एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणे ही मानवाची स्वाभाविक प्रतिक्रिया, कधी ती शाब्दिक असते, तर कधी कृतीतून व्यक्त होत असते. मात्र अनेकदा ही प्रतिक्रिया विचारपूर्वक नसल्यास दुसर्‍यावर नकारात्मक परिणाम करणारी ठरते. मानसशास्त्रीय भाषेत अशी प्रतिक्रिया देण्याआधी ‘जाणीवपूर्वक विचार’ (कॉन्शस थिंकिंग) आणि ‘परिणामलक्षी विचार’ (कॉन्सेक्वेन्शिअल थिंकिंग) यांचा कसा उपयोग होऊ शकतो ते सांगणारा हा लेख, आजच्या आधुनिक पालकत्वाशी आणि पाल्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी थेट संबंध जोडणारा…

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात दिल्लीच्या ‘जंतर-मंतर’वर काही महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणांच्या आंदोलनाने समाजासमोर अनेक प्रश्न उभे केले. हे आंदोलन केवळ राजकीय किंवा सामाजिक आंदोलन नव्हते. ते आजच्या तरुणांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे, त्यांच्या संताप व्यक्त करण्याच्या प्रकारांचे आणि समाजमाध्यमांशी असलेल्या त्यांच्या नात्याचेही एक मोठे उदाहरण होते. या आंदोलनात तरुणांचा उत्साह, धाडस, सर्जनशीलता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची तयारी निश्चितच दिसली. समाजमाध्यमे, रील्स, मिम्स आणि शॉर्ट व्हिडीओ यांच्या माध्यमातून आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. परंतु त्याचबरोबर काही ठिकाणी आक्रमकता, असभ्य भाषा, हिंसक वर्तन आणि क्षणिक भावनेच्या भरात केलेल्या बेजबाबदार कृतीही दिसल्या. काही तरुणांनी तयार केलेले व्हिडीओ आणि रील्स नंतर त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरले. काही स्त्री आंदोलकांना तर ऑनलाइन छळ, धमक्या आणि त्यांच्या जुन्या पोस्ट्स व छायाचित्रांचा गैरवापर यांनाही सामोरे जावे लागले. इथेच आणि एकूणच आपल्या जगण्यातील घटनांवर व्यक्त होण्याच्या आपल्या स्वभावावर एक अत्यंत महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रश्न निर्माण होतो. आपण एखादी कृती करण्यापूर्वी तिचे पुढे काय परिणाम होतील, याचा विचार किती वेळा करतो? हा प्रश्न आजच्या आधुनिक पालकत्वाशी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी थेट
संबंध आहे.

या संदर्भात दोन संज्ञा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, ‘जाणीवपूर्वक विचार’ (Conscious Thinking) आणि ‘परिणामकारक वा परिणामलक्षी विचार’ (Consequential Thinking). या दोन्ही संज्ञा उच्चारताना एकसारख्या वाटतात. दोन्हींमध्ये विचार करणं (‘थिंकिंग’) आहे. दोन्हींचा संबंध आपल्या विचारप्रक्रियेशी आहे. दोन्हींच्या मुळाशी ‘जाणीव’ आहे, पण तरीही या दोन्ही एकच नाहीत.

जाणीवपूर्वक विचार म्हणजे काय?

कॉन्शस थिंकिंग वा जाणीवपूर्वक विचार म्हणजे केवळ योग्य विचार करणे नव्हे; तर आपण जो आणि जसा विचार करतो आहोत, याची आपल्याला अंतर्मनातून पूर्ण ‘जाणीव’ असणे. आपल्या मनात सतत विचारांची ये-जा सुरू असते. कुणी आपल्याला काही सांगितले की लगेच आपल्या मनात प्रतिक्रिया निर्माण होते. कोणी आपल्यावर टीका केली की राग येतो. कोणी अपमान केला की प्रत्युत्तर द्यावेसे वाटते. एखाद्याने आपल्याला नकार दिला की आपण त्याच्याबद्दल काही तरी निष्कर्ष काढतो. पण त्या क्षणी आपण स्वत:ला एक प्रश्न विचारतो का? ‘माझ्या मनात आता या क्षणी नेमके कोणते विचार चालले आहेत?’’ हा प्रश्न विचारण्याची क्षमता, जाणीव व जागरूकता म्हणजेच ‘कॉन्शस थिंकिंग’ ही संकल्पना काहीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेली आहे.

ओशो रजनीश आणि जे. कृष्णमूर्ती यांनी विचारांकडे ‘साक्षीभावाने’ पाहण्याबद्दल सातत्याने भाष्य केले. विचार दाबणे, टाळणे किंवा थांबवणे हा त्यांचा उपदेश नव्हता. उलट, विचार चालू असतानाच त्या विचारांची ‘जाणीव’ (Awareness) विचार करणार्‍याला असावी हा त्यांचा मुद्दा होता. उदाहरणार्थ, ‘मी रागावलो आहे…’ या वाक्यापेक्षा ‘माझ्या मनात आता या क्षणी राग निर्माण होत आहे,’ हे जाणीवपूर्वक लक्षात घेणे. या दोन वाक्यांमध्ये मोठा फरक आहे.

पहिल्या अवस्थेत आपण रागाशी एकरूप झालो आहोत आणि त्याबद्दलची जागरूकता गमावून बसलो आहोत. दुसर्‍या अवस्थेत आपण आपल्याला राग येत आहे परंतु तो आपल्याला कळतो आहे. त्याकडे वस्तुनिष्ठतेने पाहू शकतो. ही जागरूकता म्हणजेच जाणीवपूर्वक विचार ‘कॉन्शस थिंकिंग’

‘परिणामलक्षी विचार’

कॉन्सेक्वेन्शिअल थिंकिंग वा ‘परिणामकारक वा परिणामलक्षी विचार’ याचा मथितार्थ बराच वेगळा आहे. त्यामध्ये, ‘मी जे बोलणार किंवा करणार आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे मला पक्कं माहीत आहे का?’ याचा विचार असतो. थोडक्यात, कृतीपूर्वी तिच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करणे. ‘मी हा मेसेज पाठवला तर काय होईल?’, ‘मी हे शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीला काय वाटेल?’, ‘मी हा रील अपलोड केला तर तो फक्त माझ्या मित्रांपुरताच मर्यादित राहील का?’, ‘आज मला हे मजेदार वाटत आहे; पण उद्या याचा काही परिणाम माझ्या प्रतिमेवर, प्रतिष्ठेवर किंवा रोजच्या जीवनावर होऊ शकतो का?’ असा विचार करणे म्हणजेच कॉन्सेक्वेन्शिअल थिंकिंग.

संताप व्यक्त करण्याचाही अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु ‘मला हे आत्ता, या क्षणी करावेसे वाटत आहे’ आणि ‘मी हे केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील, हे मला माहीत आहे,’ यामध्ये बराच फरक आहे. समाजमाध्यमे तर या फरकाला आणखीच अधोरेखित करतात. पूर्वी आपण मित्रांच्या संगतीत बोललेले एखादे वाक्य नंतर विसरले जायचे. आज तेच वाक्य व्हिडीओमध्ये रेकॉर्डबद्ध (टिपले जाते) झाले तर ते कायमचे ‘डिजिटल फूटप्रिंट’ बनू शकते. म्हणूनच आजच्या पिढीसाठी कॉन्सेक्वेन्शिअल थिंकिंग पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.

दोन्ही विचारांमधला फरक काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर जाणीवपूर्वक विचार म्हणजे ‘या क्षणी माझ्या मनात काय चालले आहे याची स्पष्ट जाणीव ठेवणे’ व परिणामलक्षी विचार म्हणजे, ‘मी जे काही करणार आहे, त्याचे ‘परिणाम’ काय होतील, हे मला माहीत आहे व मी त्यासाठी तयार आहे’ असा विचार करणे. पहिला विचारांची जागरूकता दाखवणारा आहे, तर दुसरा परिणामांविषयी जागरूकता दाखवणारा आहे. पहिला अंतर्मुख करणारा आहे. दुसरा मूल्याधारित, व्यवहाराभिमुख (practical) आहे.

पहिला आपल्याला आपल्या विचारांपासून थोडे अंतर ठेवून त्यांच्याकडे पाहायला शिकवतोे. तर दुसरा आपल्याला आपल्या कृतींचे पुढील परिणाम पाहायला शिकवतो. जाणीवपूर्वक विचार आणि परिणामलक्षी विचार या दोन्ही संज्ञा एकमेकांना कशा पूरक आहेत हे समजून घेऊया. समजा, एखाद्या मुलाला मित्राने चिडवले. त्याच्या मनात विचार आला, ‘याला आत्ता धडा शिकवला पाहिजे’ जर तो मुलगा जाणीवपूर्वक विचार करणारा असेल, तर त्याला कळते की, ‘मला खूप राग येतो आहे आणि मला त्याला आत्ता मारावेसे वाटत आहे.’ आता पुढचा टप्पा आहे परिणामलक्षी विचारांचा. ‘मी जर त्याला मारले, तर पुढे काय होईल? भांडण होईल. मारामारी होईल. यामध्ये इजा होऊ शकेल. शिक्षकांकडे तक्रार जाईल. पालकांना बोलावले जाईल. कदाचित शिस्तभंगाची कारवाई होईल. म्हणजेच आपल्याला प्रतिक्रिया आणि कृती यांच्यामध्ये थांबून बघण्याची जागरूकता व संधी हा विचार देते.

अनेक पालकांची एक तक्रार असते, ‘‘माझ्या पाल्याला काही कळतच नाही. तो आधी करतो आणि नंतर विचार करतो.’’ खरे तर हा केवळ मुलांचा दोष नाही. मुलांच्या मेंदूतील स्वनियंत्रण, impulse regulation (भावनांवर ताबा ठेवणे) आणि future consequences (दूरगामी परिणाम) समजून घेण्याची क्षमता या हळूहळू विकसित होत असतात. अनेक मुलांना ‘परिणामलक्षी विचार’ नैसर्गिकरीत्या पुरेशा प्रमाणात अवगत नसते. ते मुद्दाम शिकवावे लागते व ती जबाबदारी बर्‍याच अंशी पालकांची असते. हे शिकवण्याची पद्धतही खूप महत्त्वाची आहे. तिथेच पालक चुका करतात. पालकांनी प्रत्येक वेळी ‘हे करू नकोस, ते करू नकोस’ असे सांगण्यापेक्षा किंवा चूक केल्यावर त्यांना रागावण्यापेक्षा, प्रश्नांच्या माध्यमांतून त्यांना स्वतंत्र विचार करायला उद्युक्त करावे.

‘‘तुला काय वाटते, हे केल्याने काय होईल?’’
‘‘याचे दुसर्‍या व्यक्तीवर नेमके काय काय परिणाम होतील?’’
‘‘आत्ता तुला जे करावेसे वाटत आहे, ते केल्यानंतर पाच मिनिटांनी, पाच दिवसांनी व पाच महिन्यांनी त्याचे काय काय परिणाम होतील?’’ हे लहानपणापासून विचारलेले प्रश्न मुलांना तयार उत्तरे किंवा आज्ञा देण्यापेक्षा स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रेरणा देतात व विचार करण्याची पद्धत शिकवतात. मुलांना धाक, शिक्षा देणे, अपमान करणे या प्रकारांचा कधीच उपयोग होत नाही व त्यांचा परिणाम सांगणारा विचारसुद्धा त्यामुळे अविकसितच राहतो. भीती, धमकी व शिक्षेला न जुमानता त्याच त्याच गोष्टी करण्याकडे बंडखोर प्रवृत्ती मुलांमध्ये राहते.

जॉर्ज गुर्जिएफ आणि चोवीस तासांचा नियम : प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत जॉर्ज गुर्जिएफ यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्या पुढील विचार- विश्वावर खोलवर परिणाम करणारा ठरला. गुर्जिएफ लहान असतानाची गोष्ट. त्यांचे वडील अत्यवस्थ होते. छोट्या गुर्जिएफचे वडिलांशी जिव्हाळ्याचे नाते होते. मृत्यू जवळ आलेला असताना वडिलांनी गुर्जिएफला एक महत्त्वाची व आयुष्यभर उपयोगी पडेल अशी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘‘आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला कोणाचाही, कसलाही राग आला आणि तो राग अगदी योग्य कारणासाठी जरी आला असला, तरी कधीच ताबडतोब व्यक्त होऊ नकोस. चोवीस तास थांब. त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते कर.’’

प्रश्न राग येण्याचा नाही. राग येणे ही स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे. प्रश्न आहे, राग आल्यानंतर आपण काय करतो? रागाच्या क्षणी मन आपल्याला ताबडतोब काही तरी करण्यास प्रवृत्त करते. बोलून टाकावे, उत्तर द्यावे, आरोप करावा, शिक्षा करावी, नाते तोडावे. त्या क्षणी आपल्याला आपली प्रतिक्रिया अगदी योग्य आणि न्याय्य वाटते. पण भावना ओसरल्यानंतर त्याच प्रसंगाकडे पाहिले तर आपला दृष्टिकोन अनेकदा पूर्ण बदललेला असतो. गुर्जिएफच्या वडिलांचा सल्ला म्हणून सांगितला जाणारा हा ‘चोवीस तासांचा अवकाश’ प्रत्यक्षात भावनेला दडपण्याचा किंवा दुर्लक्षित करण्याचा नियम अजिबात नाही. तो प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा उपाय आहे.

राग आला म्हणून तो चुकीचा असेलच असे नाही. अन्याय झाला असेल, अपमान झाला असेल किंवा समोरच्याने चुकीचे वर्तन केले असेल, तर राग येणे स्वाभाविक आहे. पण आपला राग योग्य आहे की नाही, यापेक्षा त्या रागातून आपण जे काही करणार आहोत, त्याचे परिणाम काय असतील, हे आपल्याला नक्की माहीत आहे का? त्यासाठी आपण तयार आहोत का? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. इथेच ‘जाणीवपूर्वक विचार’ आणि ‘परिणामलक्षी विचार’ उपयोगी ठरू शकतात. ‘परिणामलक्षी विचार’ आपल्याला रागाच्या क्षणी स्वत:च्या रागाचे ‘गुलाम’ होऊ नका, हे सांगतो. कारण क्षणिक भावनेतून केलेली कृती कधी कधी कायमस्वरूपी परिणाम निर्माण करू शकते. भावना क्षणाची असते; पण तिच्यातून केलेली कृती अनेकदा आयुष्यभर पुरून उरणारी असते. म्हणूनच काही वेळा सर्वांत शहाणपणाची प्रतिक्रिया म्हणजे तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया न देणे. चोवीस तास थांबणे म्हणजे दुर्बलता नाही. उलट त्या चोवीस तासांत आपण आपल्या भावनेवर नव्हे, तर स्वत:वर विचारपूर्वक नियंत्रण मिळवत असतो.

म्हणूनच आजच्या ‘जेन झी’ तरुणांसाठी हा लेख आहे. तो तरुणांच्या प्रचंड ऊर्जेला दिशा देण्याचा प्रयत्न करणारा आहे. कारण ऊर्जा असणे ही ‘ताकद’ आहे; पण त्या ऊर्जेच्या परिणामांची ‘जाणीव’ असणे ही ‘परिपक्वता’ आहे. मत असणे महत्त्वाचे आहे. ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. पण ते व्यक्त करण्यापूर्वी आपल्या विचारांची आणि परिणामाची जाणीव असणे महत्त्वाचे.

आजच्या वेगवान, डिजिटल आणि अत्यंत प्रतिक्रियाशील जगात कदाचित आजच्या पिढीतल्या मुलांना शिकवण्याची सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच आहे. वाटणे आणि तसे वागणे यांच्यामध्ये ‘विराम’ घेणे मुलांना शिकवणे गरजेचे आहे. शेवटी शहाणपण म्हणजे विचार न करणे नाही. शहाणपण म्हणजे, विचार करताना आपल्या विचारांची जाणीव ठेवणे आणि कृती करण्यापूर्वी त्या कृतीच्या परिणामांचा विचार करणे.
urajanbhonsle@gmail.com