जगत असताना हेच आयुष्य मला हवं आहे का? ते मला सहजपणे मिळत आहे का? नसेल तर मी काय करायला हवं? हे प्रश्न प्रत्येकालाच वयाच्या विविध टप्प्यांवर पडायला हवेत. समाधानाचं, आनंदाचं आयुष्य हवं असेल तर त्यासाठी संपत्ती तर कमवायलाच हवी, पण कोणती?

संपूर्ण शहरानं सोनेरी सूर्यकिरणांची उबदार चादर लपेटली होती. एकामागोमाग एक ‘मीटिंग्ज’ आणि ‘डेडलाइन्स’नी व्यापलेला आठवडा संपवून नेहा आपल्या आलिशान घरात निवांत विश्रांती घेत बसली होती. तिच्या करिअरमधल्या प्रगतीच्या सातत्याने उंचावणाऱ्या आलेखाबद्दल तिला स्वत:चा खूप अभिमान होता. एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवात करून आज तिथेच ती उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत होती. तिला मिळालेली प्रत्येक बढती तिच्या यशावर शिक्कामोर्तब करत होती. नुकत्याच मिळालेल्या बोनसच्या रकमेची बँकिंग अॅप उघडून तिनं खात्री केली आणि पुढच्या काही गोष्टी ठरवण्याचा विचार करत असतानाच, आपण हे काय आणि का करतो आहोत, अशी काहीशी विचित्र भावना तिच्या मनात निर्माण झाली.

It has been about 20 years of my friendship
माझी मैत्रीण : विसाव्याचे असू द्यावे एखादे ठिकाण…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
burden chaturang article
सांदीत सापडलेले…! ओझं
Fear leads to sorrow
‘भय’भूती : भीतीला लगडलेलं दु:ख
Patience and respect are important in husband-wife relationship
तुझ्या माझ्या संसाराला…
Loksatt chaturang Abroad mother tongue language Experience
मनातलं कागदावर: बालपणीचा काळ सुखाचा…
Loksatta chaturang Women group of Bhishi Experience Author
भिशी

वर्षानुवर्षं नेहानं एक साधं तत्त्व पाळलं होतं. अधिक कमवा, अधिक बचत करा. अधूनमधून स्वत:चे लाड करा आणि हेच चक्र चालू ठेवा. तिने मिळवलेलं प्रत्येक यश हा तिच्यासाठी पुरस्कारच होता, पण आज परिस्थिती वेगळी होती. अतिश्रमानं नेहा प्रचंड दमलेली होती. तिच्या बँकेच्या खात्यात पैसे तर भरपूर होते, पण कामासाठी उशिरापर्यंत जागवलेल्या रात्री आणि त्यामुळे आठवड्याच्या अखेर झालेली दमछाक, या सगळ्याचा मोबदला, यापलीकडे त्याचं काही कौतुकच तिला वाटेनासं झालं होतं… तिला प्रश्न पडला की, आत्तापर्यंत अधिकाधिक पैसे कमावण्यावरच आपलं लक्ष केंद्रित झालेलं आहे. ‘पण ते का?’ हा प्रश्न कैक वर्षांत तिनं स्वत:ला विचारला नव्हता. इतका पैसा कमावून तिला नेमकं काय मिळवायचं होतं? एक नवी गाडी? एक आलिशान घर? आपण जी शिडी चढतोय, ती चढून झाल्यावर आपल्याला नेमकं काय मिळणार आहे याचीही तिला खात्री नव्हती, कित्येक दिवस ती फक्त शिडी चढत राहिली होती…

हेही वाचा : आहे जगायचं तरीही…

ती विचारात पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं, की ज्या गोष्टींची तिला सर्वांत जास्त किंमत होती, त्या गोष्टी खरं तर फार साध्या होत्या. जवळच्या लोकांचा सहवास, सुरक्षितता आणि नवनव्या गोष्टी करून बघण्याचं स्वातंत्र्य! या अगदी साध्या गोष्टी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त कमवत राहण्याचा तिचा जो अट्टहास होता त्याची खरं तर काहीच गरज नव्हती. नेमकं किती मिळालं म्हणजे ते तिच्यासाठी ‘पुरेसं’ ठरेल? या प्रश्नाचं तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पैशांच्या बाबतीत याआधी तिनं या पद्धतीनं कधीच विचार केला नव्हता.

नेहाची गोष्ट चारचौघांपेक्षा वेगळी नाहीए. पैसा कमावण्याच्या ध्यासानं आपल्यापैकी कित्येक जण अथक धावत असतात, पण आपण इतकं का धावतोय हा प्रश्न त्यांना पडतच नाही. हे गृहीत धरणं फार सोपं असतं, की अधिक पैसा मिळवल्यानं अधिक समाधान मिळेल, पण जेव्हा ‘का धावतोय?’चं नेमकं उत्तर आपल्याला देता येत नाही, तेव्हा कितीही कमावत असलो तरी आपण हरतोय, ही भावना आपल्याला ग्रासून टाकतेच. पैशांमागे धावण्यापेक्षा आपली खरी गरज काय हे ओळखायला आणि आपला पैसा योग्य कारणासाठी आणि हेतूसाठी सार्थकी लावून सजगतेनं जगायला शिकता यायला हवं.

एक अत्यंत यशस्वी, परंतु कामाच्या ताणाने वैतागलेला एक अधिकारी होता. एकदा सुट्टी घेऊन तो एका निवांत गावी गेला. एके दुपारी त्याला एक कोळी आपली बोट किनाऱ्याला लावताना दिसला. त्याने सकाळी जे काही मासे पकडले होते. ते व्यवस्थित एका टोपलीत ठेवलेले होते. कुतूहलानं तो अधिकारी त्या कोळ्याजवळ गेला.

हेही वाचा : आला हिवाळा…

‘‘आज तुझी भरपूर कमाई झालेली दिसतेय.’’ कोळ्यानं पकडलेल्या माशांकडे पाहत तो उद्गारला! ‘‘इतके मासे पकडायला किती वेळ लागला तुला?’’ त्यानं विचारलं. ‘‘फक्त काही तास!’’ दुपारच्या उन्हात अंगाला आळोखेपिळोखे देत कोळी उत्तरला. ‘‘माझं आजचं काम संपलं. ’’ हे ऐकून तो अधिकारी चक्रावला. ‘‘मग उरलेल्या दिवसाचं तू काय करणार?’’ त्यानं विचारलं. कोळी हसून म्हणाला, ‘‘घरी जाईन, कुटुंबाबरोबर एकत्र जेवण करेन, एक डुलकी काढेन, माझ्या मुलांबरोबर खेळेन. संध्याकाळी गावात जाऊन मित्रांबरोबर संगीताचा आनंद घेईन. एवढं पुरेसं आहे.’’ अधिकाऱ्याच्या भुवया उंचावल्या. तो काहीसा गोंधळला. त्याने विचारलं, ‘‘पण जर तू अधिक वेळ मासेमारी केली असतीस तर तुला आणखी पैसे मिळाले असते. त्यातून तू आणखी मोठी बोट विकत घेऊ शकला असतास, हाताखाली चार माणसं ठेवू शकला असतास आणि आणखी जास्त मासे पकडू शकला असतास. त्यात बस्तान बसल्यावर तुला बोटींचा ताफा विकत घेता आला असता, माशांची निर्यात करता आली असती, खूप पैसा मिळवून तू श्रीमंत झाला असतास. ’’ कोळ्यानं हसत विचारलं, ‘‘आणि इतक्या पैशांचं मी काय केलं असतं?’’ अधिकारी म्हणाला, ‘‘श्रीमंत होऊन तुला व्यवसायातून निवृत्ती घेता आली असती, हातात आरामासाठी भरपूर मोकळा वेळ असला असता, कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवता आला असता आणि तुला जे आवडेल ते करता आलं असतं. ’’ मंद स्मित करत कोळ्यानं त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘पण… हेच सगळं तर मी आत्ताही करतो आहे ना!’’

‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच दाखवण्यात आलेल्या एका भागात ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ ही फेरी जिंकून कोलकाता विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. नीरज सक्सेना हे अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉटसीटवर येऊन बसले. त्यांनी आत्मविश्वासानं खेळायला सुरुवात केली. जागरूकतेनं आणि बुद्धिमत्तेचा वापर करत ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या बळावर ते ३ लाख २० हजार रुपये जिंकवून देणाऱ्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचले. ‘सुपर सवाल’ या नव्यानं आणण्यात आलेल्या पर्यायाचा त्यांनी वापर केल्यानं ही रक्कम दुप्पट म्हणजे ६ लाख ४० हजार रुपये इतकी झाली.

आश्चर्य म्हणजे डॉ. सक्सेना यांनी त्या क्षणी अत्यंत विनम्रतेनं अमिताभ बच्चन यांना सांगितलं की, या ‘हॉटसीट’पर्यंत पोहोचण्याची आतुरतेनं प्रतीक्षा करणाऱ्या इतर स्पर्धकांना संधी मिळावी म्हणून त्यांना तो खेळ तिथेच सोडायचा आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘सर, एक निवेदन है, मैं इस पायदान पर क्विट करना चाहूँगा। मैं चाहता हूँ बाकी जो कॉन्टेस्टन्ट हैं, उनको मौका मिले… यहाँ सब हमसे छोटे हैं…जो प्राप्त है वह पर्याप्त है।’’

कोळ्याच्या गोष्टीतून आणि डॉ. नीरज सक्सेनांच्या एका समाधानकारक टप्प्यावर थांबण्याच्या निर्णयातून ‘आपल्यासाठी किती म्हणजे ‘पुरेसं’ आहे?’ हे ठरवण्याचं महत्त्व अधोरेखित होतं!

हेही वाचा : सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान

कोळ्याच्या जीवनशैलीतून आपल्याला हा धडा मिळतो की, भारंभार पैसा मिळवण्यात खरं समाधान नसून आपल्याला शांती आणि आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या हे जाणून त्यानुसार वागण्यात खरं समाधान आहे. त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीनं यश म्हणजे जे आहे. त्याचा विस्तार वाढवत जाणं आणि नवनवी उद्दिष्टं साध्य करत जाणं. मात्र त्या कोळ्यानं त्याच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्वाचं काय होतं, ते अगदी स्पष्ट सांगितलं. त्याचप्रमाणे आपल्याला नेमकं काय हवंय, या बाबतीत स्पष्टता असल्यानं आपण हव्यासाच्या शर्यतीत वाहवत जाण्यापासून कसे वाचतो, याचं डॉ. सक्सेनांनी त्या खेळातून घेतलेली स्वेच्छानिवृत्ती हे अगदी चपखल उदाहरण आहे.

जेव्हा नेहा आपल्या संपत्तीचा विचार करत होती, तेव्हा तिला हाही प्रश्न सतावत होता की, आपल्याकडे असलेला पैसा आपण नेमका कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरतोय? त्यानंतर काही आठवड्यांनी तिची रमेश या तिच्या बालमित्राशी भेट झाली. तो नुकताच एका लहानशा गावात आपल्या कुटुंबासह राहायला आला होता. एका स्थानिक एन.जी.ओ.मध्ये काम करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची शहरातली ‘कॉर्पोरेट नोकरी’ कशी सोडली हे त्यानं नेहाला सांगितलं. खरं तर आत्ताची त्याची मिळकत ही त्याच्या आधीच्या पगाराच्या तुलनेत नगण्य होती, पण त्याला त्याच्या मुलांसोबत वेळ घालवता येत होता, रोज सकाळी बायकोसोबत निवांतपणे नाश्ता करता येत होता, शिवाय पहाटे नदीकिनारी त्याला व्यायामासाठीसुद्धा जाता येत होतं. त्याचं बोलणं ऐकल्यावर केवळ जमा केलेला पैसा म्हणजे खरी संपत्ती नव्हे, याची नेहाला पुन्हा एकदा जाणीव झाली.

त्याच आठवड्याअखेर नेहाची आणखी एका मैत्रिणीशी, डिझायनर मीराशी भेट झाली. मीराने नुकताच तिच्या आयुष्यातला अत्यंत कठीण असा निर्णय घेतला होता. एका फॅशन कंपनीत एकेकाळी ती वरिष्ठ पदावर होती. तिचं कपाट हे विविध नामवंत ब्रँडच्या वस्तूंनी कायम भरलेलं असायचं. त्यावरून तिची प्रतिष्ठा जोखली जायची. पण या देखाव्याच्या शर्यतीत धावून धावून ती थकून गेली. आपलं आयुष्य साध्या पद्धतीनं जगायचं तिनं ठरवलं. तिच्या अनेक डिझायनर वस्तू तिनं चक्क विकून टाकल्या आणि एका शांत, निवांत उपनगरात ती राहायला गेली. आपल्या तत्त्वांशी पूर्णपणे प्रामाणिक राहत तिनं स्वत:चा कापडाचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा : स्वभाव-विभाव : अवलंबित्वाचं जग!

आता नेहाला काही गोष्टी स्पष्टपणे दिसू लागल्या. तिच्या लक्षात आलं की, कमाई आणि खर्च या गोष्टींचा ताळमेळ जेव्हा आपल्या तत्त्वाशी जुळतो तेव्हा आपल्या अर्थपूर्ण जगण्याचं पैसा हे फक्त साधन असतं. सतत गोष्टी साठवत राहण्यापेक्षा ज्यातून आपला खरा आनंद मिळेल, असे अनुभव निर्माण करायचे असतात हे तिच्या लक्षात आलं. नेहाच्या जीवनकथेबरोबरच कोळी, डॉ. सक्सेना, रमेश आणि मीरा ही सगळी माणसं आयुष्याविषयी एक फार महत्त्वाची गोष्ट शिकवतात. ती म्हणजे, पैसा हे साध्य नसून साधन आहे. यातल्या प्रत्येकानं समाधानी राहण्यासाठी त्यांच्या काय गरजा आहेत हे अगदी स्पष्ट सांगितलं, पण ते मिळवण्यासाठी भरपूर पैसा मिळवण्याचा मात्र कोणाचाच अट्टहास नव्हता.

सजगतेनं जगताना आपला हेतू, आपला वेळ आणि आपलं स्वातंत्र्य यांना बळ देण्याचं साधन म्हणून पैसा आणि संपत्तीचं महत्त्व आपण ओळखायला हवं. नुसतंच मिळवत राहण्यापेक्षा त्यामागच्या हेतूवर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करू, तेव्हा असंख्य अर्थपूर्ण गोष्टींची आपल्या आयुष्यात रेलचेल असेल. केवळ पैशापेक्षा त्यामागच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून जगताना आर्थिक स्थिती आपोआपच मजबूत होईल. असा दृष्टिकोन ठेवल्यानं पैशामागची अथक धावाधाव थांबेल आणि आपल्यासाठी नेमकं किती असलं की ‘पुरेसं’ होईल हे आपल्याला ठरवता येईल. मग आपल्याजवळची खरी संपत्ती ही मोजण्यापलीकडची असेल.
sanket@sanketpai.com