरांच्या नजरेत नवर्याला शोभेनाशीच झाले होते. नवर्याने समजून घेतलं, कालांतराने वजन आटोक्यात आणलं, पण आजही मी जे करते, जे सुचवते ते योग्य असेल का, त्यात कोणी चूक काढेल का, कोणी काही बोलेल का असं वाटतं. असा दूरगामी परिणाम माझ्या व्यक्तिमत्त्वावर झालेला आहे, असं मला वाटतं. त्यातून बाहेर यायला मी लेखन करून माझे अनुभव, विचार समाजमाध्यमे, लेखन स्पर्धा, वर्तमानपत्रात काही लेखांद्वारे व्यक्त करत असते. ज्यांना खरंच किंमत आहे अशा मोजक्या लोकांसमोरच माझे विचार व्यक्त करते. हेच ते स्वतःला स्वीकारणं. – स्वप्ना लिमये
लहानपणी मला कायम ‘पुस्तकाचा किडा’ असा टोमणा मारला जाई. बॉडी शेमिंग होत नसलं तरी त्याने मनात संकोच निर्माण झाला होता. जेव्हा मी वाचायला बसायचे तेव्हा मला येता-जाता ‘झालं, बसली वाचायला…’ असाच ओरडा मिळायचा. त्यामुळे काहीही वाचायला बसले तरी इतरांच्या नजरांना सतत घाबरत वाचायचे. पण जरा मोठी झाल्यावर मात्र जाणीवपूर्वक वेळ काढून वाचायला लागले. स्वत:च्या गुणांवर भर द्यायला शिकले. न्यूनगंडाची साखळी तोडून, स्वत:च्या अटींवर आणि आनंदाने जगण्याची ही वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. – पूर्णिमा आनंद शेंडे
मी लहानपणापासून बारीक शरीरयष्टीची असल्याने सतत लोकांचे टोमणे ऐकत आले आहे. ‘‘काहीतरी खात जा, घरचे खायला देत नाहीत का?’’, ‘‘खूपच नाजूक आहे.’’ असं बोललं जायचं. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली आणि मी त्या त्रासात असताना मला भेटायला आलेल्या एक काकू बोलून गेल्या, ‘‘किती खराब मुलगी आहे ही. घरात एवढं असून खात नाही..’’ ‘खराब’ हा शब्द एखाद्याच्या बारीक असण्यासाठी वापरणं, एखाद्याला आजारी असल्यावर भेटायला गेल्यावर हे असं बोलणं हे कितपत योग्य आहे? या सगळ्या बोलण्याला काळजीचं नाव देणं किती बरोबर असेल? अशा काही गोष्टी नकळत खूप खोलवर परिणाम करून जातात, हे सगळ्यांनी समजून घ्यायलं हवं. – मानसी पंढरपुरे
मी आठवीत असताना मला ‘टायफॉइड’ झाला. खूप अशक्तपणा आला. वजन कमी झालं. पण वैद्यकीय उपचाराने हळूहळू सुधारणा होत गेली. भरपूर भूक लागायची. औषध, आराम या सार्यामुळे माझं वजन वाढलं. आजारपणाच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळेत गेल्यानंतर माझ्या वाढलेल्या तब्येतीवरून मित्रवर्ग चिडवू लागले. ते काय कमी होतं म्हणून माझा सख्खा छोटा भाऊ ‘ए जाडे’ असं चिडवायला लागला. इतकंच नाही तर त्यानं त्याच्या मोबाइल- मध्येदेखील माझं नाव ‘जाडी’ म्हणून सेव्ह केलंय. वडीलही (जे ‘रेम्बो’ पीएसआय होते) असंच म्हणायचे. दुर्लक्ष करीत राहिले तरी वाईट वाटायचंच. पण जेव्हा मी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात’ स्त्री अभ्यास केंद्रामध्ये अभ्यासासाठी गेले तेव्हा त्यांचा स्त्रियांकडे शारीरिक रचनेतून सकारात्मक बघण्याचा वैचारिक दृष्टिकोन पाहून ‘मी जाडी’ असण्याचा न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढू लागला. आपले शरीर हा आपल्या हक्काचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणीही वक्तव्य करणे हे माणुसकीहीन वर्तन आहे, असं मला वाटतं. – वर्षा बडे, पुणे
लहान वयात झेललेले टोमणे मनावर कायमचे ठसे उमटवतात. माझ्याबाबतीतही काही वेळा असे प्रसंग आले. सुरुवातीला मी ते विनोद म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला; परंतु वारंवार त्याच गोष्टी ऐकायला मिळाल्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊ लागला. इतर लोक आपल्याकडेही त्याच नजरेने पाहत असतील, असं वाटू लागलं. हळूहळू आत्मविश्वास कमी झाला आणि लोकांमध्ये मिसळतानाही संकोच वाटू लागला. हसत असलो, तरी मनात मात्र त्या शब्दांची बोच कायम राहायची. या अनुभवांनी मला महत्त्वाचा धडा दिला, आपल्या एका वाक्याने एखाद्याच्या चेहर्यावर हसू उमटू शकते किंवा त्याच मनाला खोल जखमही होऊ शकते. म्हणून बोलण्यापूर्वी शब्दांचा विचार करायलाच हवा. – श्रीपाद टेंबे
वयाच्या २८ व्या वर्षी माझं लग्न झालं. सासरी शरीरासह प्रत्येक गोष्टीत टोमणे, उपहास आणि माझी खिल्ली उडवली जायची. माहेरच्यांना त्रास नको, मुलीसाठी संसार टिकावा म्हणून मी २२ वर्षं सहन केलं. पण आत्मविश्वास आणि मानसिक शांतता हरवली. ‘हिलिंग’च्या प्रवासाने मला पुन्हा स्वत:ला शोधायला शिकवलं. प्रत्येकीला मला सांगावंसं वाटतं, नातं कोणतंही असो, आत्मसन्मान गमावू नका. माझं शरीर, माझं मन, माझं आयुष्य, निर्णयाचा अधिकार माझाच! – संगीता नार्वेकर
‘अगं, ओळखू येत नाहीस… लग्नाआधी किती बारीक होतीस, आणि आता..? बारीक होतीस तेव्हा किती सुंदर दिसत होतीस, पण आता शारीरिक तेजाने चेहर्यावरील तेज मात्र कमी झालंय…’ दोन मैत्रिणींमधला संवाद एका लग्नकार्यात ऐकत होते. त्या पुढच्या रांगेत बसलेल्या, मला त्यांचं बोलणं ऐकायला येत होतं. दुसरी मैत्रीण निमूटपणे ऐकत होती, जणू काही खूप मोठा अपराध तिच्याकडून घडलेला. प्रत्येकाला हे शरीर देवानं दिलेली एक सुंदर भेट आहे. हे असं बोलून शारीरिक प्रश्नांसोबत मानसिक विकारही होऊ शकतात, हे बोलणार्याच्या लक्षात येतं नाही का. – अनिता जोशी
माझ्या बाबतीत ‘बॉडी शेमिंग’ची वेळ सुदैवाने कधी आली नाही. मी नितळ, सावळ्या रंगाची. शाळेपासून मला सगळे प्रेमाने ‘काळू’ म्हणायचे; पण मला त्यात टोमण्यांपेक्षा आपुलकीच जास्त जाणवली. मी जशी आहे, तशी माझ्या जवळच्या लोकांना आवडते, हा विश्वास मला नेहमीच राहिला. कधीतरी बहिणींना कपड्यांच्या रंगाबद्दल विचारलं, की त्या ठामपणे सांगतात, ‘‘तुझा रंग नाही, तर तुझा आत्मविश्वास, तुझी समजदारी आणि सत्याची बाजू घेण्याची वृत्ती ही तुझी खरी ओळख आहे!’’ हे ऐकलं की मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आठवीत असताना शिक्षकांनी ‘‘सुंदर दिसण्यासाठी काय करता?’’ विचारलं, तेव्हा मी सहज म्हणाले होते, ‘‘काहीच नाही, मला गरज वाटत नाही!’’ माझं हे उत्तर ऐकून त्यांच्या चेहर्यावरचं आश्चर्य पाहण्यासारखं होतं. – सारिका आकाश म्हेतर
‘बॉडी शेमिंग’ या विषयांवरील आपले अनुभव यांनीही व्यक्त केले आहेत – प्रा. माधुरी ढोंगे व्यवहारे, छाया निलेश पटेकर, अपर्णा शेलार, ज्ञानेश्वर पाटील, अनन्या सलोंखे, धनश्री पवार, राघवेंद्र माधवराव गायकवाड, नमिता धीरज तांडेल, प्र. मु. काळे, मयूरी नीरज तारे
