मी त्या दिवशी एका कामानिमित्त अहिल्यानगरला गेले होते. दिवसभराच्या कामानंतर यायला उशीर झाला होता. रात्री अकरा वाजता बस स्टँडवरून चालत घराकडे येत असताना माझ्या घरासमोर सात-आठ स्त्रिया लहान मुलं व काही पुरुष थांबलेले दिसले. मी झपाझप पाऊल टाकत पुढे गेले. त्या स्त्रियांची विचारपूस करत असतानाच त्या स्त्रियांमध्ये दोन-अडीच महिन्यांच्या बाळाला पोटाशी धरून उभी असलेली संगीता मला दिसली. बाहेर खूप गारठा होता. मी तात्काळ सगळ्यांनाच घरात बोलावलं. त्यांची विचारपूस केली.

ते सगळेच जण दबले-पिचलेले होते. संगीता त्यातल्या त्यात धीट होती. संगीता म्हणाली, ‘‘आमच्या समाजाची एक पोरगी घर सोडून गेली, आमच्या समाजाची जातपंचायत बसली. जातपंच म्हणाले, ‘पोरगी ज्या मुलासोबत पळून गेली, त्या दोघांनाही हजर करा अन् लाखभर दंड भरा, जातपंचायतीचा खर्चही भरा.’ आम्हाला मुलीचा ठावठिकाणा म्हाईत न्हाई. आम्ही सांगितलं, ‘आमचा मुलगा मजुरीला दुसऱ्या गावाला गेला, त्याला हवं तर आम्ही हजर करतो.’ पण पंच ऐकायला तयार नव्हते, त्यांनी आमच्यावर दबाव आणला. आम्ही एक दिवसाचा टाइम मागून घेतला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा जातपंचायत भरली. लाखभर दंड अन् तीस-पस्तीस हजार पंचायतीचा खर्च एवढं पैसं आमच्याकडे नव्हतं. आम्ही दंड भरला न्हाई, मुला-मुलीला हजर केलं न्हाई, म्हणून आम्हाला जातीभाईर काढलं. तरुण पोरांच्या मदतीनं आम्हाला घराबाहेर वढलं. मारहाण करून वस्तीभाईर हाकलून दिलं. आमच्या घरांना त्यांनी कुलूप लावल्यात. आमची लहान पोरं-सोरं थंडीत कुडकुडत्यात. पोटाला भाकर न्हाई. या लहानग्याला पोटाशी धरून फिरतुया. पोलीस ठाण्यात थंडीत दोन तास थांबलो. त्यांनी आमचं काही बी ऐकून घेतलं न्हाई, आता साहेब न्हाईत, उद्या यावा, असं सागितलं.

संज्या म्हणाला, गवांदे ताईकडं जाऊ म्हणून इकडं आलोया.’’ संगीताचं बोलणं थांबलं. ते ऐकून डोकंच सुन्न झालं. संगीता तिची वयस्क सासू, जाऊ व इतर स्त्रियांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मारहाणीमुळे अंगावरच्या साड्या काही ठिकाणी फाटल्या होत्या. लहान मुलं भेदरलेली होती. पुरुषांनाही प्रचंड मारहाण झालेली दिसत होती. त्यांच्या डोळ्यात चीड, संताप, भीती दिसत होती. जातपंचांची मुजोरी, समाजबांधवांची निष्क्रियता, पोलिसांची बेजबाबदार वृत्ती, मनात खूप चीड, संताप, राग निर्माण झाला पण या सर्वांवर नियंत्रण मिळवत पीडितांची व्यवस्था लावणं गरजेचं होतं.

दिवसभराचं काम, दोनशे किलोमीटरचा प्रवास यामुळे मला खरं तर थकल्यासारखं झालं होतं. माझ्याही पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. रात्रीचे बारा वाजून गेले होते. पोलीस तक्रार, अन्य उपाय तर होतील परंतु आता एवढ्या रात्री आलेल्या या सात-आठ स्त्रिया, लहान मुलं व त्यांच्या सोबतचे पाच-सहा पुरुष यांचं करायचं काय? हा मोठा प्रश्न समोर आला. स्वयंपाकघरात गेले. चहाचं आधण ठेवलं. साथी अशोक गवांदे यांनी जवळच्या किराणा दुकानदाराला उठवून बिस्किटं, खारी, टोस्ट आणले ते आम्ही सर्वांनी खाल्ले. घरात असलेला भेळ-चिवडा-फळं अन् थोडी भाजी-पोळी लहानांना दिली. आम्हा सर्वांचंच त्या रात्रीचं ते जेवण होतं. प्रत्येकाच्या पोटात थोडंसं काही गेल्याने तरतरी आली.

खाणं झालं. परंतु राहण्याची व्यवस्था कशी करावी या विचाराने मला ग्रासलं. कारण थंडीचे दिवस होते. एवढी आंथरूण-पांघरूणं एवढ्या रात्री आणायची कुठून? आमचे एक स्नेही सुभाष यांचं छोटं मंगल कार्यालय होतं. त्यांच्याकडे या लोकांना पाठवावं असा विचार मनात आला. एवढ्या रात्री त्यांना फोन तरी कसा करावा असा संकोच वाटत होता. परंतु धाडस केलं. मी सुभाष यांना थोडक्यात हकिगत सांगून त्या लोकांना रात्रभर तुमच्या मंगल कार्यालयात राहू द्या अशी विनंती केली. त्यांनी होकार दिला. त्या सर्व पीडित स्त्री-पुरुषांना त्या मंगल कार्यालयात पाठवलं. तिथं त्यांची रात्रभर राहण्याची व्यवस्था झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यासोबत पोलीस ठाण्याला गेले. संबंधित अधिकाऱ्याला घटना समजावून सांगितली. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची पुस्तिका दिली. तरीही ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, ‘‘मॅडम, त्या लोकांना (आरोपी-जातपंचांना)आधी बोलवून घेतो. नंतर गुन्हा दाखल करू. एवढे सर्व लोक रात्रभर थंडीत कुडकुडत घराबाहेर आहेत. लहान मुलं केविलवाण्या चेहऱ्याने आईला चिकटताहेत. हतबल झालेले पुरुष समोर दिसत आहेत. तरीही घटनेचं, प्रसंगाचं गांभीर्य या यंत्रणेला वाटत नव्हतं, याचं आश्चर्य वाटलं. प्रयत्नांती शेवटी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणलं.

जातपंच म्हणजे परमेश्वराचा अंश अशी धारणा या व अन्य समजामध्ये आहे. जातपंचांना पोलीस ठाण्यात आणल्यामुळे संगीताच्या समाजाचे शेकडो लोक पोलीस ठाण्यात जमा झाले. त्या गर्दीच्या जोरावर जातपंच पोलीस ठाण्यात गुर्मीतच बोलत होते. पुढाऱ्यांना फोन करणं सुरू होतं. पोलीस ठाण्यात ते पीडितांवर गुरगुरत होते. गुन्हा दाखल झाला. कायद्याचा दणका बसताच मात्र ते जागेवर आले. (घर सोडून निघून गेलेल्या मुली संबंधाने संबंधितांना तक्रार नोंदविण्यास सांगितली) जातपंचांनी पीडितांच्या घराचे कुलूप काढून घर उघडे करून दिले. आम्ही पुन्हा असा त्रास देणार नाही असं सांगत झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली. परंतु तरीही आम्ही केस मागे घेतली नाही.

अजूनही समाजबांधव भीतीपोटी पीडितांना लग्न-कार्यात बोलवायला घाबरतात. पंचांची दहशत, भीती अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे. समाज बहिष्कृत कुटुंबाशी संबंध ठेवले तर आपल्यालासुद्धा समाज बहिष्कृत करतील हा धाक इतरांना आहे. पीडितांना न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचे समाजबांधव, पोलीस यंत्रणा, आजूबाजूचा समाज बदलेल. जातपंचायतींची मनमानी थांबेल. संपूर्ण समाज शिक्षण, तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे समाजाचे दैन्य संपेल. संपन्नता येईल, विषमता नष्ट होईल.

हा या सदराचा शेवटचा लेख. गेले वर्षभर हे समाजवास्तव आपल्यासमोर मांडत असतानाही आजूबाजूला खूप घडामोडी घडल्या. डॉ. संपदा मुंडे हिने स्वत:ला संपवलं. सक्षम ताटे परजातीचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आंचलच्या भाऊ व वडिलांनी त्याची हत्या केली. वैशाली हगवणे सासरच्यांच्या पैशाच्या हव्यासापोटी गेली. बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे संतोष देशमुखांनी अपप्रवृत्तींना केलेल्या विरोधामुळे त्यांचा खून झाला. अशा घटना घडत आहेत. ही हिंसा, हा कलह थांबवण्यासाठी अपप्रवृत्तींना चाप बसण्यासाठी सद्प्रवृतीने गप्प न बसता सक्रिय होणं गरजेचं वाटतं. त्यासाठी लेखमालेच्या माध्यमातून साद घालण्याचा हा प्रयत्न.

आपण सर्व वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. लेखांच्या संबंधाने वेळोवेळी दूरध्वनी, संदेश, ई-मेलद्वारे प्रतिक्रिया दिल्या. शेकडो मेल आले आहेत. आपल्या या प्रतिक्रियांमुळे केवळ लिहिण्याची प्रेरणाच नाही तर आणखी काम करण्याची ताकद, ऊर्जा, प्रोत्साहन मिळालं. सामाजिक काम करताना आवश्यक बाब म्हणजे ‘माणूस जोडणं’, या लेखमालेमुळे अनेक नवीन मित्र-मैत्रिणी, स्नेही जोडले गेले. या जोडलं जाण्याच्या चळवळीला, सामाजिक काम करताना मला निश्चितच फायदा होईल. या वर्षभराच्या सदरांमध्ये मी देवदासी, बालविवाह, व्यसन, चेटूक-भानामती, बुवाबाजी, सामाजिक बहिष्कार, ज्योतिष, जातपंचायत या विषयांवर लेखन केलं. ते सर्व माझे चळवळीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे अनुभव होते. या अनुभव मांडणीतून तरुणांचे, ‘आम्ही तुमच्याबरोबर काम करू इच्छितो’ अशा आशयाचे फोन व संदेश आले. काही ज्येष्ठांनी चळवळीला मदत करण्याबाबत ई-मेल केलेत. या सदरातून काही तरुणांना काम करण्याची प्रेरणा मिळाली असं त्यांनी मेलद्वारे कळवलं. हे माझ्यासाठी व चळवळीसाठी खूप मोठं फलित आहे. त्यासाठी मी ‘लोकसत्ता-चतुरंग’ची ऋणी आहे. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्तीला लिहितं केलं.

‘समाजवास्तवाला भिडताना’ या सदरातील कामाचे अनुभव म्हणजे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून केलेलं काम. हे काम करण्यासाठीचे प्रेरणास्थान डॉ. नरेंद्र दाभोळकर आहेत. साथी अविनाश पाटील, साथी माधव बावगे, आत्ताचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, प्रा. प्र. र. आर्डे या सर्वांची वेळोवेळी खूप मदत झाली, मार्गदर्शन मिळाले.

चळवळीचं काम करताना माणूस एकटा नसतो तर संपूर्ण चळवळीचं चांगुलपण, सर्वच कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या सोबत असते. त्यांचा आधार, मार्गदर्शन, बळ असतं. कृष्णा चांदगुडे, कॉ. बाबा अरगडे, मच्छिंद्र वाघ, विनायक बंगाळ या व अन्य साथींचाही या सर्व कामात मोठा सहभाग राहिला आहे. समाजात काही लोकांचा चांगुलपणा, काही कर्तव्यदक्ष व समाजभान असलेले अधिकारी, नोकरवर्ग यांचीही मदत झाली आहे.

या सदरात मांडलेल्या, लिहिलेल्या प्रकरणापेक्षाही काही गंभीर प्रकरणं आहेत ज्यात अनेक मोठ्या (?) व्यक्ती अडकलेल्या आहेत. पैशांचा अपहार आहे. गर्भलिंग चिकित्सा आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आहे. हे मी मांडू शकले नाही. कारण ती प्रकरणे अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.

जातपंचायती, जातपंचांची समाजावरची हुकमत. समाजबांधवांवर विशेषत: स्त्रियांवर केलेले अन्याय, त्यांचं शोषण या सदरात मांडलं. तसंच बुवा-बाबा-माता-त्यांची भोंदूगिरी, त्या माध्यमातून होणारं समाजाचं शोषण हेही मी या सदरात मांडण्याचा प्रयत्न केला. ही प्रातिनिधिक स्वरूपाची उदाहरणं होती आणि आहेत. आपल्या आसपास रोजच अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांना चाप बसण्यासाठी ‘जादूटोणाविरोधी कायदा’ २०१३ मध्ये पारित झाला. या कायद्यान्वये अंधश्रद्धामूलक कृतीतून केलेले शोषण गुन्हा आहे.

तसंच जातपंचायतींच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाविरुद्धचा कायदा ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कृतिशील पाठपुराव्यातून २०१६ मध्ये अस्तित्वात आला. शोषक निर्णय घेण्याच्या हेतूने जातपंचायती बसणे. जातपंचायतींना मदत करणे, प्रोत्साहन देणे या बाबीही आता गुन्हा ठरविण्यात आल्या आहेत. कायदे अस्तित्वात असतानाही शोषण मात्र थांबलेल नाही.

तरीही ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या प्रयत्नातून हजारो पीडितांना न्याय मिळवून देण्यात यश आलं आहे. वेगवेगळ्या समाजाच्या सोळा जातपंचायती बरखास्त झाल्या असल्या तरीही तेवढं पुरेसं नाही. सामाजिक वास्तव मांडता मांडता समाजमनाला साद घालणं, समाज घटकांची संवेदनशीलता जागी करणं, गुन्हा करू पाहणाऱ्या लोकांना कायद्याचा धाक दाखवत त्यांच्यातील चांगुलपणाला हात घालत सत्प्रवृत्ती वाढवणं हा हेतू आहेच, पण समाजात सत्प्रवृत्ती वाढल्या. समाज एक झाला, नेक झाला. तर अपप्रवृत्तींना अपोआप आळा बसेल.

असंख्य तरुण-तरुणी हिंसा, शोषण, जातिभेद, लिंगभेद, बालविवाह, व्यसनाधीनता याविरोधात पुढे येऊन वैचारिक व कृतिशील भूमिका घेऊन काम करतील असा आशावाद व्यक्त करत थांबते.

लेखातील काही नावे बदलली आहेत.

अॅड. रंजना पगार-गवांदे | ranjanagawande123@gmail.com

मोबाइल क्रमांक. ९८५०४९१६११