ग्रामीण भागातील स्वयंपाकघरात, मागील दारी अजूनही मातीच्या चुली व लाकडाचे सरपण यांचे अस्तित्व कायम आहे. चुलीचा धूर, त्यामुळे होणारे प्रदूषण व इंधनाचा अपव्यय यावर प्रगत तंत्रज्ञानाने, नेहा जुनेजा हिने शोधला पर्यावरणपूरक स्मार्टस्टोव्हचा पर्याय.

आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर प्रदूषण, वातावरण बदल किंवा पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बाबींबदल चर्चा झडतात. पण खेडय़ात राहणाऱ्या सामान्य माणसापर्यंत त्या पोहोचतच नाहीत. अनेकदा लोकांनी काय करू नये, हे सांगण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावणारी व्यवस्था, काय केले पाहिजे, याचे कोणतेच पर्याय लोकांना देत नाही. यामुळे अस्वस्थ होत बडोद्याच्या नेहा जुनेजाने सुरू केला अभ्यास आणि त्यातून जन्म झाला एका पर्यावरणपूरक उत्पादनाचा- स्मार्टस्टोव्हचा.
 अभियांत्रिकीची पदवी व पाठोपाठ एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर योगायोगाचे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनी व उत्पादनांसाठी काम करण्याची तिला संधी मिळाली. त्यातून तिला लक्षात आलं, ग्रामीण भागात घरोघरी टीव्ही पोहोचलेत, मोबाइल खणखणताहेत पण स्वयंपाकाची मातीची चूल मात्र अजून  टिकून आहे. काहीजणांकडे गॅस आलेत, पण पाणी तापवणे, भाकरी करणे यासाठी चूल पेटवलीच जातेय. चुलीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर होताच पण इंधनाचा अपव्ययही चिंताजनक होता. चुलीच्या धुराने डोळे लाल होणे, दम्यासारखे श्वसनाचे विकार होणे, अशा आरोग्याच्या समस्याही गावकऱ्यांना भेडसावत होत्या. पण ‘घरोघरी मातीच्या चुली’ काही हटत नव्हत्या.
म्हणूनच लोकांना परवडेल, आवडेल अशा पर्यावरणपूरक शेगडीचा पर्याय लोकांना द्यायचा या विचाराने २८ वर्षीय नेहाला झपाटले. साल होते २०१०. आयआयएम अहमदाबादचा विद्यार्थी अंकित माथुर तिच्या या उपक्रमात सामील झाला. समविचारी मित्र-मैत्रिणींचा गट तयार झाला व ‘ग्रीनवे ग्रामीण इंफ्रा’ या संस्थेमार्फत एक स्मार्ट शेगडी प्रत्यक्षात आली.  
सुरुवातीला त्यांनी देशातल्या पाच राज्यांमध्ये संशोधन केले- राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व पंजाब या राज्यांच्या ग्रामीण भागात जाऊन लोकांच्या चुलीबाबतच्या समस्या, त्यांच्या गरजा जाणून घेण्याचे ठरवले. घरातील महिलावर्गाचा चुलीशी सर्वाधिक संबंध येतो, मग गावोगावी अक्षरश: मुक्काम ठोकून या महिलांच्या गरजा, त्यांच्या सूचना यांचा तब्बल पावणेदोन वर्षे अभ्यास केल्यानंतर एक बर्नर असणारा स्मार्टस्टोव्ह तयार झाला. या स्टोव्हची खासियत अशी की यात इंधन म्हणून लाकूड वापरता येत असले तरी पारंपरिक चुलीच्या तुलनेत कमी सरपण वापरून अधिक स्वयंपाक करता येतो, तसेच लाकडाबरोबर गोवऱ्या, शेतीतील टाकाऊ पदार्थ जसे की उसाची चिपाडे, पेंडी यांचाही वापर इंधन म्हणून करू शकतो. वजनाचा हलका असणारा हा स्टोव्ह वापरायलाही सोपा आहे. हा स्मार्ट स्टोव्ह चुलीपेक्षा चारपट अधिक कार्यक्षम आहे (६५ टक्के इंधन वाचते) व हानिकारक वायूंचे उत्सर्जन ७० ते ८० टक्के खाली आणतो.
मातीच्या चुलीतून येणारा धूर अनेक आजारांना आमंत्रण देतो. तसेच यातून कार्बनडाय ऑक्साइड व कार्बन मोनोक्सॉइड या हानिकारक वायूंचे उत्सर्जन झाल्याने प्रदूषण वाढते ते वेगळेच. म्हणूनच हा स्मार्टस्टोव्ह हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरला.
 एक तास चुलीच्या धुराचा सामना करणे म्हणजे २० सिगारेट ओढण्याइतके शरीराला घातक असते, असा दावा ‘ग्रीनवे ग्रामीण’ने केलाय म्हणूनच त्यांच्या स्मार्टस्टोव्हने इंधनबचत होते, अधिक कार्यक्षम असल्याने स्वयंपाकाचा वेळ वाचतो, शिवाय धुरापासून सुटका अशी वैशिष्टय़े सांगत बाजारात उत्पादनाचा प्रचार सुरू झाला. पण ही कल्पना गावकऱ्यांच्या गळी उतरवणे सोपे नव्हते. लोक कौतुक करीत होते, पण प्रत्यक्ष विकत घेण्यास तयार नव्हते. मग कंपनीतर्फे आम्ही प्रशिक्षणार्थी नेमले. त्यांना उत्पादन कसे वापरायचे हे शिकवले व जत्रा, मेळावे अशा गर्दीच्या ठिकाणी स्टोव्हची प्रात्यक्षिके दाखवण्यास सुरुवात केली. विक्रीत कमालीचा फरक पडला. ज्यांनी स्टोव्हचा वापर केला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर आमच्याच ज्ञानात भर पडली. स्मार्टस्टोव्हमुळे अजिबात धूर होत नाही, त्यामुळे भिंती काळ्या होत नाहीत, परिणामी रंगरंगोटीच्या खर्चातही बचत होते! कर्नाटकात अक्षरश: हीच मग आमच्या उत्पादनाची पंचलाइन ठरली- ‘अब दिवारे काली नही होंगी! ’ महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, मराठवाडा या भागातून प्रतिसाद चांगला मिळाला. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील महिला अधिक उत्साही असल्याने उत्पादनाची विक्री चांगली झाली.
आजघडीला महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांच्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील ग्रामीण भागात सुमारे अडीच लाख स्मार्ट स्टोव्हची विक्री झाली आहे. त्यामुळे ही कुटुंबे पर्यावरणरक्षणाच्या मोहिमेत सहभागी झाली आहेत.
मुळात खेडय़ापाडय़ातील लोकांना संसाधनांची कमी असते म्हणूनच त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांमधूनच जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल, हा विचार आम्ही केला असे नेहा सांगते. सध्याचे स्मार्टस्टोव्हचे डिझाइन शोएब काझी याचे असून स्मार्टस्टोव्हची किंमत १३०० रुपये आहे. नेहाला कोणतीही सामाजिक वा व्यावसायिक पाश्र्वभूमी नाही. तिचे वडील लष्करी अधिकारी होते तर आई गृहिणी. पण प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग तळागाळातील लोकांना व्हावा, हाच ध्यास तिला लागला होता.
एका मुलीने सोशल आंत्रप्रनर होण्यासाठी पाच आकडी पगाराची नोकरी सोडावी, शेगडी-बिगडी बनवण्याचा घाट घालावा, हे लोकांच्या पचनी पडणारे नव्हते. असंख्य लोकांनी मला यापासून परावृत्त केले व सुदैवाने लोक काय म्हणताहेत, हे मला तेव्हा कळतच नव्हते. माझं ध्येय पक्कं होतं. आपल्याला स्मार्टस्टोव्ह तयार करायचा आहे व लोकांपर्यंत न्यायचा आहे, हा विचार सोडून काही डोक्यात आलेच नाही, असे नेहा सांगते.
‘प्रॉडक्ट डिझाइन’मधल्या कौशल्यांसाठी नेहाचे परदेशातही कौतुक झाले आहे. ‘एकोइंग ग्रीन’ संस्थेची २०१३ ची ग्लोबल फेलोशिपला तिला मिळाली आहे. तर ‘फेमिना वुमन अ‍ॅवार्ड फार सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन २०१३’ ने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
  ही शेगडी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप मोठे आव्हान नव्हते, याहूनही अधिक बायोगॅसवर आधारित वा तत्सम उत्पादन करणे शक्य आहे. पण लोकांची मानसिकता अजून फारशी बदललेली नाही. घरची लाकडे आहेत, सरपण स्वस्त आहे, अशी अनेक कारणे देत लोक चुलीत लाकूडच जाळणे पसंत करतात म्हणूनच आम्ही उत्पादनाचा ढाचा असा ठेवला हे तिचे स्पष्टीकरण डोळ्यांत अंजन घालणारे आहे.
भविष्यात पुढचे लक्ष्य तिला खुणावते आहे-थर्मो इलेक्ट्रिक डिव्हाइस स्वरूपातील मोबाइल चार्जर बनवण्याचा त्यांच्या कंपनीचा मानस आहे. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत, आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा त्यांचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
भारती भावसार -bharati.bhawasar@expressindia.com

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”