बालपणी काही कळत नसताना किंवा किशोरावस्थेत शरीराची नव्यानं जाणीव होत असताना एखादा चुकीचा स्पर्शही भावविश्व उद्ध्वस्त करू शकतो. या स्पर्शांचं मनात जे भय बसतं, ते अनेकजणींना कधीच बाहेर काढता येत नाही. आपल्याबरोबर कुणीही पुरुष काहीही करून जाऊ शकतो, या असुरक्षिततेचं, आवाज उठवणं शक्य होत नाहीये याचं, समाजातल्या स्त्रीच्या प्रतिमेच ओझं घेऊनच जगतात अनेक स्त्रिया. लग्नानंतरही… उतारवय आल्यावरही! आकाशाला हात पोहोचतात का, हे पाहायला उत्सुक असलेल्या स्त्रीमनाच्या पायात हा असा भयाचा दोरा सुरुवातीलाच बांधला जातो!

स्वातंत्र्याला २५ वर्षं झालेली. १५ ऑगस्टला मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे रोषणाई करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. ज्या काळात घरात ट्युबलाईट येणं हीदेखील सण साजरा करावा अशी गोष्ट होती, त्या काळात दिवे लावून सजवलेली मुंबई पाहणं म्हणजे पर्वणीच! तरीही गेट वे ऑफ इंडियाला जाऊन प्रकाशात न्हाऊन निघालेली मुंबई पाहण्याची मौज आपल्याला काही करता येणार नाही, हे मनात पक्कं असल्यानं तिथे जाण्याचा विचारही मनात नव्हता. पण अचानक काय झालं माहीत नाही. माझी आई ज्या शाळेत शिक्षिका होती, त्या शाळेतल्या शिक्षकांनी आपापल्या मुलांना घेऊन गेट वे ऑफ इंडियाला जाण्याचं ठरवलं आणि आम्ही आईबरोबर निघालो.

chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
loksatta chaturang girl friend creative rival
माझी मैत्रीण : ‘Y’ची मैत्रीण ‘X’!
Win and Live, Pursue Dreams,
जिंकावे नि जगावेही : पाठपुरावा स्वप्नांचा!
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
toxins, spices , news,
विषद्रव्यांचा हिमनग..
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल

हेही वाचा…हवा सन्मान, हवेत अधिकार!

मी आठवीत असेन त्या वेळी. मुंबईत जन्म घेऊनही प्रथमच आले होते गेट वे ऑफ इंडियाला! ‘व्ही.टी.’ (आताचं ‘सी.एस.एम.टी.’) स्टेशनला उतरून चालायला लागलो आणि लक्षात आलं, अलोट गर्दी निघाली होती एकाच दिशेनं. कधी आईचा, तर कधी बहिणीचा हात घट्ट धरून चालत होते मी. पण त्या गर्दीत भेलकांडल्यासारखं झालं. धक्काबुक्की होत होतीच, पण हळूहळू ती गर्दी अंगावर चढेल की काय याचं भय वाटायला लागलं. गर्दीचे हात अंगावरून फिरायला लागले आणि अस्वस्थ व्हायला लागलं. शरीर कसं आणि कोणकोणत्या बाजून सांभाळावं कळेना. वयात येण्याचा तो काळ. स्पर्शांचे अर्थ जाणवण्याचा काळ. सर्वांना आत घेणारा भारताचा तो दरवाजा हळूहळू दिसायला लागला. त्या इमारतीवरची आकर्षक रोषणाई मन वेडावून टाकत होती. इतकं सुंदर दृष्य पाहण्याचा तो अविस्मरणीय क्षण होता खरं तर आय़ुष्यातला. पण त्या क्षणाच्या साऱ्याच आठवणी एका विचित्र भयाशी जोडल्या गेल्या. डोळे ती रोषणाई शोषून घेत होते आणि दुसरीकडे स्पर्शांचे अनेक वळवळणारे सर्प सभोवताली सरपटायला लागले. ते इतके वेगानं अंगावर आदळत होते, की समोरची सारी आल्हाददायक दृश्यं मी विसरले. घरी जाऊ या, म्हणून आईच्या मागे लागले. त्या गर्दीत माझ्याबाबतीत जे होत होतं, ते तिथे असलेल्या माझ्या आई-बहिणींसकट सगळ्याच स्त्रियांच्या आणि मुलींच्या बाबतीत होत होतं, की केवळ मलाच ते जाणवत होतं याची कल्पना मला नव्हती. तसा विचार करण्याचं ते वयही नव्हतं. त्यामुळे आपलंच काहीतरी चुकतंय, अशी भावना माझ्या मनात निर्माण होत गेली आणि नेमकं काय कारण आहे हे आईला न सांगता मी घरी जाण्याचा हट्ट करायला लागले. त्यानंतर कशी परतले ते आज आठवत नाही. पण वयात येण्याच्या दिवसांत फुललेल्या शरीराला आक्रसून घ्यायला लावणारे आणि मनात कायमचं भय निर्माण करणारे ते स्पर्श शरीरमनात कायमचे रूतून राहिले.

अंधाराला आपण घाबरतोच. मलाही भिती वाटते अंधाराची. तरीही त्या अंधारात खोल डोकावून पाहात त्या भीतीला बेडरपणे भिडण्याचा प्रयत्न मी नेहमी केलाय. मला ना कधी भूताची भिती वाटली, ना देवाची. या आपणच निर्माण केलेल्या कल्पना आहेत, हे घरात होणाऱ्या चर्चांतून, विशेषत: बाबांकडून शिकत गेले होते. पण उमलत्या वयात वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी शरीराला वेढणाऱ्या अनोळखी आणि गलिच्छ स्पर्शांचं भय त्या वेळी जे मनाच्या एका कोपऱ्यात दबा धरून बसून राहिलं, ते कायमचं सोबत आलं. आज वयाची साठी ओलांडल्यानंतरही ते आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना रिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हरवर मी विनाकारण संशय घेत राहाते. (ते पुरुष अनेकदा खूप चांगले असतात.) बसमध्ये बसल्यावर आजही अनोळखी पुरुष शेजारी येऊन बसला, तरी सारं शरीर मी आक्रसून घेते. कधी कधी माझी पर्स अशा तऱ्हेनं ठेवते, की ती दोघांच्या मध्ये व्यवस्थित बसेल आणि त्यांचा स्पर्श टाळला जाईल. कधी कधी बाजूला बसलेल्या पुरुषाचा स्पर्श वाचवण्याच्या माझ्या या धडपडीचं हसूही येतं मला. स्त्रीचं चारित्र्य, तिचं पावित्र्य, या साऱ्या कल्पनांपासून आज खूप दूर आले आहे मी. हे सारं थोतांड आहे, हे साऱ्या जगाला पटवत असते. स्वत:ला तर केव्हाच पटवलंय. पण लहानपणीचे अनुभव मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त होतात आणि त्यांना बाहेर येण्यासाठी दारच सापडत नाही. माझ्या मनाचा तो दरवाजा कोणी बंद केलाय मला माहीत नाही. मी स्वत: तो उघडण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय. अगदी ठरवून. पण तरीही त्या दाराआड लपलेलं भय शरीरमनावर असं पसरून राहतंच.

हेही वाचा…‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे

मला वाटतं हे भय प्रत्येक स्त्रीच्या मनात असावं. पुढे कधी तरी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये गप्पा मारताना मी स्वातंत्र्याच्या या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या रोषणाईचा विषय काढला, तेव्हा माझ्या बहिणींपासून अनेक मैत्रीणींनी हाच अनुभव आल्याची कबुली दिली होती. आपलीच काही तरी चूक आहे असं वाटल्यानं आणि ही गोष्ट सांगण्याचं धाडस नसल्यानं एवढी वर्षं असे अनेक स्पर्श कसे मनात साठवून ठेवलेत, याविषयीच्या मूक कहाण्यांना त्या गप्पांत कंठ फुटला होता.

प्रत्येक स्त्री या अनुभवातून जाते. वेगवेगळ्या लोकांकडून हा अनुभव येत असतो. या लोकांत कधी आपले अगदी जवळचे नातेवाईक असतात, कधी मित्र असतात, तर कधी मुंबईतल्या लोकल्स, प्लॅटफॉर्म, सगळीकडचेच बस स्टँड, बस, रस्ते, शाळा, महाविद्यालय आणि तिथल्या गर्दीत असलेले वेगवेगळ्या स्तरांतले, वेगवेगळ्या वयांतले पुरुष असतात. कधी कधी त्यांच्यात सन्माननीय क्षेत्रातले काही अतिशय प्रतिथयश लोकही असतात. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात एकदा तरी या अनुभवातून जावं लागतं. मला आठवतं, एकदा बोरिवलीहून मी ठाण्याला एसटीनं जात होते. त्या एसटीत कंडक्टर बाई होती. मी बोरिवलीला तिसऱ्या सीटवर खिडकीपाशी बसले होते. कंडक्टरनं मला तिकिट विचारलं. मी ठाणे स्टेशन सांगितल्यावर तिकिट देत ती म्हणाली, ‘‘माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही त्या पुढच्या सीटवर बसता का? माझी कंडक्टरची सीट आहे ती. तुम्ही माझ्या बाजूच्या सीटवर बसा प्लीज.’’ सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नाही काहीच. पण तिनं इतकी कळकळीनं विनंती केली होती, की मी नाही म्हणून शकले नाही. मी बाजूला बसल्यावर ती ‘थँक्स’ म्हणाली. सगळी तिकिटं देऊन झाल्यावर ती माझ्या बाजूला येऊन बसली. मग म्हणाली, ‘‘तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, मी तुम्हाला बोलावलं म्हणून?’’
मी हसले, तर म्हणाली, ‘‘प्रत्येक फेरीत तुमच्यासारखी एखादी बाई शोधते मी आणि तिला माझ्या शेजारी बसायला सांगते! अर्थात नेहमीच शक्य होत नाही.’’

हेही वाचा…धूम्रपानातही स्त्रीपुरुष भेद!

मी तिला विचारलं, ‘‘तुम्ही ही नोकरी कशी काय स्वीकारलीत?’’
तर म्हणाली, ‘‘नवरा एसटीत होता, गेल्या वर्षी गेला. त्याच्या जागेवर मला घेतलं. मला क्लेरिकलला हवं होतं. ऑफिसमध्ये बसून काम करायला काही प्रॉब्लेम नसतो. पण हीच पोस्ट शिल्लक होती. फार त्रास होतो हो! गर्दी असेल, तर लोक मुद्दामहून अंगावर पडतात. पुढून शेवटच्या सीटपर्यंत तिकिट द्यायला जाण्याचा प्रवास तर फार वाईट असतो. गाडीला जेवढे धक्के बसतात आणि जेवढ्या वेळा वळणं येतात तेवढ्या वेळा पुरुष सहज अंगावर पडतात. बायका जशा स्वत:ला सांभाळतात, तसं त्यांना सांभाळता येत नाही का? पण मुद्दाम करतात. सीटवर बसतानाही पुरुष दणकन बसतात. त्या सीटवर बाई बसली आहे, तर सांभाळून बसावं, असं त्यांना कधीच वाटत नाही. माझ्या बाजूच्या सीटवर बसण्यासाठी उत्सुक असतात. बाकी नोकरी चांगली आहे. पण हे रोज भेटणारे वेगवेगळे पुरुष कधी अंगावर चढतील ही भीती मनात घेऊन, शरीर सांभाळत नोकरी करावी लागते.’’
मी तिच्याकडे पाहात राहिले खूप वेळ, तशी ती म्हणाली, ‘‘सगळेच असे नसतात बरं का… कधी चांगलाही अनुभव येतो!’’

‘सगळेच पुरुष असे नसतात,’ हे कबूल करून जे काही असतात त्यांचं भय बाळगत आयुष्यभर जगतात बायका. मग या भयातूनच मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’चा फतवा निघतो, वयात आल्याबरोबर लग्न करून देण्याची सक्त्ती होते. मुलीचं चारित्र्यहनन होण्याचं भय तर या समाजानं रूजवूनच ठेवलंय मनात. मग आकाशाला शिवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या मुलींच्या पायात दोरा बांधला जातो या भयाचा. आणि त्या भयावर तरंगत जगत राहतात मुली.

हेही वाचा…सांधा बदलताना : सिसिफस

गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी थापेच्या आवाजानं भयभीत होतात मुली आणि अशा भयभीत झालेल्या मुलींना वाटत राहतं, कोणी सहज छिन्नविछिन्न करेल असं गर्भाशय असूच नये आपल्याला आणि असलं, तरी आपल्या गर्भाशयातून जन्माला आलेल्या मुलाला लिंग असू नये फाळासारखं रूतणारं आत, असावी फक्त निर्मिणारी योनीच!
मी माझ्या एका कवितेत म्हटलंय,
‘गर्भाशय उखडून टाकणाऱ्या हातांचं भय
वाढत गेलं मुलींच्या मनात
तर मुलीच संपवून टाकतील
निर्मितीच्या साऱ्या शक्यता’
अर्थात असं होत नाही. क्वचित एखाद्दुसरी मुलगी सोडली, तर जवळजवळ सगळ्या मुली शरण जातात व्यवस्थेला. शतकानुशतकं जन्म देताहेत त्या आपल्या लिंगालाच सत्तेची काठी समजणाऱ्या मुलांना.

आयुष्यात कधी ना कधी आलेले वाईट अनुभव मनाच्या खोल विहिरीत तळाशी सोडून स्त्रिया विसरूनही जातात आणि काहीच बोलत नाहीत त्याविषयी. आणि आई झाल्यावरही नाही सांगत आपल्या लिंगाधारी मुलांना मुलींच्या मनात रूजलेल्या त्या भयाविषयी. नाही पटवत मुलांच्यात लपलेल्या पुरुषांना, की ‘तुम्ही तिला हाताळण्याची गोष्ट समजलात, तर ती कायमची मिटून जाईल. तुम्हालाच तिला सांगायला हवं पुरुषात लपलेल्या प्रेमाविषयी. अलवार स्पर्शांच्या झऱ्याविषयी. पुरुषांच्यातही असलेल्या मायेविषयी…’ पण आपल्या वयात आलेल्या मुलामुलींशी बोलणाऱ्या आया क्वचितच सापडतात.

हेही वाचा…एका मनात होती: शोकाकुल एकटेपणा

खरं तर अनेक मुली वयात आल्यावर स्वप्न पाहतात आपल्या ओंजळीतला अंधार दूर करून ती ओंजळ प्रकाशानं भरणाऱ्या पुरुषाची. लग्न करून त्याच्या आयुष्यात येताना सहज विसरून जातात आपलं जुनं घर. काहींना मिळतो मनासारखा, समजून घेत जपणारा पुरुष. पण अनेकदा मरण बरं असं वाटायला लावणाऱ्या यातना देणारा पुरुषही भेटतो. आणि मग त्या म्हणतात,
‘मी मृत्यूला भीत नाही
पण हे सप्तरंगी क्षितिज
एक एक रंग उतरवत जाते
दिवस उतरताना तेव्हा
माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या
पांढऱ्याफटक पडत जातात
अंधाराच्या चाहुलीनं
आपले भावविश्व कोसळत असताना
आपल्या मागे हसत असते खदखदून
एक कवटी;
धूर्त डोळे
अन् कपाळावर शिक्का पौरूषाचा
तिला हात नसले तरी ती चेपते आपला चढणारा आवाज
मृत्यू असाही असतो
अंधारात लपलेला
कातरवेळी जेव्हा त्याची थाप पडते दारावर
तेव्हा
निघते अंत्ययात्रा
मनाची
किचनपासून बेडरूमपर्यंत’
(मृत्यू असाही असतो- वेणा- नीरजा)

हेही वाचा…स्त्री विश्व: ‘सफ्राजेट्स’चं योगदान

हे मरणासारखं अंगावर येणारं भय इतर साऱ्या भयांपेक्षाही जास्त मानगुटीवर बसलेलं असतं. ‘हे भय बायका घालवू शकतात. कराटे शिकून, सेल्फ डिफेन्सची शिकवणी घेऊन, पर्संमध्ये मिरचीची पावडर बाळगून,’ असे सल्लेही देत राहतात लोक अनाहूत! आणि हेच लोक बोलत राहतात तोकडे कपडे घालून पुरुषांच्या भावना उद्दीपित करणाऱ्या बायकांविषयी. तेच मारत राहतात उलट्या बोंबा कधी बायकांविषयी चुकीची वक्तव्यं करून. आज मनूस्मृतीतील श्लोकअभ्यासक्रमात घालावेत म्हणून आग्रही असलेल्या लोकांनी जर मनूस्मृती नीट वाचली, तर लक्षात येईल, की मनुस्मृतीतील तिसऱ्या, पाचव्या, नवव्या अध्यायात असे कितीतरी श्लोक आहेत, ज्यात बाईच पुरुषापेक्षा कशी जास्त कामांध आहे हे पुन:पुन्हा सांगितलं आहे. त्यातल्या काही श्लोकांत तर असं म्हटलंय, की ‘उत्तम रूप, तरुण वय, इत्यादिकांची स्त्रिया परीक्षा करत नाहीत. सुरूप असो, वा कुरूप असो, हा पुरुष आहे, एवढ्याच भावनेने या त्याचा उपभोग करतात.’ (अध्याय ९, श्लोक १४) ‘स्वाभाविकपणे मन चंचल असल्यामुळे पुरुषास पाहताच संभोगेच्छा उत्पन्न होत असल्यामुळे आणि स्नेह कमी असल्यामुळे यत्नपूर्वक स्त्रियांचे संरक्षण झाले, तरी त्या पतीच्या उलट जातात.’ (अध्याय ९, श्लोक १५) अशा प्रकारे स्त्रियांनाच ‘चंचल’ असं विशेषण लावून तिच्यावर बंधन घालणाऱ्या या समाजाचंही भय स्त्रीच्या मनात कायम वसलेलं असतं. आपले निर्णय घेण्याचं बळ तिच्यात आजही नाही.

समाजानं लादलेल्या या अशा अनेक नियमांचं पालन करण्यातच भलं आहे, हे सांगितल्यानं, ते नियम मोडले तर आपल्या वाट्याला काय येईल, याची भीती घेऊन जगताहेत अनेक स्त्रिया. पुरुषांचं भय जसं तिला वाटतंय, तसंच या पुरुषसत्ताक समाजानं लादलेल्या तिच्या प्रतिमेचं भयही तिला वाटतंय.

हेही वाचा…इतिश्री : जोडीदाराची निवड…

या एकविसाव्या शतकातही जर हे भय मनात घेऊन जगणार असतील बायका, तर आपण कोणत्या प्रगतीच्या वाटेवर उभ्या आहोत हाही विचार करायला हवा. नाहीतर वाटेवर पसरून ठेवलेल्या काचांवरून चालत राहात कधी तरी वर्तमानपत्रातली एखादी बातमी होत राहायचं किंवा या काळोखात लपून राहिलेल्या, पौरूषाचा शिक्का कपाळावर लावलेल्या कवटीच्या आधीन होत जगायचं, एवढंच हातात उरतं!

nrajan20 @gmail.com