समीना दलवाई

जग बदलतंय असं म्हणत असतानासुद्धा अनेक विचारधारा, पारंपरिक समजुती इतक्या घट्ट असतात की अनेकदा माणसाचं माणूसपण विसरलं जातं. स्त्री आणि पुरुष यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या लिंगाची व्यक्ती आजही तिरस्काराचा, अव्हेराचा, फार तर कुतूहलाचा विषय बनते. मागच्या पिढीची ही अस्वीकृतता नवीन पिढीत दूर होतेय का?

बर्लिनमधील ‘नो बॉर्डर फेस्टिव्हल’मध्ये मी विकी शाहजहानला भेटले. उठावदार व्यक्तिमत्त्व. लांब घनदाट कुरळे केस. काजळ घातलेले मोठे डोळे. बोलताना हातवारे करून मुद्दा ठासून सांगायची लकब. कोलंबोमध्ये स्लेव आयलंड भागातील भारतीय समाजामध्ये वाढलेल्या विकीला, जर्मनीमध्ये वंशभेदविरोधी काम करणाऱ्या ‘विमेन इन एक्साईल’ या अफ्रिकी स्त्री-संघटनेने खास श्रीलंकेहून बोलावले होते. विकी पारलिंगी अथवा ट्रान्स व्यक्ती आहे. विकीच्या उपस्थितीमुळे देश, प्रांत, धर्म, वंश, रंग यापलीकडे लिंग भेदभावाचीसुद्धा ‘बॉर्डर’ पार करावी लागते हे मला ठळकपणे जाणवले.

विकीचे लहानपणीचे, मुलगा असतानाचे नाव विकंभरन शाहजहान होते. शाहजहान म्हणजे जगाचा राजा, ते नाव तिच्या हिंदू केरळी वडिलांनी मोठ्या हौसेने ठेवले होते. विकी एक ‘म्युरल आर्टिस्ट’ आहे. जगातल्या अनेक भिंतींवर तिने आपल्या चित्रांच्या रंगकामाचा ठसा उमटवला आहे.

वैद्याकीय शास्त्रामध्ये लिंगबदलाची प्रक्रिया सोपी होत गेली असली, तरी समाजामध्ये अशा व्यक्तींना सहज मान्यता मिळत नाही. जन्माला येताना जे शरीर, जे लिंग आपणास मिळाले ते मुकाटपणे मान्य करून जगावे अशी अपेक्षा असते. काहीसे हे धर्म, जातीसारखेच आहे. मुलगी असताना मुलगा बनण्याची अपेक्षा करणे किंवा मुलगा असून मुलीसारखे वागणे हे म्हणजे भयंकरच. खरं तर भारतीयांना तृतीयपंथीय व्यक्ती आणि त्यांचे समूह ही संकल्पना नवीन नाही. परंतु ते स्वत:चे गट करून मुख्य समाजापासून दूर राहतात. आजही अनेकांना भीक मागणे, समाजात कुणाचे लग्न किंवा घरी बारसे असल्यास त्यांच्या घरी नाचणे, नाहीतर वेश्या व्यवसाय करणे यापलीकडे उपजीविकेचे फार मार्ग उपलब्ध असतातच असे नाही.

संपूर्ण समाज स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांमध्ये विभागलेला असताना ‘इंटरसेक्स’ अथवा ‘तृतीय लिंगी बाळां’ची आणि त्यांच्या पालकांची विचित्र कोंडी होते. जर दोन्ही लिंगांचे अवयव घेऊन एखादे बाळ जन्माला आले, तर डॉक्टरच घाईघाईने त्याचे ऑपरेशन करून त्याला मुलगा अथवा मुलगी बनवून टाकतात. समजा योनी आणि शिश्न दोन्ही आहे, अशा बाळाचे शिश्न कापून टाकले आणि त्याला मुलगी बनविले, पालकांनी त्याला मुलगी म्हणून वाढविलेदेखील. पण त्याला मनातून आपण मुलगा आहोत, असे वाटत राहिले तर? त्याची किती कुचंबणा होत असेल? किंवा आपण दोन्ही आहोत, दोन्ही अनुभव आपल्याला जाणवतात, असे वाटणारी एखादी व्यक्ती असेल तर समाज आणि वैद्याकीय यंत्रणा मिळून हे मुळीच चालणार नाही, असे का बरे ठरवत असते? आपल्याला एक धर्म, एक जात, एक देश, एक भाषा अशा प्रकारची ओळख आणि बांधिलकी सर्वसामान्य वाटते त्यामुळेच असेल कदाचित अनेक प्रकारच्या ‘आयडेंटिटी’ असलेले लोक अनेकांना विचित्र वाटतात. आणि जी गोष्ट अनोळखी दिसते, जी संकल्पना सहज समजू येत नाही ती भीतीदायक वाटण्याची प्रवृत्ती सर्वच प्राण्यांमध्ये असते.

जगभरात नैसर्गिकरीत्या १.७ टक्के तृतीयलिंगी जन्माला येतात. भारतात यांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. आई-वडिलांनी झिडकारले आणि समाजाने लाथाडले अशा परिस्थितीत हे लोक जगतात, किंवा मन मारून एक तर पुरुष नाही तर स्त्री बनून राहतात. भारत सरकारने ‘ट्रान्सजेंडर पर्सन्स अॅक्ट २०१९’ पारित करून मानवी आणि नागरिकत्वाचे अधिकार त्यांना देऊ केले आहेत. नोकरी, शिक्षण, वैद्याकीय आणि इतर सेवा यामध्ये भेदभाव करणाऱ्यांना शिक्षा, तसेच शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये २ टक्के राखीव जागा अशा तरतुदी या कायद्याने आणल्या. तरी महत्त्वाचे मुद्दे राहून गेले. एक म्हणजे, जिल्हा पातळीवर तपासणी समिती, म्हणजे सरकारी अधिकारी आणि डॉक्टर ठरवणार कोण ‘खरे’ ट्रान्सजेंडर आहे. दुसरे म्हणजे सवलती मिळण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करावी लागणार. ही मोठी कठीण खर्चीक शस्त्रक्रिया असते. त्यानंतर अनेक महिने रिकव्हरीसाठी लागणार, हार्मोन्स इंजेक्शन लागणार. या सगळ्याची कायदेशीर जबरदस्ती होऊन बसते आणि तिसरी गोष्ट म्हणजे, राखीव जागांमध्ये जातीनिहाय वाटप नाही. त्यामुळे ‘दलित ट्रान्स’ना ‘उच्च जातीय ट्रान्स’शी स्पर्धा करावी लागणार, आणि नोकऱ्या मिळण्याची शक्यता मंदावणार. आपल्याकडे कायदेशीर, सामाजिक पातळीवर मोठी लढाई अजून बाकी आहे.

युरोपमध्ये याबाबतीत सुधारणा दिसते. एकेकाळी इथल्या अनेक देशांमध्ये ‘गे’ लोकांना तुरुंगात टाकत असत. जर्मनीमध्ये तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू आणि कम्युनिस्टच नव्हे, तर समलिंगी लोकांनाही मारून टाकण्यात आले होते. आता मात्र ‘प्राइड परेड’ सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते. ‘एलजीबीटीक्यू…’ आणि ट्रान्स कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. समाजातही मान्यता वाढत चालली आहे.

मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या एका मित्राला १५ वर्षांनी भेटले. गप्पा मारताना त्याला विचारले, ‘‘दोघी मुली कशा आहेत?’’ तो म्हणाला, ‘‘चार वर्षांची अलेक्झांड्रा तुला आठवत असेल. आता ती अॅलेक्स आहे. तो आता कॉलेजमध्ये जातोे.’’ त्याने एवढंच सांगितलं आणि जेव्हा अॅलेक्स समोर आला तेव्हा मी ते लक्षात ठेवले असल्याने अवघडलेपणाचा प्रश्नच आला नाही. चेहरा तसाच सुंदर होता, पण कपडे, केस, हालचाली पुरुषी बनल्या होत्या. ते चौघे अनेक आठवडे युरोप फिरणार होते. एकमेकांशी अत्यंत प्रेमाने, मिळून-मिसळून वागत होते. मला खूप आनंद झाला. इतकी मोठी गोष्ट या लोकांनी किती छोटी, सहज करून टाकली होती.

मला आठवले, याच वयातली माझी विद्यार्थिनी अचानक काही वर्षांनी समोर आली आणि म्हणाली, ‘प्रोफेसर मी आता अनुश्री नाही, फक्त अनु आहे. मला ‘ती’ नाही ‘तो / ते’ म्हणा.’ मी म्हटले, ‘‘बरे बाई.’’ तरी रोजची सवय जाते थोडीच. मी प्रयत्न आणि चुका करत राहिले. त्याच्या घरातून विरोध होता. त्यामुळे अनु मनातून दु:खी असायचा आणि डिप्रेशनच्या गोळ्या खायचा. आता मी तिच्या पालकांना अॅलेक्सची कथा सांगेन.

पण पुढची पिढी नेहमीच अधिक हुशार निघते. पालकांना बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. एकदा मी आणि माझी आठ वर्षांची मुलगी गाडीतून जात असताना सिग्नलला थांबलो. एक तृतीयपंथी बाजूने गेल्यावर मी तिला म्हणाले, ‘इनाया, ही एक ट्रान्स व्यक्ती आहे.’’ ती म्हणाली, ‘‘मला माहिती आहे. तो आधी मुलगा होता, पण त्याला मनातून वाटत होतं की ती मुलगी आहे. म्हणून ती आता मुलगी बनली.’’ मी म्हटलं, ‘‘बाप रे तुला कसं माहिती?’’ तर नेहमीचे उत्तर आले, ‘‘मी वाचलं ना.’’ कसलेही प्रश्न, शंका नाहीत. केवळ वास्तविक माहिती. माझ्या मैत्रिणीची मुलगी तिला म्हणाली, ‘‘आपल्याकडे सर्व प्रकारच्या बाहुल्या आहेत. ट्रान्स बाहुली का नाही?’’ वय वर्षे दहाच्या आतल्या या मुली पीएच.डी. झालेल्या आपल्या आईपेक्षा किती हुशार, समजूतदार. मुलांना शिकवायचा नाद सोडून मुलांबरोबर वाढलो, तर सर्वांचीच प्रगती होईल, आणि समाज किती सहिष्णू बनेल, नाही?

(लेखिका कायद्याच्या प्राध्यापक असून ‘हंबोल्ट स्कॉलरशीप’साठी सध्या त्यांचे बर्लिन येथे वास्तव्य आहे.)

sameenad@gmail.com