लोकसंस्कृ‘ती’ सदरातील डॉ. तारा भवाळकर यांचा ‘नातं सण, निसर्गाशी’ हा लेख वाचला. पूर्वी हे सारे सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरे होत असत. अलीकडच्या काही वर्षांत मात्र परिस्थिती बदलली असून काहींना आर्थिक अडचणी जाणवतात तर दुसरीकडे माणसे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीने हैराण झालेले असतात, अशा परिस्थितीत येणारे हे सणवार कसे साजरे होणार? तरीही जमेल तसे सण साजरे होतातच. सणांमागील उद्देश लक्षात घेता निसर्गातील सर्व घटकांना संरक्षण मिळावे हा विचार होता. हा विचार जपणे व सद्यस्थितीत गरजू घटकांना मदत करणे महत्त्वाचे वाटते. आधुनिकतेच्या काळात व्रतवैकल्यांत योग्य प्रकारे सुसंगत बदल व्हावेत असे वाटते. निसर्गाची जपणूक, गरजूंना यथाशक्ती मदत, वागणुकीत सद्भावनेची जोपासना करणे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. – अर्चना काळे, नाशिक

खिळवून ठेवणारी लेखनशैली

‘शीतयुद्धातील मोहरा’ या अत्यंत समर्पक शीर्षकाचा लेख ‘गुप्त तिची सावली’ या सदरात वाचला. दुसर्‍या महायुद्धात आणि एकूणच जगभरात इतक्या मोठ्या संख्येने महिला गुप्तहेर सक्रिय होत्या, हे वाचून अचंबा वाटतो. लेखिका अपर्णा देशपांडे यांची शैली सुटसुटीत आणि खिळवून ठेवणारी आहे. याशिवाय याच अंकातील सण आणि निसर्गाचं नातं सांगणारा डॉ. तारा भवाळकरांचा लेखही आवडला. – भावना आफळे, छत्रपती संभाजीनगर

मार्गदर्शनपर लेख

मेधा कुळकर्णी यांचा ‘जोडीदाराचं पालकत्व’ हा लेख मार्गदर्शक ठरावा. अनेकांना आपल्या रुग्ण जोडीदाराचा दीर्घकाळ सांभाळ करतांना काय कष्ट पडले, विशेषत: मानसिक आघातांना सहन करावे लागले हे वाचून त्यांचे कौतुक वाटलेच, परंतु आज तब्येतीने ठीकठाक असलेल्या ज्येष्ठ पती-पत्नींना यामुळे मानसिक बळ मिळेल. – राम राजे, नागपूर</strong>