शनिवार दि. २३ ऑक्टोबरच्या अंकातील ‘लढा अस्तित्वासाठी’ हा सिद्धी महाजन यांचा लेख वाचला. त्यात मूळच्या भारतीय वंशाच्या अंजली शर्मा या मुलीने ऑस्ट्रेलियातील पर्यावरण मंत्र्यां विरुध्द कोर्टात खटला दाखल करुन ती मर्यादित प्रमाणात का होईना, यशस्वी झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तिला कायदेशीर सल्ला देणाऱ्या ८६ वर्षांच्या नन ब्रिजिड आर्थर, हा खटला लढवणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून अनेक वकीलही पाठिंबा देत या मुलांच्या मागे उभे राहिले. याक्षणी मनात विचार येतो, की आपल्याकडे लहान मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बस, रिक्षा यांत क्षमतेपेक्षा जास्त संख्येने मुले कोंबलेली असतात, त्यांची वाहने वाहतूकीचे कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाहीत.  आपल्या देशातील मुलांनी असा काही प्रयत्न केला, तर त्यांना कोणते वकील साथ देतील? कोणती माध्यमे याची दखल घेतील?… -मनोहर तारे, पुणे

वाचनाचा आनंद मिळाला

दि.१६. ऑक्टोबरच्या  पुरवणीतील सर्वच लेख अत्यंत वाचनीय होते. जन्मजात अंधत्व असलेल्या किंवा अचानक दृष्टी गमवावी लागलेल्या व्यक्तींची जिद्द आणि त्यांचे कर्तृत्व पाहून अचंबित व्हायला झाले.

मेंदूसाठी ध्यानधारणेचे महत्व मंगला गोडबोले यांच्या लेखातून पटले. ‘जगणं बदलताना’ या सदरातील लेखात आताच्या पालकांची मुलांशी वागताना होणारी तारांबळ अचूकरित्या मांडली आहे. त्यामुळे मुलामुलीचे मित्र होण्याच्या धडपडीत आई-वडील म्हणून त्यांच्यावर काही प्रमाणात तरी धाक असणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट झाले. सफाई कामगारांच्या सन्मानासाठी धडपडणाऱ्या सुनील यादव यांची कहाणी मनास भिडणारी होती. यादव यांच्या लढाईस नक्कीच यश मिळो अशी सदिच्छा. ‘गद्धेपंचविशी’ सदरात अभिनेते अविनाश नारकर यांची जीवनकहाणी वाचून त्यांच्या प्रसिद्ध अभिनेता होण्यासाठी कारणीभूत असणारी परिस्थिती जाणता आली. त्यांच्या संवेदनशील मनाचीही ओळख झाली.  या पुरवणीतील लेखांनी वाचनाचा भरभरुन आनंद दिला.  -अरुणा गोलटकर, प्रभादेवी, मुंबई.