–  डॉ. समिधा गांधी

१९९१ ची दिवाळी. मी डेंटल कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांला शिकत होते. दिवाळीच्या दिवशी आईवडिलांनी माझ्याकडे माझ्या लग्नाचा विषय काढला. माझं वय होतं एकोणीस. मी अवाक् झाले. पण मग अधिक बोलणं झाल्यावर असं वाटलं, की अजून एखाद्-दोन वर्षांनी का होईना, आपल्याला लग्न तर करायचंच आहे. ज्या स्थळाचा विचार माझे आईवडील करत होते, ते स्थळ म्हणून उत्तमच होतं. आजच्या भाषेत ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’!

 माझं शिक्षण सुरू राहील आणि मला पुढे क्लिनिक चालवायला परवानगी असेल, माझं करिअर मला करता येईल अशाच घरात मी लग्न करून जावं इतकीच माझी इच्छा होती. पुढील घटना वेगाने घडल्या आणि १ जानेवारी १९९२ ला माझं लग्न झालंदेखील. माझे पती डॉ. ययाती गांधी नुकतेच ‘एम.डी.’ होऊन सायन हॉस्पिटलमध्ये ‘सीनियर रजिस्ट्रार’ म्हणून नोकरी करत होते. अतिशय शांत, समंजस आणि ऋजू व्यक्तिमत्त्व. लग्नानंतर मी माहेरी राहून माझं शिक्षण पूर्ण करावं, असंच घरातल्या मोठय़ांना वाटत होतं. पण ‘माझी बायको ही माझी जबाबदारी आहे. तिच्या शिक्षणात खंड पडणार नाही हे मी पाहीन,’ असं त्यांनी दोन्हीकडच्या मोठय़ांना सांगितलं आणि सर्वतोपरी आपला शब्द निभावला. लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाला पंधरा दिवस असताना माझ्या ‘इंटर्नल’ परीक्षेची तारीख आली. आम्ही हनीमूनवरून येण्याच्या दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती. हनीमूनला अभ्यासाची पुस्तकं नेणारं कदाचित आमचं एकमेव जोडपं असेल!

मी परत आल्यावर ती परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. त्यानंतर दीड वर्षांच्या शिक्षणात कोणतीही अडचण आली, तरी ययाती माझ्या मागे भक्कमपणे उभे होते. माझ्यासाठी आपली स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करणं त्यांनी दोन वर्षांसाठी लांबणीवर टाकलं.

लग्नानंतर दीड वर्षांत मी पहिल्या प्रयत्नात ‘बी.डी.एस.’ झाले. माझ्या इंटर्नशिपमध्ये आम्ही पनवेलला, माझ्या सासरी राहायला आलो. याच दरम्यान बाळाची चाहूल लागली. माझ्या डिलिव्हरीच्या वेळी ययातींनीदेखील दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. माझी आणि आमच्या बाळाची माझ्या आईच्या बरोबरीनं त्यांनी काळजी घेतली. मुलाच्या जन्मानंतरच ययातींनी स्वत:चं क्लिनिक सुरू केलं. हर्षवर्धन जन्माला आला तेव्हा माझी एक महिन्याची इंटर्नशिप बाकी होती. तो सहा महिन्यांचा झाल्यावर मी इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर काही महिने पनवेलच्याच सीनियर डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये काम करून क्लिनिक चालवण्याचा अनुभव घेतला.

स्वत:चं क्लिनिक काढावं अशी खूप इच्छा होती, पण मला जमेल का अशी भीती वाटत होती. ययातींचा मात्र माझ्यावर ठाम विश्वास होता. माझी डेंटल चेअर घेण्यासाठीचा पहिला दहा हजार रुपयांचा चेक त्यांनी मला दिला. मी माझं क्लिनिक सुरू केलं. अनेक नवरे जसे ‘हे काम पुरुषांनी करायचं असतं. तुला जमणार नाही. दे मी करतो,’ असं म्हणतात तसं कधीच आमच्या बाबतीत झालं नाही. अगदी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार या साऱ्यांशी बोलणं, त्यांच्याकडून कामं करवून घेणं मी निभवायला शिकले. ‘तुझ्या अडचणी सोडवायला तूच शिकायला हवंस’ हे त्यांचं ठाम मत आहे. मी गेली सत्तावीस वर्ष डेंटल क्लिनिक यशस्वीपणे चालवू शकले यात त्यांच्या प्रोत्साहनाचा आणि माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास असण्याचा मोठा सहभाग आहे.

हे इतकं छान सुरू असलं, तरी आमचं जगणं म्हणजे एक ‘रोलर कोस्टर राइड’ आहे. आमच्या दोघांचं क्लिनिक उत्तम सुरू झालं, तशी आम्हाला जागा कमी पडू लागली. २००१ मध्ये आम्ही नवीन क्लिनिकसाठी जागा घेतली. हातात फारसे पैसे नव्हते, पण आमच्या बिल्डरने ‘तुम्हाला जमतील तसे पैसे द्या’ अशी सूट दिली आणि माझ्या मोठय़ा भावानं आर्थिक मदत केल्यामुळे आम्ही ती जागा घेऊ शकलो. २००३ मध्ये आम्ही नव्या जागेत क्लिनिक सुरू केलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता, पण आत्मविश्वास होता. ययाती दिवसाचे सोळा तास काम करायचे. इतकं सारं उत्तम सुरू होतं आणि २००४ चा जुलै महिना आमच्यासाठी संकट घेऊन आला. ययातींना ‘हॉड्जकिन्स लिम्फोमा’ कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. पुढील आठ महिने आम्ही दोघं, आमचा समंजस लेक आणि संपूर्ण कुटुंब त्या कर्करोगाशी सर्व शक्तीनिशी लढत होतो. खूप आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दमछाक होत होती. कर्ज असल्यानं आणि ययाती क्लिनिकमध्ये जाऊ शकत नसल्यानं मला त्या परिस्थितीतही क्लिनिकला जाणं भाग होतं. पण आमचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी आमच्यामागे खंबीरपणे उभे होते. अनेक परीक्षेचे प्रसंग आले, पण ययाती स्वत: आजारी असूनसुद्धा मला मानसिक बळ देत होते. आणि ७ जुलै २००५ या दिवशी ययाती आजारातून पूर्णपणे बरे झाले.

आपल्या मागचं दुष्टचक्र संपलं, असा विचार करून आम्ही सुटकेचा निश्वास टाकतो न टाकतो, तोच २६ जुलै २००५ चा पूर आला आणि आमचं घर अक्षरश: धुऊन गेला. सासूबाई, सासरे आणि आम्ही सर्वानी पुन्हा ते घर उभं केलं आणि तिथे राहायला सुरुवात केली. या धक्क्यातून बाहेर पडायला आम्हाला अनेक दिवस लागले. आजही खूप जोरात पाऊस आला आणि रस्त्यावर पाणी साठलं की मी अस्वस्थ होते.

पुन्हा आयुष्य सुरळीत झालं. सगळं नीट सुरू होतं. आमचा मुलगा उत्तम मार्कानी दहावी झाला. अकरावी-बारावीचे क्लासेस आणि महाविद्यालय मुंबईत होतं आणि मुलाचा खूप वेळ प्रवासात वाया जायचा. पूर्ण चर्चेअंती मी आणि हर्षवर्धन यांनी एक वर्ष मुंबईत राहायचं आणि ययातींनी आई-पपांसोबत (माझे सासू-सासरे) पनवेलला राहायचं असं ठरलं. त्या वर्षभरात ययाती आणि मी दोन्हीकडची जबाबदारी सांभाळत होतो. आम्हाला एकमेकांसाठी वेळ देणं कठीण होत होतं, पण ययातींनी कधीही कुरबुर केली नाही. ‘कोणत्याही प्रसंगात आपण एकमेकांसाठी असूच’ हा ठाम विश्वासच आम्हाला मार्गक्रमण करायला मदत करत होता.

हर्षवर्धनला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला. कालांतरानं आम्ही नवीन घरात राहायला आलो. ययाती अतिशय नेमस्त आणि शिस्तबद्ध पद्धतीनं वागत आले आहेत. कितीही दमले असले, तरी रोज सकाळी एक तास क्रिकेट खेळायचा नेम ते मोडत नसत. पण एका क्रिकेट स्पर्धेच्या वेळी त्यांच्या छातीत दुखू लागलं. तपासणीअंती त्यांची तातडीनं बायपास करावी लागेल असं सांगितलं गेलं. आम्ही पुन्हा हादरलो. नंतर समजलं, की कर्करोगाच्या वेळेला जी केमोथेरपीची औषधं शिरेतून घेतली होती, त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या होत्या. त्याचा परिणाम आता इतक्या वर्षांनी दिसून येत होता. पुन्हा रुग्णालय, शस्त्रक्रिया, पथ्य सगळय़ाला ययातींनी धीरानं तोंड दिलं. मनाची इतकी अफाट शक्ती, की शस्त्रक्रियेनंतर बरोबर एकवीसाव्या दिवशी ते पुन्हा क्लिनिकमध्ये येऊ लागले.

 अनेक छोटय़ामोठय़ा प्रसंगांना तोंड देऊन आमचं नातं तावूनसुलाखून निघालं. आमच्यात कधी वादविवाद होत नाहीत असं नाही. आम्ही दोन भिन्न प्रवृत्तींचे आहोत. ते शांत, काहीसे अबोल, पण खूप टापटिपीचे आहेत. मी बडबडी, धडपडी आणि काहीशी अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे वादाचे प्रसंग येतात. पण सहवासामुळे, एकमेकांवरच्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे किती ताणायचं आणि कोणी माघार घ्यायची, हे आपोआपच समजू लागलं आहे.

सप्तपदी एकत्र चाललेली सात पावलं आता एकतीस वर्ष एकमेकांची साथ निभावत आहेत. ‘मीच का माघार घ्यायची’ असं न म्हणता ‘मीच का नाही?’ हा मंत्र जपत आम्ही इथवर प्रवास केला आहे..samidhaygandhi@gmail.com