आशुतोष उकिडवे
दुसरे महायुद्ध समाप्त होऊन दशक पूर्ण होत होतं. कित्येक वर्षांच्या अराजकतेनंतर, प्राप्त झालेलं शांत, सुखी, समृद्ध आयुष्य आता चैनीत आणि शांतपणे घालवण्याची मानसिकता फ्रेंच समाजात वाढीस लागली होती. ज्याचा प्रभाव तत्कालीन साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रावरही पडत होता. या कालखंडालाच मुळी फ्रान्समध्ये ‘Les Trente Glorieuses’ (भरभराटीची तीस वर्षे) अशी संज्ञा आहे, ज्याचं प्रतिनिधित्व करणारी एक अभिनेत्री, फ्रेंच सिनेसृष्टीत उदयास आली. ‘आपल्या मादक सौंदर्याने रसिकांना घायाळ करणारी बिनधास्त, टंच फटाकडी’ ही ब्रिजीत बार्दोची ओळख मात्र तिच्या तोकड्या कपड्यांपेक्षाही जास्त तोकडी-त्रोटक ठरेल.

हुशार व चतुरस्त्र स्त्री, यशस्वी अभिनेत्री, गाजलेली मॉडेल, लोकप्रिय गायिका, निपुण बेलरीना नर्तकी, निर्भीड लेखिका, वादग्रस्त वंशवादी, धडाडीची पशुमित्र कार्यकर्ती… अनेक गुणा-अवगुणांचं मोहोळ सहजतेने वागवणारी ब्रिजीत म्हणजे एक जिवंत आख्यायिकाच होती. २८ सप्टेंबर १९३४ रोजी, पॅरिसमधल्या एका अत्यंत श्रीमंत घरात ब्रिजीतचा जन्म झाला. बॅले नृत्यशैलीत ती पारंगत होती. साहजिकच सौंदर्य आणि देहकमनीयता उपजतच लाभलेल्या ब्रिजीतच्या व्यक्तिमत्त्वात एक डौल व आत्मविश्वास होता. त्याबळावरच ‘ Elle’ या गाजलेल्या फॅशन मासिकाची मॉडेल म्हणून ती मुक्रर झाली आणि तिची दिलखेचक रंगीत चित्रे मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकू लागली.

यथावकाश तिचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. इथेच तिची ओळख झाली ती रॉजर वादीमशी. रॉजर एक धडाडीचा, बुद्धिमान चित्रपट निर्माता आणि पटकथाकार होता. दोघांचे सूर जुळले आणि वयाच्या १८व्या वर्षीच तिने रॉजरशी लग्न केलं. तिथपासून एक सनसनाटी सिने-सिलसिला सुरू झाला. ‘Manina, the girl in the bikini’ या तिच्या चित्रपटाने, १९५२ मध्ये तिला प्रसिद्धीच्या लाटेवर तर आणलेच पण ‘बिकिनी’ हे ‘चिंधी-वस्त्र’, दर्शनीय आणि प्रदर्शनीयही असू शकतं हे सिद्ध झालं. पुढे कितीतरी कामिनींनी, चित्रपटांमधून आपली कंचोळी-काया दाखवण्याचा सपाटाच लावला.

अतिशय रेखीव प्रमाणबद्ध शरीर, फ्रेंच सौंदर्याचा मापदंड समजले जाणारे लांब सडसडीत व घोटीव पाय, लहान मुलीसारखा निष्पाप, गोंडस चेहरा नि घनदाट तपकिरी केस लाभलेली ही ‘तिलोत्तमा’ मग तमाम सिनेरसिकांच्या हृदयाची धडकन ठरली. त्यावर्षी ‘कान’ इथे भरलेल्या सुप्रसिद्ध सिने-महोत्सवात तिला मानाचं बोलावणं होतं. तिथेही, पांढऱ्याशुभ्र वाळूवर, बिकिनीमध्ये सूर्यस्नान करतानाचे तिचे फोटो, तिने सिनेपत्रकारांना आणि छायाचित्रकारांना मनोसोक्त काढू दिले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातली तिची वर्णी अशी गाजली आणि मग देश-विदेशातल्या बड्या चित्रपट निर्मात्यांची नजर तिच्याकडे वळली. इटली, ब्राझिल, ब्रिटिश चित्रपटांबरोबरच ती हॉलीवूड चित्रपटांतही झळकली. एक अभिनेत्री म्हणून सामान्य असूनही, जणू नियतीही तिच्या सौंदर्यावर फिदा असावी, असे खणखणीत यश तिच्या प्रत्येक चित्रपटाला मिळत गेले. चित्रपटात ब्रिजीत असेल तर तो हमखास चालणारच याची खात्रीच प्रत्येक निर्मात्याला तिच्याबद्दल वाटायची.

१९५० आणि ६० अशी दोन दशके ब्रिजीतने अक्षरश: गाजवली. ब्रिजीत करमणूकप्रधान चित्रपटात अधिक खुलायची. ‘Naughty girl’ चित्रपट हे त्याचे उत्तम उदाहरण. नंतरचा ‘And God created woman’ हा १९५६ चा चित्रपट तर इतका गाजला की सर्वोत्कृष्ट दहा जागतिक चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव लागले. साध्या, सोज्वळ वळणाच्या निमशहरातली एक बिनधास्त, नीती-अनीतीची पर्वा न करणाऱ्या तरुणीची भूमिका, ब्रिजीतने उत्कृष्टपणे वठवली. या चित्रपटामुळे, ब्रिजीत बार्दो या तिच्या नावातल्या आद्याक्षरांवरून, तिला ‘BB’ असे टोपणनावही मिळाले.

खरं तर, ब्रिजीत अभिनेत्री म्हणून श्रेष्ठ कधीच नव्हती. पण तरीही तिच्या सौंदर्यात काहीतरी ‘जीवघेणं आकर्षण’ होतं. सामान्य रसिकच नव्हे तर ‘सिमोन द बोव्हार’ या अस्तित्ववादी तत्त्ववेत्ती विदुषीनेही आपल्या ‘The Lolita Syndrom’ या गाजलेल्या निबंधात ‘स्त्री-शक्तीचा मूलस्राोत’ म्हणून ब्रिजीतचा गौरव केला. आपल्या कारकीर्दीत ब्रिजीतने अनेक फॅशन्स आणल्या, रुजवल्या नी कायमच्या लोकप्रिय केल्या. खोल गळ्याचा नि बिनबाह्याचा टीशर्ट- झंपर, १९५०च्या दशकात तिने योजला, बिनधास्तपणे चढवला आणि तद्नंतर फॅशन जगतातले ‘अलौकिक’ म्हणून कितीतरी अभिनेत्रींनी त्याचे अनुकरणही केले. ‘बार्दो नेकलाइन’ म्हणून तो आजही तितकाच लोकप्रिय आहे.

एकीकडे असे चित्रपट धो धो चालत असताना, ब्रिजीतने संगीत क्षेत्रातही यशस्वी मुशाफिरी केली. इथेही, संगीताची कसलीही तालीम वा सुरेल गळा नसतानासुद्धा, ब्रिजीतची सामान्य गाणीही आवाजापेक्षा तिच्या अदाकारीनेच जास्त गाजली. यशासोबत भरपूर पैसाही ब्रिजीतला मिळाला. मग तिने दक्षिण फ्रान्समधल्या सेंट-त्रोपेझ या बेटावर एक आलिशान घर घेतलं. १९५७ मध्ये, ब्रिजीत आणि रॉजर विभक्त झाले खरे, पण उभयतांच्या नात्यातला गोडवा शेवटपर्यंत टिकला. पुढेही कितीतरी चित्रपट या जोडगोळीने गाजवले.

पण अवघ्या ३९व्या वर्षी ब्रिजीतने चित्रपटनिवृत्ती घेतली. अर्थात माध्यमांचं आणि समाजाचं तिच्यावरचं लक्ष कधीच ढळलं नाही. तिनेही ते कधी ढळू दिलं नाही. १९६९ ते १९७८ या दशकात, सलगपणे ब्रिजीतचा चेहरा ‘मारियान’ या फ्रेंच स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक असलेल्या अर्ध-पुतळ्याच्या छबीसाठी पहिल्यांदा वापरण्यात आला. जन्माचं सार्थक व्हावं असा हा मान ब्रिजीतच्या वाट्याला आला. १९७४ मध्ये, ‘Playboy’ या गाजलेल्या शाृंगारिक मासिकासाठी तिने अर्धनग्न, उत्तान पोझ दिली आणि बाळंतपण, वयाची ४०शी असे टप्पे पार करूनही, तिची ‘फिगर’ आणि अम्लान लावण्य पाहून, तिच्या टीकाकारांनीही तोंडात बोटे घातली.

मात्र नंतर ‘पर्यावरण’, ‘वन्यजीव संवर्धन, ‘प्राणी-हक्क आणि संरक्षण’ असे शब्दही जेव्हा शब्दकोशातून प्रत्यक्ष जीवनात अवतरले नव्हते त्या काळात, ब्रिजीतने ते अमलात आणले. सारे आयुष्य हे भूतदयेसाठी वेचले. त्यासाठी, ती स्वत: पूर्ण शाकाहारी बनली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लागणारा लक्षावधी डॉलर्सचा निधी तिच्या संस्थेने एकहाती उभा केला. ब्रिजीतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, फ्रान्समधल्या कितीतरी ‘Boucheries chevalines’– अश्व-मांस विकणारी मटण केंद्रे आणि कत्तलखाने धडाधड बंद झाले. ‘कोरिदा’ अर्थात बैलांची झुंज हा स्पेनप्रमाणे, फ्रान्सचाही पारंपरिक राष्ट्रीय खेळ समजला जाई. त्यावेळी सांस्कृतिकमंत्री असलेल्या मितरॉ यांना पत्र लिहून, ब्रिजीतने या क्रूर खेळाची अधिकृत मान्यता काढायला लावली. ईदच्या निमित्ताने, अज-बळी देण्याच्या प्रथेला, खासकरून बकऱ्याला हलाल पद्धतीने कापण्याच्या पद्धतीला ब्रिजीतने कडकडून विरोध केला.

ज्या देशांमध्ये संस्कृती-वारसा, उपजीविका, खेळ आणि मनोरंजन अशा सबबींखाली, प्राण्यांवर अत्याचार होत असेल त्या देशांच्या पंतप्रधान वा महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना ती खरमरीत पत्रं पाठवायची. सन्मानपूर्ण जगण्याचा हक्क माणसांप्रमाणे चराचर प्राणीमात्रांनासुद्धा आहे. या ब्रिजीतच्या संदेशातून अनेक संस्था आणि चळवळी जगभर निर्माण झाल्या.

चीन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अनेक युरोपीय व आफ्रिकी देश ब्रिजीतच्या तावडीतून सुटले नाहीत. कॅनडामध्ये सीलच्या बेबंद शिकारीला तिच्यामुळे खीळ बसली. एरवी कुणाला सहजासहजी दाद न देणाऱ्या चीननेही आपली प्राण्यांबाबतची धोरणे बदलली. अतिपूर्वेला शांत, स्वस्थ डेन्मार्कच्या राणीला ब्रिजीतने जळजळीत पत्र पाठवले. ‘‘पारंपरिक खेळाच्या नावाखाली तुमच्या देशात जी डॉल्फिनची शिकार होते ते प्रत्यक्षात एक सामूहिक, सुनियोजित हत्याकांड आहे.’’ ब्रिजीतसारख्या वलयांकित बाईकडून आलेल्या या पत्राने डेन्मार्कची राणी खडबडून जागी झाली.

ऑस्ट्रेलियाने ‘छोटेखानी कांगारू’ आणि ‘निशाचर पोपट’ या प्रजातींच्या लुप्तप्राय होण्यामागे, त्यांची शिकार करणारे रानमांजरच कारणीभूत आहे असा जावईशोध लावून, जास्तीत जास्त मांजरी मारण्याचे फर्मान सोडले. या पढतमूर्खतेचे ब्रिजीतने जाहीर वाभाडे काढले. ‘‘एक प्रजाती वाचवण्यासाठी दुसऱ्या प्रजातीला ठार मारणे हा शुद्ध खुळचटपणा आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुजाण नागरिकांनो, तुम्हाला हे पटते का?’’ असं लिहिणाऱ्या ब्रिजीतच्या उपहासगर्भ पत्राने ऑस्ट्रेलियात ठिणगी पडली. फतवा मागे घेण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाच्या मांजरींवरचे हे सुलतानी संकट अखेर टळलं. भारतातही, विशेषत: ‘बोधगया’ इथे, ब्रिजीतच्या संस्थेने ‘Veterinary Care Camps’ साठी अर्थसाहाय्य केले.

हे सर्व जरी कौतुकास्पद असले तरी ब्रिजीतला भरपूर विरोधकही मिळाले. याचे कारण तिची जाहीर असलेली वंशवादी मानसिकता. स्वत:ला ‘अस्सल-कुळी’ फ्रेंच मानणारी ब्रिजीत वर्णद्वेषी होती. स्थलांतरितांबद्दल, तिला प्रचंड तिटकारा होता. ‘Le carré de Pluton’ या पुस्तकातून, आपल्या ‘ओपन लेटर टू माय लॉस्ट फ्रान्स’ या लेखात, ब्रिजीत लिहिते, ‘‘आज माझी प्रिय मातृभूमी निर्वासितांनी आक्रमिली आहे.’ २००३ मध्ये तिने पुढचे पुस्तक प्रसिद्ध केले ‘अरण्यरुदन’ ज्यात तिने फ्रान्समध्ये येणाऱ्या स्थलांतरितांच्या लोंढ्याला परत लक्ष्य केले. ‘गेल्या २० वर्षांपासून, आमच्या भूमीवर येणाऱ्या बेबंद आणि धोकादायक परकियांना आम्ही उदार मनाने आश्रय दिला. त्यांच्या हितासाठी, आमचे कायदे आणि नियम बदलले. लक्षात ठेवा, अजून काही वर्षांनंतर, दिसामासी वाढत जाणारी ही निर्वासितांची प्रजा त्यांचे स्वत:चे स्वायत्त कायदे-कानून आमच्यावर लादेल.’

वंश-संकराला विरोध आणि ‘संस्कृती-शुचित्वाला’ पाठिंबा देणारी आपली ‘गोरी’ मानसिकता ब्रिजीतने कुणाचीही भिडमूर्वत न बाळगता जपली, नव्हे तर निर्भीडपणे प्रतिपादिली. त्यासाठी, फ्रेंच सरकारने वेळोवेळी ठोठावलेला दंडही तिने भरला. असे असले तरी ब्रिजीतला देशोविदेशीचे कित्येक मानाचे पुरस्कार मिळाले.

२००९ला तिच्या पंचाहत्तरीनिमित्त पॅरिसला तिच्या चित्रपटांचा ‘रेत्रोस्पेतीव’ आयोजित करण्यात आला. ब्राझीलमध्ये तिचा तो सुप्रसिद्ध खोल गळ्याचा झंपर नी केसांचा टोपला या ‘नीजखुणा’ मिरवणारा ब्राँझचा पुतळाही उभारण्यात आला आहे.

‘मादक सौंदर्याचा अॅटमबॉम्ब, ‘निर्वासितांची वंशद्वेषी विरोधक,’ ‘पशुप्रेमी’, ‘मीडियाची लाडकी बेबे’ ‘१९८५चा La Lé gion d’ Honneur हा मानाचा किताब तत्त्वासाठी बेधडकपणे नाकारणारी, झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारी नी पुढे कर्करोगाच्या जीवघेण्या आजारातून निग्रहाने स्वत:ला बरी करणारी, परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वाची अशी ही जीवनासक्त ब्रिजीत. अलीकडे म्हणजे २८ डिसेंबर २०२५ला तिने जगाचा निरोप घेतला.

तिचे हे चौसोपी वाड्यासारखे भरगच्च आयुष्य पाहताना, शरच्चंद्र मुक्तिबोधांची ‘जीवाची प्रचंड फेक’ ही कविता आठवते. जीव जन्माला येतो नी साधे सोपे वाटणारे त्याचे आयुष्य पाहता पाहता कुठल्या कुठल्या वळणांतून त्याला प्रवाहित करते. नियतीने योजलेले तरीही ‘अनियोजित’ भासणारे, अघटिताचे ‘घटित’ जीवन त्याला जगायला लावते.

आपल्या सेंट त्रोपेझमधल्या आलिशान प्रासादतुल्य घरात, शांत-कृतार्थ आणि उणपुरं ९१ वर्षाचं आयुष्य जगलेल्या ब्रिजीत बार्दोला, ‘शेवटचा पडदा’ पडताना, आपणच पेललेली, साहिलेली ही ‘जीवाची प्रचंड फेक’ जाणवली असेल का?

ashujune2000 @yahoo.com