डॉ. स्वाती जयदेवकर

दिवसभर शांतपणे कळ्या जपणारी माझी छोटीशी तगर, रात्रीच्या निवांत कुशीत अलगद उमलते. शुभ्र, नाजूक फुलांनी ती जणू चांदण्यांशी मैत्री करते. तिचा मंद सुगंध आणि कोमल सौंदर्य मनाला विलक्षण शांततेचा स्पर्श करून जाते. प्रत्येक रात्री मन उद्याच्या पहाटेची आतुरतेने वाट पाहत असते. कधी या टपोऱ्या कळ्या शुभ्र फुलांत उमलतील आणि कधी ती प्रेमाने देवाच्या चरणी अर्पण करीन, याची ओढ मनात असते.

स्वत:च्या बागेतील फुले देवाला अर्पण करून पूजा करण्याची आवड मला माझ्या वडिलांकडून वारशाने मिळाली आहे. त्यांनी दिलेले भक्तीचे संस्कार आजही माझ्या प्रत्येक पूजेत, प्रत्येक प्रार्थनेत आणि प्रत्येक फुलात जपलेले आहेत. म्हणूनच तगरीच्या त्या शुभ्र फुलांनी सजलेली प्रत्येक सकाळ माझ्यासाठी केवळ दिवसाची सुरुवात नसते; ती भक्तिभाव, समाधान आणि अंतर्मनाला लाभणार्‍या प्रसन्नतेचा एक पवित्र सोहळाच असतो.

माझ्याही स्वयंपाकघराच्या बाल्कनीत दोन तगरीची रोपे आहेत. एक मोठे, पूर्ण वाढलेले, शुभ्र फुलांनी बहरलेले; आणि त्याच्या शेजारी एक छोटेसे, नुकतेच रुजलेले कोवळे रोप. रोज सकाळी त्यांच्याकडे पाहताना मला असे वाटायचे की, ही रोपे जणू जिवलग मैत्रिणीच आहेत. मोठी तगर आपल्या शांत अस्तित्वाने छोट्या रोपाला आधार देत होती आणि छोटी तगर तिच्या सहवासात आनंदाने वाढत होती. आमच्या स्वयंपाकघराच्या बाल्कनीतली ती मोठी तगर तर घरातील एक सदस्यच बनली होती. रोज पहाटे तिची शुभ्र, टपोर्‍या फुलांनी भरलेली फांदी माझे स्वागत करायची. देवाला वाहण्यासाठी मी तिची फुले प्रेमाने गोळा करायचे.

त्या शुभ्र फुलांनी दिवसाची सुरुवात अधिकच प्रसन्न व्हायची. कधी कधी तिच्या काही फांद्या बाल्कनीच्या पलीकडे येऊन स्वयंपाकघरामध्ये डोकावत आहेत, असे वाटायचे. जणू तीही घरातील प्रत्येक घडामोडींमध्ये सहभागी होत होती. तिचे ते कोमल अस्तित्व घराला वेगळीच ऊब देत होते. तिच्या शेजारी वाढणारी छोटी तगरही तिच्याकडे पाहत मोठी होत होती. त्या दोघींचा सहवास सहजसुंदर होता. निसर्गातील ही नाती किती खोल असतात, हे मला ‘त्या’ दिवसानंतर जाणवले.

एके दिवशी मी त्या छोट्या तगरीचे रोप दुसर्‍या कुंडीत लावून वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवले. मला वाटले, आता तिला अधिक जागा मिळेल आणि ती अधिक लवकर वाढेल. पण निसर्गाचे गणित माणसाच्या विचारांपेक्षा वेगळे असते. काही दिवसांतच ते रोप कोमेजू लागले. पाने निस्तेज झाली, उत्साह हरवला आणि तिची जणू जगण्याची इच्छाच हरवून गेली. तेव्हा माझ्या मनात एक हळवा विचार आला. कदाचित त्या छोट्या तगरीला तिच्या मोठ्या मैत्रिणीचा सहवास प्रिय असावा. तिच्या सावलीत, तिच्या सान्निध्यात आणि तिच्या नि:शब्द आधारात तिने आपले छोटेसे विश्व उभे केले असावे. अचानक तो आधार दूर गेल्यावर ती रुसली असावी.

वैज्ञानिकदृष्ट्या हा विचार खरा असेलच असे नाही; पण मनाला मात्र तो खूप जवळचा वाटतो. कारण माणसांच्याही आयुष्यात असेच घडते. काही व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांच्या उपस्थितीनेच आपले जग सुंदर वाटते. आणि जेव्हा त्या दूर जातात, तेव्हा मनही त्या छोट्या तगरीसारखे थोडेसे कोमेजते. म्हणून मी पुन्हा ते छोटे रोप मोठ्या तगरीजवळ आणून ठेवले आणि घडलेला तो साक्षात्कारी क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बाल्कनीत गेले, पाहते तर काय! त्या छोट्याशा तगरीला जवळजवळ दहा शुभ्र, टपोर्‍या फुलांचा बहर आला होता. ती अगदी खुलून हसत होती. मोठ्या तगरीच्या सहवासात ती पुन्हा फुलली होती. किंबहुना अनुभवांच्या ऊन-पावसात ती डौलाने बहरली होती. ते पाहून माझे मन आनंदाने भरून आले. आनंद याचाच होता की, मी ती छोटी तगर केवळ वाचवली नव्हती; तर तिला पुन्हा बहरताना पाहता आले. त्या सकाळी देवाच्या चरणी तगरीची शुभ्र फुले अर्पण करताना मनात एकच भावना दाटून आली, निसर्ग आपल्याला रोज काही ना काही शिकवत असतो.

माणसांच्या नात्यांचेही असेच नसते का? कधी गैरसमज होतात, मतभेद होतात, अहंकार आडवा येतो आणि नाती कोमेजू लागतात. पण जर आपण थोडेसे नमलो, अहंकार बाजूला ठेवला, पुन्हा एकमेकांच्या जवळ गेलो, तर कदाचित ती नातीही अशाच छोट्या तगरीसारखी पुन्हा बहरू शकतील. आजच्या काँक्रीटच्या जंगलात माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. घरे मोठी होत आहेत; पण मनांमधले अंतर वाढत आहे. गर्दी वाढते आहे; पण सहवास कमी होत आहे. एकाकीपणा नकळत माणसाला आतून कोमेजवत आहे. निसर्ग मात्र शांतपणे शिकवत राहतो- जवळीक, जिव्हाळा आणि आपलेपणा यांतच जगण्याचे खरे सौंदर्य आहे. झाडांना जशी योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाश हवा असतो, तशीच नात्यांनाही प्रेम, संवाद आणि सहवासाची ऊब हवी असते.

त्या छोट्या तगरीने मला शिकवले की, जगण्याची मुळे केवळ जमिनीत नसतात; ती श्रद्धेत, विश्वासात, प्रेमात आणि जपलेल्या नात्यांतही खोलवर रुजलेली असतात. भक्ती, प्रेम, सहवास आणि आपलेपणा हीच जीवनाला खर्‍या अर्थाने सुगंधित करणारी फुले आहेत. देवाच्या चरणी अर्पण केलेल्या त्या शुभ्र फुलांप्रमाणेच नातीही निरपेक्ष, निर्मळ आणि सुगंधी असली की जीवन अधिक सुंदर बनते. म्हणूनच आज मनापासून वाटते, तगरीप्रमाणेच आपल्या नात्यांनाही पुन्हा पुन्हा बहर येत राहो. मतभेदांचे ढग दूर होवोत, आपलेपणाची फुले उमलोत आणि प्रत्येक नाते चिरंतन काळासाठी जपले जावो. कधी कधी निसर्ग शब्दांत बोलत नाही; पण एका उमललेल्या फुलातून तो आयुष्यभर पुरेल इतका जीवनाचा अर्थ सांगून जातो. मोठ्या तगरीच्या सहवासात पुन्हा बहरलेली ती छोटी तगर जणू मला सांगत होती, मुळे जमिनीत असतात; पण फुलण्यासाठी आपलेपणाची ऊबही तितकीच आवश्यक असते.

हे केवळ दोन रोपांचे नाते नव्हते; ते होते सहवासाचे, जिव्हाळ्याचे, पुनर्मीलनाचे आणि भक्तीचे एक सुंदर मुळांपलीकडचे नाते. त्या दिवसापासून प्रत्येक सकाळी देवाच्या चरणी तगरीची शुभ्र फुले अर्पण करताना मन कृतज्ञतेने भरून येते. त्या प्रत्येक फुलातून मला माझ्या वडिलांनी दिलेले भक्तीचे संस्कार, निसर्गाने शिकवलेले प्रेम आणि नात्यांचे मोल पुन्हा पुन्हा जाणवते. तेव्हा मनात एकच प्रार्थना उमटते- जीवन सुंदर व्हायचे असेल, तर नाती जपा, भक्ती जपा आणि मनातली प्रसन्नता जिवंत ठेवा.

swati5672.sj@gmail.com