daanदोन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांनी समृद्ध, पाच हजार वाचकसंख्या असणारं वातानुकूलित ‘ग्रंथसखा’ वाचनालयआणि त्यातूनच निर्माण झालेल्या चळवळीतून मायबोलीचं जतन करण्याचं, ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या शाम जोशी सर आणि त्यांच्या नानाविध उपक्रमाविषयी.

मदर तेरेसांच्या कोलकत्यातील आश्रमात प्रथमदर्शनी एक सुविचार लिहिला होता, , Give till it hurts  म्हणजे स्वत:ची सोय पाहून, आपलं पोट भरल्यावर केलेल्या दानापेक्षा, स्वत:ची गैरसोय सोसून, स्वत:ला कितीही कष्ट पडले तरी दुसऱ्याला मदत करणाऱ्याचा त्याग हा अधिक मोलाचा असतो. या प्रणालीनुसार जीवन जगणाऱ्या मोजक्या दीपस्तंभांपैकी एक नाव म्हणजे बदलापूर येथील ‘ग्रंथसखा’ वाचनालयाचे संस्थापक शाम जोशी. (जोशी सर) वाचन चळवळीच्या अफाट प्रेमापोटी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीतून मिळालेले सर्व पैसे ओतून, एवढंच नाही तर पै पै साठवून बांधलेला राहता बंगला विकून, तेवढंही पुरलं नाही म्हणून वर कर्ज काढून जन्माला आलेला त्यांचा ‘ग्रंथसखा’ हा उपक्रम म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक अनमोल ठेवा आहे.
शासकीय अनुदान न घेता, अगदी कमी वर्गणीत सुमारे ५००० वाचक-सभासदांना वाचनप्रेमात बांधून ठेवणारं ‘ग्रंथसखा’ हे ठाणे जिल्ह्य़ातील एकमेव वातानुकूलित ग्रंथालय आहे. या वाचनालयाच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे २००४ साली या वाचनवेडय़ा माणसाने स्वायत्त मराठी विद्यापीठाचा जो संकल्प सोडला होता तो आता २०१५ साली पूर्णत्वास येतोय. येत्या २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी या विद्यापीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. बदलापूर स्टेशना (पूर्वेला) लगत असलेल्या ‘ग्रंथसखा’मध्ये पाऊल ठेवताना आत शिरणारा प्रत्येक जण बाहेर चपला-बूट काढूनच या ज्ञानमंदिरात शिरत होता तरी अशा सूचना देणाऱ्या पाटय़ा-सूचना यांचा तिथे मागमूसही नसताना. २०० रुपये डिपॉझिट व ६० रुपये मासिक वर्गणीत इथे हजार रुपयांचं पुस्तकंही वाचता येतं. साडेचारशे दिवाळी अंकांची मेजवानी पुढच्या दिवाळीपर्यंत सुरू असते. उन्हाळी सुट्टीत बालसाहित्याचा बालधमाका मोफत. रजिस्टर धुंडाळा आणि मग पुस्तकाची मागणी करा असा प्रकार इथे नाही. विषयवार, लेखकांनुसार लावलेली पुस्तकं तुम्ही स्वत: हाताळू, निवडू शकता. मदत लागली तर इथले कर्मचारी तत्पर आहेतच.
दोन लाखांच्या आसपास पुस्तकं, दुर्मिळातील दुर्मीळ दिवाळी अंक, जवळजवळ दहा हजार दुर्मीळ मासिकांचा संग्रह, साहित्य संमेलनाच्या पत्रिका सुमारे ५५ दोलामुद्रिते(म्हणजे १८६७चा मुद्रणविषयक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची मुद्रिते) हे ‘ग्रंथसखा’चे वैभव आहे. १९०९ साली प्रसिद्ध झालेला पहिला दिवाळी अंक ‘मासिक मनोरंजन’ इथे दिसला, तोही नीटनेटक्या अवस्थेत, तेव्हा शाम जोशी ही काय चीज असावी याची थोडीफार कल्पना आली.

याची सुरुवात कशी झाली, या प्रश्नावर जोशी सर म्हणाले, ‘माझे वडील साने गुरुजींबरोबर काम करणारे. त्यांचे भक्तच म्हणा ना! साने गुरुजींचे संस्कार म्हणजे वाचन. त्यामुळे घरात पुस्तकंच पुस्तक. त्यांच्या सहवासातच आमचं संगोपन झालं. मोठा भाऊ हरी जोशी लेखक. त्याने लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रहही घरी होताच. शिवाय वाचनाच्या वेडातून नोकरी सुरू झाल्यावर पगार झाला की, पुस्तकं खरेदी करण्याचं माझं सत्र सुरू झालं. असं करता करता घरात दहा हजारांवर पुस्तकं जमा झाली. वडिलांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक म्हणून काय करता येईल या विचारातून ‘निसर्ग ट्रस्ट’ स्थापन केला आणि या ट्रस्टच्या माध्यमातून २००४च्या गुढीपाडव्याला ‘ग्रंथसखा’चा जन्म झाला.’
 दुर्मीळ पुस्तकं मिळवण्याच्या छंदाबद्दल ते म्हणाले, ‘रद्दीचं दुकान म्हणजे आम्हा पुस्तकप्रेमींसाठी अलिबाबाची गुहाच!  १९३२ मे १९३४ सालचे ‘अभिरुची’ मासिकाचे दहा-बारा अंक २००८ साली मिळाले. त्या काळची सत्तर पैसे किमतीची ती दुर्मीळ मासिकं मी रद्दीतून प्रत्येकी सत्तर रुपयांना उचलली. आता अनेक रद्दीवाल्यांचे नंबर माझ्यापाशी आहेत. त्यांच्या संपर्कातून अवचित काही तरी गवसून जातं.’ परंतु केवळ संग्रह करणं हे ‘गं्रथसखा’चं उद्दिष्ट नव्हतं, आजही नाही. वाचकांची अभिरुची वाढवण्यासाठी इथे सतत वेगवेगळे उपक्रम आयोजले जातात. उदा. दिवाळी अंकांच्या शताब्दी वर्षांत जोशी सरांनी पहिल्या दिवाळी अंकापासून आजच्या अंकापर्यंत विविध टप्पे दाखवणारं प्रदर्शन भरवलं. पदरमोड करून ते ठिकठिकाणी नेलं. त्यासंदर्भात व्याख्यानं दिली. या उपक्रमाचा एक फायदा असा झाला की, अनेकांनी आपली पुस्तके दिली. रवींद्र पिंगे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने दोन टेम्पो भरेल एवढं साहित्य ‘ग्रंथसखा’कडे पाठवलं. त्यातून ‘कै. रवींद्र पिंगे दालन’ तयार झालं. अशी अनेक ‘स्मृती गं्रथ दालनं’ इथे आहेत.
२०१३ ला बदलापुरात ते ३९ वं महानगरीय साहित्यसंमेलन झालं त्याचं आयोजन ‘ग्रंथसखा’नेच केलं होतं. आजी-माजी संमेलनाध्यक्षांना बोलावून त्यांच्या साहित्याचा महोत्सव करणं तर गेल्या ४-५ वर्षांपासून सुरू आहे. आता तर ‘ग्रंथसखा’ला सांस्कृतिक मंच म्हणावं इतके कार्यक्रम इथे होत असतात. वाचक अभिरुची वाढवण्याबरोबर साहित्यविषयक दस्तऐवजीकरण या हेतूने सुरू केलेल्या ‘विश्वसखा’ प्रकाशनातर्फे आजवर ९ पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलंय. गोऱ्यांना मराठी भाषा यावी म्हणून विल्यम कॅरी या लेखकाने लिहिलेलं ‘ग्रामर ऑफ मरहट्टे लँग्वेज’ हे मराठी व्याकरणावर छापलं गेलेलं पहिलं पुस्तक इथं दिसलं.
 स्वायत्त मराठी विद्यापीठाचा विषयावर बोलताना ते म्हणाले, ‘दहावीनंतर साधारणपणे मुलांचा मराठी भाषेशी केवळ बोलण्यापुरताच संपर्क राहतो, पण त्यापैकी अनेकांना मराठीविषयी प्रेम असतं, कुतूहल असतं ते पूर्ण करण्यासाठी  हे विद्यापीठ आहे. ज्यांना अभ्यास करायचा आहे ते इथं येऊन राहू शकतात, भरपूर वाचू शकतात. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. डॉ. द. भि. कुलकर्णी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं इथे स्वयंप्रेरणेने मराठीचा अभ्यास करतील हा जोशी सरांचा विश्वास अनाठायी नाही, कारण उद्घाटन होण्यापूर्वीच १७ जणांची नाव नोंदणी झाली आहे.
केवळ आपल्या मायबोलीचं जतन व्हावं या एकाच प्रेरणेतून स्वत:चं सर्वस्व पणाला लावून उभ्या केलेल्या या प्रकल्पामागील जोशी कुटुंबाच्या समर्पणाची कथा तिथल्या वाचक सभासदांच्या तोंडून ऐकली. पती-पत्नी दोघेही शिक्षक. पैसे जमा होतील तसं थोडं थोडं बांधकाम करत बंगला बांधला. यात १५ ते २० वर्षे गेली. एवढं करूनही या वास्तूत राहिले किती दिवस? तर जेमतेम दीड वर्षे. ‘ग्रंथसखा’ सुरू करण्यासाठी, हौसेने बांधलेल्या या घराला तिलांजली दिली. तेव्हापासून गेली १० वर्षे हे कुटुंब आपलं बिऱ्हाड पाठीवर घेऊन ११/११ महिन्यांच्या भाडेकरारावर इथं-तिथं राहतंय. घरात उंची वस्तू नाहीत की अंगावर मौल्यवान दागिना नाही. आयुष्यात चैन केली ती फक्त पुस्तकांची. या उपद्व्यापातून काहीही मिळत नाही. उलट टाकत राहावं लागतं. तरीही केवळ सरच नव्हे तर त्यांची पत्नी रोहिणी जोशी, मुलगा, सून सगळेच एका विचाराचे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही म्हणतात, ते उगीच नव्हे.     
waglesampada@gmail.com
संपर्क- ग्रंथसखा वाचनालय,
तेलवणे टॉवर्स,
बदलापूर (पूर्व), जिल्हा ठाणे
 शाम जोशी- ९३२००३४१५६

Story img Loader