‘सोयरे सहचर’ या सदरातील ‘ती आऊ होती म्हणुनी..’ (२६ मार्च) हा आशुतोष आपटेंचा लेख वाचला आणि काही क्षणांसाठी अवाक होऊन गेलो. त्यांच्या पत्नी राजश्री करकेरा-आपटे यांनी आयुष्यभर प्राणीमात्रांसाठी केलेली नि:स्वार्थ सेवा, प्रेम पाहून असेही लोक आहेत ज्यामुळे जगात मानवता टिकून आहे, यावर विश्वास बसला. मला आधी मुक्या प्राणीमात्रांवर दाखवण्यात येणारे प्रेम हे निव्वळ प्रसिद्धीसाठी किंवा सामाजिक कार्याचा आव आणण्याचा केलेला प्रयत्न वाटायचा. पण राजश्री आपटेंची जखमी प्राण्यांबद्दल असणारी करुणा ही त्या नवीन लग्न झालेले असतानाही रात्री बाहेर पडून प्राण्यांवर शक्य ते उपचार करण्याच्या कृतीतून स्पष्ट होते. ‘जखमी जनावरं रात्री बाहेर पडतात व उकिरडय़ांवर अन्न शोधतात’ हे वाक्य काळजाला चटका लावून गेलं. आपणही त्यांचे काही देणं लागतो, ही भावना मुळात प्रत्येकात असावी हेच यातून स्पष्ट होते. आशुतोष आपटेंचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे. बायकोचे प्राणिमात्रांच्या सेवेचे अनोखे व्रत त्यांनी तिच्या मृत्यूनंतरही सुरू ठेवले. मुळात ते स्वीकारणेच फार जिकिरीचे होते. अशी माणसे जगण्याला नवीन दिशा आणि आशा देतात. कृतीतून समाजसेवा हीच मुळी काळाची गरज बनली आहे. अशा असंख्य निष्पाप, मुक्या प्राण्यांच्या आऊला आदरांजली! – तन्मय शिंपी

गेले लिहायचे राहूनवाचनीय

मृदुला भाटकर यांचे ‘गेले लिहायचे राहून’ हे सदर अत्यंत मार्मिक आणि वाचनीय आहे. सरकारी नोकरीनिमित्त मला अनेकदा न्यायालयांमध्ये साक्षीकरिता जावे लागते. तेथील वातावरण, अशील, वकील आणि दस्तुरखुद्द न्यायाधीशांच्या मानसिकतेबद्दल मला नेहमी कुतूहल वाटत असते. न्यायाधीशांचे मनोगत, अनुभव जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलावे असे वाटते. मृदुला भाटकर यांचे लेख वाचताना ती इच्छा निश्चित पूर्ण होत असल्याचे समाधान मिळते. त्यांचे लेखाचे विषय, मांडणी, विवेचन आणि भाषा अत्यंत प्रामाणिक आणि यथास्थित असते. न्यायाधीशांच्या मनातही सामाजिक स्थित्यंतराचे पडसाद उमटतात, हे वाचून समाधान वाटले. कोणत्याही भावनांना बळी न पडता केवळ पुराव्यांच्या आधारावर गुन्हे आणि गुन्हेगारांचे मूल्यमापन करताना मानसिक स्तरावर खूप कसरत करावी लागते, हे लक्षात येते. एका दर्जेदार लेखमलिकेबद्दल ‘चतुरंग’ला आणि मृदुला भाटकर यांना मन:पूर्वक धन्यवाद.

डॉ. श्रीपाद गणेश पाठक