डॉ. ऋजुता अयाचित
कुशाग्र बुद्धीच्या अभयनं कर्करोगाचं सुसज्ज रुग्णालय आपल्या गावी सुरू केलं आणि त्याचं उद्घाटन करायला बोलावलं आपल्या दोन मातांना… तेव्हा त्याच्या मनात होते ते कृतज्ञतेचे भाव. मित्राच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून दिलेले आशीर्वाद आणि व्यक्त केलेला विश्वास आज असा फळास आला होता… एका ऋणातून जणू तो मुक्त होत होता…
एका सुसज्ज कर्करोग रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा… डॉ. राही कार्यक्रमाचं निवेदन करत होती. डॉ. अभय, ज्याच्या कर्तृत्वामुळे या रुग्णालयाची प्रशस्त व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज इमारत उभी राहिली होती, त्याचं मनोगत चालू होतं. काळासावळा, सर्वसाधारण शरीरयष्टीचा डॉ. अभय. त्याच्या चेहर्यावर बुद्धिमत्तेचं तेज ओसंडून वाहत होतं…
रुग्णालयाच्या समोरील एका मोठ्या प्रांगणात हा सोहळा चाललेला होता. मंचावर डॉ. अभयचे गुरू व इतरही निष्णात कर्करोगतज्ज्ञ, डॉक्टर मंडळी विराजमान होती. बोलता बोलता डॉ. अभयने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का देत जाहीर केलं, ‘‘माझ्या दोन्ही आई… बाई (त्याची जन्मदात्री) व आई यांना विनंती करतो की, त्यांनी मंचावर येऊन डिजिटल पद्धतीने रुग्णालयाच्या नावाच्या फलकाचं अनावरण करावं. नंतर माझे गुरू प्रत्यक्ष फीत कापून उद्घाटन करतील. गणेश, तू त्यांना मंचावर आण.
’’ते ऐकून राही अचंबित होऊन पाहतच राहिली, अभयची दुसरी आई?… कोण? इतक्यात तिला त्या दोघी मंचावर येताना दिसल्या. त्यांना पाहून ती मनात म्हणाली. अरे, या तर कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत बॉटनीच्या! ही अभयची आई कशी? अशी कोणती गोष्ट आहे, जी मला आजपर्यंत माहीत नाही.’’ तेवढ्यात अभयनं काकाजींना, त्याच्या वडिलांना आणि जिच्या पावलावर पाऊल ठेवून तो ‘एमबीबीएस’ला गेला ती त्याची मोठी बहीण डॉ. अंजली, या सर्वांना मंचावर बोलावून कृतज्ञता व्यक्त केली. राहीनं तिच्या उत्सुकतेवर कसाबसा ताबा मिळवला. सोहळा संपल्यावर अभिनंदनाची, सत्काराची, जेवणावळींची एकच गडबड उडाली. इतकं प्रशस्त कर्करोग रुग्णालय बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. राहीच्या उत्तम निवेदनाबद्दल तिचंही कौतुक होत होतं. ती मात्र अस्वस्थ होती. डॉ. राही अभयपेक्षा मोठी, मागील ४-५ वर्षांपासून ती अभय आणि त्याच्या कुटुंबीयांना ओळखत होती. परंतु या नात्याबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. उद्घाटन सोहळ्याचं निवेदन करण्यासाठी ती मुंबईहून खास इथे आली होती. न राहवून ती बाईंकडे गेली. बाई हसून म्हणाल्या, ‘‘राही, सगळी घाई संपू दे. उद्या आपण निवांत जाऊ रेणापूरचं शेत बघायला. मी सगळी कहाणी सांगेन तुला.’’
लातूरच्या दुष्काळी भागातील, छोट्याशा रेणा नदीकाठचं, म्हटलं तर जरा सुपीक जमिनींचं गाव रेणापूर! दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. रेणा नदीला बर्यापैकी पाणी होतं. अभय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गाला शिकत असतानाची ही गोष्ट… मित्रवेडा अभय, सुट्टीसाठी रेणापूरला येताना लातूरच्या २-३ मित्रांना घेऊन आला. किशोर, गणेश आणि आनंद. सारेच एकमेकांचे घट्ट मित्र… इतरत्र वैद्यकीय महाविद्यालयात लागले होते, अभयला मात्र मुंबईच्या ‘केईएम’ला प्रवेश मिळाला होता!
घरी आल्या आल्या तो म्हणाला, ‘‘मित्रांनो, तुम्ही एमबीबीएसला नुसता प्रवेश घेतलायत तर बाई-काकांना वाटतंय जणू काही डॉक्टर मंडळीच आलीयत घरी! बघा बघा त्यांनी तुमच्यासाठी ओसरीच्या एका कोपर्यात नवा कोरा बेसीनही बसवून घेतलाय…’’ आणि हास्यकल्लोळात रेणापूरचं घर बुडून गेलं. दुसर्या दिवशी मुलांचं ठरलं की, नदीवर पोहायला जायचं अन् दोन वाजेपर्यंत घरी परत यायचं. बाईच्या हातचं भरपेट जेवून मस्त ताणून द्यायची अन् रात्री टीव्हीवरचा हिंदी चित्रपट बघत मजा करायची.
दुसर्या दिवशी सकाळी पोरं नदीवर निघताच बाईनी काळजीनं विचारलं, ‘‘सगळ्यांना पोहता येतंय ना रे नीट? लौकर या जेवायला. मी स्वयंपाक करायला सुरुवात केलीय.’’ पोरं पडवी वा ढाळजेतूनच उत्तरली, ‘‘बाई काळजी करू नका, भरपूर जेवण करून ठेवा, आम्ही येतोच.’’बाई सगळं आवरून ओसरीवर आल्या, तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. पोरांच्या आवडीची एसर आमटी, कांद्याची चटणी, गव्हाची खीर असा फक्कड बेत केला होता त्यांनी. तेवढ्यात बाहेर कसला तरी गलका ऐकू आला. शेतातला गंपा धावत धावत ओरडतच आला ‘‘बाई-काका पळा पळा, पोरं नदीत बुडाया लागल्यात…’’ बाईच्या काळजात चर्र झालं, काका तर ऊर बडवत नदीकडे पळत सुटले… ‘‘कुणी तरी लेकरांना वाचवा रे… वाचवा.’’
शेजार्यांनी बाईंना अडवलं, घरी आणलं. दुपारचे ४ वाजले असतील. एव्हाना नदीवरून थेट ॲम्ब्युलन्सने सगळे लातूरला पोहोचले होते. बाईंनाही रुग्णालयात नेण्यात आलं… हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग समोर होता, आभाळ फाटलं होतं जणू… नदीतल्या एका अनपेक्षित भोवर्यात सापडून बुडायला लागल्यावर मुलांनी एकमेकांना घट्ट धरलं, पण… किशोर आणि आनंद, दोघे वाहून गेले होते… बाईंच्या समोर होतं ते त्या दोघांचं कलेवर! ‘‘माझा किशोर मला आणून द्या’’, ‘‘माझ्या आनंदला मी कुठं शोधू आता?’’ दोघांच्या मातांच्या आकांतानं रुग्णालयाचं आवार गलबललं. बाई-काकांनी हाय खाल्ली. अपराधीभावामुळे दोघे पुरते कोलमडले होते. आपल्या घरी आल्यावर दोन लेकरांचे जीव गेले, त्यांच्या मायबापांना आपण पुत्रशोकात ढकललं ही भावना त्यांचं अंत:करण कुरतडू लागली. त्या दु:खी आईवडिलांना कसं तोंड दाखवावं, त्यांचं सांत्वन कशानं करावं हे त्यांना समजेना.
या घटनेला काही दिवस उलटून गेले तरी अपराधी भावनेतून अभयला बाहेर पडता येत नव्हतं. कॉलेजला जाऊन अभ्यास होईल का? किंवा गेलोच नाही तर काय होईल? आपण आता आयुष्यात काहीच करू शकणार नाही, या विचारांमुळे तो खरं तर नैराश्यातच मुंबईला निघाला होता. त्याला पोहोचवायला म्हणून बाई-काकाही स्टेशनवर आले होते. समोर पाहतात तर किशोरचे बाबा तिथं हजर! अत्यंत स्थितप्रज्ञासारखे. त्यांनी अभयच्या पाठीवर हात ठेवला, ‘‘बेटा अभय, जी स्वप्नं किशोरची होती, आनंदची होती, तीच तुझीही आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मुंबईला जा. कसलाही विचार करू नकोस. खूप अभ्यास कर आणि एक उत्तम डॉक्टर बनूनच परत ये, आम्ही तुझी वाट पाहू.’’ भावनावेशाने अभयला मिठीत घेऊन ते धाय मोकलून रडू लागले, तेव्हा सर्वांच्याच भावनांचा बांध फुटला…
ट्रेन सुटली, अभयला जरा हलकं वाटू लागलं. बाबांचं केवढं मोठं हृदय ते! असा बाप शोधून सापडणार नाही, त्याला वाटून गेलं. नंतर काही दिवसांनी मनाचा हिय्या करून बाई-काका किशोरच्या आणि आनंदच्या आईवडिलांना भेटायला गेले. काही क्षण जीवघेण्या नि:शब्दतेत गेले. एकाएकी किशोरची आई आणि किशोरची मोठी बहीण, दीदी रडू लागल्या. आनंदचे आईवडील, बाई-काकाही रडू लागले, दु:खाचा सागरच उसळला जणू… परिस्थिती सावरत किशोरचे बाबा सार्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हे पाहा, जे घडलं ती परमेश्वराची इच्छा होती. आता अभय हाच आपला किशोर आणि आनंदही आहे असं समजा. गुणी मुलगा आहे तो, आपल्याला कधीही अंतर देणार नाही. बघा, माझे बोल लक्षात ठेवा!’’ बाबांच्या या बोलण्यानं किशोरच्या आईच्या मनात अभयचा स्वीकार होण्यास मदत झाली.
काळ पुढे सरकत होता. अभय, आईची व दीदीची काळजी घ्यायला शिकला. जणू त्याची यशोदाच. मायलेकरांमध्ये आणि बहीण-भावामध्ये खेळीमेळीचं नातं रुजायला लागलं. गणेशही अधूनमधून येऊ लागला. जेव्हा केव्हा अभय सुट्टीला घरी यायचा तेव्हा आईला आधी भेटून मगच रेणापूरला जायचा! करता करता दोन्ही घरांतील ऋणानुबंध घट्ट होत गेले. आनंदचे कुटुंबीयसुद्धा नकळतपणे या सार्यांशी एकरूप झाले. गणेशही अभयच्या रुग्णालयात त्याच्याबरोबरीनं दाखल झाला. कालपरत्वे दीदीचं लग्न, तिची दोन बाळंतपणं, या सगळ्यात अभय स्वत: व त्याचं पुरतं कुटुंब सर्वार्थानं रमून गेलं. इतर तीन मित्रांचे कुटुंबीयसुद्धा जोडलेले राहिले. सारे एकमेकांना समजून घेत, आधार देत राहत होते. ना कधी जातपात मनात आली, ना आर्थिक स्तर! दरम्यान, किशोरच्या बाबांचं निधन झालं आणि पुन्हा सर्वांवर शोककळा पसरली.
अभय मात्र बाबांचं वाक्य कधीही विसरला नाही. जात्याच बुद्धिमान असलेल्या अभयने कर्करोग शस्त्रक्रियेतील सर्व अत्युच्च कौशल्यं अवगत केली. परदेशातही प्रशिक्षण घेतलं. नंतर भल्या मोठ्या आकड्यांचा पगार देणार्या नोकर्या मुंबईत हाताशी असतानाही गावाकडे येऊन लातूरच्या मातीतच बहरायचं ठरवलं! अल्पावधीतच पंचक्रोशीत, अख्ख्या मराठवाड्यात त्याचं नाव झालं.
आज सख्ख्या बहिणीपेक्षाही अभय दीदीला जास्त जपतो. नंतर जुळलेली नातीदेखील… बाईंच्या दोन्ही सुना, जावई, नातवंडं… दीदीचे पती, दोन्ही मुली सारे एकमेकांत मिसळून गेले, एक विस्तारलेलं कुटुंब तयार झालं. किशोरच्या बाबांच्या एका वाक्याने अभयला जशी आयुष्याची दिशा मिळाली, तशी आईलाही जगण्याची उमेद मिळाली. आनंदच्या आईवडिलांनीही परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला. ऋणानुबंधाच्या सगळ्या चौकटी पार करून मनामनाच्या नात्यांची घट्ट वीण तयार झाली. असे अनोखे ऋणानुबंध ज्यांना उमगले, ज्यांनी मोठ्या मनानं परिस्थितीचा स्वीकार करून, उभरत्या अभयला विश्वास दिला, ते केवढे समृद्ध झाले असतील!
नुकताच, आईला झालेला कर्करोगसुद्धा तिच्या या निष्णात डॉक्टर मुलानं अतिशय ममतेनं हाताळला. हातातोंडाशी आलेल्या, डॉक्टर होऊ घातलेल्या मुलाच्या मृत्यूचं अपरंपार दु:ख कुठल्या कुठे विरून गेलं होतं. दीदीच्या मुलीचा आयएएसचा ‘इंटरव्ह्यू’ दिल्लीत होता तेव्हा अभय स्वत: जातीने तिच्या सोबतीला गेला होता. अगदी कालपरवा दीदीच्या मोठ्या मुलीच्या, म्हणजेच भाचीच्या लग्नात मामा म्हणून पाठीशी उभा राहिलेल्या अभय आणि गणेश या दोन भावांनी, मामा असण्याचं चोख कर्तव्यही बजावलं. नवरीच्या पाठीशी उभ्या असलेल्या डॉ. अभयचे पाणावलेले डोळे आईच्या नजरेतून सुटले नाहीत. आपण म्हणतो, जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात हजारो नाती असतात. पण असे ईश्वरी बंध अभावानेच अनुभवास येतात. आइनस्टाइन म्हणतो तसं…
There are only two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle!
आपण आयुष्यातल्या घटनांचा स्वीकार कसा करायचा हे प्रत्येकानं ठरवायचं असतं!
(सत्य घटनेवर आधारित)
