सुमंगला गोखले
मी १९७३ ते २००३ अशी ३० वर्ष स्वत:ची ‘प्रगत शॉर्टहॅण्ड अँड टाइपरायटिंग रूम’ ही संस्था पुण्यात पर्वती परिसरात चालवली. नंतर कोरेगाव पार्कमधील अंध मुलांनाही टायपिंग शिकवलं. मी मराठी आणि हिंदीची प्रश्नोत्तरं कॅसेटवर टेप करून द्यावीत अशी विनंती दहावी इयत्तेतील मुलांनी केली. त्याचा अनुभव मला नव्हता, पण त्यांनीच मला प्रश्नोत्तरं कशी वाचावीत ते सांगितलं आणि मी त्यांना हव्या असलेल्या कॅसेट टेप करून देऊ शकले. माझ्यापेक्षा लहान असलेल्यांकडून शिकण्यात मला कधी कमीपणा वाटला नाही.
२००७ मध्ये सख्ख्या भावाचा (गणेश दीक्षित) मला फोन आला. तो म्हणाला, ‘‘अगं, तू लगेच कॉम्प्युटरचा क्लास लाव आणि तुला त्यावर टाइप करायला यायला लागलं की मला फोन कर.’’ मी म्हटलं, ‘‘आता मला काय करायचंय कॉम्प्युटर शिकून? मी टायपिंग चा क्लास बंद केलाय माझा..’’ त्यानंतर मी ठिकठिकाणच्या संस्थांसाठी ‘जिथे कमी तिथे मी’ हा विचार मनात ठेवून विनावेतन सेवा करत होते. भाऊ मला म्हणाला, ‘‘आपली बहीण मीनाताई आपल्याला सोडून गेल्याला यंदा, २००७ मध्ये ५० वर्ष झाली. तेव्हा या निमित्तानं तिचा कवितासंग्रह पुन्हा छापून आपल्या आणि नातेवाईकांच्या पुढच्या पिढीला तो भेट द्यायचं ठरवलंय. तू कॉम्प्युटर शिकून घे आणि मीनाताईच्या कविता- संग्रहातील सर्व कविता टाइप करून दे. मी माझ्या कुटुंबातर्फे तुला कॉम्प्युटर भेट देणार आहे.’’
मी लगेच कॉम्प्युटरचा क्लास लावला. क्लासमध्ये रोज जे शिकत होते त्याचा सराव ‘नेट कॅफे’त जाऊन करत होते. अगदी १५ दिवसांतच कॉम्प्युटरचं तंत्र जमू लागलं. बंधुराजांना कॉम्प्युटरवर टाइप करून देते असं मोठय़ा उत्साहात कळवलं आणि त्यानं ८ मार्च २००७ ला महिला दिनाच्या दिवशी मला कॉम्प्युटर आणून दिला. १५ दिवसांतच कविता टाइप करून दिल्या. गणेशनं त्याचा मुलगा आशीषच्या मदतीनं ‘मीना’ हा काव्यसंग्रह छापून उद्घाटनाचा समारंभ मोठय़ा थाटात केला. ते झाल्यावर आता कॉम्प्युटरवर काय करायचं असा प्रश्न मला पडला होता. अचानक कल्पना सुचली आणि २००७ मध्येच मी माझं ‘सुमंगल’ हे पुस्तक कॉम्प्युटरवर टाइप करून छापलं. २००८ मध्ये ‘कृष्णार्पण’ हे पुस्तक कॉम्प्युटरवर तयार करून छापलं.
भाऊ गणेश आणि बहीण ललिता गुप्ते यांनी आम्हा उभयतांना सहलीला जाताना कॅमेरा भेट दिला होता. तेव्हा फोटो कसे काढायचे, रोल कसा बसवायचा, काढायचा सारं मी शिकून घेतलं. पुढे भावाचा मुलगा अतुल याच्याकडून डिजिटल कॅमेराही वापरायला शिकले. सहलीत काही मैत्रिणींनाही मी ते शिकवलं. २०१५ मध्ये मी एका ७ किलोमीटर्सच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती पूर्ण केली होती. माझं वय त्यावेळी होतं ७५. त्याविषयी एका वृत्तपत्रात लेख छापून आला होता. मला तो वाचायला न मिळाल्यामुळे इंटरनेटवर जाऊन लेख पाहावा, असं सुचवण्यात आलं. मी कशीबशी एकदाची इंटरनेटवर गेले. लेखावर खूप जणांनी कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, पण एक प्रतिक्रिया मी अशी मॅरेथॉन पूर्ण केलीच नसावी, अशी शंका घेणारी होती. त्या व्यक्तीला चांगलं खरमरीत उत्तर द्यावंसं वाटलं. मात्र तिथे दुसऱ्या एका वाचकानं परस्पर ‘बातमी खरी आहे,’ असं म्हणून त्याची लिंक टाकली होती. त्या प्रसंगी मला आठवलं, की माझी मुलगी बीना जोशी हिनं मला २०१२ मध्ये ‘फेसबुक’ अकाऊंट सुरू करून दिलं होतं. पण मी ते कधी वापरलंच नव्हतं. आता मी फेसबुक कसं वापरायचं ते मुलीकडून शिकून घेतलं. तेव्हापासून त्यावर फोटो, लेख इत्यादी पाठवत असते. नातू अभिषेक, नात मधुरा यांनी मला फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मराठी व हिंदीत संवाद कसा करायचा ते सांगितलं.
मी सिंगापूरची सहल केली तेव्हा माझ्याकडे डिजिटल कॅमेरा होता. फोटो छान आले. त्या फोटोंची सीडी मला मामेभाऊ अनंता देशमुख यानं करून दिली होती. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आता मी तुला तुझ्या इतर सहलींच्या सीडी नाही करून देणार. तुला मी सर्व प्रक्रिया सांगितलीय. तेव्हा आता तू सीडी करायच्यास. मग बघ तुला किती आनंद होईल ते!’’ मामेभाऊ आणि सख्खा भाऊ यांनी मला शिकवलं, प्रोत्साहन दिलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे मी माझ्या सर्व सहलींच्या सीडी केल्या आणि निर्मितीचा आनंद घेतला. काळाच्या मागे, अगर काळाच्या पुढे न राहता काळाबरोबर राहावं असाच प्रयत्न मी नवीन शिकताना केला. त्याबद्दल आनंद वाटतो.