scorecardresearch

भोगले जे दु:ख त्याला – घाणीतच जगायचं नि घाणीतच मरायचं?

सार्वजनिक संडास साफ करणं हे तिचं काम. रोजच्या रोज येणारे असहय़ अनुभव सहन करायला तिला ताकद मिळते ती 'कशासाठी पोटासाठी' या मंत्राची. वाचतानाही अंगावर काटा येणारे अनुभव तिला रोज घ्यावे लागतात. तरीही ती जगते आहे, समाजाची घाण उपसते आहे, त्या …

सार्वजनिक संडास साफ करणं हे तिचं काम. रोजच्या रोज येणारे असहय़ अनुभव सहन करायला तिला ताकद मिळते ती ‘कशासाठी पोटासाठी’ या मंत्राची. वाचतानाही अंगावर काटा येणारे अनुभव तिला रोज घ्यावे लागतात. तरीही ती जगते आहे, समाजाची घाण उपसते आहे, त्या मेहतर वैशालीचे हे अनुभव.

पहाटेचे पाच वाजलेत. बाहेर काळामिट्ट काळोख आहे. हजेरीसाठी ‘थंब’ मशीन लावलंय. मुकादम शिस्तीचा आहे. जरा उशीर झाला तर खाडा लावेल या भीतीने सायकल दामटली. पायांत गोळे आले; पण नशीब! सहा वाजता कामावर पोहोचले एकदाची! अ‍ॅसिड, फिनेल, झाडू उचलला आणि संडासाच्या दिशेने निघाले. भोवती सगळी झोपडपट्टी. पहिल्या संडासात डोकावले. आत अंधूक उजेड होता. दार लावलेलं. ठोकलं, ‘‘चला, आवरा लवकर!’’ आतला माणूस लगेच बाहेर आला नि जोरात टमरेलच मारलं डोक्यावर! ‘‘xxx दम नाही का बाहेर येईपर्यंत!’’ म्हणत तरातरा निघून गेला.   
मस्तकात कळच गेली. तिरमिरीत डोकं धरून त्या घाणीतच फतकल मारली. जरा वेळाने उठले. कोणी बघितलं आणि तक्रार केली मुकादमला तर लगेच खाडा लावायचा. गेल्या आठवडय़ात एकच दिवस आले नाही तरी चार दिवस खाडा लावला आणि पैसे कापले. हप्ते देत नाही ना त्याला! त्याचा खुन्नस काढतो. जाऊ दे. उद्या वॉर्ड ऑफिसरसमोर उभं केलं तर नोकरी जायची. त्यापेक्षा गप्प बसावं ते बरं!
मी उठून संडास साफ करायला आत गेले, तर एका म्हातारीने पार दरवाजापासून घाण करून ठेवली होती. भिंतीवरही विष्ठा होती. जागोजागी मशेरी लावून थुंकलेलं होतं. मागून एक जण टमरेल घेऊन आली. दरडावून म्हणाली, ‘‘भाभी, ती भिंत नीट साफ कर आणि हो, या चिंध्या गोळा कर!’’ चिंध्या, फडकी, पॅड रक्ताने भरलेल्या. त्यांना भयानक दरुगधी येत होती. आठवडा झाला मास्क नाही मिळालेले. कचराकुंडय़ाही कमी केल्यात. सकाळच्या प्रहरी रस्त्यावर पेपर वाचत उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावरून तिथवर जाताना उघडय़ा बादलीतले ते अस्वच्छ पॅड्स बघून पुरुष उगाचच खाकरतात. ओशाळं वाटतं म्हणून त्या पॅड्सना हातानेच दाबलं खाली. त्याच्यावर माती, कचरा टाकून ते झाकून टाकलं आणि आले टाकून ते सगळं कचराकुंडीत! अशी कशी ही माणसं? स्वत:ची घाणसुद्धा धड साफ करत नाहीत.
  काल पुरुषांच्या टॉयलेटच्या खिडकीत दारूची बाटली होती. टाकायला गेले, तर त्यात कोणी तरी लघवी भरलेली होती. ती अंगावर सांडली. अंगावर काटा आला. आज पुरुषांचं टॉयलेट पुन्हा तुंबलंय. ते काढणाऱ्यांना निरोप दिलाय, पण ते काही चार दिवस येणार नाहीत. शेवटी भिंतीपलीकडे गेले. सळई ठेवलेय तिथे. ती घुसवली. खराटय़ाने घाण बाहेर ओढली आणि डोक्याला हात लावला. अहो, काय नव्हतं त्यात? वापरलेले घाणेरडे निरोध, गुटखा-तंबाखूची पाकिटं, नशाच्या पुडय़ांची पाकिटं, विटांचे तुकडे आणि दारूच्या बाटल्यासुद्धा आतच कोंबलेल्या! लोक सगळं नको ते खातात, त्यामुळे विष्ठेला असा दर्प येतो की भडभडून उलटीच येते.
 आज हगणदारी साफ करायचा दिवस! नकोच वाटतो तो! झोपडपट्टय़ांमध्ये मुलांना बाहेर संडासला बसवतात. बादलीत माती घेऊन जायचं. त्यावर ती माती टाकायची. बरेचदा उन्हाने सुकून विष्ठा कडक झालेली असते. ती खराटय़ाने खरवडायची. नाहीच निघाली तर सरळ हाताने उचलून बालदीत भरायची. ती खरवडताना इतकं वाकावं लागतं की, त्या विष्ठेचा घाण वास नाकात जातो. पावसाळय़ात उलटी परिस्थिती. पावसाच्या पाण्याने वाहून आलेल्या घाणीत उभं राहूनच सगळं साफ करायचं. शेवटी पावसाळा काय, उन्हाळा काय.. सगळे दिवस घाणीतच सरायचे आमचे!
दुपारी एकची शिफ्ट संपली आणि संडासच्या पायरीवर ठेवलेला घरून आणलेला डबा उचलला. पोटात भुकेने आग पडली होती. पहाटेपासून कपभर चहावर काम करत होते. तिथेच संडासच्या पायरीवर बसकण मारली. संडासच्या वासाबरोबर डब्यातली कोरडी पोळीभाजी पोटात ढकलली. अन्नाला चव असते म्हणतात. मला कधी लागलीच नाही ती चव! तरी आता निदान पोटात अन्न पोटात तरी जातंय. मेहतर म्हणून काम मिळालं त्याचं नेमणूक पत्र हातात पडलं तेव्हा कळेना, हसावं की रडावं? चांगली दहावी पास मुलगी मी! टायपिंग शिकलेली. टय़ूशन्स घेणारी, पार्लरचा कोर्स केलेली. नागरवस्ती विकास योजनेत उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार मिळवलेला! सगळं सगळं गेलं मातीत! मेहतर जातीत जन्माला आले. शिकले, सवरले. वाटलं, आपल्याला नाही करावं लागणार हे काम. कसलं काय? सोळाव्या वर्षी आईने लग्न उरकलं. सासू अर्धवट होती. तिने बाहेरच्या खोलीत लघवी, संडास करून ठेवला होता. ते साफ करायला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हातात झाडू घेतला तो कायमचा! आधी घरच्यांची घाण काढली, आता दुनियेची घाण काढते. नशीब दुसरं काय? बरं, नवरा तरी धड मिळावा? तोही ऐदी, आळशी, संशयी. घरात दोन-दोन दिवस चूल पेटायची नाही. शेवटी गावाबाहेरचा घाणीचा ढिगारा उपसून त्यातून लाकूडफाटा, भंगार गोळा करून विकायला लागले. शहरात वाढलेली, शिकलेली मुलगी मी! त्या घोंगावणाऱ्याा माशा मारत घाणीच्या ढिगाऱ्यावर उभी राहिले तेव्हा रडूच कोसळलं मला! तशातच दोन बाळंतपणं झाली. मरायला टेकले तेव्हा आईने शहरात आणलं. हे मेहतरचं काम मिळवून दिलं. पगार बरा मिळतो, पण किंमत शून्य! फार वाईट वागतात लोक हे असलं काम करते म्हणून! कुणी साधा जेवणाचा डबा, पिशवीसुद्धा घरात ठेवू देत नाही, की जवळपास फिरकत नाही. बोलणार तेही लांबून! बाजूने जाणार तेही अंग चोरून! अरे, तुमचीच घाण साफ करतो ना आम्ही?
पहिल्या दिवशी कामावर गेले तेव्हा संडासातले ते घाणीचे ढीग बघून पळून जावंसं वाटलं? हे काम करू, की सोडून देऊ या विचारांत किती तरी वेळ नुसती उभी राहिले; पण डोळय़ांसमोर उपाशी पोरांची केविलवाणी तोंडं आली. मग मन घट्ट केलं, नाक दाबलं आणि उचलला खराटा! दिवसभर संडास साफ केले. घरी गेले. किती तरी वेळ अंग घासून आंघोळ केली तरी सारखं वाटत होतं, ती सगळी घाण अजून हातांना लागतेय. नाकांत तोच दर्प! आईने पुढय़ात ताट ठेवलं. ताटातला वरणभात पाहिला आणि सारखं तेच डोळय़ांसमोर यायला लागलं. ताटावरून उठले आणि मोरीत जाऊन भडाभडा उलटी केली. पोरांना पोटाशी घेतलं आणि ढसाढसा रडले.
 परवा पोरीचा रिझल्ट लागला. तीन विषयांत नापास! मी सकाळी लवकर कामावर जाते. मुलाला उठवून नवरा वेळेवर शाळेत पाठवत नाही. रोज त्याचा पहिला तास बुडतो. शेवटी दोघांना समोर बसवलं आणि सांगून टाकलं, तुमच्या भविष्यासाठी मी हे काम करतेय. पहाटे चारला उठून डबे करते. दिवसभर कष्ट करते. तुम्ही तरी मला निराशा देऊ नका बाळांनो! अरे घरात, बाहेर काय काय सहन करायचं मी?  बाहेरचं जग फारच वाईट. गेल्या आठवडय़ातली गोष्ट! एक माणूस नागडा संडासात काळोखात आडोशाला उभा राहायचा. विचारायचा येतेस का माझ्याबरोबर? बदनामीच्या भीतीने चार दिवस गप्प बसले. मग मुकादमाकडे तक्रार केली. आणखी एक जण, पहाटे काळोखात माझा पाठलाग करत असे. एक दिवस सायकल थांबवून असा सडकून मारला चपलाने की बस्स! मजबुरी आहे म्हणून हे काम करतो म्हणजे आम्हाला काय किंमत नाही? कसंही वागायचं? पुरुषांची मुतारी साफ करायला गेलं, की मुद्दाम लघवीला उभे राहतात. आपण वाकून संडास धूत असलो, की पुरुष मुद्दाम धक्का मारून आत शिरतात. मग मेहतर बायका घालतात शिव्या! पण काय उपयोग? उद्या परत इथेच यायचंय.
 उन्हाळय़ात सफाईला पाणी नसतं, तर आम्ही काय करणार? लोक आम्हालाच शिव्या घालतात, तक्रार करतात. काही वेळा संडासाखाली चेंबरसारखी पाण्याची टाकी असते. त्याचं झाकण उघडून बादलीला दोरी लावून आत सोडावी लागते आणि त्यातून पाणी काढावं लागतं. हात भरून येतात; पण कोणी मदतीला येत नाही. एकदा तर अ‍ॅसिड टाकलं, त्याच्या धुराने कोंडले, हातपाय भाजले; पण कुणी पेलाभर पाणी पाजलं नाही, की घरात घेतलं नाही. तशीच किती तरी वेळ पायरीवर पडून राहिले. एकदा खूप तहान लागली म्हणून एका बाईच्या दारात गेले, तर वसकन अंगावरच आली. ‘‘एऽऽऽ दूर हो. ती देवाची खोली आहे. देवावर सावली पडेल तुझी. विटाळ होईल.’’ कमाल आहे! हिचं घर झोपडपट्टीत, संडासाला लागून! तो विटाळ नाही आणि तिची घाण साफ करणारीचा मात्र विटाळ! कोण म्हणतं समाजातली अस्पृश्यता संपलेय?
  रोज दहा कि.मी. सायकल चालवून पाय दुखतात म्हणून सेकंडहँड स्कुटी घेतली, तर राऊंडला आलेले साहेब फटकन बोलले, ‘‘गाडीवर फिरतेस? कामाची गरज नाही वाटतं तुला.’’ म्हटलं, ‘‘साहेब, घाम गाळून पैसे कमावते. xxx नाही करत!’’ गप्प बसले. एखाद्या दिवशी चांगले कपडे घातले, तर लगेच लोक बोलतात, ‘‘संडास धुणारी बाई आणि कपडे बघा!’’ म्हणजे जिंदगीभर आम्ही घाणीतच जगायचं आणि घाणीतच मरायचं का?
चांगलं जगण्याचा आम्हाला हक्क नाही ?    
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cleaning human scavengers