ह्रदयस्पर्शी ‘आभाळमाया’

उदय दंडवते यांचा प्रमिला दंडवते यांच्याविषयीचा लेख (२९ ऑगस्ट) वाचला. लेख अत्यंत हृदयस्पर्शी, भावुक आणि अंतर्मनाला भिडणारा आहे. आदरणीय प्रमिलाताईंचं आयुष्य एक आदर्श अशी जीवनगाथा आहे. एवढे  साधंसुधं आणि सात्त्विक संपन्न जीवन दुर्मीळच. त्यांचं सार्वजनिक जीवन स्फटिकासारखं पारदर्शक होतं.  रंजल्या-गांजल्यांच्यासाठी, स्त्रियांकरिता त्या झगडल्या, त्यांनी जीवनमूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही. त्यासाठी सदैव ठाम राहिल्या. निष्ठापूर्वक जीवन जगल्या. त्यांनी प्रामाणिकपणा प्राणापेक्षा अधिक जपला.

आपण खरंच भाग्यवंत की अशा सर्वत्र वंदनीय आणि आदर्श मातेच्या पोटी जन्मला.

– शिवाजी खडतरे

जगावेगळा स्तुत्य प्रयत्न

‘सृजनाच्या नव्या वाटा’ सदरातील ‘शिक्षांतर’ हा रेणू दांडेकर यांचा लेख वाचताना जगण्याच्या सामान्य माणसाच्या सर्व संकल्पनाच बोथट होत असल्याचा प्रत्यय आला. या जगावेगळ्या क्षितिजाला वास्तवात आणायचा प्रयत्न आणि त्यासाठी करत असलेले आखीव नियोजन, त्यापुढे जाऊन कसलीही जाहिरातबाजी नाही की पारितोषिकाची लालसा नाही हे सारेच अकल्पित वाटले. वीस वर्षांची वाटचाल तेवढय़ाच उत्साहाने चालू आहे याचे कौतुक वाटले.  बरेच विचारवंत सेवाभावी संस्थेतून आयुष्यभर समाजसेवा करत आहेत. त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचते. पण ‘शिक्षांतर’सारखे उपक्रम समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या वेगळ्या वाटचालीचे नेमकेपणाने समर्थ शब्दांकन करणाऱ्या रेणू दांडेकर यांनाही मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.

– नितीन गांगल, रसायनी

आचार्य अत्रे यांचे नाव अजरामरच

‘आभाळमाया’ सदरातील ‘पपा एक महाकाव्य’ हा मीना देशपांडे यांचा वडील आचार्य अत्रे यांच्यावरील विस्तृत लेख (१० ऑगस्ट) मनाला भावला.

साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण या सर्व क्षेत्रांतले आचार्य अत्रे यांचे कार्यच एवढे अफाट होते की त्यांच्या निधनाला आता ५० वर्षे झाली तरी त्यांच्या साहित्याची गोडी आणि कार्याची महती कमी झालेली नाही. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी आचार्य अत्र्यांवरील लेखात आचार्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन प्रचंड आणि उत्तुंग असे केले आहे. तर गदिमांनी अत्र्यांवरील श्रद्धांजली लेखाचे शीर्षक ‘कऱ्हेचे पाणी आटले’ असे समर्पक लिहिले होते. स्वत: मीना देशपांडे यांनी अलीकडे ‘कऱ्हेचे पाणी’ या आचार्य अत्रे यांच्या आत्मवृत्ताचे स हा, सात व आठ असे पुढील ३ खंड प्रकाशित करून मोठे कार्य केले आहे.

मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव अजरामर राहणार आहे.

– सुरेश पटवर्धन, कल्याण</p>