-संकेत पै

नात्याची मशागत नेहमीच गरजेची असते, मात्र ते न करता आपण आपल्या जवळच्यांना खूप गृहीत धरतो. त्यामुळे नातं कोमेजून जाण्याचीच शक्यता जास्त असते. त्याच वेळी, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्या माणसांबद्दल विष पेरणारी माणसं नाहीत ना, याचंही भान ठेवायला हवं. नात्यांच्या मांदियाळीत काय जपायचं, काय सोडायचं, या नीरक्षीरविवेकाची ही कसोटी आहे.

जगताना सजगतेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण दुसऱ्याला देऊ शकतो अशी सगळ्यात उत्तम भेट म्हणजे त्यांच्यासाठीची आपली उपस्थिती किंवा उपलब्धता! त्यातूनच आपण आपली नाती जपू आणि वाढवू शकतो, ज्यातून पुढे आपल्यालाच समाधान मिळेल.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
social anxiety, fomo, fear of missing out, joy of missing out, social media, real life, others life, always extra want in life, mental health, stay in present
‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
chaturang, friendship, story of school friendship
सांदीत सापडलेले : मैत्री
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

आपल्या विकासात आणि यशात इतरांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो, हे मागच्या लेखात मी अधोरेखित केलं होतं. आज याच विषयाबद्दल आणखी थोडं विस्तारानं सांगावंसं वाटतंय. विशेषत: आपल्या वेगवान जीवनात असलेल्या नात्यांच्या गुंतागुंतीबद्दल. चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. व्यावसायिक जीवनात अनेक जबाबदाऱ्या असतात. ही तारेवरची कसरत करताना अर्थगर्भ नातेसंबंध जोपासणं राहूनच जातं. प्रत्येक नात्याला काळजीची फुंकर आवश्यक असते. अधूनमधून व्यक्तीला त्या नात्याच्या मजबुतीची खात्रीही हवी असते. जेव्हा या बाबतीत आपले प्रयत्न मागे पडतात, तेव्हा सुदृढ नात्यांचा प्रवास उतरणीला लागतो.

हेही वाचा…सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

सतीश आणि मनीषाची प्रेमकहाणी एकमेकांची स्वप्नं पूर्ण करत आणि एकमेकांवर निरतिशय प्रेम करण्याचं वचन देत लग्नात रूपांतरित झाली होती. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात ते दोघं एकमेकांचा अविभाज्य भाग होते. एकत्र असताना मनानंही एकमेकांच्या जवळ असायचे आणि अत्यंत आनंदात असायचे. पण कालांतरानं अर्थातच व्यावसायिक जीवनाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. त्या त्यांच्या नात्यापेक्षाही वरचढ होऊ लागल्या आणि त्यांना एकमेकांपासून दूर करू लागल्या.

कायदा क्षेत्रातलं काम, त्याची आवड आणि काही तरी भव्यदिव्य करून दाखवायची मनीषाची जिद्द. त्यामुळे ती रात्रंदिवस झपाटून काम करत होती. मीटिंग्ज संपत नसत, खटल्यांच्या फाइल्सच्या ढिगाऱ्यात तिचे तासंतास जायचे. तिनं जिद्दीला पेटून एक ध्येय समोर ठेवलं होतं. ऑफिसमधले तास वाढले. एकदा कामात गढून गेली, की रात्र झालीय, हेही तिला समजत नसे. व्यवसायात ती अशी व्यग्र होऊन गेली आणि दुसरीकडे सतीशबरोबरच्या तिच्या पूर्वी घट्ट असलेल्या नात्याची वीण मात्र सैल व्हायला लागली. पुढचा खटला, पुढची तारीख, यापुढे तिला काही सुचत नसे.

सुरुवातीच्या काही दिवसांत मनीषा घरी नसताना सतीशला घर रिकामं रिकामं वाटायचं. तो व्यवसायानं चित्रकार. मग तोही आपल्या कलेत स्वत:ला पूर्ण झोकून देऊ लागला, घराच्या एका कोपऱ्यात ब्रशच्या फटकाऱ्यांमध्ये बुडून घेऊ लागला. घरातच त्याने स्टुडिओ केला होता. मनीषाच्या नसण्यानं सतीशला जी पोकळी जाणवत होती, त्यातून सुटण्यासाठी तो सतत स्टुडिओमध्येच स्वत:ला बंद करून घेऊ लागला.

हेही वाचा…महिला व्होट बँकेचा शोध!

मनीषा आणि सतीशचं नातं असं अस्थिरतेत हेलकावे खात होतं. आता या गोष्टीत आणखी एका पात्राचा समावेश झाला. मनीषाची मैत्रीण आणि सहकारी वकील नमिता. नमिता वरवर खेळकर स्वभावाची आणि भरपूर गप्पा मारणारी. पण तिच्या मनीषाशी होणाऱ्या गप्पा मात्र खेळकर नसत. मनीषानं सतीशबरोबरच्या तणावांबद्दल काहीही सांगितलं, की नमिता लगेच त्यावर आपलं मत नोंदवत असे. आणि तिच्या मते, मनीषाला सतीशपेक्षा चांगलं कुणी तरी मिळू शकलं असतं. नमिताला असं वाटत असे, की मनीषा करिअरमध्ये आणखी पुढे जाऊ पाहात असताना सतीश मात्र तिला मागे खेचतोय. मनीषाच्या मनातही हा विचार येऊन गेला होताच. तिच्या संशयाला नमिताकडून खतपाणी मिळू लागलं. संशय गडद झाला. नमिताच्या बोलण्यात मनीषा पुरती अडकत गेली. परिणामी, सतीशबरोबरच्या तिच्या नात्याला जे आधीच तडे गेले होते, त्यातली दरी रुंदावली.

सतीश आणि मनीषामधलं अंतर वाढलं. त्यांच्यात संवाद घडणं दुरापास्त होऊ लागलं. अर्थात त्या जोडीला त्यांनी आपापल्या व्यावसायिक जीवनाला नात्यापेक्षा जास्त प्राधान्य देणं हेही कारण होतंच. हळूहळू आणि नकळत झालेल्या या प्रवासात हे जोडपं एकमेकांना दुरावलं. नातं परत फुलण्याऐवजी वठायलाच लागलं. त्या दोघांनीही हे गृहीत धरलं होतं, की आपल्या जोडीदारानंच आपल्या महत्त्वाकांक्षा समजून घ्यायला हव्यात आणि आपल्याला पाठिंबा द्यायला हवा.

इथून पुढे त्यांच्या गोष्टीचा शेवट कसा करायचा हे मी तुमच्यावर सोडतो. मनीषा आणि सतीशच्या नात्यातली दरी इतकी वाढेल का, की ती कधी भरूनच येणार नाही? की दोघं समोरासमोर बसून काही सुवर्णमध्य काढू शकतील?…

हेही वाचा…निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!

आपल्याही आयुष्यात अशी काही नाती दिसतील, ज्या नात्यांकडे आपण लक्ष देणं बंद केलंय. किंवा पूर्वीसारखं आपण ते नातं जपायचा प्रयत्न करत नाही. आणि असंही एखादं नातं असू शकेल, ज्यानं आपल्याला मनस्तापच होतो. त्या नात्यात हुकूमशाही वृत्ती, समोरच्याचा मानसिक छळ करण्याची वृत्ती, लबाडी आहे. पहिल्या प्रकारच्या नात्याला पुन्हा जिवंत करायची गरज आहे, तर दुसऱ्या प्रकारच्या नात्याला पूर्णविराम द्यायला हवा.

आपल्या पाठीशी उभी राहणारी काही नाती किंवा संबंध असतात. मग ते वैयक्तिक असोत, अथवा व्यावसायिक. त्यामुळे प्रोत्साहन मिळतं, नवीन संधी दिसतात. आज संपर्कयंत्रणा गरजेपेक्षा अधिक प्रभावी झाल्यात. रोजच्या जगण्यात विविध प्रकारचे दबाव, ताणतणाव वाढलेत. अशा स्थितीत आपण आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नात्यांना गृहीत धरायला लागतो. नातेसंबंध फुलवण्यासाठी म्हणून आपला वेळ आणि ऊर्जा देणं हे आता दुर्मीळ आहे. परंतु त्याचीच खरी गरज असते. आणि हे कसं करायला हवं, तर लाभाची समीकरणं न लावता या नात्यांना आपला वेळ व सहवास देता आला पाहिजे.

नातेसंबंधांना व्यवहाराच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांचं काळजीपूर्वक संगोपन करायला मलाही शिकावं लागलं. लहानपणी मी, ज्याला ‘एकाकी बेट’ म्हणतात, तसा होतो. विशिष्ट जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातूनच मी जवळच्या व्यक्तींकडे पाहायचो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची कशासाठी तरी गरज असेल, तेव्हाच मी त्या व्यक्तीशी बोलायचो. इतर वेळी ‘गैरहजर’च असायचो.

हेही वाचा…‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!

ही चूक कालांतरानं माझ्या लक्षात आली. नात्यांमुळे व्यक्तीचा विकास होतो आणि अशी नाती केवळ व्यावहारिक देवघेवीची नसतात. आपल्या सुखाचा, यशाचा तो पाया असतो. जेव्हा तुम्हाला सावलीची गरज असते, त्या वेळी बी पेरून कसं चालेल? तुम्हाला त्या नात्याची काळजी आहे, त्याकडे तुमचं लक्ष आहे, तुम्हाला नेहमी त्याबद्दल आपलेपणा, माया वाटतेय, यात सातत्य लागतं. हे सातत्य कसं मिळेल, तर मनापासून त्या नात्यासाठी आपण उपलब्ध राहिलो तरच! त्यांच्याबरोबर आपण प्रत्यक्ष असलो तर.

आजही हे करण्याची, शिकण्याची माझी प्रक्रिया सुरू आहे. त्यात हळूहळू प्रगती होते. नाती निभावणं सोपं नसतं, पण तरीही त्यात आपल्या वेळेची, ऊर्जेची गुंतवणूक करणं आवश्यक असतं. पाठीशी भक्कम उभी राहणारी नाती आपल्याला स्वत:मध्ये डोकावून बघायलाही लावतात. त्यामुळे आपला विकास होतो. आपण सर्वार्थानं नात्यांसाठी उपलब्ध राहू लागलो, की अनेक पूर्वग्रह किंवा ‘अमुक गोष्ट अशीच आहे,’ अशा अनेक धारणा मागे पडू लागतात. मोकळा आणि पारदर्शी संवाद घडू लागतो.

परस्परसहवासामुळे ताण आणि चिंता कमी व्हायला मदत होते. हा सहवास अनुभवताना आपण फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि दैनंदिन जीवनात अडथळे आणणाऱ्या, चिंता निर्माण करणाऱ्या गोष्टींना बाजूला ठेवू शकतो. यामुळे आपोआपच ‘मी किती केलं’ यापेक्षा ‘कसं केलं’ याला प्राधान्य दिलं जातं. समोरच्याचा आदर करायला, प्रसंगी त्यांचं कौतुक करायला आपण शिकतो. हे सर्व आव्हानात्मक असू शकतं, पण यशस्वी नात्यांसाठी ते अत्यंत गरजेचंदेखील आहे.

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?

आधी नमूद केल्यानुसार जसं आधार देणाऱ्या नात्यांचं संगोपन करायला हवं, तसंच त्रासदायक नात्यांमधून स्वत:ची सुटका करून घेणंही आपल्या विकासासाठी महत्त्वाचं असतं. या त्रासदायक व्यक्ती आपली ऊर्जा शोषून घेतात, आपल्या भावनांशी खेळतात, आपल्या प्रगतीला बाधा आणतात. त्यांच्या सहवासात असताना आपल्याला नेहमी आपण दुबळे असल्याची भावना येते. त्यामुळे आपल्या अत्यंत आवडत्या गोष्टींवरसुद्धा लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. मनीषा आणि सतीशच्या गोष्टीतल्या नमितासारख्या व्यक्ती आपल्याही आजूबाजूला असतात. सतत काही ना काही कुरापती काढण्याचा प्रकार त्या करत असतात. अशा व्यक्तींमुळे आपल्याला त्रास होतो. आयुष्य अस्थिर होतं. अशा विषारी वृत्तीच्या व्यक्ती कधीही बदलणार नाहीयेत, त्या दूर निघूनही जाणार नाहीयेत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे. एक संशोधन असं सांगतं, की आपण ज्यांच्याबरोबर वेळ घालवतो त्यांचे विचार, त्यांची वागण्याची पद्धत आपण आत्मसात करत असतो. त्यामुळे आपण जर अशा विषारी वृत्तीच्या व्यक्तींच्या सहवासात असू, तर आपण त्यांच्यासारखं होण्याची शक्यता मोठी आहे.

आपल्या जीवनातले असे विषारी नातेसंबंध कोणते आहेत, हे ओळखून त्यांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवल्यानं आपल्या जीवनावरचं नियंत्रण परत आपल्या हातात येतं. सकारात्मकता पुन्हा वाढीस लागू शकते.

हेही वाचा…इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

थोडक्यात, नात्यांसाठीची आपली उपलब्धता वाढवणं आणि त्रासदायक नात्यांना पूर्णविराम देणं हे आपल्या उन्नतीसाठी अत्यावश्यक आहे. आपल्यासाठी हितावह असलेल्या संबंधांना प्राधान्य देणं, सकारात्मक संवादांमध्ये वेळ आणि ऊर्जेची गुंतवणूक करणं, यात आपण आपल्या मनाचं, आत्म्याचं पोषण करत असतो. त्यामुळेच आपली प्रगती होते. विषारी व्यक्तींपासून स्वत:ला दूर ठेवून आपण समाधानकारक जीवनाच्या दिशेनं पुन्हा वाटचाल करू लागतो.

sanket@sanketpai.com