गौरी जंगम, मिरज

आपल्याकडे ‘कोहम्’ या प्रश्नाची सुरुवात आपल्या जन्मापासूनच होते. पालक, कुटुंब, शाळा आणि समाज या सगळ्यांसाठी आपण कोणी ना कोणी असतो आणि ते आपल्याला आवडतही असतं. पण जशी आपल्या जगण्याला सुरुवात होते आणि मेंदू नावाचा अवयव जास्त क्रियाशील होतो, तसं ‘आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे’ या प्रश्नाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू होतो. या प्रश्नांचा प्रवास जगताना आपण ‘जगायचं कशासाठी’ या कोडय़ाजवळ कधी येऊन थांबतो हे कळतही नाही. कधीतरी ही वेळ नक्कीच येते.. अगदी सगळ्यांच्या आयुष्यात!

family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आपण कोणतीही पदवी, शिक्षण घेतलं, तरी एका समंजस, सज्ञान माणसाचं साधारण एकच स्वप्न असतं- एक समाधानी, साधंसरळ, आवड आणि अपेक्षांची पूर्तता करणारं आयुष्य! आणि हे आयुष्य आपण आपल्या कुटुंब, मित्रपरिवार आणि परिचित-अपरिचित समाजाभोवती आखून ठेवतो. पण काही वर्ष या वळणावर चालल्यानंतर एक नीरस टप्पा येतो आणि आपण वळतो आपल्या स्वत:च्या जगण्याकडे. तोपर्यंत आपला स्वर काही प्रमाणात गमावलेला असतो, तर काही प्रमाणात शिल्लक असतो, कधी तरी शोधावा लागतो. खरं तर हा टप्पा ‘स्व’पासून सुरू होऊन ‘स्व’पर्यंत (‘स्व’पाशी) संपायला हवा, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष जायला बराच उशीर होतो आणि आपण त्या चुकीला ‘बघितलेले पावसाळे’, ‘परतावा देऊन घेतलेलं शिक्षण’अशी नावं देतो.  यात फार काही वेगळं आहे असं नाही. कारण आपल्यावर अशा वळणाचं जोखड असतं, की आधी दुसऱ्याचा विचार करावा आणि मग आपला! ‘सेवा परमो धर्म:’, ‘कर्मण्येवाधिकारस्ते..’, वगैरे. त्यामुळे आपल्याला काय वाटेल, यापेक्षा इतरांना काय वाटेल या विचारांतून लांब जातच नाही. मुळात निसर्गानं प्रत्येकाला प्रत्येकाची विशिष्ट रचना, वैशिष्टय़ं, कौशल्यं, स्वभाव, गुणधर्म देऊन पाठवलं आहे. त्याला न्याय देत किंवा त्याला विकसित करतच आपण लढलं पाहिजे आणि ते नैसर्गिक आहे. पण आपण स्वत:चा जेवढा विचार करतो त्यापेक्षा जास्त इतर काय विचार करतात त्या परिस्थितीशी येऊन थांबतो. समाजानं व इतर काही व्यक्तींनी सांगितलेली तत्त्वं आपण आपली मानतो आणि बऱ्याचदा इथे गोंधळतो. उदा. मुळातच मला उत्फुल्ल, प्रसन्न राहण्याची आवड असेल, टापटीप कपडे, प्रवास याची आवड असेल, तर अशा मनोवृत्तीला संयमाचे धडे कसे रुचतील? आणि दिले तरी ते किती दिवस पचतील? आपल्याला काय हवंय, आपली अभिरुची काय, हे माणसाला मुळातच कळायला वेळ लागतो आणि स्वीकारायला तर त्याहून जड जातं. बरं, अगदी आवर्जून अशी मनोवृत्ती बदलत नाही.  चेहऱ्यावरचे एके क मुखवटे खर्रकन् उतरून त्यांचं स्वरूप कळलं तरी आपण जागे होत नाही. मात्र ते जगण्यालाच काचू लागले की आपल्या ‘स्व’चा पाया हादरून जातो. मग आपण शोधू लागतो,

‘मला जगायचंय तरी कसं?’.

माणूस एकटय़ानं कधी घडू शकत नाही. कुटुंबातील लोकांची, परिवाराची एक अनामिक छाप माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असते. त्याला धरूनच तो चालत असतो किंवा हाच मार्ग म्हणून तो ती पायवाट तुडवत असतो. त्या व्यक्तींशी असलेल्या निष्ठा, कर्तव्याप्रति असलेल्या भावना, ध्येयाकडे जाणारी वाटचाल स्वच्छ व सुस्पष्ट दिसणारी साध्यं, या साऱ्यांच्या भेंडोळ्यात सतत जगत असतो. मात्र वर्षांनुवर्ष ज्या माणसांत आपण आपलंच प्रतिबिंब पाहत असतो, तीच माणसं विश्वासघात केल्यासारखं वागू लागली तर.. त्या माणसांच्या तोंडून ‘अमुक बरोबर आहे, हा मार्ग आपला नाही’ असं आयुष्यभर ऐकलं आणि काही एका निर्णायक क्षणी हीच माणसं तो रस्ताच बदलू लागली तर? आणि हे सर्व करत असताना आपल्याला गृहीत धरून तशाच वागण्याची अपेक्षा करू लागली तर?  याच शंका आणि हेच प्रश्न आतापर्यंत आपण जगत कसे होतो आणि कुणासाठी?, आपल्या जगण्याची प्रत काय?, अशा कल्लोळाला आमंत्रण देतात आणि आपण चालू लागतो पुन्हा एकदा आपल्याच अस्तित्वाच्या दिशेनं. पण फार उशिरानं चालू झालेली ही वाटचाल साधीसुधी नसतेच आणि नसावीही. कारण त्या विचारांच्या गर्तेतून आणि भावनांच्या जंजाळातून तावूनसुलाखून निघालेला माणूस पुन्हा सहसा त्या वाटेला जात नाही. त्याला समजलेली असते आपल्या जगण्यातील गफलत. आपल्याकडे दुर्लक्ष करून, निर्थक सायास करून, भलत्याच कोंडीत अडकून गेलेलं आपलं जगणं! त्याला कळून चुकलेलं असतं, की आपण आपल्या जगण्यासाठी ठरवतो तीच पायवाट. ज्यामुळे आपल्याला द्विधा अवस्था येणार नाही तीच माझी तत्त्वं. ज्या कर्मामुळे आपल्याला आणखी दहा वर्षांनी पश्चात्ताप होणार नाही तीच माझी कर्मगती. लोकांचं काय, धन आणि  समोरची माणसं बदलली की तत्त्वंही बदलतात. आणि ते सहज स्वीकारतातही. असं जगणं असलेल्या माणसांचंही एक जग आहे. त्यांच्या परीनं त्यांना ते जमतं आणि योग्यही वाटतं. पण खरोखर स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक असलेला ,भावनांशी एकनिष्ठ असणारा एखादा माणूस अशा दुनियेत कर्मठ ठरतो. ‘तो बदलणारच नाही, त्याच्यामध्ये बदल शक्यच नाही’ अशी मुक्ताफळं ऐकून घ्यावी लागतातच, उलट त्यालाच चार शब्द (फुकाचे), समजुतीचे सांगण्याचं धाडसही या लोकांमध्ये येतं.

तसंही मन आणि बुद्धी या दोहोंमध्ये सतत संघर्ष चालू असतो. आपले कित्येक निर्णय या दोघांच्या साक्षीनंच होत असतात. मात्र मनाचा कौल कुठे आणि विचारांचा विवेक कुठे, हे सर्वस्वी त्या माणसावर अवलंबून असतं. मला असं वाटतं, की दोन्ही ठिकाणी तशीच अलिप्तता ठेवून वागणारे लोक बरेच व्यावहारिक निर्णय घेतात. ते वस्तुनिष्ठ असतील किंवा नसतीलही. एखादी प्रतिक्रिया सर्वस्वी माझी होती, ही भावना नैसर्गिक आणि बरोबर. यातून एक शहाणपण येतं, की आपल्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांना आपण आपल्या स्वत:च्या नैसर्गिक न्यायानं समोर जायचं. तो प्रसंग कितीही लहान किंवा मोठा असू दे, समोरची व्यक्ती जवळची, ओळखीतली असू दे, त्यांच्याशी माझं बोलणं हे माझं असेल, त्याची जबाबदारी, आमच्यातील नातं  टिकवण्याची ऊर्मी  माझ्या आणि माझ्याच विचारांच्या दिशेतून आलेली असेल, असा स्वच्छ दृष्टिकोन आपल्या जगण्याला नितळ बनवतो आणि आपली जगण्याची पायवाट काहीशी सुकर करून जातो.

आयुष्यात आलेले अनेक भलेबुरे अनुभव, मिळालेले फुकटचे सल्ले, वाचनातून, निरीक्षणातून मिळालेली दिशा, या सर्वाचा परिपाक एकाच वाक्यात होतो- ‘मीच माझा सोबती’! या तत्त्वाला जागून वाटचाल सुरू केली, की एक सुंदर आणि शहाणिवेचा अलिप्तपणा येतो.. पण त्याच्याशी नाळ जोडता येते. आपला प्रवास सजगतेनं आणि आयुष्याच्या परिपक्वतेकडे चालू होतो. शेवटी आयुष्याचा हिशेब करत असताना आपण आपले अनुभव तपासून पाहतो आणि ते किती खरे ठरले किंवा खोटे ठरले याचा हिशेब आपणच करत असतो. मग आपल्याच विचारांशी प्रामाणिक राहून आपण जगलो तर ते वाईट काय?.. भलेबुरे नंतर मग नियतीच्या पायाशी रुजू होईलच की!