इराण येथे खेळल्या गेलेल्या ‘आशियाई बुद्धिबळ स्पर्धे’ तील ही घटना. माझा डाव सुरू होता. मी विचारात गढून गेले होते, तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारली आणि माझी विचारशृंखला भंग झाली. खरं सांगायचं तर मी, थोडं वैतागून, मागे वळून पाहिलं तर काळ्या बुरख्यातील मेट्रन तिथल्या सक्तीनियमानुसार माझ्या डोक्यावरील केस झाकायचा हिजाब ठीक करायला सांगत होती!

जगभर बुद्धिबळ स्पर्धा खेळूनही मला या कारणासाठी डावात व्यत्यय आल्याचा अनुभव नवीन होता. इराण- मध्ये गेल्यावर सुपरमार्केटमध्ये हिंडताना स्त्रियांच्या सर्व ‘स्टॉकिंग्स’च्या वेष्टनांवरील स्टॉकिंग्स घातलेल्या पायाची चित्रे काळ्या रंगाने खोडलेली पाहिली होतीच. त्यामुळे स्त्री खेळाडूंचे कपडे, केस यावर देखरेख ठेवायला स्पर्धेच्या ठिकाणी एका मेट्रनची तजवीज पाहून जास्त आश्चर्य वाटले नाही. तिथल्या एका आयोजक स्त्रीने आम्हाला सांगितले, की काही वर्षांपूर्वी इराणमध्ये धार्मिक कारणांमुळे बुद्धिबळावर बंदी होती. मग बुद्धिबळ खेळणार्‍या स्त्रिया दिसणं तर दूरच…! हळूहळू ही बंदी शिथिल होऊन बुद्धिबळाचे आणि त्या स्पर्धेत खेळणार्‍या स्त्री खेळाडूंचे चित्रण दूरचित्रवाणीवर दाखविले जात आहे. खेळांवर पुन्हा बंदी येऊ नये यासाठी इराणची जास्त माहिती नसलेल्या परदेशी स्त्री खेळाडूंच्या पोशाखावर त्यांना सक्तीने देखरेख ठेवावी लागत होती. या बंधनांना कंटाळून सुझन पोल्गार,ॲना मुझीचुक यांसारख्या आघाडीच्या स्त्री बुद्धिबळ खेळाडूंनी वेळोवेळी इराणमध्ये न खेळणे पसंत केले. जागतिक ज्युनियर स्पर्धेतील गतविजेती सौम्या स्वामिनाथन हिनेदेखील इराणच्या या धोरणाला विरोध म्हणून ‘आशियाई सांघिक स्पर्धे’तून काढता पाय घेतला होता. कट्टर इस्लामिक देशांमध्ये अशा बंधनांमुळे स्त्रिया अनेक खेळ खेळण्यापासून वंचित राहतात. सारा खादेम, हेजाझीपूर मित्रा यासारख्या अनेक इराणी स्त्री बुद्धिबळ खेळाडू अशा कायद्यांमुळे इराण सोडून दुसर्‍या देशांमध्ये स्थायिक झाल्या आहेत. अशा प्रकारे अनेक वेळा सामाजिक, धार्मिक आणि संघटनात्मक पातळीवरील स्त्री-पुरुष भेदभावाला स्त्री खेळाडूंना तोंड द्यावे लागते. भारताची क्रिकेट कर्णधार हरमनप्रीत कौर हिने क्रिकेट खेळताना सोयीचे पडते म्हणून केस कापले. तिच्या वडिलांना हे मान्य नसल्यामुळे थोडे दिवस त्यांनी तिच्याशी मौन धरले होते. शफाली वर्मा लहानपणी मुलाचे सोंग घेऊन क्रिकेट खेळत असे, कारण क्रिकेट खेळणार्‍या मुलींकडे समाज चांगल्या दृष्टिकोनातून बघत नसे. मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून आलेल्या भारतीय संघातील क्रिकेट खेळाडू क्रांती गौड हिलासुद्धा नकारात्मक सामाजिक अनुभवांशी झगडावे लागले. विश्व कप विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडूंच्या यशामुळे आता तरी गावागावांतून स्त्री खेळाडूंना सामाजिक पाठिंबा मिळेल अशी आशा करू या.

स्त्री खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सुविधा पुरवताना, आर्थिक कमाईच्या बाबतीत, प्रमोशन वा प्रसिद्धी कार्यक्रम आदी विविध बाबतीत बरेच वेळा दुय्यम वागणूक दिली जाते. याची सुरुवात अगदी स्पर्धेच्या आयोजनापासून सुरू होते. ‘ऑलिम्पिक’ मधील मॅरेथॉन स्पर्धा स्त्रियांसाठी आयोजित करायला १९८८ हे वर्ष उजाडावे लागले.

निसर्गदत्त जैविक चक्राला सांभाळून स्त्री खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात कामगिरी दाखवावी लागते. अनेकदा मातृत्वाची मोठी जबाबदारी निभावत स्त्री खेळाडूंना आपली कारकीर्द फुलवावी लागते. मासिकपाळीत स्त्रियांच्या शरीरात होणार्‍या संप्रेरकांमधील (हॉर्मोन्स) बदलांमुळे पुरुषांपेक्षा मानसिक चढ-उतारांचा स्त्रियांना जास्त त्रास होतो. खेळाच्या मैदानात सतत मानसिक संतुलन राखणे अतिशय महत्त्वाचे असते. कसोटीच्या क्षणी शारीरिक क्षमतेइतकीच मनाची कणखरतासुद्धा महत्त्वाची ठरते. प्रतिस्पध्र्याची सरशी होत असताना आपले डावपेच बदलून, हिंमत न हरता सामना पलटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. बुद्धिबळासारख्या खेळात जिंकत असलेला डाव, मनाची एकाग्रता मोडू न देता, प्रतिस्पध्र्याचा बचाव मोडून जिंकणे हे कर्मकठीण काम समजले जाते. टेबल टेनिस, बॅडमिंटनसारख्या अनेक खेळांमध्ये क्षणार्धात मेंदूकडून होणारी प्रतिक्षिप्त क्रिया महत्त्वाची ठरते. यात भर म्हणून मैदानाबाहेरील अनेक गोष्टींमुळे येणार्‍या ताण-तणावांचा स्त्री खेळाडूंना सामना करावा लागतो. सततचा दमवून टाकणारा सराव, दुखापतींची भीती, कामगिरी उंचावण्याचा दबाव, माध्यमे, संघटना, प्रायोजक, कुटुंबीय या सर्वांना जपण्याची धडपड अशा अनेक गोष्टी स्त्री खेळाडूंच्या मानसिक संतुलनावर परिणाम करत असतात.

सिमॉन बाइल्स या आघाडीच्या स्त्री जिमनॅस्टने तर २०२० मध्ये टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये झालेल्या अनेक जिम्नॅस्टिक स्पर्धांमधून मानसिक ताणामुळे आयत्या वेळी माघार घेतली होती. या घटनेनंतर सिमॉनने आपल्या आठवड्याच्या सरावाच्या वेळापत्रकात मनोचिकित्सेचा आवर्जून समावेश केला. याचा चांगला परिणाम लवकरच दिसून आला. २०२३ मध्ये झालेल्या ‘जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धां’मध्ये चार सुवर्णपदकांची कमाई करून तिने दणदणीत पुनरागमन केले. राईसा लील या केवळ १३ वर्षांच्या मुलीने ‘टोकियो ऑलिम्पिक’ मध्ये स्केट बोर्ड स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले. राईसा म्हणते, ‘‘ऑलिम्पिक पदकासाठी किती मानसिक मोल द्यावे लागते ते मला लवकरच उमजले. मी लगेच मनोवैज्ञानिकांशी संपर्क साधला. मी माझ्या आयुष्यात केलेली ही सर्वात योग्य गोष्ट म्हणावी लागेल.’’ विश्व कप विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज हिलासुद्धा स्पर्धेदरम्यान मानसिक दबावाचा सामना करावा लागला. तिच्या आई-वडिलांनी या दरम्यान तिला मानसिक उभारी दिली.

विशेष करून मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूंना मासिक पाळीच्या होणार्‍या त्रासावर मात करून मैदानावर आपले कर्तृत्व दाखवावे लागते. खराब कामगिरीसाठी जरी ही सबब बहुतेक स्त्री खेळाडू पुढे करीत नसल्या, तरी अपरिहार्यपणे केव्हाना केव्हा या कारणाचा स्त्री खेळाडूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होताना दिसतो. चिनी जलतरणपटू फू युआनहुईने २०१६ च्या रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये पदक हुकण्याकरिता मासिक चक्राला जबाबदार ठरविले होते. २०२४ च्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’ मध्ये मीराबाई चानूचे वेटलिफ्टिंगमधील पदक फक्त एका किलोने हुकले. त्या दरम्यान मासिक पाळी चालू नसती तर कदाचित ते पदक हुकले नसते अशी खंत तिने नंतर व्यक्त केली. भारताची माजी हॉकी कर्णधार सविता पुनिया म्हणते, ‘‘राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात करताना मासिक चक्राबद्दल पूर्ण माहिती दिली गेली होती. त्या दरम्यान कसा सराव करावा, शरीराची योग्य काळजी घेऊन सामन्यांच्या वेळी या कारणामुळे शारीरिक क्षमता कमी पडू नये यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण आम्हाला दिले गेले. जरी खेळताना हे सांभाळणे कठीण असले, तरी मानसिक तयारी ठेवली तर सर्व जमून जाते.’’

प्रत्येक स्त्रीचा मासिक पाळीचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. या दरम्यान मानसिक ताणतणाव वाढणे, अति चिंता करणे, झोप नीट न लागणं असे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. प्रत्येक स्त्रीला याचा सामना करावा लागतो. कार्यालयात काम करणार्‍या स्त्रियांना किंवा बैठे खेळ खेळणार्‍या खेळाडूंना याच्याशी मुकाबला करणं तुलनेत किंचित सोपे जातं. परंतु मैदानी खेळ खेळताना स्त्री खेळाडूंना यावर मात करणे जास्त अवघड जाऊ शकते. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार आणि नियमांनुसार सामने खेळले जात असल्यामुळे मासिक पाळी दरम्यान रजेचा विचार क्रीडाक्षेत्रात करणे अशक्यच! अनेक वेळा स्पर्धेचे नियमसुद्धा स्त्री खेळाडूंना मदत करणारे नसतात. ब्रिटिश फुटबॉलपटू बेथ मिड म्हणते, ‘‘मैदानावर पांढर्‍या रंगाचे कपडे घालणे या दिवसात सोयीचे नसते, परंतु ‘विम्बल्डन’सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्त्री खेळाडूंना गडद रंगाच्या शॉर्ट वापरण्याची परवानगी स्पर्धा सुरू झाल्यानंतर तब्बल १४६ वर्षांनी मिळाली!’’ काही वेळा अति व्यायामाने मासिक पाळी बंद होण्याचा प्रकार स्त्री खेळाडूंच्या बाबतीत घडतो. अर्थात वैद्यक शास्त्रातील प्रगतीचा फायदा घेऊन आजकाल काही त्रासांवर उपाययोजना करता येऊ शकतात.

काही वर्षांपूर्वी खेळावर प्रभाव पडू शकणार्‍या मासिक पाळीसारख्या विषयावर स्त्री खेळाडू आपल्या प्रशिक्षकांसोबत सुद्धा मोकळेपणे चर्चा करत नसत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होत असे. काळानुसार यात लक्षणीय बदल घडून येत आहे. गोल्फसारख्या खेळात न रागावता, मनावर ताबा ठेवून खेळणे खूप महत्त्वाचे असते. मासिक पाळीचा खेळावर होणार्‍या शारीरिक आणि मानसिक परिणामांविषयी न्यूझीलंडची आघाडीची गोल्फ खेळाडू लिडिया को उघडपणे चर्चा करते. लिडिया म्हणते, ‘‘मी तरुण असताना अशी चर्चा करणे कदाचित मला लाजिरवाणे वाटले असते. पण आता मला ही गोष्ट सर्वसाधारण वाटते, कारण सर्वच स्त्री खेळाडूंना यातून जावे लागते.’’ फ्रांसची स्केटिंगपटू माई बेरेनिस मेंटे हिने तर तिच्या यू ट्यूब चॅनेल वर अनेक स्त्री ॲथलिटना मासिक चक्राचा खेळावरील परिणाम याबद्दल त्यांचे अनुभव सांगण्यास प्रोत्साहित केले आहे.

एकंदरीत स्त्री खेळाडूंसाठी सामाजिक परिस्थितीत सकारात्मक बदल आणि ्त्रिरयांच्या समस्येविषयी चर्चेतून मार्ग काढण्याचा मोकळेपणा हळूहळू वाढताना दिसतो आहे. २०१७ मध्ये सौदी अरेबियामधील रियाध येथे ‘जागतिक जलदगती बुद्धिबळ’ स्पर्धा झाल्या होत्या. तेव्हा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मागणीनुसार सौदी अरेबियाने प्रथमच स्त्री खेळाडूंना हिजाब न वापरता खेळण्याची परवानगी दिली होती. २०१२ च्या ‘लंडन ऑलिम्पिक’ मध्ये सौदी अरेबिया, कतार, बहारीन या देशांनी प्रथमच स्त्री ॲथलिटचा समावेश आपल्या चमूत केला होता. यावेळी कतार या देशाने तर ध्वजवाहकाचा मान बाहिया अल हमाद या त्यांच्या स्त्री शूटरला दिला होता. २०१६ मध्ये इराणने ऑलिम्पिक चमू मध्ये ९ स्त्री खेळाडूंचा समावेश केला होता. त्यातील किमिया अलीझादेह या तायक्वांदो खेळाडूने ऑलिम्पिक पदक मिळवून इराणच्या स्त्री खेळाडूंसाठी इतिहास रचला. भारतात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटमधील स्त्री संघाचे विश्व कपमधील यश तळागाळापर्यंत, गावागावांत वाखाणले गेले आहे. यामुळे स्त्री खेळाडूंना समानता आणि सामाजिक मान्यता मिळायला निश्चित मदत होईल. वाढत्या कौटुंबिक पाठबळामुळे स्त्री खेळाडू लग्नानंतरच काय, तर मुले झाल्यानंतरसुद्धा आपली खेळातील कारकीर्द पुढे चालू ठेवताना दिसत आहेत.

भारताची आघाडीची मुष्टियोद्धा आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित मेरी कोम हिने मातृत्वानंतर यशस्वीपणे खेळ चालू ठेवण्यासाठी घेतलेले कष्ट, शारीरिक आणि मानसिक संघर्ष नवीन पिढीला खूप प्रोत्साहित करतील. ‘मेरी कोम’ या चित्रपटात ‘अनब्रेकेबल’ या पुस्तकात या संघर्षाचे यथार्थ चित्रण आले आहे. असे आदर्श समोर ठेवून जिद्दीने प्रयत्न केल्यास स्त्री खेळाडूंसाठी भविष्यकाळ उज्ज्वल असेल अशी खात्री मला वाटते.

gokhale.anupama@gmail.com