‘‘वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून घोडय़ांच्या पाठीवर बसून मजेत रपेट करण्याच्या सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत. घोडय़ांनी जीव लावल्याच्या, त्यांनी प्रसंगी मला घोडेस्वारी करताना पडण्यापासून वाचवल्याच्या, एखादा अतिप्रिय घोडा मरण पावल्यावरच्या शोकाच्या, अशा असंख्य आठवणी.. माझं संपूर्ण जीवनच घोडय़ांच्या अवतीभोवती गुंफलेलं आहे. इतकं, की त्यांचा सहवास आणि घोडेस्वारी बंद केली, तर माझ्यातली मी पूर्वीसारखी राहूच शकणार नाही, याची मला खात्री आहे..’’ सांगताहेत अश्वारोहक, अश्वप्रशिक्षक रसिका रेड्डी.
निलगिरी पर्वतराजीमधील उटीजवळचं एक अत्यंत निसर्गरम्य स्थळ वेलिंग्टन. नुकतीच त्या स्थळाला भेट दिली, तेव्हा माझी पावलं आपोआप त्या घनदाट जंगलाकडे वळली. त्याच अत्युच्च पर्वतरांगा, घनदाट वृक्षराजीमधून जाणारा तो लाल मातीचा ट्रॅक आणि त्या ट्रॅकवर घोडय़ावरून मजेत जाणारी सहा वर्षांची चिमुरडी मी, रसिका. पंचेचाळीस वर्षांनंतरही माझ्या नजरेसमोर हे चित्र लख्खपणे उभं राहिलं आणि मी थरारले. जंगलातल्या त्या नि:शब्द शांततेनं मनाचा तळ पार ढवळून टाकला आणि त्या नि:शब्दतेत आठवत गेली ती माझी इतक्या वर्षांची घोडेस्वारी आणि माझे सारेच अतिप्रिय घोडे..
माझे वडील आर्मीत अधिकारी होते. त्यांचं पोस्टिंग वेलिंग्टनला झालं आणि तिथल्या मिलिटरी रायिडग क्लबमध्ये अवघ्या सहाव्या वर्षी मी दाखल झाले. घोडय़ांची देखभाल करणारा सईस, पोनीवर बसवून मला त्या जंगल ट्रॅकवर न्यायचा, तेव्हा माझा रोज एकच हट्ट असायचा, ‘‘तू घोडय़ाला सोड. मला एकटीला घोडा चालवायचा आहे!’’ एकदा सईसनं जेमतेम पट्टा सोडला. मी घोडय़ाला हलकेच टाच दिली आणि घोडा मस्त पळायला लागला! आता या मुलीला फेकून घोडा जंगलात पळून गेला तर.. या विचारानं सईस मटकन खालीच बसला. पण मी ठरलेल्या नेमक्या पॉइंटवर घोडा थांबवला. छानपैकी गिरकी घेऊन वळवला आणि परत जागेवर आणला. त्या क्षणी मी जो थरार अनुभवला तो अगदी आजही माझी साथसोबत करतो आहे. भीतीचा तर लवलेशही मला चाटून गेला नाही, उलट त्या क्षणापासून घोडे आणि घोडेस्वारीचा असा नाद लागला, की ते सारे घोडे माझे सोयरे सहचर झाले.
त्या बालवयातसुद्धा वडिलांनी हौसेनं आणलेलं छोटं खोगीर, पट्टा, हेल्मेट, बूट.. घेऊन मी कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे पाच वाजता गुडूप काळोखात एकटीच सायकलवरून रायिडग क्लबला निघायची. माझी आजी बंगल्याच्या फाटकात टॉर्च घेऊन उभी रहायची. तिच्या रोज त्याच त्या सूचना! ‘‘द्वाड घोडा चालवू नकोस. जीवाला जप’’ वगैरे! मी रायिडग करून घरी आले की ती माझ्यासाठी गरम दुधाचा ग्लास घेऊन उभीच असे. हळूहळू मी लहान मुलांच्या घोडेस्वारीच्या शर्यतींत भाग घेऊ लागले. या स्पर्धामधलं माझं पहिलं बक्षीस मुळी कधी चुकलं नाही. या स्पर्धामुळे माझा आत्मविश्वास वाढला. पुढे माझ्या वडिलांची बदली अहमदनगरला झाली. तेव्हा मी होते अवघी अकरा वर्षांची. तिथल्या आर्मी रायिडग स्कूलमधल्या नाठाळ घोडय़ांवर बेधडक बसून मी ट्रेनिंग घ्यायची. तिथेच माझी गट्टी जमली ‘दर्या’शी! दर्याला ‘पटरीचा घोडा’ म्हणत. तो लहान चणीचा, गडद रंगाचा आणि सुंदर डोळय़ांचा देखणा घोडा होता. त्याला वेगानं पळायचा शौक. त्यामुळे इतर मुलं त्याच्यावर बसायचीच नाहीत. रायिडग स्कूलमधला हा घोडा जणू माझ्या एकटीच्या मालकीचा झाला होता. माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम! रोज रायिडग करून घरी आले की मी डायरी लिहायची. त्यात दर्यानं आज हे केलं, ते केलं. ‘मला प्रेमानं पप्पी दिली’, ‘मी त्याला कुरवाळल्यावर त्याचं अंग थरथरलं,’ माझ्या बालबुद्धीला जे जे जाणवायचं ते ते मी दर्याबद्दल डायरीत लिहायची. आमच्या रायिडग स्कूलचे प्रमुख आमच्या या प्रेमलीला पाहून नेहमी म्हणत,‘‘रसिका, हा फक्त तुझा आणि तुझाच घोडा आहे!’’ तर त्या दिवशी रविवार होता. सुट्टी होती. त्यामुळे रायिडग झाल्यावर मी त्याला पोलो ग्राउंडवर नेलं. तिथून नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी पाणी प्यायला नेलं. पाणी प्यायला नेलं की तो पाणी न पिता पाण्याशी खूप खेळत असे. माझ्या अंगावर पाणी उडवे. मजा करी. इतर घोडे पाणी पिऊन गेले, तरी याची पाण्याशी दंगामस्ती चालूच असे. दर्याला रायिडग क्लबला सोडून मी घरी गेले. सुट्टीचा दिवस असल्यानं दर्याच्या आवडीचं रायिडगचं सामान पॉलिश करून ठेवलं. दुसऱ्या दिवसासाठी त्याच्या आवडीचा खाऊ- गाजरं, उसाचे तुकडे एका डब्यात भरुन ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी रायिडगला निघणार, तोच फोन आला, ‘दर्या रात्री मरण पावला.’ मला धक्काच बसला. मी अक्षरश: हंबरडा फोडला. हात-पाय थंड पडले. दर्या असा मरू कसा शकतो? तो मला टाकून जाऊ कसा शकतो? मला काही सुचेचना. मी डायरी काढली नि वाचत बसले. अश्रू थांबतच नव्हते. माझा लाडका दर्या! त्यानंतर अनेक घोडय़ांचं प्रेम लाभलं. पण दर्याची जागा कोणीच घेऊ शकलं नाही. त्यानंतर बरोबर बारा वर्षांनी मला मुलगा झाला. त्याचं नाव अर्णव- अर्थात दर्या. अर्णवच्या रूपानं आजही दर्या माझ्यासोबत आहे!
माझ्या हे लहानपणीच लक्षात आलंय की घोडा हा अत्यंत तल्लख प्राणी आहे. त्याच्या पाठीवर स्वार झालेला घोडेस्वार किती तयारीचा आहे, हे त्याला तात्काळ कळतं. मी नाठाळ घोडय़ांना कसं ताब्यात ठेवायचं ते कौशल्य आत्मसात करत असतानाच एक घटना घडली. शाळेला सुट्टी लागली म्हणून आत्याबरोबर महाबळेश्वरला जायचं ठरलं. त्याच्या आदल्याच दिवशी मस्त मूडमध्ये मी रायिडग क्लबला गेले. रेसकोसर्वंरचा एक घोडा आर्मीनं नुकताच घेतला होता. उस्तादनं मोठय़ा विश्वासानं त्याला माझ्या ताब्यात दिलं. मी ऐटीत त्याला एरिनात घेऊन आले. एरिनाच्या रिंगणात येताच तो माहोल बघितल्यावर घोडा रायिडग स्कूलचे धडे साफ विसरला. त्याचं वागणं एकदम बदललं आणि त्यानं अशी उंच उडी घेतली, की मी थेट पाठीवर पडले.अवघ्या काही सेकंदांत हे घडलं. घोडा स्वाराला पाठीवरून फेकतो, तेव्हा पाचशे किलोच्या त्या घोडय़ानं त्याची अवघी ताकद त्यासाठी पणाला लावलेली असते. नतीजा? माझं माकडहाड मोडलं. अंगभर मार लागला. मला हॉस्पिटलमधून घरी सोडताना डॉक्टरांनी सांगितलं, ‘‘घोडेस्वारीत माकडहाडावर भार येतो. तेच मोडलंय. आता तू घोडय़ावर बसू शकणार नाहीस.’’ त्यात नातलगांचे फोन! ‘अकरा वर्षांची कोवळी मुलगी! इतक्या लहान वयापासून हिचे असे एकेक अवयव मोडले, तर पुढे हिचं कसं होणार?’ वेदनांमुळे नव्हे, तर हे सगळं ऐकून मी इतकी प्रचंड रडत होते, की माझ्या आई-वडिलांना कळून चुकलं, की काही झालं तरी हिला आपण घोडेस्वारीपासून थांबवू शकणार नाही. एखाद्याला श्वास घेण्यापासून तुम्ही कसं बरं थांबवणार?
एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते, अशी मी अनेक वेळा घोडय़ांवरून पडले, जखमी झाले, तरी मला घोडय़ांचा कधीच राग नाही आला, भीती नाही वाटली. इतर मुलं पडली, जखमी झाली की रायिडग सोडून द्यायची. मी कधी तसा विचारसुद्धा केला नाही. म्हणूनच त्यानंतर पुढच्याच सीझनला मी ‘शो जिम्पग’च्या अत्यंत साहसी क्रीडाप्रकारात सहभागी झाले. त्यात प्रावीण्य मिळवलं. पुणे, मुंबई, बंगळूरु इथल्या स्पर्धामध्ये बक्षिसंही मिळवली. मी आजवर अनेक घोडय़ांवर रायिडग केलंय. त्यातून त्यांनी मला आत्मविश्वास दिला. माणूस म्हणून हिमतीनं जगायला शिकवलं. आयुष्यात घोडेच माझे गुरू आहेत. त्यांनी मला काय शिकवलं? आयुष्यात पडलं तरी रडायचं नाही. लागलं तरी भ्यायचं नाही. परत उठून उभं राहायचं. घोडय़ांवरून अनेकदा पडली आहे मी! पण घरी कधी सांगितलं नाही. तोंड धुऊन, मातीनं मळलेले कपडे झटकायचे आणि गुपचूप घरी यायचं. आयुष्यात शरीरानं नव्हे, मनानंसुद्धा जखमी झालं, तरी त्याचा गाजावाजा करायचा नाही. हिंमत हरायची नाही, हेच शिकले.
घोडय़ांच्या जगात अशी रमलेली असतानाच एकवीसाव्या वर्षी माझं लग्न झालं. सुदैवानं माझे पती अमेरिकेतून घोडय़ांचं पशुवैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले! त्यांचं स्वत:चं स्टड फार्म बंगळूरुला होतं. माझ्या लाडक्या घोडय़ांनीच जणू आमचं लग्न जमवलं. लग्नानंतर आमच्या सर्व घोडय़ांची सासरे आणि मी देखभाल करत असू. ब्रीडिंग सीझनमध्ये अगदी मध्यरात्रीसुद्धा पतींबरोबर मी घोडींचं बाळंतपण करायची. हे सगळं करत असताना एक गोष्ट तीव्रतेनं जाणवली, माणसांप्रमाणे घोडय़ालाही मन आहे, भावना आहेत. म्हणूनच त्यांच्याशी शारीरिक, भावनिक, मानसिक आणि वैचारिक सुसंवाद साधायला हवा. प्रशिक्षण आणि उपकरणांइतकंच त्याच्याशी तुमचा ‘कनेक्ट’ असणं महत्त्वाचं आहे.
हा ‘कनेक्ट’ कसा असतो, त्याची गंमत सांगते! असील्डर हा माझा जिम्पग एक्झरसाइजचा घोडा आहे, तर पाईनक्रेस्ट हा माझा प्लेजर रायिडगचा घोडा आहे. पाईनक्रेस्ट तीन वर्षांचा असताना मी पहिल्यांदा त्याच्यावर बसून मस्त सफारी केली. मला त्या क्षणी त्याच्याशी वेगळाच अनुबंध निर्माण झाल्यासारखं वाटलं. हे मलाच नव्हे, आमच्या इन्स्ट्रक्टरलाही जाणवलं. ते नेहमी म्हणत, ‘‘हा तुझ्याबरोबर वेगळा वागतो. इतरांबरोबर वेगळा वागतो. त्याची देहबोली, त्याचं वागणं तुझ्याशी वेगळं असतं.’’ मलाही हे सतत जाणवत होतं. मी रोज पहाटे पाईनक्रेस्टवर रायिडग करत असे. एक दिवस मी ट्रॅकवर गेले. इतरांचीही घोडेस्वारी चालू होती. माझ्यापुढे, मागे, आजूबाजूला.. मी उजवीकडच्या ट्रॅकवर होते. अचानक डाव्या बाजूनं एक घोडा वेगानं माझ्या दिशेनं येताना दिसला. मी जॉकीच्या नावानं किंचाळू लागले, ‘त्याला थांबव.. त्याला थांबव’ पण जॉकीला ते शक्य होत नव्हतं. दोन्ही घोडे प्रचंड वेगात होते. माझा घोडा अचानक थांबला असता, तर माझा तोल जाऊन मी पडले असते. तो अचानक वळला असता, तरी मी दूर फेकली गेले असते. ट्रेनर दुर्बिणीतून हे पाहात होता. आता दोन्ही घोडे एकमेकांवर आदळणार.. फार मोठा अपघात होणार..त्यानं गपकन डोळे मिटले. एवढय़ात पाईनक्रेस्ट हळुवारपणे थांबला. मला पडू न देता हलकेच त्या घोडय़ापासून दूर गेला.. मी सावकाश पाईनक्रेस्टवरून उतरले. भरल्या डोळय़ांनी त्याला घट्ट मिठी मारली. माझा इन्स्ट्रक्टर धावत माझ्याकडे आला. म्हणाला, ‘‘बेटा ये तो तेराही घोडा हैं! और किसी का नही! देखो उसने किस तरह तुम्हें बचाया.’’
पाईनक्रेस्ट आज वीस वर्षांचा आहे. आजही तो माझ्याजवळ आहे. मी त्याला माझ्या घरातला ‘ओल्ड मॅन’ म्हणते. मी तबेल्यात गेले, की तो आधी माझ्या हातातलं गाजर खातो. खुशीत अंगाला अंग घासतो. खांद्यावर डोकं ठेवून माझ्या श्वासाची लय अनुभवतो. त्याला पाठीचा त्रास आहे. म्हणून मी त्याला कधीही सईसच्या ताब्यात देत नाही. त्याचं दाणापाणी, पाठीला औषध लावून मालिश करणं हे सगळं मी स्वत: करते. मी घोडेस्वारी करून कधीही लगेच घर गाठत नाही. तासन्तास त्यांच्याबरोबर तबेल्यात बसून राहते. प्रत्येक घोडय़ाला प्रेमानं कुरवाळते. घोडय़ांना तुमच्या भावना अचूक कळतात. मी त्यांना प्रेमानं छातीशी धरलं, माझ्या हृदयाची स्पंदनं त्यांनी अनुभवली, तर माझ्या वेदना, प्रेम, राग, सगळय़ा सगळय़ा भावना त्यांना उमगतात. घोडय़ांची त्वचा खूप नाजूक असते. डास चावल्यानं त्याला गळू होतं. कधी कधी त्यांच्या त्वचेवर पुरळ येतं. अशा वेळी मी स्वत: त्यांना हलक्या हातानं औषध लावून मालिश करते. जखमेवर बँडेज करते. हे सगळं मी कधीच कोणावर सोपवत नाही. असे औषधोपचार करताना प्रत्येक घोडा आपलं शरीर माझ्या स्वाधीन करतो. मी औषध द्यायला गेले, की ‘ही मला बरी करायला आली आहे’ हा विश्वास मला त्यांच्या नजरेत दिसतो. माझ्या स्पर्शातली माया आणि काळजी त्याला जाणवते. त्यामुळे ते कधीच मला दूर लोटत नाहीत. मुळात घोडा हा प्राणी अत्यंत संवेदनशील,अत्यंत निव्र्याज आणि निष्पाप असतो. तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकणं ही त्याची आंतरिक प्रेरणा असते. नवजात बाळासारखी! वास्तविक तो तुम्हाला क्षणांत ठार मारू शकतो एवढा ताकदवान आहे. पण तो तसं करत नाही. म्हणूनच त्याला मारायचं नाही. मी कधीही त्यांच्यावर चाबूक उगारत नाही. कारण त्यांना मारणं, म्हणजे त्यांच्या आपल्यावरच्या या विश्वासाला तडा जाणं.
मला घोडय़ांचा सहवास आवडतो. त्यामुळेच मी रेसकोसर्वंर ट्रॅक जॉकीचं काम सुरू केलं. पण ते अनेकदा कठीणही असतं. एकदा मी हे काम करत होते. अचानक एक घोडा पाठीवरच्या जॉकीला फेकून, उलटा फिरला आणि प्रचंड वेगानं माझ्या दिशेनं दौडत आला आणि थेट माझ्या घोडय़ावर आदळला. त्या दोन तगडय़ा घोडय़ांमध्ये मी चिरडली गेले. माझ्या कवटी आणि हनुवटीला तडे गेले. मी बेशुद्ध पडले. संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होत होत्या. मला रुग्णालयात दाखल केलं गेलं. काही दिवसांनी मी घरी आले. डोक्याला, अंगाला पांढरं बँडेज बांधलेल्या मला पाहून माझा सात वर्षांचा मुलगा अर्णव भेदरून एकटक मला पाहात राहिला. त्याच्या डोळय़ांत कमालीची भीती होती. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, ‘‘ममा तू मला मरायला नको आहेस. तू रायिडग नको ना करूस!’’ माझे डोळे भरून आले. त्याला जवळ घेऊन मी एवढंच म्हटलं, ‘‘राजा मी रायिडग नाही करणार.. तुझ्यासाठी! पण लेकरा मग तुझी मम्मा पूर्वीसारखी कधीच जगू शकणार नाही.’’ त्याला काय कळलं कुणास ठाऊक! पण मला कळत होतं. घोडय़ांशिवाय मी जगू शकत नाही. घोडेस्वारी हा माझा आत्मा आहे! हळूहळू मी बरी झाले. पुढच्या सीझनला परत घोडय़ावर स्वार झाले. अर्णवही सगळं विसरून गेला, की त्यानं विसरल्यासारखं दाखवलं.. मला नाही माहीत!
आता अंतिम ध्येय नजरेच्या टप्प्यात आलं होतं. रेस जॉकीचं लायसन्स मिळवण्याच्या पात्रतेसाठी मी तयारी करू लागले. घोडेस्वारीमध्ये स्त्री-पुरुष हा भेद नाही. दोघांनाही सारखे निकष आणि काटेकोर नियम असतात. म्हणूनच स्त्रियांना कठोर परिश्रम करून, स्वत:ची ताकद वाढवून मजबूत बनावं लागतं. त्यासाठीच मी पौष्टिक, पण वजन नियंत्रणात ठेवणारा आहार सुरू केला. माझ्या चार पात्रता फेऱ्या व्हिडीओग्राफ केल्या गेल्या. त्यात मी अव्वल होते. आता रेस जॉकीचं लायसन्स मिळालं की मी देशातली एकमेव ‘रेस जॉकी’ स्त्री ठरणार होते. निकाल लागला आणि मला लायसन्स नाकारण्यात आलं. ज्या परीक्षकांनी ‘तुझ्यासारख्या स्त्रिया या क्षेत्रात यायला हव्यात’ असं माझा प्रवेश अर्ज स्वीकारताना म्हटलं होतं. तेच परीक्षक खेदानं उद्गारले, ‘‘मला हे लायसन्स नाकारण्याचं खूप दु:ख होतंय. पण मी त्याचं कारण तुला नाही सांगू शकत. मला माफ कर!’’ ते कारण वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक काहीही असेल! एका स्त्रीला पात्रता असूनही, तीव्र इच्छा असूनही डावललं गेलं याचं मला अतीव दु:ख झालं. मी नैराश्यात गेले. अंथरुणाला खिळले.
अखेर मी माघार घेतली. रेस जॉकी बनण्याचं माझं स्वप्न भंगलं खरं, पण घोडय़ांकडे बघण्याची माझी दृष्टीच त्यानंतर बदलली. घोडय़ांना रेसमध्ये पळवून ‘चॅम्पियन’ बनवण्यापेक्षा घोडय़ांचं जे आयुष्य आहे, ते त्यानं आनंदानं, यशस्वीपणे जगावं यासाठी मला काम करायला हवं, हे मला प्रकर्षांनं जाणवलं. त्यासाठी घोडय़ांचं मानसशास्त्र जाणायला हवं होतं. घोडय़ांच्या मानसिक आरोग्याचं रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. तिथून परतले आणि इथे ‘बास्क ट्रेनिंग सेंटर’ संस्था सुरू केली. या संस्थेत मी घोडय़ांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणकाळात नवे नवे घोडे माझ्या संपर्कात येतात. मी त्यांच्यावर केवळ शारीरिक उपचार करत नाही, त्यांच्या मनोवस्थेवर उपचार करते. असं प्रशिक्षण देत असताना माझा आश्वासक स्पर्श त्यांना बरोबर कळतो. ते मला प्रेमानं ‘किस’ करतात. त्यांचा मूड मला कळतो, तसंच त्यांना माझं मन कळतं. एखाद्या दिवशी मी उदास असेन, तर ते माझ्याशी समजूतदारपणे वागतात. दंगा करत नाहीत. एखाद्या दिवशी त्यांना पळायचा मूड नसतो किंवा स्वाराला पाठीवर बसू द्यायचं नसतं. अशा वेळी चाबूक मारून त्यांना पळवणं अमानुष आहे असं मला वाटतं. त्या मुक्या प्राण्याची भाषा आणि भावना समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करते.
माझ्यासाठी घोडा हे माझं सर्वस्व आहे. मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजते, की माझा दिवस अत्यंत आवडत्या कामात आणि माझ्या अत्यंत आवडत्या प्राण्याबरोबर- घोडय़ांबरोबर व्यतीत होतो. मला ठाऊक आहे, की घोडेस्वारी हा अत्यंत धोकादायक क्रीडाप्रकार आहे. पण धोक्याच्या प्रमाणात घोडय़ांबरोबर जगायला मिळण्याचा आनंद खूप खूप मोठा आहे. घोडय़ांकडे प्रेमभरानं पाहताना त्यांचे डोळे मला खूप खूप खोल आशयगर्भ भासतात. त्यांच्या डोळय़ांत बघितलं की अथांग समुद्रात मी पोहतेय असं मला वाटतं. त्यांच्या बोलक्या डोळय़ांतल्या या गूढ भावनांनी मला घोडय़ांची पेंटिंग्ज करायला प्रवृत्त केलं.
लहानपणापासून मी घोडय़ांची चित्रं काढते. त्यांच्या हावभावानुसार प्रत्येक चित्र वेगळं असतं. म्हणूनच ज्या लोकांना त्यांच्या स्वत:च्या घोडय़ांची चित्रं काढून हवी असतात त्यांना मी ती काढून देते. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आता त्यांचा आहे..
शब्दांकन- माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail. Com