विवाह आणि कुटुंब संस्था या मानवी समाजजीवनाच्या मोठ्या कालखंडाचा हिस्सा बनून राहिलेल्या आहेत. त्यामुळे बदलत्या काळाला अनुसरून त्यात बदल होत गेले आहेत. मग या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत म्हणजेच २००० ते २०२५ दरम्यान असे कोणते वेगळे बदल काय झाले, की आपल्याला त्याची जाणीवपूर्वक दखल घ्यावीशी वाटते आहे?

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या विशाल आणि बहुपेडी देशात, जनता अनेकविध स्तरांवर जगते. साध्या शैक्षणिक स्तरांचं उदाहरण घेतलं, तरी अंगठाबहाद्दर आता सही करायला शिकले, इथपासून शालेय शिक्षण ते पीएच.डी., पोस्ट डॉक
(Postdoctoral Research)हे एवढ्या स्तरांमध्ये समाज विभागलेला आहे. जाती-पाती, रूढी, परंपरा यातील विविधतेनेही समाज वेगवेगळ्या स्तरांत विभागलेला आहेच. गरीब आणि श्रीमंत यामधली दरी तर सर्व परिचित आहे. तरीही या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांनी आपल्या देशात आर्थिकदृष्ट्या एक मोठा मध्यमवर्ग तयार केला ही वस्तुस्थिती आहे. या मध्यमवर्गात जीवनमूल्यांच्या बाबतीत बरीच साम्यस्थळं दिसतात, ज्याला या वर्गाची जीवनशैली असं म्हणता येईल. ही जीवनशैली गेल्या पंचवीस वर्षांत खूपच बदलली. पण मुळात ही नवी जीवनशैली निर्माण करणारा मध्यमवर्ग या पंचवीस वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला तरी कसा? बदलत्या जीवनशैलीने विवाह आणि कुटुंबसंस्थेचा प्रवाह बदललाच, पण त्या आधी या पंचवीस वर्षांत नेमकं काय घडलं? ही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

कुठल्याही समाजाचा आर्थिक डोलारा उभा राहतो तो विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर. साधारण १९७५-८०च्या सुमारास मुख्यत: अमेरिकेत सुरू झालेली तांत्रिक प्रगती पुढच्या पन्नास वर्षांमध्ये कृत्रिम प्रज्ञे (ए.आय.)पर्यंत झेपावेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. माणसाचा बौद्धिक विकास तांत्रिक प्रगती घडवतो आणि तांत्रिक विकासाचा चौखूर उधळलेला वारू माणसाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बौद्धिक प्रगती करत राहण्याला भाग पाडतो. याची सुरुवात अर्थातच शिक्षणापासून होते. जी माणसाला अधिकाधिक विद्यापीठीय आणि व्यावसायिक शिक्षणाकडे खेचत राहते. जिथे शिक्षणाच्या या सुविधा आणि नंतर त्या शिक्षणाला पूरक नोकर्‍या उपलब्ध होतात त्या भौगोलिक परिसरांकडे माणसं स्थलांतर करायला सुरुवात करतात.

गेल्या २५-३० वर्षांत समाजातल्या वंचित घटकांना मोफत शिक्षणाच्या सुविधा सरकारकडून उपलब्ध झाल्या. श्रीमंतांना अत्यंत खर्चीक वैद्यकीय शिक्षण पुरवणार्‍या विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्था उभारल्या गेल्या. समाजातील विविध स्तर मोठ्या प्रमाणात शिक्षित होण्यास सुरुवात झाली. शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलींनाही व्यवस्थेने हळूहळू सामावून घ्यायला सुरुवात केली. पालकांना आणि समाजाला ‘बाई’ने शिकण्याचं महत्त्व जसं उमगू लागलं, तसा त्यांच्या विचारात थोडा खुलेपणा येऊ लागला. आता तर स्त्रीशिक्षणाची दोरी मुलींनी स्वत:च्याच हातात घेतली आहे. मात्र ज्या देशाला विज्ञानाधिष्ठित, मूल्याधारित सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची गुरू- शिष्य शैक्षणिक परंपरा लाभली होती, त्या आपल्याच देशात दुर्दैवाने शिक्षणाचा गुणात्मक दर्जा मात्र सातत्याने घसरत गेला.

एके काळी आपल्या संस्कृतीत शिक्षणाकडे तप म्हणून बघितले जात असे. ब्रह्मचर्याश्रमामधील अध्ययनामध्ये आहार, विहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, जबाबदारीचे वर्तन अशा अनेक गोष्टींचाही सखोल विचार होत होता. माणूस घडवणं हा त्याचा व्यापक उद्देश होता. शिष्यांनी श्रवण, पठण, लेखन अनेक वर्षं सातत्याने करत राहणं याला गीतेत तपाचरण म्हटलं आहे. स्वत: गुरूही व्रतस्थपणे अध्यापनाकडे एक तप म्हणून बघत असल्याशिवाय हे तपाचरण खाली कसे झिरपणार? आज वयाच्या सत्तरी-ऐंशीमध्ये असलेल्या आणि त्यापूर्वीच्या कितीतरी पिढ्यांनी आपल्या घडण्यात शिक्षकांचा किती मोलाचा वाटा होता, याचे अनेक दाखले दिले आहेत. काही अंशी आजच्या चाळिशी-पन्नाशीतील पिढीनेही हे अनुभवले आहे. मात्र शिक्षणाकडे अनेकांनी व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केल्यानंतर अनेक शिक्षक आपला दर्जा आणि समाजातील मान गमावून बसले. परदेशांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, शैक्षणिक सल्लागार यांना आजही खूप मान आहे. कारण उद्याचा प्रगल्भ, विवेकी नागरिक आजच्या शिक्षणातून घडत असतो, याचे भान त्यांना आहे.

मुळात आपल्याकडे शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी असतं याचं भान कितपत उरलं आहे? अंगी गुण बाणवण्याऐवजी परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवून हव्या त्या शिक्षणक्रमामध्ये प्रवेश मिळवणं हाच बहुतांशी पालक आणि मुलांसाठी शिक्षणाचा उद्देश बनला आहे. यातून शाळा, महाविद्यालयीन शिक्षणाला समांतर व्यवस्था पुरवणारे शैक्षणिक कारखाने आपण उभे केले. गुरुदक्षिणेची जागा फी, देणगी, वशिले, टेबलाखालून दिलेला पैसा अशा गोष्टींनी घेतली. हे सारे अंतिमत: नोकरी, व्यवसायात पैसा, पद आणि समाजात पत मिळवण्यासाठीच आहे, असे आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आणि जगण्याचा काही वैचारिक, सांस्कृतिक दर्जा असलेल्या एका मोठ्या समाजवर्गालासुद्धा वाटायला लागलं. त्यामुळे निम्न आर्थिक स्तरातून आपल्या घर-दार जमिनीपासून दूर आलेल्यांना असं वाटणं साहजिकच होतं.

शिक्षणाचा उद्देशच असा बदलत गेला आणि जीवनाचं प्राधान्य भौतिक प्रगती करण्याकडे झुकत गेलं. चंगळवादी मानसिकता वाढू लागली आणि वृत्तीतला हा फरक लोकांच्या नात्यातही दिसू लागला. समाजाचा कौटुंबिक जीवनाकडून व्यक्तिगत जगण्याकडचा प्रवास सुरू झाला तोही इथेच. या पैसे मिळवण्याच्या चक्रात अडकलेल्या माणसाला स्वत:साठीही वेळ मिळेनासा झाला तिथे कुटुंबाला देण्याच्या वेळेविषयी बोलायलाच नको. आता तर जो वेळ मिळेल तो हातातील किंवा समोरील ‘स्क्रीन’च खातो. आजच्या उपभोगवादी जीवनशैलीच्या मुळाशी प्रामुख्याने गेल्या २५ वर्षात झालेल्या या बदलाला शिक्षणाकडे बघण्याची मानसिकता कारणीभूत आहे.

सामाजिक दृष्टीनं बघितलं तर १९७५ पासून पुढच्या पन्नास वर्षांचा काळ हा जगात स्त्री चळवळ रुजण्याचा, फोफावण्याचा होता. आत्ता ज्या स्त्रिया त्यांच्या सत्तरी-ऐंशीत आहेत, त्यांच्यामध्ये स्त्री मुक्तीचे विचार सहज रुजणं थोडं अवघड होतं. त्यामुळे त्या उंबरठ्यापर्यंतच पोहोचल्या. पण या चळवळीची झळ स्वत:ला लागू न देता, त्यात कोणताही सहभाग न देता, त्याची गोरी गोमटी फळं मात्र आत्ता विशी-तिशी,चाळिशीतील स्त्रियांची पिढी खाताना दिसते आहे. त्यांनी उंबरठा ओलांडला आहे. अर्थात ज्या वेगाने स्त्री बदलली तो वेग गाठणं आजही पुरुषाला जमलेलं नाही. त्याचे बरे-वाईट परिणाम कुटुंब व्यवस्थेवर पडणे स्वाभाविक होते.

पुरुषप्रधान व्यवस्थेला आजही या उच्चशिक्षित, आर्थिक आणि वैचारिक दृष्ट्या स्वावलंबी झालेल्या स्त्रियांच्या या मानसिक स्थित्यंतराला सामोरं जाणं अजूनही अवघड जातं आहे. परंतु इतरांवरचं अवलंबित्व जसजसं कमी होत जातं, तसतसं विरोधाला भीक घालणंही हळूहळू थांबत जातं. एका अर्थाने हा दाबून ठेवलेल्या पाण्याचं कारंजं उडण्याचाच प्रकार म्हणायचा. समाज व्यक्तिकेंद्री होत जाण्याचं हेही एक कारण आहे. एकीकडे समानतेच्या वाटेवर नात्यांचे प्रवाह दिसू लागले, तर दुसरीकडे मात्र विवाह आणि कुटुंबसंस्थेत नवे प्रश्न उभे राहत होते. त्यात या शतकातील पहिल्या केवळ पंचवीस वर्षांमध्येच, माणसाला भोवळ आणणारी जी तांत्रिक प्रगती झाली, तिने त्याच्या हजारो वर्षांच्या बर्‍याचशा संथ जगण्यात पार उलथापालथ केली. हातात आलेल्या ‘स्क्रीन’ नामक गोष्टीने समाजमाध्यमांना व्यक्तिगत जीवनाचा अविभाज्य भाग बनवलं. मोबाइलचा वापर आणि नातेसंबंध हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

एकीकडे माहितीचा महापूर आणि दुसरीकडे ती माहिती कशी हाताळायची, त्यातलं काय घ्यायचं, काय गाळायचं, या विवेकाचा, बौद्धिक प्रगल्भतेचा अभाव! आधीच अठरापगड जाती-जमातींच्या डोक्यावर रूढी परंपरांचे भार. त्यात स्वत:चा स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमता मारून टाकणारं ‘घोका -ओका’ पद्धतीचं शिक्षण. यातून आपण स्वतंत्र, प्रगत, प्रगल्भ विचारांच्या उन्नत व्यक्तिमत्त्वांऐवजी, बिनचेहर्‍याच्या माणसांचे ‘साचे’ तयार केले. त्यामुळे ‘विचार करूच नका; आमचं ऐका’ असं अत्यंत प्रभावी जाहिरातबाजीतून सांगणार्‍या बाजारपेठेनं आधी आमच्या अविचारी मनाचा आणि नंतर आमच्या खिशांचा ताबा घेतला. दुकानातून ओसंडून वाहणार्‍या मालाने गरज नसतानाही आमची घरं आणि कपाटं भरत ठेवण्याचं काम चोख केलं. शनिवार रविवारच्या सुट्टीत मॉल्समध्ये फिरणार्‍या पिढीतील अनेक जण आपल्या परिसराबद्दलची संवेदनशीलता, उत्तरदायित्व गमावून बसले. गावातील बौद्धिक उंची आणि भावनिक संवेदनशीलता वाढवणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना तरुणांची हजेरी कमी कमी होत गेली. सरस्वती अभावी लक्ष्मी हाताळता येत नाही हे आपलं पारंपरिक शहाणपण न कळलेली मध्यमवर्गातील एक मोठी लोकसंख्या या चंगळवादी, उथळ, अविचारी जीवनशैलीचा भाग बनली. एका मोठ्या मध्यमवर्गाची वैचारिक पडझड होऊ लागली. अभिरुची, जीवनमूल्य घसरू लागली. वेगळा, स्वतंत्र, विवेकी विचार करता येण्याची ताकद एकदा का गमावली, की अनुकरण तेवढं होत राहतं.

खेड्यातून शहराकडे स्थलांतरित झालेल्यांना गावातील शारीरिक कष्टांच्या कामांपेक्षा ही बक्कळ पैसे मिळवून देणारी बैठी कार्यपद्धती न आवडती तरच नवल. त्यांनी शहरातील सगळी छानछोकीची, दिखाऊ, खर्चीक राहणी सहज अवलंबली (कारण त्यात कष्ट काहीच नाही, फक्त खर्च करणं आहे). मात्र शहरात मिळणार्‍या बौद्धिक, भावनिक प्रगतीच्या/उन्नतीच्या संधी किती जणांनी घेतल्या? स्वविकासाकडे किती जणांनी लक्ष दिलं? अवांतर वाचन, सामान्यज्ञान, एवढंच काय कुठल्याही भाषेतील चार वाक्यंही धड लिहिता न येणारा एक मोठा तरुण वर्ग नित्य भेटत राहतो. त्याची त्यांना कोणती खंतही दिसत नाही.

दुसरीकडे, अशी मूल्य ज्यांनी जपली, ज्यांच्या जगण्यातच संवेदनशीलता, सृजनशीलता, माणूसपण, विवेक, सामाजिक बांधीलकीची जाण आदी होतं, त्यांनी या शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक बदलांचा आपल्या आणि आपल्याबरोबरच समाजाच्या, देशाच्या उन्नतीमध्ये मोलाचा सहभाग दिला. यामध्ये स्त्रियांची प्रगतीही किती डोळ्यांत भरणारी आहे हे नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने वर्तमानपत्र, रेडिओ अशा अनेक सर्वसमावेशक प्रसारमाध्यमातून ठळकपणे पुढे आलं. आत्महत्या केलेल्या नवर्‍यांच्या मागे खचून न जाता अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने, शेती आणि संसार उत्तम सांभाळणार्‍या, मुलांना शिक्षण मिळण्यासाठी धडपडणार्‍या, अशिक्षित/ अल्पशिक्षित ग्रामीण स्त्रियांपासून, देशाच्या विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये व्रतस्थपणे संशोधन आणि इतर अनेक प्रकारची उच्च क्षमतेची कामं करत आपला अमीट छाप उमटवलेल्या उच्चशिक्षित शहरी स्त्रियांपर्यंत अनेकांचं काम पुढे आलं.

हे सगळं समोर दिसत असताना मात्र एक कळीचा प्रश्न समोर येतो. आर्थिक स्वातंत्र्य आलं, की नात्यांची गरज उरत नाही, अशी स्वकेंद्रित वृत्ती तयार होताना दिसते आहे का? जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि त्यातून उदयाला आलेला आजच्या सेवा उद्योगाचा एक अविभाज्य भाग असलेला माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील व्यवसायाने माणसाच्या बुद्धिमत्तेचं, वैचारिकतेचं, स्ववैशिष्ट्यांचं, फार मोठ्या वर्गाचं सपाटीकरण केलं. माहिती तंत्रज्ञानाचं उदाहरण घेतलं, कारण ग्रामीण- निमशहरी-शहरी या स्थलांतरात तसेच इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत सरसकट सगळ्यांना जास्त पगाराच्या नोकर्‍या देण्यात या उद्योगाचा मोठा सहभाग आहे. बुद्धिमान, बहुपेडी/बहुआयामी माणसांपेक्षा, पैसा, घर, गाडी (भले कर्जावर घेतलेलं असेल) ही ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठा मिरवणार्‍या माणसांची समाजात पत वाढली. याचं प्रतिबिंब थेट नात्यांत पडताना दिसू लागलं. नातेसंबंधांचा पोत तर खूपच बदलला.
या सगळ्याचे सर्वात मोठे आणि दूरगामी पडसाद विवाह आणि कुटुंबसंस्थेत उमटणं साहजिकच होतं. त्याविषयी पुढच्या भागात.
vankulk57@yahoo.co.in