विद्या निकम

‘‘सोळा-सतरा वर्षं झालीत आता गाव सोडून. या काळात माणूस फक्त मोठा होत नाही… बदलतो. स्वत:च्या जखमांभोवती स्वत:चं आयुष्य बांधतो.’’ वीरच्या आयुष्याने शिकवलेल्या या तत्त्वज्ञानानेच त्याला परिस्थितीला तोंड द्यायला तयार केलं खरं, पण त्याचमुळे मी मात्र माझा बालपणीचा सवंगडी कायमचा हरवून बसले… आमचं आजोळ म्हणजे मुंबईपासून अवघं सव्वाशे मैलावर, पण मुंबईच्या झगमगाटाचा, शहराच्या धावपळीचा लवलेशही नसलेलं छोटंसं खेडं, ‘निलेश्वर बुद्रुक.’ दीड-दोन हजारांची वस्ती. गावाच्या एका टोकाला प्राथमिक शाळा, दुसर्‍या टोकाला ग्रामीण सरकारी दवाखाना आणि दिवसातून चार वेळा धरणगावला ये-जा करणारी एस.टी. एवढंच काय ते जगाशी असलेलं आमचं नातं.

मूळ रस्त्याला जोडणारा दोन किलोमीटरचा कच्चा, ओबडधोबड रस्ता म्हणजे गावाच्या नशिबातला महामार्ग! गावाच्या माथ्यावर काळ्या दगडाचं, गूढ आणि गंभीर विरुपाक्षाचं भव्य मंदिर उभं होतं. माझे बाबा प्रांत कार्यालयात वरिष्ठ कर्मचारी होते. त्यांची बदली थेट राघोबा नगरला झाली आणि पिराजीवाडीचं आमचं बिर्‍हाड मामाच्या गावी निलेश्वर बुद्रुकला हललं. बाबा एकटेच राघोबा नगरला गेले. माझं बालपण त्या गावानेच आपल्या कुशीत घेतलं. गावाला लाभलेली काळू नदी. तिच्या काठावरची हिरवीगार झाडी. त्यापलीकडे भैरोबाची टेकडी. टेकडीवरचं निर्मनुष्य माळरान आणि त्या माळरानाच्या टोकावर उभं असलेलं काळ्या दगडाचं विरुपाक्षाचं मंदिर. त्या मंदिरातला काळोख मला फार आवडायचा.

गार, ओलसर दगडांना हात लावला की अंगभर अनामिक शांतता पसरायची. मंदिरात धुपाचा वास असायचा. कधी घंटा वाजायची. कधी दूर कुठेतरी एखाद्या पक्ष्याचा आवाज ऐकू यायचा आणि पुन्हा सगळं गूढ शांत. तिथे बसायला मला खूप आवडायचं. त्या मंदिराचा पुजारी होता, गुरवदादा. धिप्पाड देहयष्टी. भव्य कपाळ. लालबुंद डोळे आणि त्या कपाळावर तीन बोटांचा आडवा भस्माचा पट्टा. मला त्या तीन रेघांचं फार अप्रूप होतं. दिवसभर कितीही काम केलं, उन्हा-तान्हात फिरले, जंगलात जडीबुटी गोळा केल्या तरी गुरवदादांच्या कपाळावरच्या त्या तीन रेघा कधी विस्कटलेल्या दिसल्या नाहीत. मला तर वाटायचं, त्या विरुपाक्षानेच त्यांच्या कपाळावर जन्मत:च त्या आखल्या असाव्यात.

अगदी तशाच तीन रेघा गुरवदादांचा मुलगा वीरभद्र, वीरच्याही कपाळावर असायच्या. वीर माझ्याच वयाचा. आमच्या सगळ्या मुलींच्या टोळीतला तो एकुलता एक मुलगा. पण खरं सांगायचं तर तो स्वत:ला मुलगा समजतच नसावा. त्याचं हसणं, बोलणं, हातवारे करणं, चालताना नकळत कमरेत येणारी लय सगळंच आमच्यासारखं. आम्ही लगोरी खेळायचो, सागरगोटे खेळायचो, तो आमच्यापेक्षा सरस. तळ्यात-मळ्यात खेळताना तो आमच्या बाजूने उभा राहायचा आणि बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचताना तर तो आमच्यापेक्षाही जास्त हळुवार व्हायचा. एकदा आम्ही मुलींनी त्याला गमतीने विचारलं होतं, ‘‘वीर, तू मोठा झाल्यावर काय होणार?’’ तो बकुळीचं फूल हातात फिरवत म्हणाला होता, ‘‘मी?’’ क्षणभर विचार करून त्याने खांदे उडवले. ‘‘मी… मी सुलूसारखी होणार!’’ त्यावर सगळे हसले होते. मलाही आश्चर्य वाटलं, माझ्यासारखं व्हायचंय याला? म्हणजे काय? ‘‘मुलगा असून मुलगी कसा होणार रे?’’ या प्रश्नावर त्याने काही उत्तर दिलं नव्हतं. फक्त हातातलं बकुळीचं फूल कानामागे खोवलं होतं.

आज त्या सगळ्याचा अर्थ मला कळतोय… तेव्हा मात्र तो फक्त वीर होता. माझा मित्र. आमच्या खेळातला आमचा सवंगडी. बाकीचे मुलगे त्याला चिडवायचे, ‘‘मुलींमध्ये मुलगा लांडोरा!’’, ‘‘अगं, वीरला तुझा परकर नेसायला दे!’’, ‘‘वीर, तुझं लग्न मुलाशी करणार की मुलीशी?’’ आणि सगळे हसायचे. वीरही कधी कधी हसायचा. पण चेहर्‍यावर अगतिकता दिसायची. काही वेळा त्याच्या डोळ्यांत क्षणभराकरिता आलेली भयाची सावली मला दिसायची. मी त्याला कधी चिडवलं नाही. कधी हटकलं नाही. कारण त्याच्या मनात काहीतरी फार नाजूक होतं. ते तो जपत असावा. एकदा आम्ही मंदिराच्या आवारात खेळत होतो. अचानक जोरात वारा सुटला.

माझा परकर उडू लागला. मी तो सावरत असताना वीरने स्वत:चा अंगरखा काढून माझ्याभोवती धरला. ‘‘कुणाला दिसायला नको,’’ तो म्हणाला. ‘‘तुला एवढं काय?’’ तो हसला.‘‘मुलींची अब्रू राखायची असते.’’ तेव्हा आम्ही सगळ्या खिदळलो होतो, पण आज वाटतंय तो इतरांची अब्रू राखत होता, कारण स्वत:ची ओळख तो जपून ठेवत होता, हे त्याला तेव्हाच कळलं असावं. काळ पुढे गेला. शाळा संपली. गाव मागे पडलं. प्रत्येकाने आपापल्या वाटा निवडल्या आणि एक दिवस मला तो माझ्या ऑफिसच्या वाटेवर ‘सिग्नल’वर दिसला. मी ओळखलं नाही. कुणी एक तृतीयपंथी. रंगीत झुळझुळीत साडी, चापूनचोपून नेसलेली, नीटनेटका मेकअप, अंगात कुठलाही उर्मटपणा नाही.

पैसे मागताना ना लोचट आर्जव, ना दादागिरी. फक्त टाळी वाजवायची. नजर भिडवायची आणि पुढच्या गाडीपाशी जायचं. एखाद्या सौंदर्यवतीलाही लाजवेल असं त्याचं रूप होतं. पण माझी नजर त्याच्या चेहर्‍यावरच्या एका गोष्टीवर खिळली होती. त्याच्या कपाळावर असलेल्या भस्माच्या तीन रेघा. अगदी नाजूक… ‘सिग्नल’ पार केल्यावर पहिल्याच वळणावर माझं ऑफिस. ऑफिसच्या खाली चहाचा स्टॉल. स्कूटर लावायची, चहा घ्यायचा आणि मग कामाला सुरुवात करायची हा माझा रोजचा शिरस्ता. त्या दिवशी चहा समोर असूनही त्याची चव लागली नाही. फाइल उघडली. अक्षरं दिसत होती. अर्थ दिसत नव्हता. तो चेहरा डोळ्यासमोरून हटत नव्हता. कुठे पाहिलाय? कधी? कोण आहे हा? उत्तर सापडत नव्हतं. ‘सिग्नल’ अडीच मिनिटांचा असायचा. त्या अडीच मिनिटांत आमची नजरानजर व्हायची.

तो माझ्याकडे पाहायचा… मी त्याच्याकडे. काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं व्हायचं. पण ओळखीची खूण सापडत नव्हती. आणि एके दिवशी अचानक त्याच्याकडे पाहाताना निलेश्वर बुद्रुक माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. भैरोबाची टेकडी, विरुपाक्षाचं मंदिर, काळ्या दगडाचा गार स्पर्श, बकुळीची फुलं आणि वीर. पण तरीही एक धागा तुटलेला होता. तो धागा एकदा हाती आलाच. अचानक वीज चमकावी तसा. त्या तृतीयपंथीच्या दोन भुवयांमध्ये मला एक खूण दिसली. जुनी. माझ्यासाठी ती जखम नव्हती. ती माझ्या बालपणातली खूणगाठ होती. हा वीर…नक्की वीरच. मला आठवलं, तो सुट्टीचा दिवस होता. आम्ही सात-आठ मुली भैरोबाच्या माळावर लगोरी खेळत होतो. वीरही आमच्यात सामील झाला होता. मी चेंडू भिरकावला. वीरने तो चुकवण्यासाठी वाकायचा प्रयत्न केला आणि धाडकन तोंडावर पडला.

त्याच्या दोन भुवयांच्या मध्ये खोल खोक पडली. क्षणात रक्ताची धार लागली. आम्ही सगळ्या किंचाळलो. आजूबाजूला एकही मोठा माणूस नव्हता. मंदिराची झाडलोट करणारा नरसू आमचा गलका ऐकून धावत आला. त्याने वीरला खांद्यावर घेतलं आणि गावातल्या वैद्याकडे धावला. तिथे मलमपट्टी झाली. त्यानंतर बैलगाडीतून त्याला गावच्या रुग्णालयात नेण्यात आलं. संध्याकाळी तो परत आला. कपाळावर भलं मोठं बँडेज. आठ टाके पडले होते. जखम भरायला महिना लागला. महिनाभरानंतर वीर पुन्हा आमच्यात आला, कपाळावरच्या त्या जखमेच्या खुणेसह. आज इतक्या वर्षांनी मला तीच खूण त्याच्या चेहर्‍यावर दिसली होती.

माझ्या अंगावर सरकन काटा आला. मला कळलं होतं. तो वीरच होता. पण खात्री नव्हती. ती खात्री त्या दिवशी संध्याकाळी झाली. संध्याकाळी ऑफिस सुटलं. मी स्कूटर सुरू केली आणि अचानक ती बंद पडली. पुन्हा किक मारली. काही उपयोग झाला नाही. मेकॅनिकला फोन केला. ‘‘मॅडम, तुम्ही समोरच्या बागेच्या कट्ट्यावर बसा. मी येतो. स्कूटर दुरुस्त करून आणतो.’’ मी स्कूटर रस्त्याच्या कडेला लावली आणि बागेच्या कट्ट्यावर जाऊन बसले. शेजारच्या बाकड्यावर कोणीतरी बसलं होतं. तोच तो तृतीयपंथी. साडीच्या पदरात दिवसभराची कमाई जमा करून तो नोटा मोजत होता. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने माझ्याकडे पाहिलं. काही क्षण… मग माझी नजर त्याच्या कपाळाकडे गेली.

त्याच्या भुवयांच्या मधल्या खुणेकडे पाहिलं आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘वीर…’’ नोटा मोजणारे हात थांबले. त्याने माझ्याकडे पाहिलं. ओठ थरथरले. आणि पुढच्याच क्षणी त्याच्या तोंडूनही शब्द बाहेर पडले, ‘‘सुलू… तू?’’ त्या दोन शब्दांनी सोळा-सतरा वर्षांचं अंतर एका क्षणात संपलं. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. त्याच्या डोळ्यांतही, पण आम्ही दोघांनीही ते लपवलं. ‘‘तू…’’ माझ्या तोंडून एवढंच निघालं. तो हसला. पूर्वी वीर हसल्यावर जसा डोळ्यांच्या कोपर्‍यांतून हसायचा, तसाच. ‘‘हो. मीच.’’ ‘‘कुठे होतास एवढी वर्षं?’’ त्याने खांदे उडवले. काही प्रश्न शब्दांत विचारता येत नाहीत. त्यानेच माझी अडचण समजून घेतली. ‘‘तो दिवस आठवतोय. पाऊस पडत होता.

खूप…’’ माझ्या अंगावर शहारा आला. मलाही तो दिवस आठवला. तो बोलू लागला. ‘‘मी तेव्हा घरात आईची साडी नेसून आरशासमोर उभा राहिलो होतो. बापानं पाहिलं. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यांत मला माझा बाप दिसला नाही. त्याच्या हातात वेताची छडी होती. किती फटके मारले माहीत नाही. शरीरावरच्या जखमा बर्‍या झाल्या नंतर सुलू, पण त्या रात्री जे तुटलं ना, ते कधीच जुळलं नाही. बाहेर पाऊस सुरूच होता. भर पावसात त्याने मला घराबाहेर काढलं. मी मागे वळून पाहिलं. आई दारात उभी होती. ती काहीच बोलली नाही, फक्त रडत होती.’’ नि:शब्द होऊन मी वीरची कहाणी ऐकत होते. ‘‘त्या रात्री मी पळालो.’’‘‘कुठे?’’ ‘‘मुंबईला. मुंबई एवढी मोठी आहे ना सुलू, की माणूस स्वत:पासूनही तिथे लपून राहू शकतो. तिथे तृतीयपंथीयांची मोठी वस्ती होती. त्यांनी मला आसरा दिला. पूजा केली.

त्यांच्या पद्धतीने मला आपल्यात घेतलं.’’ तो आपल्या साडीच्या पदराशी खेळत पुढे बोलत होता… ‘‘सुरुवातीला वाटलं, माझं घर मला सापडलं.’’ क्षणभर हसला आणि म्हणाला, ‘‘मग हळूहळू कळलं… घर सापडलं नव्हतं. फक्त घरातून हाकललेल्या माणसांना एकत्र राहायची जागा सापडली होती.’’ माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ‘‘खूप काही पाहिलं सुलू. लोकांचे चेहरे पाहिले. काहींच्या नजरेत कुतूहल, काहींच्या नजरेत वासना, काहींच्या नजरेत तुच्छता, काहींना आम्ही माणूसच वाटत नाही. काहींना आमचं शरीर म्हणजे बाजारात ठेवलेली वस्तू वाटतं.’’ बोलता बोलता क्षणभर थांबून म्हणाला, ‘‘या सगळ्यात जगता-जगता एक दिवस लक्षात आलं परत जाण्यासाठी मागे काही उरलेलंच नाही.’’ ‘‘ तुझे आई-वडील?’’ ‘‘आईला माझी आठवण येत असेल कदाचित.’’

‘‘मग जा ना एकदा घरी.’’ तो बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिला. म्हणाला, ‘‘घर म्हणजे चार भिंती असतात सुलू. पण त्या भिंतींच्या आत आपल्यासाठी जागा असावी लागते.’’ मी त्याचा हात हातात घेतला. ‘‘वीर, आजकाल पुनर्वसनाचे प्रयत्न होतात. कितीतरी संस्था काम करतात. हवं तर मी मदत करते. तुझ्यासाठी काहीतरी.’’ त्याने माझा हात अलगद सोडवला. ‘‘नको.’’ ‘‘का?’’ तो माझ्याकडे पाहत राहिला. ‘‘कारण मला माझं स्त्रीपण परत काढून ठेवता येणार नाही.’’ मी गप्प. ‘‘ ती साडी नाहीये सुलू, जी अंगावरून काढता येईल. ते कुंकू नाही, जे पुसता येईल. ते नाव नाही, जे बदलता येईल.’’ त्याने आपल्या ह्रदयावर हात ठेवला. ‘‘ते इथे आहे. रोमारोमात. रक्तात. श्वासात.’’ त्याच्या कपाळावरच्या तीन रेघांकडे माझी नजर गेली.
‘‘आणि समाज?’’ तो हसला.

‘‘ज्या समाजाने मला ‘वीर’ म्हणून स्वीकारलं नाही, तो ‘वीरा’ म्हणून कसा स्वीकारेल?’’ माझ्याकडे उत्तर नव्हतं. तो पुन्हा म्हणाला,‘‘सोळा-सतरा वर्षं झालीत सुलू. या काळात माणूस फक्त मोठा होत नाही… बदलतो. स्वत:च्या जखमांभोवती स्वत:चं आयुष्य बांधतो.’’ मी त्याच्या कपाळावरच्या तीन रेघांकडे पाहत राहिले. अचानक मला गुरवदादा आठवले. भव्य कपाळ. तीन ठाशीव रेघा, विरुपाक्षाचं मंदिर. आणि त्याच मंदिराच्या आवारात बकुळीची फुलं वेचणारा माझा वीर. माझ्या डोळ्यांसमोर दोन्ही चेहरे एकमेकांत मिसळले. ‘‘वीर,’’ मी हळूच विचारलं, ‘‘तुला कधी आपल्या गावाची आठवण येते?’’ त्याने मान वर केली. डोळे मिटले. बराच वेळ काही बोलला नाही. मग म्हणाला,‘‘दररोज.’’ ‘‘विरुपाक्षाची?’’ ‘‘हो.’’ ‘‘भैरोबाच्या माळाची?’’ त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं ‘‘तुझी सगळ्यात जास्त.’’ माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

तो हसला. ‘‘रडू नकोस सुलू.’’ ‘‘मी तुला हरवून बसले होते वीर.’’ ‘‘नाही.’’ ‘‘मग?’’ ‘‘आपण एकमेकांना हरवलं होतं.’’ तो उठला. साडीचा पदर नीट केला. कपाळावरच्या तीन रेघा पर्समधल्या छोट्या आरशात पाहून नीटनेटक्या केल्या. तेवढ्यात दूरवरून मेकॅनिकचा आवाज आला. ‘‘मॅडम! स्कूटर तयार झाली!’’ मी उठले. वीर माझ्याकडे पाहत होता. काही क्षण आम्ही दोघेही काही बोललो नाही. मी विचारलं, ‘‘पुन्हा भेटशील?’’तो हसला आणि म्हणाला, ‘‘हा रस्ता, हा सिग्नल तुझा रोजचा आहे, हो ना? या समोरच्या बिल्डिंगमध्ये तुझं ऑफिस आहे, हो ना? मग ठरलं उद्यापासून मी माझा सिग्नल बदलून घेणार. एकदा जी माणसं, ज्या आठवणी, जे स्पर्श सगळेच्या सगळे मनातून हद्दपार केलेत ते पुन्हा नको तुझ्या-माझ्यात आणि तो पाठमोरा चालू लागला. दोन पावलं चालला.

मग अचानक थांबला. मागे वळून म्हणाला, ‘‘सुलू… विरुपाक्षाच्या मंदिरातल्या त्या काळ्या दगडाचा गार स्पर्श अजून आठवतो का?’’ मी होकारार्थी मान हलवली. ‘‘मलाही.’’ तो म्हणाला आणि तो गर्दीत मिसळून गेला. मी मात्र तिथेच उभी राहिले. पावसाच्या सरी समोर पडत होत्या. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात त्या तीन रेघांसारख्या चमकत होत्या. माझ्या डोळ्यांसमोर गुरवदादांचं भव्य कपाळ आलं. मग वीरचं. एकाच रक्ताच्या दोन कपाळांवरच्या त्या तीन रेघा. एकाला देवाने स्वीकारलं होतं. दुसर्‍याला माणसांनी नाकारलं होतं. स्कूटर सुरू झाली. मी निघाले. पण त्या दिवसापासून प्रत्येक सिग्नलला लाल दिवा लागला की, मला नेहमी वाटतं, अजून अडीच मिनिटं बाकी आहेत…कदाचित वीर इथेच आजूबाजूला कुठेतरी असेल.
uvidyanikam230563 @gmail.com