‘शालेय शिक्षणाचा ओनामा’ हा डॉ.वृषाली देहाडराय यांचा १४ मेच्या पुरवणीतील लेख वाचला. पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची घाई झालेली असते, हे वास्तव आहे. अशी कमी वयाची बालके इयत्ता पहिलीत दाखल केली तर पुढे ती शाळेत नेतृत्व करण्यात देखील कमी पडतात. पुढच्या इयत्तांमध्ये ही बालके घरी स्वयंअध्ययन करू शकत नाहीत. त्यांना यासाठी खासगी शिकवणीवर्ग किंवा पालकांना रोज घरी अभ्यास घेऊन या कुबडय़ांचा आधार द्यावा लागतो. शाळेत अभ्यासाचा ताण तर त्यांच्यावर पडतोच, तसाच पालकांना देखील घरी अभ्यास घेण्याचा ताण पडतो. माझ्या शाळेत दरवर्षी जूनमध्ये साडेपाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे ४ ते ५ तरी पालक ‘प्रवेश द्या’ म्हणून येतात पण समजावल्यावर त्यांना ते पटते. अशी मुले पुढच्या वर्षी साडेसहा वर्षांची असतात. अशा मुलांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते. ही मुले शाळेत व घरी त्यांच्या स्वत:च्या गतीने, कुठल्याही कुबडय़ांशिवाय शिकतात. असा प्रयोग मी माझ्या शाळेत गेल्या १५ वर्षांपासून करत आहे. एकूणच लेख पालकांना व शिक्षणक्षेत्राला मार्गदर्शक ठरणारा आहे. – संजीव झेंडू सावकार

प्राणीप्रेमींचे लेख आनंददायी
अश्वप्रेमी रसिका रेड्डी यांचा अश्वांवरील निर्व्याज प्रेम दर्शविणारा अतिशय हृदयस्पर्शी आणि माधुरी ताम्हणे यांनी सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेला लेख (३० एप्रिल) वाचला आणि सकाळ अतिशय आनंददायी झाली. हा आनंद दिल्याबद्दल लोकसत्ता व लेखिकेचे खरोखर मनापासून आभार. दर शनिवारची सकाळ ‘सोयरे सहचर’ हे साप्ताहिक सदर वाचून आनंदित होतेच, मात्र हा लेख मनाला चिटकला! एक तर रसिका रेड्डींचा हेवा वाटतो. माणसाच्या मनाला जे आवडते ते संपूर्ण आयुष्यभर करायला मिळणे यापेक्षा आणखी काय हवे आयुष्यात आणि त्यातही जोडीदारसुद्धा त्याच क्षेत्रातील मिळणे हे भाग्यच! आमच्या घरीही एक मांजर पाळलेली आहे जिच्या येण्याने आमचे आयुष्य निर्व्याज, निष्पाप प्रेमाने भरून निघत आहे. हा शब्दातीत अनुभव आहे. असेच अनुभवसंपन्न प्राणीप्रेमींचे लेख दर शनिवारी अव्याहतपणे वाचायला मिळो आणि आमचे आयुष्य ते वाचून तृप्त होवो ही कामना.-आशीष सिरसोकर