भारती महाजन-रायबागकर
‘‘आलेच दोन मिनिटांत. अगं हो, येते लगेच. हो, झाला बाई जरासा उशीर… आता तू फोन ठेवलास तर मला पटकन येता येईल नं…’’काय बाई या मैत्रिणी… आज जमणार नाही म्हटलं त्यांच्याबरोबर खरेदीला जायला, तर ऐकायलाच तयार नाहीत, म्हणे आम्हाला तुझ्या आवडीनेच साड्या घ्यायच्यात. मग काय करणार? मन कसं मोडणार मैत्रिणींचं? त्यांच्यामुळेच तर झालंय, माझं इथलं वास्तव्य अगदी सुखकर, आनंदी… नाही तर इथं अगदी दूरच्या परभाषिक द्रविड तमिळनाडू प्रांतात राहायची काळजीच वाटत होती. मी म्हणूनही दाखवलं होतं तसं, पण त्यावर सूनबाई म्हणते कशी, ‘‘अहो आई, एकदा आमच्याबरोबर चला तर खरं. नाही आवडलं तुम्हाला तर बघू पुढे काय करायचं ते. पण तुम्हाला आवडेलच, खात्री आहे मला…’’
‘‘अगं आई, अधूनमधून येत जा तुम्ही दोघं इथं, विमानानेच तर यायचं-जायचं. मग तर झालं?’’ लेकाची पुष्टी. ‘‘आज्जी… मला गोष्ट कोण सांगणार?’’ नातवाचं आर्जव.
ते तिघंही नातवाच्या शाळेच्या प्रवेशासाठी दोन महिन्यांपूर्वी इथं येऊन गेले होते आणि जिथं घर घ्यायचं ती सोसायटी पाहून गेले होते. शिवाय ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाया वैसा’ हा माझा स्वभाव माझ्या पूर्वायुष्यातले अनुभव ऐकून त्यांना ठाऊक झाला होता. ‘‘अरे, पण आपलं हे हौसेनं बांधलेलं मनासारखं घर, ही मेहनतीनं फुलवलेली बाग, आमची मित्रमंडळी, नातेवाईक, किती तरी आठवणी गुंतलेल्या आहेत इथं. हे सगळं सोडून कसं रे यायचं तुमच्याबरोबर? तुमचं ठीक आहे, तुम्हाला बदली झाली तर जावंच लागणार…’’
आमच्यासमोर बरीच वर्षं वास्तव्य केलेलं छत्रपती संभाजीनगर किंवा आधारस्तंभ असलेलं माझं नाशिकचं माहेर असे दोन पर्याय होते. पण लेक-सुनेला तेही मान्य नव्हतं.‘‘आम्ही असताना तुम्हा दोघांना सोडून आम्ही तरी का जायचं तिथं? किती काळजी वाटेल आम्हाला. चटकन येताही येणार नाही, काही अडचण आली तर…’’ आणि मलासुद्धा माझ्यापेक्षाही यांची काळजी जास्त वाटत होती. मुलांना जर तिथं मित्र नाही मिळाले तर? त्या तमिळ भाषिकांसमवेत कसा मेळ जमेल? आधीच शांत आणि मितभाषी स्वभाव असणारे हे एकलकोंडे तर नाहीत ना होणार? एवढी प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे, आता इतक्या वर्षांनंतर हा संवाद आठवला की हसू येतं.
चेन्नईला येण्यासाठी आम्हाला अखेर पांढरं निशाण दाखवावं लागलं होतं. विमनस्क मनानं सामानाची बांधाबांध करत होतो. अधूनमधून मनाला समजावतही होतो. आता जायचं ठरलंय ना, तर मग आनंदानंच जाऊ. पर दिल है की मानता नही… अशीच मनोवस्था होती. मग काय, पोहोचलो एकदाचे इथं. सकाळ झाली. जरासा फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि हिरवागार परिसर, नेटकी सोसायटी, जवळच छोटंसं रेल्वे स्टेशन, लगतचं छानसं तळं आणि त्यात फुललेली कमळं. शहरातील घरातून क्वचितच, पण इथल्या घरातून रोज दिसणारा सूर्योदय. मन प्रसन्न झालं अगदी. संध्याकाळी सोसायटीच्या बागेत गेले. संथ पावलांनी रमत-गमत स्थानिक ललना-बालकांचं निरीक्षण करत चालले होते. इतक्यात पाठीमागून कुजबूज ऐकू आली.
‘‘नवीन दिसताहेत, आपल्यासारख्याच वाटतात…’’
‘‘आपल्यासारख्याच…?’’ मी गर्रकन वळले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले.
‘‘नमस्कार…! कालच आलोय इथं राहायला.’’ आमच्यात संवाद सुरू झाला आणि त्या दिवसानंतर कळलंच नाही कधी हा ओळखीचा सिलसिला जिवलग मैत्रीच्या धाग्यात बांधला गेला ते. आणि आता तर छंदच लागला या मैत्रीच्या साखळीत एकेक कडी जोडण्याचा. जरासे इथल्यापेक्षा वेगळे, आपल्याशी साम्य असलेलं वाण दिसलं रे दिसलं की समोर जाऊन उभं राहायचं आणि विचारायचं, ‘‘मराठी आहात…?’’
‘‘नाही, हिंदी…!’’
‘‘चालतंय की…’’ संवाद साधण्याशी मतलब… आणि मग काय विचारता, असा मस्त ग्रुप जमला आमचा. सगळ्या सोसायटीत चर्चा. प्रभातफेरी, सायंमैफील, लहान-मोठ्या सहली, जुने-बैठे खेळ, सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग, फोटो, आणि काय काय… बालपण आठवावं, अशी धमाल आणि फोनवर या सगळ्यांचं उत्साहानं वर्णन केल्यावर जुन्या सख्यांची लाडिक तक्रार ‘‘आम्हाला विसरलीस हं तू…’’ आमचा हा प्रौढ मैत्रिणींचा ग्रुप पाहून इथं राहावं लागणार्या तरुण मैत्रिणीसुद्धा म्हणाल्या, ‘‘काकू, आता आम्हीसुद्धा आमच्या पालकांना इथं बोलावू शकतो. नाही तर ते इथं यायला तयारच नसतात आणि आले तरी लगेचच परतीचं तिकीट काढूनच येतात.’’ किती मोठी पावती होती ही…!
सुदैवाने यांनाही इथं मित्रांचा सहवास लाभला आणि माझी काळजी मिटली. करोनाच्या साथीनंतर काही मैत्रिणी इथून निघून गेल्या, पण पुन्हा पहिलाच फंडा वापरून नवीन मैत्रिणी मिळवल्याच आणि हो, चेन्नईला मुक्कामाची सोय होते आणि कधी कधी घरच्याच गाइडचीही म्हणून स्थळदर्शनाच्या निमित्ताने होणारी पाहुण्यांची हवीहवीशी वर्दळ, आजूबाजूची प्रेक्षणीय, निसर्गरम्य स्थळं पाहण्याची जमून आलेली पर्वणी त्यामुळे इथलं वास्तव्य खरोखरंच सुखदायी ठरलं. आणखी एक गंमत सांगायचीच राहिली, माझ्या स्वलिखित साहित्याखाली माझं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पाहून डिजिटल समूह माध्यमांवरील अनेक मराठी समूहप्रमुखांनी मला आपणहून आपल्या समूहात सामील केलं. कारण एकच, हिमाचल ते कन्याकुमारी सदस्य असल्याचा, ‘अखिल भारतीय’ नाव सार्थ ठरल्याचा अभिमान… माझ्या साहित्याच्या गुणवत्तेपेक्षा स्थळमाहात्म्य वरचढ ठरतं हे पाहून मजा वाटली.
आता माझा चेन्नईचा मुक्काम संपला तर…? हा विचार मनात आला आणि उमगलेलं एक सत्य, शक्य असेल तर, जुन्या आठवणींना अट्टहासानं कवटाळून जगण्यापेक्षा त्यांना जोडाव्यात नवीन आठवणी. वाढवावा आपला मैत्रीचा परीघ. जोपासावेत जुने छंद. नातं जोडावं नवीन छंदांशी… मग आयुष्य होतं सुखकर, सुसह्य… सर्वांसाठीच…!
‘‘आई, कळलंच नाही ना… नाही नाही म्हणता म्हणता इथं किती छान रमलात तुम्ही ते…’’ असं म्हणताना लेक-सुनेने सोडलेला समाधानाचा सुस्कारा आणि ते पाहून आपल्या चेहर्यावर उमटलेलं मंद स्मित… सगळं सगळं आठवलं…
(आता चेन्नई सोडताना वाटलेल्या संमिश्र भावनांच्या पार्श्वभूमीवर मनातलं आठवांचं हे मोरपीस कागदावर उमटवलं एवढंच…)
