नीता चंद्रकांत कुलकर्णी
नवीन घरात राहायला आल्यावर मिताला एक साधी सरळ नंदा घरकामाला मिळाली. नंदाची चौकशी केली तर तिला लिहिता-वाचता येत नाही, असं तिला कळलं. अशा किती तरी अडाणी बाया आपल्या इथं आहेत, हे वास्तव तिला खट्टू करून गेलं खरं; परंतु नंदाशी बोलता बोलता तिला एका वेगळ्याच गोष्टीचा साक्षात्कार झाला…
मिता तिथं अलीकडेच राहायला आली होती. तिचं अजून घर आवरणं चालू होतं. नंदा ही साधी, प्रेमळ बाई तिला कामाला मिळाली होती. त्या दिवशी नंदा काम करायला आली नि म्हणाली, ‘‘वहिनी, काही जादा काम असेल तर ते करू. आज मला एका कामावर सुट्टी आहे.’’‘‘अगं, बरं झालं. पुस्तकांचा खोका उघडायचा राहिला आहे. पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ.’’ नंदाने सगळी पुस्तकं काढली. बरेच दिवस बंद असल्यानं जमा झालेली धूळ ओल्या कपड्याने पुसायला घेतली. ‘‘वहिनी, पंखा सुरू करा. वाळली की मग आत ठेवू.’’ एकेक पुस्तक नंदा पुसत होती. ‘‘केवढी पुस्तकं हो वहिनी. एवढी कधी वाचता?’’
‘‘अगं अभ्यासाची पुस्तकं, कथा, कादंबर्या, प्रवासवर्णन, काही इंग्रजी पुस्तकं आहेत. परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत.’’ ती म्हणाली, पण तिच्या मनात आलं, या अडाणी बाईला आपण सांगतोय. तिला काय कळणार?नंदा म्हणाली, ‘‘बैजवार सगळी पुस्तकं नीट लावून ठेवते. तुम्ही तुमचं दुसरं काम असलं तर करा.’’‘‘अगं नको, तुलाच मदत करते,’’ आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली. ‘‘तुला वाचायला- लिहायला येतं का? ’’
‘‘नाही हो वहिनी. आम्ही गावाकडे राहत होतो. माझा बाप फार गरीब होता. दुसर्याच्या शेतात काम करायचा. आईसुद्धा रोजंदारीनं जायची… आम्ही चार बहिणी, एक भाऊ. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडायची. कुठली शाळा अन् काय हो.’’
‘‘म्हणजे तू काहीच शिकली नाहीस?’’
‘‘नाही हो. लहानपणापासून कामंच करायला लागले. शेतातलं तणं काढायला जायचं, गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा, लोकांचं अंगण झाडायला जायचं, दूध घालायला जायचं…’’
‘‘म्हणजे घरात कोणीच शिकलं नाही?’’
‘‘बापानं लहान भावाला… तो मुलगा म्हणून शाळेत घातलं. आमची लग्नं सोळा-सतरा वयातच लावून दिली. माझा नवरा इथं बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथं शहरात आले.’’ मिताला वाईट वाटलं… काय या बाईचं आयुष्य? हीच कशाला अशा अनेक बायका अडाणीच राहिल्या.
आई-वडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं. अर्थात यात या बिचार्या बायकांचा तरी काय दोष म्हणा.
‘‘तुला अजिबात लिहिता-वाचता येत नाही?’’
‘‘अगदी थोडं येतं, पण कुठंही गेलं तरी अंगठाच द्यावा लागतोय बघा. वाईट वाटतंय. पण बापाचाही नाइलाजच होता. तो तरी काय करणार? एकापाठोपाठ चार पोरी घरी होतो.’’
‘‘हो… तेही खरं आहे म्हणा.’’
‘‘शिक्षण नाही झालं, पण नवर्यानं इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा.’’
ती काय म्हणते आहे मिताच्या लक्षातच येईना. ‘‘कसलं कल्याण?’’ ‘‘अहो वहिनी, बघा इथल्या लोकांत मिसळले, कामं मिळाली, काम करतेय… चार पैसे हातात येतायत.’’
‘‘अगं, पण किती कष्ट.’’
‘‘अहो, कुठंही काम केलं तरी कष्ट करावेच लागणार ना? आम्हाला त्याची सवय असते. त्याचं काही वाटत नाही. दहा ते चार कामं करते. साडेचारला घरी जाते.’’
‘‘अगं पण थोडं तरी लिहिता यायला पाहिजे. मी शिकवीन तुला. साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो.’’
‘‘अहो, आता शिकून काय करू? घरी गेले की घरचं काम असतं.’’
‘‘तशी तू हुशार वाटतेस म्हणून तू थोडं तरी शिकावं असं मला वाटतं.’’
‘‘तसं नाही वहिनी. मलापण आवडलं असतं, पण संध्याकाळचं आणखी एक काम असतं बघा.’’
‘‘संध्याकाळी काय करतेस?’’
‘‘बाजूच्या इमारतीतल्या आगाशे आजींना बागेत नेते. त्या तिथल्या बाकावर मैत्रिणींशी गप्पा मारतात. मी बाजूच्या बाकावर बसते. नंतर त्यांना घरी आणून सोडते. तेवढे चार पैसे मिळतात. संसाराला उपयोग होतो.’’
‘‘हो का. बरं बरं. ’’
रोज नंदा येऊन काम करून जायची. आजही कामं करता करता मिताशी गप्पा सुरू होत्या. तीही आनंदात काही काही सांगत होती. ‘‘वहिनी, माझी मुलगी रोज वीस मुलांना डबे देते. ती साबुदाणा खिचडी, कटलेट, बटाटेवडे, पावभाजीची ऑर्डर घेते. कधी तुम्हाला काही लागलं तर सांगा.’’
‘‘अरे हो का. सांगेन हं.’’ सगळी पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली होती. ‘‘वहिनी बघा बरं नीट लागलीत का?’’
‘‘हो गं. छान काम केलंस.’’ ‘‘वहिनी हे काय आहे? हे आत ठेवायचं का?’’
‘‘हो. त्यात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं, आमची सगळी ‘सर्टिफिकेटस्’ आहेत.’’ तिने स्वत:च ते फोल्डर नीट कपाटात ठेवलं. तेवढ्यात नंदाला फोन आला. बोलून झाल्यावर ती म्हणाली, ‘‘वहिनी तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय बघा. मला जमेल तसं मी शिकेन. मध्येच मलाही वाटतं तुमच्यासारखं शिकावं, शहाणं व्हावं.’’
‘‘मी शिकवून चांगलं शहाणं करेन तुला.’’ मिता हसत म्हणाली.‘‘बरं आता निघते मी. माझी मुलगी इथंच ऑर्डर द्यायला आली आहे. तिच्याबरोबर गाडीवर जाते घरी.’’
‘‘ती गाडीवर येते?’’
‘‘अहो, जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत. त्यांची जुनी गाडी विकत घेतलीय लेकीनं. निघते वहिनी.’’
‘‘अगं थांब, तुझा पगार काढून ठेवला आहे. तो देते.’’
‘‘वहिनी रोख पैसे नको. तुम्हाला माझं पासबुक दाखवते. त्या नंबरावर खात्यावर टाका. सगळे तसंच करतात.’’ असं म्हणून नंदानं पासबुक तिच्या हातात दिलं. मितानं उघडून बघितलं तर सोळा हजार रुपये जमा झाले होते. ‘‘माझं ‘वन बीएचके’चं जुनं घर आहे. आता एक नवीन ‘टू बीएचके’ घेतलं आहे. पगारातनं हप्ता भरते. माझा नवरा, मुलगासुद्धा बँकेत पैसे भरतो. चार महिन्यांत आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा. दोन लाख तेवढे द्यायचे राहिलेत.’’ नंदा सहजपणे सांगत होती.
‘‘दुसरं घर घेतलंस?’’
‘‘मुलाचं लग्न होईल. मग घरात सूनबाई येईल. मोठं घर हवं. वाढता संसार… म्हणून घेतलंय.’’
‘‘अरे वा. ’’
‘‘बरं वहिनी, येते मी. खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला ‘व्हाट्सअप’ला पाठवते. त्यावर पैसे पाठवा.’’ असं म्हणून नंदा गेली आणि मिता विचारातच पडली. इतका वेळ आपण तिला ‘मी तुला शिकवते, मी तुला शिकवते,’ असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली. लिहिता-वाचता येणं, हातात पदवी असणं म्हणजे खरं शिक्षण असंच इतकी वर्षं आपण समजत होतो. ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्तासुद्धा भरत होती… लाखांची गोष्ट करत होती. रोजच्या जगात वावरताना लागणारं व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं. खरं तर तिच्याकडून आपणच काही शिकायला हवं असं तिला मनोमन वाटलं… महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही. आणि हिला मी अडाणी, अशिक्षित समजत होते… ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडे… त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडे बघत राहिली… या शिक्षणातून मिळालेलं ज्ञानही असंच आपण डोक्यात बंद करून ठेवलं आहे. कधी त्याचा उपयोग केला नाही. नुसता पदवीचा अभिमान बाळगला. आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं. खंत वाटली. ती उठून गॅलरीत आली. मुलीच्या मागे बसून नंदा निघाली होती…
तिच्याकडे पाहून ती प्रांजळपणे मनात म्हणाली, नंदा, खरी शहाणी तर तूच आहेस.
