आभाळमायाची संकल्पना चांगली

सर्वप्रथम नवीन वर्षांच्या ‘चतुरंग’ची सुरुवात ‘आभाळमाया’ सदरांतर्गत आनंद कर्वे यांच्या इरावतींबाईंवरील अतिशय सुंदर लेखाने केल्याबद्दल लोकसत्ताला शतश: धन्यवाद. या सदरामागील संकल्पनाच खूप छान आहे. समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची, त्यांच्या आचारविचारांची, जीवनविषयक दृष्टिकोनाची ओळख त्यांच्याच मुलांपेक्षा अन्य कोण इतक्या यथार्थपणे करून देऊ  शकेल? इरावतीबाईंवरील लेख वाचताना प्रकर्षांने जाणवलं की स्त्रीमुक्ती आणि स्त्रीपुरुष समानता याबद्दलच्या त्यांच्या कल्पना त्या काळातही सुस्पष्ट होत्या आणि त्या आचरण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास होता. या क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्यच मार्गदर्शक ठरावं.

– जान्हवी नवरे

इच्छामरण हवेच

प्रिय विद्याताई,

‘अवघे  पाऊणशे वयमान’ सदरातील तुमचा लेख वाचला. विचार आवडले, पटले. वृद्धत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही इतकं छान आणि अतिशय तर्कनिष्ठ भाष्य करता की ते लगेच पटतेच.   माझं वय ७० आहे.  साठ ते सत्तर ही १० वर्षे म्हणजे नोकरीतून निवृत्त  झाल्यानंतरची वर्षे चांगली गेली. त्यामानाने आता थकणं आहेच. सर्व छोटेमोठे विकार घेऊनच आपण जगत असतो. तुम्ही आम्हाला खूप ज्येष्ठ आहात. या वयातील समस्या, त्यावर होता होईतो मात कशी करायची, मनाशी कसं खरं बोलायचं, हे तुम्ही एक प्रकारे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला शिकवता, ते पटते.  काही वर्षांपूर्वी लिहिलेला तुमचा लेख यानिमित्ताने आठवला की प्रत्येकाला क्वालिटी लाइफ जगायला आवडते व ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जगण्यात मजा आहे; पण जेव्हा ते क्वालिटी लाइफ संपेल व आपली कसे तरी जगण्याची इच्छा नसेल, तेव्हा इच्छामरण द्यावे व त्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणारा कायदा असावा. त्याला सन्मानाने आयुष्य संपवता यावे, असे माझेही मत आहे. तुम्हाला पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा.

– उषा आठल्ये, विलेपार्ले

पत्र लिहिणाऱ्यांसाठी

वाचकहो, चतुरंग पुरवणीतील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद. ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना- पत्र मराठीतून असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. केवळ लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एक शब्दांची, वाक्याची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील.

हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.comअथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत.