ई-कॉमर्ससारख्या गुंतागुंतींच्या क्षेत्रातील संधी ओळखून ऑनलाइन व्यवहारांसाठी खात्रीशीर व सोपे उपाय सुचवणारी प्रणाली विकसित करण्यासारखे आव्हान पेलणाऱ्या उपासना टाकू या तरुणीच्या योगदानाविषयी.  
आपला कर भरायचा असो वा आपलं गॅसचं बिल, मोबाइलचं रिचार्ज करायचा असेल वा बँक खात्याची माहिती घ्यायची असेल तर आपण पटकन ऑनलाइन पैसे भरण्याची सोय आहे का ते पाहतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत मात्र आपल्याला बँकांचे हे व्यवहार घरात बसून करता येतील ही कल्पनाही नव्हती. बिलं भरायची असतील तर शेवटच्या दिवशी केंद्रांवर लांबच लांब रांगा लागायच्या. याचं कारण ‘वेळ नाही’ ही सबब नेहमीच तयार असायची किंबहुना अजूनही असते. पण हीच गोष्ट लक्षात घेऊन, घरबसल्या सगळी बिलं भरून टाकणं सोप्पं आणि सहज झालंय ते ई-कॉमर्समधील सुलभीकरणामुळं!
असं म्हणतात की ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ पण जेव्हा गरजेसोबत प्रबळ इच्छाशक्ती आणि भक्कम साथीदार एकत्र येतात तेव्हा मिळणारं यश हे नक्कीच खणखणीत असतं. उपासना टाकू यांनी आणलेली ई-कॉमर्समधली सुलभता हे याचंच उदाहरण ठरू शकेल.
भारतामध्ये एखादं ‘स्टार्ट अपस्’ सुरू करणं हे मोठं आव्हानात्मक काम, त्यातही एका तरुणीसाठी हे मोठं दिव्यच. पण उपासना टाकू यांना भारताच्या बदलत्या आर्थिक व्यवहारांमध्ये, त्यामध्ये होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत संधी शोधता आली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. भारतामध्ये ई-कॉमर्स किंवा मोबाइल कॉमर्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि यापुढेही ते वाढतच जाणार आहे. त्यात अधिकाधिक सुलभता आणणं, हे व्यवहार अधिक सुरक्षित होणं हे ग्राहकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होणार आहे आणि इथेच महत्त्वाचं ठरणार आहे टाकू यांचं हे इनोव्हेशन.
उपासना टाकू यांना ‘स्टार्ट अपस्’चं प्रयोगशील जग अगदी जवळचं वाटतं. आणि आता ई-कॉमर्सचं जग त्यांच्यासाठी संशोधनाची प्रयोगशाळाच झाली आहे. ऑनलाइन पेमेंटस् अधिक सुलभ कसे करता येतील याच्या नवीन नवीन पद्धती शोधून काढणं यात त्यांचा जणू हातखंडा झाला आहे. २००१ साली जालंधरमधल्या एन.आय.टी मधून उपासना यांनी आपलं इंजिनीयिरगचं शिक्षण पूर्ण केलं. काश्मिरी कुटुंबात जन्मल्यामुळे उच्च शिक्षणाचं स्वप्नं त्यांना पूर्ण करता आलं. त्यानंतर स्टॅनफोर्ड महाविद्यालयामध्ये संशोधन साहाय्यक म्हणून कामाला लागल्या. पुढे काही वर्षे आणखी खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्या भारतात परतल्या. भारतात नव्याने जम बसवू पाहणाऱ्या काही कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं.
याच दरम्यान त्यांची ओळख बिपिन प्रीत सिंग यांच्याशी झाली. सिंग यांच्याबरोबर काम करताना उपासना यांच्या कल्पकतेने व त्यांच्या व्यावसायिक आकांक्षांनी भरारी घेतली. सिंग हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर. आय.आय.टी.सारख्या प्रतिष्ठित संस्थेमधून त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांच्यासह उपासना यांनी ‘मोबिक्विक’ ही ऑनलाइन मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा देणारी वेबसाइट सुरू केली. देशातली मोबाइलधारकांची वाढती संख्या व त्यांना आपल्या सेवेशी जोडून घेण्याची संधी उपासना यांना खुणावू लागली. ग्राहकांचं पेमेंट पोहोचणं/ यशस्वी न होणं, ई-पेमेंटमध्ये लागणारा प्रचंड वेळ या गोष्टी भारतातल्या ई-कॉमर्सच्या वाढीतले मोठे अडथळे असल्याचं लवकरच उपासना यांच्या लक्षात आलं. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी या दोघांनी मिळून, खूप चर्चा, विचारविनिमय केल्यानंतर जन्म झाला ‘झाकपे’ (ZaakPay) चा. आपण ऑनलाइन व्यवहार करताना ती सुविधा देणारी वेबसाइट व बँक खाते यांना जोडणारा, ही प्रक्रिया सुरक्षित ठेवणारा जो ‘पेमेंट गेट वे’ आहे, त्यासंबंधी ‘झाकपे’ काम करतं.  आतापर्यंत जमवलेल्या पैशांतून दोघांनी २५ लाख रुपये काढून ठेवले. आणखी दोन जण कामाला घेतले, ई-कॉमर्स मधल्या समस्यांवर काय तोडगा निघू शकतो, यावर काम सुरू केलं. दिल्लीतल्या कार्यालयात प्रयत्नांची शिकस्त चालू होती. अवघ्या पाच महिन्यांच्या काळात ‘बँकपे’ नावाची सुविधा यावर तोडगा ठरू शकते, ही कल्पना पुढे आली. मात्र, रिझर्व बँकेच्या काही नियमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात आणता आली नाही. पण या अनुभवाने न खचता, उपासना व तिच्या गटाचे काम सुरूच होते. अल्पावधीत ‘झाकपे’चा जन्म झाला. ई-कॉमर्समध्ये काम करणाऱ्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डची सोय करतात. म्हणजे आपण एखाद्या साइटवरून एखादी वस्तू खरेदी केली की आपण आपल्या बँकेबरोबरच आणखी एका प्रणालीचा वापर करतो. ही प्रणाली आपल्याला, आपण जिथून वस्तू खरेदी करणार आहोत या साइटला आणि बँकेला एकत्र जोडते. भारतात अशी सुविधा पुरवणारे आणखी काही स्पर्धक आहेत- पण  ZaakPay  ची प्रणाली अधिक सुटसुटीत आणि वापरायला सोपी अशी आहे. यामध्ये कमीत कमी कागदी व्यवहार करावा लागतो, त्यामुळे ही सुविधा वापरणं आणखीनच सोप्पं होऊन जातं. मार्च २०१२ पासून ‘झाकपे’चं काम प्रत्यक्षात सुरू झालं. केवळ पाच ग्राहकांसह सुरू झालेल्या या कंपनीकडे आज ४७ ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी काही नामवंत ग्राहक म्हणजे झोमॅटो, हेल्थकार्ट. पहिल्याच वर्षांत कंपनीचा टर्नओव्हर ७ कोटीं रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. दिल्लीमधल्या एका खोलीत सुरू झालेल्या कंपनीचा विस्तारही हळूहळू वाढला- आता दिल्लीत इतरत्र व बंगळुरूमध्येही त्यांच्या शाखा आहेत. आणि आगामी काही वर्षांत त्यांचा टर्नओव्हर ७० कोटी रुपयांच्या घरात जाईल, अशी उपासना यांची अपेक्षा आहे. लवकरच ‘झाकपे’ आपली सुविधा ‘वॉलमार्ट’लाही पुरवणार आहे.
‘झाकपे’इतकीच उपासना यांची आणखी मोलाची कामगिरी म्हणजे मोबिक्विक – मोबाइल वॉलेटची. म्हणजे एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणच्या व्यक्तीला मोबाइलच्या मदतीने पैसे पाठवण्याचा सोपा मार्ग. या एकाच वेबसाइट/अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मोबाइल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, डेटा कार्ड्स किंवा कोणतीही बिलं भरण्याची सुविधा मिळते. वेबसाइट एकदम युजर फ्रेंडली असून ऑनलाइन व्यवहारांचा सुरक्षित पर्याय देते. ग्राहक ज्या कंपन्याशी हा व्यवहार करतात, त्यांच्याकडून मोबिक्विक ३ टक्के शुल्क आकारते. विशेष म्हणजे केवळ ऑनलाइन पैसे पाठवण्याचं काम न करता ते प्रत्यक्ष पैसे काढून घेण्याचीही सोय मोबिक्विकद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, एखाद्या एटीएमसारखी. ‘झाकपे’चे यश पाहता भारतातील तब्बल ४० कंपन्यांनी या स्पर्धेत उतरण्याचा इरादा केला आहे-ज्यात आदित्य बिर्ला, व्होडाफोन, रिलायन्ससारख्या बलाढय़ कंपन्यादेखील आहेत.
मोबिक्विकची सेवा आज साधारण १ कोटी ५० लाख ग्राहक वापरतात. प्रत्येक महिन्यात त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढतेच आहे. ‘‘भारतासारख्या देशात जिथे लोकांकडे बँकेची खाती नाहीत पण मोबाइल मात्र नक्की आहे. अशा लोकांपर्यंत, म्हणजे जवळजवळ अध्र्या भारतापर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. कारण भारताची लोकसंख्या १२० कोटी पण बँक खाती केवळ १० कोटी लोकांकडे आहेत. या लोकांना आपले व्यवहार मोबाइलद्वारे करायला शिकवणं हे आमच्या समोरचं आव्हान असणार आहे.’’ असं उपासना सांगतात.
‘‘आमच्यासारख्या सोयी पुरवणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आमची गती थोडीशी कमी असली तरी सुरुवातीच्या काही महिन्यात भरमसाट ग्राहक जमवून त्या ग्राहकांनी एकदाच एखादा व्यवहार केला तर उपयोग नाही. आम्हाला असं तंत्रज्ञान विकसित करायचं आहे जे एखाद्या व्यक्तीने एकदा वापरलं की तो कायमचा आमच्या तंत्रज्ञानाशी जोडलेला राहील. माझं ठाम मत आहे डिस्काऊंट वगैरे देऊन ग्राहक मिळवता येतील, टिकवता येत नाहीत.’’
आपल्या कंपनीसाठी असं अधिक टिकाऊ  बिझनेस मॉडेल स्वीकारणाऱ्या उपासना टाकू यांच्या कंपन्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे.
आपणही पुढच्या वेळेला एखादा ऑनलाइन व्यवहार केला तर आपल्याला उपासना यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की!
प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?