रेखा शहाणे
जागतिक तापमानवाढ हा जगासमोर उभा असलेला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्याचे परिणाम म्हणून पावसाची अनिश्चितता, ऋतूचक्रातले बदल, वितळणार्‍या हिमनद्यांमुळे समुद्राची वाढलेली पातळी, अचानक येणारी चक्रीवादळे, तीव्र उष्णतेची लाट किंवा मुसळधार पाऊस यासारख्या घटनांमध्ये होणारी वाढ आपणही पाहत आहोत. याच वातावरण बदलाविषयीचा इशारा देणारा सजीव सूचक निसर्गात अस्तित्त्वात आहे. तो म्हणजे आपल्या अवतीभोवती बागडणारी रंगीबेरंगी नाजूक सुंदर फुलपाखरं. त्यांना हवामान बदलाची- पर्यावरणीय बदलाची उत्तम निदर्शक मानली जातात.

आश्चर्य वाटलं ना? पण १९७०-८०च्या दशकात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की, फुलपाखरांच्या संख्येत, त्यांच्या दिसण्याच्या वेळांमध्ये, आणि त्यांचं अस्तित्व असणार्‍या भूभागात वेगाने बदल होतायत आणि हे बदल हवामान आणि पर्यावरणीय बदलाशी जोडलेले आहेत. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’, युरोपमधील ‘इकोलॉजिकल मॉनिटरिंग प्रोग्राम’, ब्रिटनमधील ‘दीर्घकालीन फुलपाखरांचे सर्वेक्षण तसेच ‘यूके बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम’ सारख्या प्रकल्पातून गोळा झालेल्या माहितीमुळे हे स्पष्ट होत गेलं की, फुलपाखरं ही परिसंस्थेच्या आरोग्याची निदर्शक आहेत. अर्थात त्या मानण्यामागे काही निरीक्षणे होती.

हवामान बदलामध्ये तापमान, पाऊस, आर्द्रता, ऋतूंचं बदलत जाणारं स्वरुप,वारे, इत्यादींचे दीर्घकालीन पॅटर्न (नमुने) लक्षात घेतले जातात व तापमानात झालेली वाढ, पाऊस व ऋतुमानात झालेले बदल या सगळ्याचा विचार केला जातो. त्यामधून लक्षात येत गेलं, की हवामान बदलाचा परिणाम फुलपाखरांच्या वितरणात म्हणजे ते जिथे आढळतात त्याच्या भौगोलिक व्याप्तीमध्ये, स्थलांतरात व त्यांच्या जीवनचक्रावरही होतो. हवामान बदल हा पर्यावरणाचा अविभाज्य भागच आहे. पर्यावरण म्हणजे कोणत्याही जीवाभोवती असलेली हवा, पाणी, माती, वनस्पती, इतर जीव असं सगळंच येतं. त्यात वाढतं प्रदूषण, सतत होणारी जंगलतोड, कीटकनाशकांचा अतोनात वापर यामुळे पर्यावरणाचा बेसुमार र्‍हास होतोय व त्या र्‍हासाबरोबर विविध वनस्पती वेगाने कमी होत आहेत. सर्वच प्राण्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. फुलपाखरांचे अधिवास याला अपवाद नाहीत.

करोना साथीतल्या टाळेबंदीच्या काळात सगळं मानवी जीवनच ठप्प होऊन गेलं होतं. गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. वाहनं ठप्प झाली होती. प्रदूषणाच्या पातळीत सकारात्मक बदल झाला होता. आता निसर्ग पुन्हा बहरू लागला होता. आपण घरबंदी झालो होतो आणि बाकी सगळे प्राणी, पशुपक्षी मोकळेपणाने बाहेर मस्त निर्धास्त फिरत होते. त्यावेळी फुलपाखरांच्या संख्येतही वाढ झाल्याचे अहवाल वाचनात आले होते. थोडक्यात, फुलपाखरं ही हवामानातील, पर्यावरणातील बदलांबाबत खूप संवेदनशील असतात. म्हणूनच ती पर्यावरण आरोग्याचं मूल्यमापन करताना महत्वाची निदर्शक मानली गेली आहेत.

एकतर फुलपाखरांचं आयुष्य खूप कमी असतं आणि प्रदूषण, हवामानातील बदल, तापमानातील चढउतार यांचा त्यांच्या जीवनचक्रावर म्हणजे अंडी, अळी, कोष व प्रौढ फुलपाखरू या चारही अवस्थांवर अतिशय जलद गतीने परिणाम होतो. त्यात त्यांचं आयुष्य दोन-चार आठवडे ते दोन- अडीच महिन्यांचं असतं. त्यांची पिढी फार पटकन बदलते. एका दशकातच त्यांच्या अनेक पिढ्या जन्माला येऊन जातात. त्यामुळे परिसंस्थेमधले, वातावरणातले सूक्ष्म बदलही त्यांच्या वावरात, हालचालीत, वर्तनात, स्थलांतरात, प्रजननामध्ये, त्यांच्या संख्येत, वितरणात लगेचच दिसू लागतात. फुलपाखरांच्या अधिवासाच्या निरीक्षणातून पर्यावरणामधील मोठ्या बदलांची चाहूल पर्यावरणतज्ज्ञांना लवकर लागते. तसेच फुलपाखरे प्रजातीनुसार विशिष्ट वनस्पतींवरच अंडी घालतात. वातावरणात थोडा बदल झाला किंवा कोणत्याही कारणामुळे आवश्यक वनस्पती नष्ट झाल्या, धोक्यात आल्या तर त्या त्या प्रजातींची संख्या रोडावते.

दुसरं असं, की फुलपाखरे ही ‘शीतरक्त कीटक’आहेत. म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानावर अवलंबून असतं. म्हणूनच तापमानातील बदल, ऊन, पाऊस, हवेतली आर्द्रता याचा परिणाम त्यांच्या हालचालींवर व प्रजननावर होतो. थोडक्यात काय तर, मानवी हस्तक्षेप, बेसुमार जंगलतोड आणि हवामान बदलांमुळे पर्यावरणाचा जो र्‍हास होतो त्याचा पहिला फटका इतर कोणत्याही जीवापेक्षा फुलापाखरांना सर्वात आधी बसतो. म्हणूनच एखाद्या भूभागात फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता व संख्या जास्त असेल तर तेथील हवामान, पर्यावरण नैसर्गिकदृष्ट्या अधिक संतुलित, आरोग्यदायी आहे, असं मानण्यात येतं. याशिवाय परागीभवन (Pollination) आणि इतर प्राण्यांसाठी अन्न साखळीमधला फुलपाखरं हा एक महत्त्वाचा दुवा आहेत. म्हणजे फुलपाखरं परिसंस्थेत महत्वाची भूमिकाही बजावतात.

अमेरिकेतील ‘kScience Journal March’ टं१ूँ 2025’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या सर्वात मोठ्या फुलपाखरांच्या अभ्यासामध्ये दिसून आलंय की, फुलपाखरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होतेय. पण हा प्रश्न फक्त अमेरिकेचाच नाही. जर्मनीमध्येही फुलपाखरे आणि पतंगांच्या (Lepidoptera) दीर्घकालीन अभ्यासातही त्यांच्या संख्येत तीव्र घट दिसून आली. यु.के.मधल्या ‘बग्ज मॅटर’ या ‘सिटीझन सायन्स प्रोजेक्ट’मध्ये उडणार्‍या कीटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, असं दिसतं.

भारतामध्ये मात्र वर्षानुवर्ष एकाच वैज्ञानिक पद्धतीने नियमित निरीक्षण नोंदी ठेवणारी व्यवस्था अनेक कारणांमुळे मर्यादित आहे. परंतु फुलपाखरांच्या संख्येत घट होत असल्याचे प्रादेशिक संकेत व अभ्यास मुख्यत: पश्चिम घाट, मलबार कोस्ट, अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागातून मिळतात व तेथील निरीक्षणांवर आधारित नोंदी उपलब्ध आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर अनेक वर्षांच्या सलग नोंदी मर्यादित असल्यामुळे देश पातळीवर भारतातील फुलपाखरांच्या संख्येबाबतचे नेमके निष्कर्ष आज काढता येत नाहीत.

फुलपाखरु संवर्धनासाठी काही वर्षांपासून आपल्याकडेही फुलपाखरू उद्यानं तयार होत आहेत. मर्यादित स्वरूपात ती उपयोगीही आहेत. केरळमध्ये थेन्मला ‘बटरफ्लाय सफारी’, ‘आरलम बटरफ्लाय कन्झर्वेशन एरिया’, महाराष्ट्रात ‘माहीम निसर्ग उद्यान’ व ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ अशा ठिकाणी फुलपाखरांच्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रीय आधारावर फुलपाखरांचे अधिवास पुनस्र्थापित करण्याचे प्रयत्न केले गेले ते महत्वाचे आहेत. फुलपाखरांचा अभ्यास करता करता फुलपाखरू उद्यान तयार करण्यामध्ये मीही कधी गुंतून गेले, ते मलाही कळलं नाही आणि हे मार्गदर्शन मी विनामूल्य करते. बाग तयार होते. फुलपाखरांनी ती आपलीशी केलेली पाहिली की मन हरखून जातं. पर्यावरण संवर्धनात अगदीच नगण्य तरी आपलाही हातभार लागतो असं उगाच किंचितसं कधी वाटतं, इतकंच. फुलपाखरांमागे फिरताना पुरेसं सजग असाल तर अनेक गोष्टी नजरेला पडतात. मग कुतूहल स्वस्थ बसू देत नाही. असा फुलपाखरांचा मोठ्या प्रमाणावरचा माझा अभ्यास, आमच्या हाऊसिंग सोसायटीतही झाला.

कुतूहलामुळे मग उत्क्रांतीच्या काळाचा वेध घेताना त्यांच्या संदर्भात भलत्याच गोष्टी ध्यानात आल्या. ‘टॉनी कोस्टर’ हे लहान ते मध्यम आकाराचं सुंदर फुलपाखरू आहे. सोसायटीमध्ये त्याची खाद्य वनस्पती टर्नेरा उल्मिफोलिया (Turnera ulmifolia) आहे. मात्र सोसायटीत ती दिसत नसे. करोना काळात मात्र अचानक घाणी वेल (Passiflora foetida) उगवली आणि हे फुलपाखरू आमच्या सोसायटीतही दिसायला लागलं नि मादीचा अंडी घालतानाचा फोटोही मला मिळाला. त्याचं निरीक्षण, मला फुलपाखरांच्या उत्क्रांतीमधील एका टप्प्याकडे घेऊन गेलं. टॉनी कोस्टर या फुलपाखरांचा संयोग होतो तेव्हा शुक्राणूबरोबर सोडलेले इतर स्त्राव नंतर घट्ट होतात, तेव्हा जनन मार्गाच्या प्रवेशाजवळ पुर्नसंयोगाला अडथळा आणणारी ‘प्लग’ सदृश्य रचना तयार होऊ शकते व दुसर्‍या नराला संयोग करणे कठीण जाते.

या प्रजातीमध्ये दोघांचे प्रजनन हितसंबध पूर्णपणे समान असतील असं नाही. मादीने अधिक नरांशी संयोग केला तर तिला ‘अनुवांशिक विविधता’ (Genetic Diversity), अधिक सक्षम शुक्राणूंची निवड व अतिरिक्त पोषक द्रव्यांचा फायदा मिळू शकतो. उत्क्रांतीच्या काळात हे अनेक कीटकांमध्ये झालेले आहे. पण नरामध्ये ‘फक्त माझाच वंश पुढे जावा’ असं असेल तर दोघांच्या हितसंबधात प्रजनन संदर्भात संघर्ष निर्माण होतो. टॉनी कोस्टरमधील हे वर्तन, लैंगिक निवड (Sexual selection), लैंगिक संघर्ष (Sexual conflict) म्हणून उत्क्रांतीच्या घडामोडीतील एक उदाहरण म्हणता येतं. फुलपाखरांचा मागोवा घेताना या अनुषंगानं उत्क्रांती काळामधला हा मोठा मनोरंजक भाग समजून घेता आला.

बहुतेक सर्व प्राण्यांना निसर्गाने स्वसंरक्षणासाठी काही ना काही अवयव हे शस्त्र म्हणून दिलेत. जशी विंचवाला नांगी, मधमाशांना डंख दिलाय, मग फुलपाखरांना काय दिलंय बरं? तर काहीही नाही! तेव्हा स्वसंरक्षणासाठी त्यांना अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या वापराव्या लागतात.तर कॉमन मॉरमॉन (बहुरूपी) नावाचं सुंदरसं, मध्यम ते मोठ्या आकाराच्या, शहरातही सहजी दिसणार्‍या या फुलपाखराच्या मादीमध्ये उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नैसर्गिक निवडीद्वारे (Natural selection) तिच्यामध्ये काही बदल झाले त्याला अनुवांशिक अनुकूलन म्हणूया. (Heritable/ Genetic adaptation) असं वर्तन फुलापाखरांच्या आणखीही प्रजातींमध्ये पहायला मिळतं. म्हणजे काय होतं, तर काही फुलपाखरांच्या अळ्या विषारी खाद्य वनस्पतींवर वाढतात आणि पुढे त्या फुलापाखरांना त्यांच्या शिकार्‍याने, पक्ष्यांनी, खाल्लं तर त्यांना गरगरतं, उलटी होते, चक्कर येते त्यामुळे ते शिकारी पुन्हा त्या फुलपाखराच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे ते फुलपाखरू बचावतं. आता काही फुलपाखरांच्या माद्या अशा विषारी म्हणजे न-खाण्यायोग्य फुलपाखराची नक्कल करतात. छद्मवेश धारण करतात व त्याला शिकारी फसतात. आणि मादीचा जीवही वाचतो. केवढी अजब गोष्ट. निसर्ग अशा किती विस्मयकारी करामती करत असतो ना!

कॉमन मॉरमॉन फुलपाखराची मादी अशी तीन वेगवेगळी फसवी रूपं धारण करते. आश्चर्य हे की, या तीनही रुपातल्या माद्यांना अंडी घालतानाच मी कॅमेर्‍यात कैद केलंय. त्यातल्या एका फसव्या रुपाला ‘सायरस’ (Cyrus) रूप म्हणतात. दुसर्‍या रुपात या मादींनी ‘कॉमन रोझ’ (Pachliopta aristolochiae) या विषारी फुलपाखराची नक्कल केली. त्याला स्टीचिअस (Stichius) रूप म्हणतात आणि ‘क्रीम्सन रोझ’ची नक्कल केली त्याला ‘रोमुलस’ (Romulus) रूप म्हणतात. दोन्ही रूपांमध्ये स्वसंरक्षणासाठी मादीमध्ये, त्या विषारी फुलपाखरांच्या पंखांवर असलेल्या नक्षीशी मेळ साधणारी नक्षी, अनुवंशिकरीत्या तिच्या पंखांवर आकार घेते. असे अनुवांशिक अनुकूलनातले बदल प्रत्यक्ष होण्यासाठी बराच मोठा काळ जावा लागतो.

पण तरीही शिकार्‍यांपासून स्वत:चा बचाव करण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे. या बदलाला ‘वॉर्निंग कलरेशन’ म्हणतात. म्हणजे विषारी (न खाण्यायोग्य) फुलपाखराच्या रंग साधम्र्याचा फायदा घेत ती शिकार्‍यांना इशारा देते की, माझ्या पासून दूर रहा. मी खाण्यायोग्य नाही. शिकारी तिच्यापासून दूर राहातात. मग गंमत अशी, की नक्कल केल्यामुळे मादीला संरक्षण मिळत असेल तर मग ‘सायरस’ हे रूप आजही का टिकून आहे? याचं नेमकं उत्तर अजून मिळालेलं नाही. तसंच ‘कॉमन वंडरर’-भटक्याच्या मादीचीही दोन फसवी रूपं आहेत आणि या दोन्ही माद्यांचे फोटो मला काढता आले हा आनंद अगदी माझा आहे.

पहिल्या रुपात ती विषारी ‘ग्लॉसी टायगर’ (Parantica aglea) या फुलपाखराची नक्कल करते आणि फिलोमॅला (Philomela) रूपामध्ये ती विषारी ‘यलो ग्लॉसी टायगर’ची (Parantica aspasia) नक्कल करते. हे रूप दुर्मिळ आहे. पण उत्क्रांतीच्या रेट्यात याचं मूळ रूप नाहिसं झालं आहे, असंही घडतंच.

फुलपाखरांच्याच नव्हे तर निसर्गाच्या जितकं जवळ जावं तितक्या नानाविध कुतूहल जागवणार्‍या गोष्टी नजरेस पडतात. त्याचा मागोवा घेण्याची तीव्र इच्छा असेल तर निसर्गातली अनेक गुपितं समजून घेता येतात आणि आपणही निसर्गाच्या अधिक जवळ जात राहतो. तर एकुणातच निसर्ग अद्भुत आहे. निसर्गाची अथांगता विलक्षण मोहात पाडणारीच आहे. मानवही या निसर्गाचाच एक घटक आहे. त्याचं संपूर्ण जीवन निसर्गावरच अवलंबून आहे. पण याचा त्याला विसर पडलेला आहे. ते भान त्याला लवकरात लवकर यावं म्हणून कालच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण मानव जातीला अपरिमित शुभेच्छा…!

भवतु सब मंगलम!

(लेखिका कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.)

urekhashahane@gmail.com