मीना चंदावरकर यांचा (२३ ऑक्टोबर) ‘गद्धेपंचविशी’ सदरातील लेख वाचला. दक्षिण कोकणातील एका लहानशा खेड्यातून येऊन पाच भावंडाबरोबर गरिबीतून वर येण्यासाठी कोल्हापूर व पुण्यात त्यांनी केलेला जीवनसंघर्ष अगदी बेधडक व पारदर्शीपणे कथन केला आहे. हे धारिष्ट्य खरोखर चकित करणारे आहे. सुबत्ता आल्यानंतरचे त्यांचे भाष्य कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेले आहे. समाजातील अनेकांनी केलेल्या मदतीमुळे त्या व त्यांची भावंडे हे आर्थिक संकटातून तरले, हे त्या मान्य करतात. मला सगळ्यात भावला तो त्यांचा सामाजिक जाणिवा प्रखर असलेला स्वभाव आणि पूर्वीची आठवण ठेवत, जमेल तशी गरिबांना मदत करण्याची ऊर्मी- जी आजच्या ‘मी व माझे’ संस्कृतीत उठून दिसते! या बाबतीत मला विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे पुढील उद्गार उद्धृत करावेसे वाटतात- ‘माझ्या सर्वांगीण विकासाला समाजातील अनेक लोकांनी केलेली मदत कारणीभूत झाली आहे याची व त्या मिळालेल्या आणि मिळत असलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी त्याच प्रमाणात झटले पाहिजे याची मी स्वत:ला दिवसातून शंभर वेळा आठवण करून देतो!’ – गोविंद काजरोळकर, पुणे.
‘विचारांच्या भिंगऱ्या’मधील उदाहरणे पटणारी ‘व्यर्थ चिंता नको रे’ या सदरातील
(३० ऑक्टोबर) डॉ. आशीष देशपांडे यांचा ‘विचारांच्या भिंगऱ्या’ हा लेख वाचला आणि खूप आवडला. त्यात त्यांनी ‘कर्क श’ विचारांबाबत दिलेले ‘डीटीएच’चे (सेट टॉप बॉक्सचे) उदाहरण चपखल लागू पडते. हा लेख वाचून माझ्या विचारांची भिंगरी नेमकी कोणत्या दिशेस फिरवायला हवी हे साधारण उमगले. त्यांनी असेच प्रोत्साहनकारक लिहीत राहावे. अनेक निराश मनांना उभारी मिळेल. – मुग्धा कर्वे