किन्नरी नेरुरकर
बाल लैंगिक शोषणाच्या घटना वारंवार समोर येत असताना ही चर्चा बहुतांश वेळा गुन्हा, आरोपी आणि शिक्षेपुरतीच मर्यादित राहते. मात्र, या घटनेचा आयुष्यभर परिणाम भोगणारं पाल्य आणि तितकाच गंभीर मानसिक आघात सहन करणार्या त्याच्या पालकांना त्यांचं ‘ऐकणारं’ कुणीतरी हवं असतं, कारण न्याय मिळाल्यानंतरही या आघाताचे व्रण कधी पुसले जात नाहीत. म्हणूनच महत्त्वाचा असतो तो निरागस बालपणाच्या पुनर्संचयाचा प्रवास. पालकांची सजग भूमिका, समुपदेशनाचं महत्त्व आणि मुलांना पुन्हा आनंदी जीवनाची, सुरक्षिततेची भावना देण्यासाठीच्या प्रक्रियेचा हा प्रवास असतो, तो प्रवास समजून घ्यायला हवा…
समाजात घडणार्या काही घटना कधी कधी आपल्याला इतक्या अस्वस्थ करतात की, त्या फक्त बातम्यांपुरत्या किंवा ज्या कुटुंबात घडल्यात त्या कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या घटनांकडे आपण अधिक संवेदनशीलतेने, सहानुभूतीपूर्वक पाहायला लागतो. गेल्या कित्येक दिवसात मन उद्विग्न करणार्या अशा घटना सातत्याने समोर येतायत, पण नसरापूरच्या बालिकेच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावल्याची बातमी समोर आली तेव्हा एक नागरिक आणि एका मुलीची पालक या नात्याने फार फार दिलासा मिळाला.
ही घटना घडली तेव्हापासून या घटनेविषयीच्या बातम्यांचा पाठपुरावा करत होतेच, पण सहानुभूतीच्या पलीकडे जात मनाला काही प्रश्न सतावत होते, ही साडेतीन वर्षांची पीडित मुलगी आज हयात नाही, पण तिचे पालक कसं सावरतायत स्वत:ला? वेळोवेळी तिच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसणारा इतका संयतपणा कुठून आला असेल त्यांनी? लहान मुलीवरील बलात्काराचं हे प्रकरण गंभीर आहेच, पण बाल लैंगिक शोषणाची बळी ठरलेल्या कित्येक लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा या आघातानंतर मानसिकदृष्ट्या पुन्हा उभं राहण्याचा प्रवास किती वेदनादायी असेल? आपलं मूल अशा शोषणाचा बळी ठरत असेल तर पालकांची भूमिका काय असायला हवी? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेताना काही निष्कर्ष समोर आले.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी ) २०२४ नुसार देशभरात लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणात १.८७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६९,१९१ प्रकरणं पॉक्सो (POCSO) अंतर्गत नोंदवली गेली. याच विषयाच्या अनुषंगाने आणखी तपशिलात गेल्यावर समोर आलेल्या माहितीने पालक म्हणून आपण किती सजग असायला हवं, आपली मुलं खरंच सुरक्षित वातावरणात वाढतायत ना? याकडे किती जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं, याचं भान आलं. ‘इंडियन जर्नल ऑफ सायकॉलॉजिकल मेडिसिन’ कडून ६ ते १७ वयोगटातल्या ‘पॉक्सो’ अंतर्गत नोंद झालेल्या १०० मुलांच्या केलेल्या अभ्यासात असं आढळलं की, त्यापैकी ५३ टक्के मुलांना किमान एक मानसिक आजार होता. २८ टक्के मुलांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) म्हणजेच आघातानंतरचा जाणवणारा तीव्र ताण होता, १७ टक्के मुलं नैराश्याने ग्रस्त होती, २१ टक्के मुलांमध्ये वर्तनविषयक अडचणी दिसल्या आणि १२ टक्के मुलांच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार आल्याची नोंद त्यांनी केली होती.
‘अज्ञान’ बालकांविषयीचे हे तपशील पालकांसमोर काही प्रश्न ठेवतात. आपलं मूल कधी लैंगिक शोषणाचं बळी ठरलं, तर पालक या नात्याने आपली भूमिका काय असायला हवी? या परिस्थितीत लहान मुलांचं भावविश्व कसं समजून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना सावरायचं कसं? याची उत्तरं शोधण्यासाठी बाल लैंगिक शोषण झालेली लहान मुलं आणि पालकांचं समुपदेशन करणार्या मानसोपचारतज्ज्ञ सायली रसाळकर यांच्याशी बोलले.
त्यांच्या मते, ‘‘लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवेल असा बदल होतो तो म्हणजे त्यांच्या भावनिक वर्तणुकीत होणारा बदल. अशा मुलांच्या दररोजच्या जगण्यात अचानक भीती येते. नवीन माणसं, नवीन जागा, कधी कधी स्वत:चं घरही असुरक्षित वाटू लागतं. झोप उडते, भयानक स्वप्नं त्रास देतात. काही मुलं अबोल होतात, काही अतिशय चिडचिडी होतात, तर काहींच्या डोळ्यांत भकासपण जाणवतं. सर्वात वेदनादायक असतं ते म्हणजे, ‘चूक माझीच आहे’ अशी भावना त्यांच्या मनात घर करणं, ही अपराधीपणाची भावना इतक्या खोलवर रुजते, की त्यांचा इतरांबरोबरच स्वत:वरचाही विश्वास उडतो. वर्तनातील बदल हे या अशा घटनांचे पहिले संकेत असतात, पण आपण अनेकदा ते दुर्लक्षित करतो किंवा ते बदल म्हणून लक्षातच येत नाहीत. खेळकर मूल एकटं राहू लागतं, अभ्यासातून लक्ष उडतं, राग अनावर होतो. काही वेळा स्वत:लाच इजा करण्याची प्रवृत्ती दिसते, आतल्या वेदनेला बाहेर काढण्याचा हा एक असहाय प्रयत्न असतो.
या घटनांमध्ये त्यावेळची लहान मुलांची मनोवस्था काय असू शकते, हे जाणून घेण्यासाठी लैंगिक शोषण सहन केलेली माझी मैत्रीण गौरीशी (नाव बदललं आहे.) बोलले, ७-८ वर्षांची असताना मावस भावाकडून तिचं लैंगिक शोषण झालं होतं; पण आपल्यासोबत काय घडलं, हे तिला थोड कळत्या वयात आल्यावर समजलं. तेव्हापासून तिला या घटनेचा प्रचंड मानसिक त्रास व्हायला लागला. ही आठवण तिला आजही बोचत राहते. काही वर्षांपूर्वी तिने धीर करून वडिलांना आणि समुपदेशकांना याबाबत सांगितलं, तेव्हा इतकी वर्षं मनात दाबून ठेवलेल्या भावनिक आणि मानसिक जखमांचा निचरा झाल्याचं ती सांगते. गौरी म्हणते, ‘‘बाबांना हे सांगितल्यावर त्यांना त्यावेळी काही ठोस करता आलं नाही, पण ज्या विश्वासाने त्यांनी मला ऐकून घेतलं, ते मला खूप आधार देणारं होतं. आज मी माझ्या मुलाच्या बाबतीत म्हणूनच इतकी सजग झाले, मी त्याचं म्हणणं काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक ऐकते.’’
पालकांकडून स्वीकार
बाल लैंगिक शोषणाचा परिणाम फक्त त्या मुलांवर होत नसतो. अशा घटनेनंतर पालकांवरही प्रचंड भावनिक आघात होतो. आपल्या पाल्याबरोबर हे कसं घडू शकतं? हा पहिला प्रश्न त्यांना पडतो त्यामुळे अविश्वास आणि मानसिक धक्का ही पालकांची पहिली प्रतिक्रिया असते. त्यानंतर ‘आपण मुला/ मुलीला वाचवू शकलो नाही,’ या विचारामुळे तीव्र अपराधीपणाची भावना निर्माण होते. दोषी व्यक्तीविषयी राग असतो आणि असहायतेची भावना वाढीस लागते. अनेक पालकांना स्वत:लाच चिंता आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. कुटुंबात तणाव वाढतो, एकमेकांवर दोषारोप होतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी अनेक कुटुंबं गप्प राहतात, कारण अजूनही समाजात या विषयाकडे बंद दाराआडची गोष्ट म्हणूनच पाहिलं जातं.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पालक अशा मुलांबद्दल अति काळजीवाहू होतात, जे पाल्यांवर दडपण आणणारं ठरतं. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती आणि सततचा मानसिक ताण यामुळे पालकांचा मानसिक समतोल अनेकदा बिघडतो, असं समुपदेशकांच्या निरीक्षणातून दिसतं. जर घरात इतर भावंडं असतील, तर त्यांनाही दुर्लक्षित किंवा असमान वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांत राहून परिस्थिती हाताळण्याची पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं ते नसरापूरच्या पीडित मुलीचे वडील शुभम कुलकर्णीं यांचं. त्यांच्या मुलीविषयीची घटना निश्चितच इतर गु्न्ह्यांच्या तुलनेत गंभीर होती, त्यामुळे या पालक दाम्पत्यावर झालेला मानसिक आघात किती खोल असू शकतो याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. ते कसं सावरतायत स्वत:ला, या प्रश्नाचं शुभम यांनी जे उत्तर दिलं त्याने अनेक पालकांना अशा आघातातून सावरण्याची दिशा मिळेल, ते म्हणाले, ‘‘घटनेच्या सुरुवातीचे काही दिवस नक्कीच त्रासदायक होते, पण मुलीला न्याय मिळवून देण्याच्या एकाच उद्देशाने आम्ही जे घडलंय त्याचा आधी स्वीकार केला. हा ‘स्वीकार’ खूप महत्त्वाचा आहे.
आम्ही समुपदेशनाची मदत घेतलीच, पण त्याहीपेक्षा या सगळ्यातून सावरायला मला माझ्या जवळच्या माणसांचा खूप आधार मिळाला, पालकांनी त्यांच्या मुलांबाबतीत घडलेल्या घटना मोकळेपणाने संकोच न करता आपल्या जवळच्या माणसांशी, समुपदेशकांशी बोलायला हव्यात. आमची एक मुलगी या जगात नाहीये, पण दुसर्या मुलीला आम्हाला आयुष्यभर साथ द्यायचीय, या घटनेची तिला झळ बसू द्यायची नाहीये आणि त्यासाठीचे प्रयत्न आम्ही सुरू केलेत. आम्ही तिच्याशी सतत बोलतो, तिच्या बहिणीच्या बाबतीत नेमकं काय घडलंय, हे आम्हाला तिला स्पष्ट सांगता येत नाहीये पण तिची लहान बहीण जगात नाहीये याचा तिला हळूहळू स्वीकार होतोय, हे आम्हाला जाणवतंय. कारण तिच्याशी सतत होत असलेला संवाद. आपल्या पाल्यातले छोटे छोटे बदल टिपण्यासाठी पालकांनी मुलांशी बोलत राहायला हवं. समाजापेक्षा आपलं मूल महत्त्वाचं या एका भावनेतून लहान मुलांना आणि स्वत:लाही सावरता येऊ शकतं.
समुपदेशनातून पुनर्संचयाकडे…
या आघातातून बाहेर पडण्यासाठी स मुपदेशन कसं काम करतं, या संदर्भात ही प्रकरणं हाताळलेल्या मानसोपचारतज्ज्ञ ऐश्वर्या नाटेकर यांनी सांगितलं, ‘‘समुपदेशनाची सर्वात पहिली पायरी असते, ती या लहान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करणं. त्यानंतर आवश्यक असल्यास वैद्यकीय आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देणं महत्त्वाचं असतं. या प्रक्रियेत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून सर्वप्रथम पालकांना त्यांच्या स्वत:च्या भावनांची जाणीव करून देणं गरजेचं असतं. पालक भावनिकदृष्ट्या स्थिर असतील तर ते मुलांना अधिक सक्षमपणे आधार देऊ शकतात. म्हणून बाल लैंगिक शोषण झालेल्या मुलांच्या पालकांचं समुपदेशनही तितकंच महत्त्वाचं ठरतं. अनेकदा शोषण केलेली व्यक्ती ही नातेवाईंकांपैकी असते.
पालकांना याची माहिती करून दिल्यावर ‘‘आता आम्ही कटाक्षाने लक्ष देऊ…’’ असं पालक सांगतात, पण अनेकदा लहान मुलांना ती संबंधित व्यक्ती घरात आलेलीच नको असते. अशा वेळी पालकांना मुलांच्या बाजूने ठाम भूमिका घेण्यासाठी तयार करणं, मुलांची गरज त्यांना समजावून सांगणं, मुलांशी संवाद करताना कोणताही दोषारोप न करता, न्यायनिवाडा न करता त्यांच्या भावना ऐकून घेणं, कडेकोट संरक्षणात न ठेवता आधार देणारं वातावरण तयार करणं यासाठी समुपदेशनातून पालकांना तयार केलं जातं. तसेच लहान मुलांमध्ये पुन्हा विश्वासाचं नातं निर्माण करणं, त्यांच्या गतीने त्यांना बोलू देणं आणि त्यांच्या भावनांना मान्यता देणं यातून दीर्घकाळासाठी त्या घटनेतून बाहेर पडत ताण विकसित करण्यावर भर दिला जातो जेणेकरून मूल या अनुभवातून सावरेल,’’ असं सायली सांगतात.
‘‘समुपदेशनामध्ये ‘ट्रॉमा-फोकस्ड थेरपी’चा वापर केला जातो. लहान मुलांमध्ये ‘प्ले थेरपी’, ‘आर्ट थेरपी’ आणि ‘एक्सप्रेसिव्ह थेरपी’च्या माध्यमातून त्यांना सुरक्षित पद्धतीनं बोलतं केलं जातं. अपराधीपणा, लाज, राग या भावनांवर काम करता येतं. EMDR ( Eye Movement Desensitization and Reprocessing) सारख्या तंत्रांमुळे मुलांना त्या आघाताबद्दल बोलण्याची आणि त्याला स्वीकारण्याची क्षमता विकसित होते. दडपून ठेवलेला आघात मनावर अधिक खोलवर परिणाम करतो. योग्य समुपदेशनामुळे मुलांना हे समजण्यास मदत होते की हा एकच अनुभव त्यांच्या आयुष्याची ओळख नाही आणि म्हणूनच बाल लैंगिक शोषणानंतरचं समुपदेशन हे अत्यंत महत्त्वाचं असतं,’’ असं सायली आवर्जून सांगतात.
लहान मुलांचे मानसोपचार या संदर्भातलं भारतातलं वास्तव मात्र निराशाजनकच आहे. ‘युनिसेफ इंडिया’ (२०२५) च्या अहवालानुसार अनेक लहान मुलांना मानसोपचार मिळतच नाहीत. यामागे प्रशिक्षित बाल मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता, तक्रार नोंदवण्यास होणारा विलंब, कुटुंबीयांना वाटणारी भीती, ग्रामीण भागातील सेवांचा अभाव आणि न्यायव्यवस्थेतील अडथळे ही कारणं आहेत. याच अहवालानुसार भारतात ७० ते ८० टक्के लहान आणि किशोरवयीन मुलांना मानसिक आरोग्य सेवा मिळत नाहीत. म्हणजेच, ज्या मुलांना मानसोपचारांची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत ती पोहोचतच नाही. लैंगिक अत्याचारग्रस्त मुलांच्या बाबतीत ही दरी आणखी खोल आहे.
या सर्व विषयाकडे पाहता, बाल लैंगिक शोषणानंतरचं समुपदेशन, पालकांची आधाराची भूमिका, पालकांनी आघातातून सावरणं यातून ही केवळ उपचार प्रक्रिया राहत नाही तर ती पुनर्संचयाची सुरुवात ठरते. लहान मुलांना पुन्हा सुरक्षित वाटेल असं वातावरण आपण तयार करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला दोषमुक्त करणं, हे या प्रक्रियेचे केंद्रबिंदू आहेत. म्हणूनच लहान मुलांच्या अव्यक्त विश्वात पालक, कुटुंब आणि समाज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ही लहान मुलं आपल्या अंगणात पूर्वीच्याच निरागसतेने, आनंदी मनाने बागडायला हवी असतील, तर पालक आणि समाज या नात्याने आपण अधिक संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार होणं ही काळाची गरज आहे.
अलीकडचे तरुण पालक जोडपी जे दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्या प्रत्येकाने आपल्या पाल्याचं बालपण भौतिकदृष्ट्या समृद्ध करत असतानाच त्यांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि विश्वासाचं वातावरण मिळेल, यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हेच त्यांच्याप्रति असलेलं सजग पालकत्व आहे.
kinnari.nerurkar@expressindia.com
